Menu

पुनरारंभ

199281

ॐ कार जगत

Please Download here!                                           

ॐ कार जगत

              प्रत्येक शुभ कार्याचा प्रारंभ आराध्य आद्य दैवत,  गणाधीश, श्री. गणेशाचे पूजनाने केली जाते. सांस्कॄतिक क्षेत्रातही नाटयकला विष्कार  सादर करण्यापूर्वी “ हे गणनायक सिध्दी विनायक नमन पहिले तुला गणेशा” अशा नांदीने केली जाते.  “ॐकार प्रधान रूप गणशाचे,  हे तिन्ही लोकांचे जन्मस्थान”.  या श्री. गणेश प्रार्थने मध्ये स्पष्टच आहे,  श्री. गणेश ॐकार रूप आहे. याचा संदर्भ श्री गणपती अथर्वशीर्षाच्या 7 व्या श्लोकात  आढळतो.  तो येणेप्रमाणे :

                        गणादिं पूर्वमुच्चार्यवर्णादिं |

                         तदनंतरं | अनुस्वार: |  परतर: |

                        अर्धेन्दुलसितम् | तारेण रूध्दम् |

                         एतत्तव मनुस्वरूपम् |

                        गकार: पूर्वरूपम् |

                        अकारो मध्यमरूपम् |

                        अनुस्वारश्र्चान्त्यरूपम् |

                         बिन्दुरूत्तररूपम्  |

                         नाद: संधानम् |  संहिता संधि: |

                         सैषा गणेशविद्या |  गणक ऋषि: |

                         निचॄद्गायत्री छन्द: |  गणपतिर्देवता |

                         ॐ गं गणपतये नम: |

          या प्रमाणेच अनेक देव देवतांच्या पूजनाचे मंत्रोपचार व प्रार्थनांची सुरवात ॐ उच्चारणाने केली जाते. उदा. मंत्रपुष्पांजली “ॐ यज्ञेन यज्ञ देवास्तानि धर्माणी प्रथमान्यासन………”| प्रार्थना ॐभद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा:| भद्रंपश्येमाक्षभिर्यजत्रा: ……………” आदि.  पुरूष सुक्त व श्रीसुक्ताची सुरवात देखिल ॐ नेच केली जाते.

प्रसिध्द गायत्री मंत्र  “ॐ भूर्भुव:स्व: ॐ तत्स वितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि |  धियो योन: प्रचोदयात् ||

             या मंत्राच्या प्रारंभी असलेले ॐ हे अक्षर परब्रम्हाचे प्रतिक आहे. निर्गुण  निराकाराच्या सगुण साकार रूपाचा अविष्कार.  निर्गुण सगुणांची संधी.  तोच विश्वारंभ कारक पहिला ध्वनि व त्या पासूनच सारे विश्व निर्माण झाले.  जसा बिजात संपूर्ण  वॄक्ष सामावलेला असतो व योग्य सहकारी कारणे लाभताच अंकुर, रोपटे वगैरे रूपांनी विस्तार पावतो तसेच हे सर्व प्रचंड विस्ताराच्या विश्वाचे बीज आहे.                                                

              “ॐ” हा अ ,ऊ, व म या तीन अक्षरांपासून निर्माण झाला आहे. ॐ उच्चारतांना प्रथम तोंडाचा चंबू होतेा.  तर अंतास ‘म’ चा उच्चार करतांना दोन्ही ओठ एकमेकास मिळतात.

              ध्यान धारणेशी याचा जवळचा संबंध येतो.  या बाबतीत भगवद्गगीते मध्ये ध्यान धारणा कशी करावी याचा उल्लेख आढळतो.

                  सर्वद्वाराणि संयम्य मनो ॐ हृदि निरूध्यच |

                  मूध्नर्याधायात्मन: प्राणमास्थितो योग धारणाम || (अध्याय 8,श्लोक 12)

              अर्थात् सर्व इंद्रियांचे नियमन करून, हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायु मस्तकामध्ये ठेउन, सर्वेंद्रिंयांची निग्रहाची कवाडे बंद करून योग चरणात स्थित होत ध्यान धारणेस बसावे.  पुढे असे देखिल म्हटले आहे.  

                  ओमित्येकाक्षरं ब्रम्ह व्याहरन्मामनुस्मरन्  |

                  य: प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्  || (अध्याय 8,श्लोक 13)

              अर्थात् ॐ या एकाक्षरि ब्रम्हाचा उच्चार करित व स्मरण करित जो देहाचा त्याग करतो, तो अत्यंत श्रेष्ठ गतीला पावतो.

                 वर सांगितल्या प्रमाणे ध्यान धारणेस ॐ ला खूप महत्व आहे.  कित्येक ठिकाणी ध्यान धारणे साठी मध्यभागी केंद्र बिंदु भोवती समांतर अनेक वर्तुळे काढलेला बोर्ड वापरला जातो. बोर्डाच्या मध्यभागी शून्यावर नजर स्थिर करून ध्यान धारणा केली जाते.  याची संकल्पना या ॐ रूपी केंद्र बिंदुवरच आधारित आहे.

               आपल्या शरीरात ॐ चे स्थान उंच कपाळावर दोन्ही डोळ्यांच्यां मध्ये आहे. म्हणूनच कुंकुम तिलक कपाळावरच करण्याची प्रथा आहे.

            ॐ च्या उच्चारणाने आपल्या शरीरास अनेक फायदे होतात.

            ॐ च्या उच्चारणाने शरीराच्या अनेक व्याधी पासून मुक्तता होउ शकते .

            ॐच्या उच्चारणाने मणक्यांचा आजार असल्यास त्या पासून सूटका मिळते.

             ॐच्या उच्चारणाने  निद्रा नाश असल्यास व शांत झोप येत नसल्यास शांत झोप लागते.  

                ॐ चे उच्चारण रोज सकाळी केल्यास अधिक ऑक्सिजन प्राप्त होतो व शरीरास शक्ती मिळते.

               ॐ च्या उच्चारणाने पोटात स्पंदन तयार होउन पचनशक्ती सुधारते.

               ॐ च्या उच्चारणाने शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

               ॐ च्या उच्चारणाने  छातीतील धडधड व भीती दूर होते.

               ॐ च्या उच्चारणाने  ताण तणाव दूर होउन मानसिक शांती मिळते.                                                                                    

           ॐ चे उच्चारण हे एक असे माध्यम आहे ज्यामुळे मेंदुच्या हालचाली जलद हाउन एकाग्रता वाढविण्यास मदत करते.

           या साठी रोज ॐ उच्चारण करणे जरूरीचे आहे.  

               ॐ चा संबऺध पूर्ण ब्रम्हांड अर्थात तीनही लोक स्वर्ग, मॄत्यु व पाताळाशी जोडला आहे.  भगवान श्रीकॄष्णाच्या बाल पणीच्या लीला सांगतांना म्हटले गेले की, एकदा भगवान श्रीकॄष्णाने खेळतांना माती भक्षण केली.  हे यशोदा मातेच्या लक्षात आल्यावर तिने त्यास तोंड उघडण्यास सांगितले.  भगवान श्रीकॄष्णांनी तोंड उघडले पण तोंडातील दॄश्य पाहून माता यशोदा अचंभित झाली व पाहतच राहिली.  तिला भगवान श्रीकॄष्णाच्या मुखात माती ऐवजी अखंड ब्रम्हांड दिसले.   

               ब्रम्हांडाचा आकार ॐ या अक्षरासारखा गोल आहे.  या ॐ पासून निर्माण झालेले सूर्य, चंद्र.  पॄथ्वी, ग्रह,  तारे हे सर्वच गोल आकाराचे आहेत.  हे सर्व अवकाशात एकमेकाभोवती वर्तुळाकार फिरत आहेत. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब देखिल गोल रूप धारण करूनच पॄथ्वीवर पडतो.  या वरूनच शून्याचा जन्म झाला असे म्हटल्यास गैर ठरणार नाही.  हा शून्य म्हणावा तर किंमती आहे व म्हणावा तर काहीच किमत नाही.  १  या आकडयाच्या आधी कितीही शून्य जोडले तर त्या एकाची किंमत वाढत नाही परंतु याच १ आकडयाच्या नंतर एखादा जरी शून्य लावला तर त्या एकाची किंमत वाढते व जस जसे शून्य वाढविले तस तशी याची किंमत पण वाढते.   या एकाला स्थूल रूपी मानून ॐ नामक प्राणाची जोड मिळाल्यास स्थूल रूपास सजीवता प्राप्त होते व तोच शून्य काढून घेतल्यास निर्जीव होतो.                          

               दैनंदिन जिवनात देखिल वाहनाची चाके ज्यावर वाहने धावतात ती गोलाकार आहेत.  उद्योग व्यवसायात वापरण्यात येणारी मशिनरी पण गोलाकार  चक्रावरच चालते.  ही  या ॐची वैशिष्टये आहेत.

           ॐचा संबध संपूर्ण ब्रम्हांड अर्थात तीनही लोक स्वर्ग, मॄत्यु व पाताळाशी असल्याने प्रार्थना करूया !

                            सर्वेत्र सुखीः निसंतू सर्वे संतू निरामया |

                            सर्वे भद्रानी पश्यंतू मा कश्चित् दुःख ना भवेत् ||

            या तीनही लोकी सदैव सुख व शांति नांदो.

                                        हरी ॐ शांती :  शांती :  शाती :

Go Back

Comment