Menu

पुनरारंभ

199275

भाव, भक्ती, मुक्ती

Please download here !!

 

 भाव, भक्ती, मुक्ती       

           असे म्हटले जाते “हरी भक्तीचा भुकेला” आहे. हरी अर्थात परमेश्वर. परमेश्वर हा केवळ भक्तीचा भुकेला आहे. त्यास कोणत्याही प्रकारची संपत्ती, धन, पैसा, अडका नकोय. तो साक्षात् जगज्जेता, जगद्व्यापी, जगदीश्वर आहे. या सॄष्टिचा निर्माता पालनकर्ता आहे. त्याचे जवळ सर्व काही आहे. मनोभावे तन व मन एकत्र करून शांत चित्ताने दोन हात व एक मस्तक त्याच्या चरणी ठेउन केलेला नमस्कार त्याला पोचतो व प्रसन्न होतो. अशा परमेश्वराचे चिंतन करण्यास भक्ताच्या मनात त्याच्या विषयी श्रध्दा, भाव, भक्ती व एकाग्राता असणे फार महत्वाचे असते. श्री, गणेशाची आरती गातांना गायले जाते “दर्शन मात्रेमान शरणे मात्रेमान कामनापुर्ती. जयदेव जयदेव.” देवाधिदेव गणपती सुखकर्ता दु:खहर्ता आहे. तो भक्तांच्या दु:ख वेदना जाणतो. अशा देवाधिदेवाच्या केवळ दर्शनाने व त्याला मनोभावे शरण जाण्याने भक्तांचे दु:ख निवारण होतात.

      संतश्रेष्ठ श्री. ज्ञानदेव रचित हरिपाठामध्ये म्हटले आहे ”भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती बळेविण शक्ती बोलू नये.  कैसेनी दैवत प्रसन्न त्वरीत उगाराहे निवंत शिणसी वाया॥” भावाशिवाय भक्ती नाही व भक्ती शिवाय मुक्ती नाही. मुक्ती शिवाय जन्म मरणाच्या फे–यातून सूटका नाही. जर मनात भावच नसले तर उगाच परमेश्वरापुढे नुसते नतमस्तक होणे व्यर्थ.  परमेश्वराची प्रसन्नता हा पुढचा भाग आहे. भाव भक्तीचा अजून उलगडा करित ज्ञानेश्वर माउली म्हणते “ त्रिवेणी संगमी नाऩा तीर्थे भ्रमी, चित्त नाही  तरी ते व्यर्थ|” आपल्या हातून कळत न कळत झालेल्ल्या पापांचे क्षालन करण्यास तसेच भक्ती मार्गातील एकभाग म्हणून त्रिवेणी संगमावर पवित्र जलाने स्नानासाठी गेलात, चार धाम यात्रा करायला निघालात पण चित्त जर थारावर नसेल तर ती चार धाम यात्रा व गंगा स्नान व्यर्थच नाही काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पण समाज प्रबोधन करताना म्हणतात, “ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशाने भेटायचा नाही रे”  जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज उपदेश करित म्हणतात “ न लागती सायास जावे वनांतरा,  सुखे येतो घरा नारायण, ठायीच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा ॥  परमेश्वराचे मनन चिंतन करण्यासाठी संसार सोडून कोठेही रानावनात जाण्याची गरजच काय| घरातच एक जागी बसून शांत चित्ताने केलेले नामस्मरण, केलेली उपासना भक्ती त्याला पोचते.

           संतश्रेष्ठ श्री|ज्ञानेश्वर माउली म्हणतात, “असोनी संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा | संसारात राहून तुझे नित्य कर्म, कुळ धर्म, कुळाचाराचे पालन करित, पुजा पाठ करित जातीपातीचा अहंभाव मनी न धरता तु इश्वराचे चिंतन करू शकतो.

 इंद्रिये न कोंडी । भोगाते न तोडी ।

अभिमानु न संडी । स्वजातीचा ॥ ११५ ॥

कुळधर्म चाळी । विधिनिषेध पाळी

मग सुखे तुज सरळी । दिधली आहे ॥ ११६ ॥

परि मन वाचा देहे । जैसा जो व्यापारू होये ।

तो मी करितु आहे । ऐसे न म्हणे ॥ ११७॥

अर्थात् इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषय भोग टाकू नकोस, किंवा आपल्या जातिकुळा. अभिमानही सोडू नकोस. तुझे कुलधर्म, कुलचार यांचे निष्ठेने पालन कर. शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे, ती कर्मे कर. ज्याचा निषेध केला आहे, ती कर्मे करू नकोस, एवढे केलेस म्हणजे सुखाने तुला वागायला मोकळीक आहे.  परंतु कायिक, वाचिक, मानसिक ही जी नित्यकर्मे तुझ्याकडून घडतील ती सर्व मी करतो असे म्हणू नकोस.

 परमेश्वराच्या भक्ती बद्दल विषद करतांना हरिपाठात म्हटले आहे.

               सगुण निर्गुण गुणाचे अगुण।  हरीविण मन व्यर्थ जाय ।

               अव्यक्त निराकार नाही ज्या आकार। जेथोनी चराचर हरीसी भजे ॥

परमेश्वर अव्यक्त निराकार आहे. तो चराचरात जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्व ठिकाणी आहे. व्यक्त अर्थात सगुण, म्हणजे परमेश्वराची मूर्त स्वरूपात मुर्ती ठेउन केलेली भक्ती तर अव्यक्त अर्थात निर्गुण म्हणजे काल्पनिक चराचरात वसलेल्या परमेश्वराची भक्त बाळ प्रल्हादाने केलेली भक्ती. कोणत्याही प्रकारची सगुण निर्गुण अशी मनोभावे, शांतचित्ताने केलेली भक्ती परमेश्वरास मान्य आहे.

        माउली अधिक विषद करित म्हणतात,

        तरि व्यक्त आणि अव्यक्ता हे तुचि एक निभ्रांत ।

        भक्ती पाविजे व्यक्ता अव्यक्त योगे ॥ २३ ॥

        या दोनी जी वाटा तूंते पावावया वैकूंठा ।

        व्यक्ताव्यक्त दारवंठा रिगिजे येथे ॥ २४ ॥

अर्थात् व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी संदेह नाही.  भक्तीने व्यक्त रूपाची (सगुण रूपाची) योगाने अव्यक्त (निर्गुण रूपाची) प्राप्ती होते. हे वैकुंठ नायका तुझ्या ठिकाणी विलीन होण्याचे हे देान्ही मार्ग आहेत. यामार्गाचे सगुण निर्गुण हे दोन उंबरठे आहेत.

 

           भक्त कोणास म्हणावे? जो परमेश्वराची सगुण अथवा निर्गुण अशी कोणतीही उपासना, आराधना अथवा पूजा अर्चा मनोभावे एकाग्रचित्ताने करता, तो परमेश्वराचा भक्त. हरीपाठामधील ओवींनुसार,

           पर्वताप्रमाणे पातक करणे ।

           वज्र लेप होणे अभक्तासी ।

          नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त ।

          हरीसी न भजत दैवहत ॥

          अनंत वाचाळ बरळती बरळ ।

          त्या कैसेनी दयाळ पावे हरी ॥

सदैव अपशब्द उच्चारणे, क्रूर कर्म करणे, दूस–याला त्रासदायक कलेशदायक वक्तव्य अथवा क्रीया करणे अशी अनेक पापे करून आपल्या भोवती पापांचा डोंगर रचणारा, ज्याचे मनी कदापि हरी भक्तीची भावना जागॄत होत नाही व हरीनाम उच्चारत नाही तो अभक्त. अशा पापी माणसास परमेश्वर कदापि प्रसन्न्न होत नाही.                  

भगवत गीते मध्ये भक्ताची काही लक्षणे विषद करतांना, भगवंत अर्जुनाला अनेक उपदेश करतात.  

                मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्त उपासते

                श्रध्दया परयोपेतास्ते मे युक्ततमा मता: ॥ अध्या. 12 ॥  श्लोक 2

 

   अर्थात् माझ्या ठिकाणी मन ठेउन नित्ययुक्त होउन अतिशय श्रध्देने युक्त अशी जो माझी उपासना करतो, तो सर्वोत्कॄष्ट योगी असे मी समजतो.

                 यस्मान्नोद्विजते लोको लोकोन्ना द्विजते च य:

                 हर्षामर्षभयो द्वेगैर्मुक्तोय: स च मे प्रिय:  ॥ अध्या. 12 ॥ श्लोक 15

   अर्थात् लोकांना ज्याचा कंटाळा येत नाही व लोकांचा जो कांटाळा करित नाही.  आनंद, क्रोध, भय, उद्वेग यांच्या पासून जो अलिप्त आहे. तोच भक्त मला प्रिय आहे. या ठिकाणी माउली एक उत्तम उदाहरण देतात.

              तरी सिंधूचेनि माजे । जळचरां भय नुपजे ।

              आणि जळचरी नुबगिजे । समुद्र जैसा ॥

            

            अर्थात् जसे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणा–या जलचरांना त्याचे भय वाटत नाही आणि जलचरांचा समुद्राला कंटाळा येत नाही.

               अनपेक्ष: शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ:

               सर्वारंभपरित्यागी यो मदभक्त: स मे प्रिय:  ॥ अध्या. 12॥ श्लोक 16

      अर्थात् निरपेक्ष, शुचिर्भुत, कर्म करण्यात दक्ष, परिणामाबद्दल अथवा फलाबद्दल उदासिन, संसार दु:ख विरहित कार्यरंभास अवश्य असणारा जो अहंकार रहित असा जो, माझा भक्त मला प्रिय आहे.

          “कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। ” कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता आपले कर्तव्य समजून जो कर्म करतो, तो भक्त.

          सदैव परमेश्वराचे ध्यान, चिंतन, मनन करणा–या भक्त बाळ प्रल्हादास त्याचा नास्तिक पिता, हिरण्यकश्यपूने खांबाला बांधले, उकळत्या तेलात टाकले, त्याचा विविध प्रकारे शारिरिक व मानसिक छळ  केला. तरी पण बाळ प्रल्हादाने परमेश्वराचे चिंतन मनन सोडले नाही. 

       पुंडलिकाची विठ्ठल भक्ती सांगतांना म्हणतात. भक्त पुंडलिकाची निरपेक्ष व शुचिर्भुत अशी भक्ती पाहून साक्षात श्री. पांडूरंग पुंडलिकाच्या भेटी पॄथ्वीतलावर अवतरले त्यावेळी भक्त पुंडलिक, ज्यांना आपले दैवत मानत असे, त्या आपल्या माता पित्याची सेवा करण्यात मग्न होते. पांडूरंगाला आलेले पाहून पुंडलिकाने जवळच असलेली विट त्यांच्या कडे फेकून जोवर माता पित्याची सेवा पूर्ण होत नाही तोवर उभे राहण्याची पांडूरंगाला विनंती केली. तेव्हापासून पंढरीचा पांडूरंग पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर कटेवर कर ठेउन, पुंडलिकाची वाट पहात विटेवर अजून देखिल उभा आहे. असे भक्त व भक्ती करवून घेणारा परमेश्वर.

 

     पण हल्लीच्या कलियुगात, दर वर्षी न चुकता, आपले देहभान विसरून, उन, वारा ,पाउस  तसेच अन्य नैसर्गिक व अनैसर्गिक आपत्तीची तमा न  बाळगता आषाढी कार्तीकीची वारी करतो, तोच खरा भक्त.

Go Back

Comment