Menu

पुनरारंभ

199240

कमळा

Please download here !! 

प्रकाशन: कराड वैभव दिवाळी अंक २०१२| वसुधा मासिक २००९ 

कमळा

              ज दीड ते दोन महिने झाले देशपांडयांनी आपल्या घराचे काम सुरू करून.  घरासमोरच बांधकाम चालू असल्यामुळे सर्व बांधकाम दॄष्टीस पडले नव्हे पहावे लागले असे म्हणावयास काहीच हरकत नाही.  जमिनीचे मोजमाप आखणी पाया खोदणी पासून पिलर्स उभे होर्इपर्यंत सर्व काम पाहण्यात आले.  क्वचित प्रसंगी देशपांडे,  त्यांचा बिल्डर, मटेरियल सप्लायर एवढेच नव्हे तर कारागीर,  मदतनीस यांचेशी झालेल्या संवादास मी साक्ष ठरू शकेन.  आजपर्यंत अनेक कारागीर मदतनीस या कामावर येउन गेलेत आज दिसलेला कामगार‚ गवंडी कींवा मदतनीस उद्या परत कामावर दिसेलच असे नाही.     नेहमीप्रमाणे देशपांडे आज सकाळी आले व बिल्डरशी संवाद साधून व सूचना देउन निघून गेले.  दुपारच्या जेवणाचे वेळी क्वचित प्रसंगी जेवणास पाणी नसल्यास कामगार व मजूर आमचेकडून पाणी नेत. पाणी हा धर्म समजून आम्ही पण त्यांना पाणी देत असू.  आज पाणी मागण्यास आलेल्या इतर कामगारा समवेत ती पण आली होती.   सर्व कामगार बदलले परंतु मी तिला काम सुरू झाल्यापासून पाहत आहे.  न जाणो कां व कसे तिच्याबद्दल अनेक विचार माझे मनात येउ लागले.  तिच्याबद्दल सहानुभुती निर्माण झाली.

                 “साहेब जरा पाणी देता का प्यायला ?” तिने अदबीने विचारले.  

  “ हो का नाही,  हे घे ” स्वभावधर्मे मी तिच्या तांब्यात पाणी ओतीत तिला सहजच प्रश्न केला? “ तुझ नाव काय ग ?”

              “कमळा ” ती म्हणाली.

             “ कोठे  राहते?  गाव कोणते तुझे? “माझा प्रतिप्रश्न.

                 “ मी नगरजवळ केडगांवची.  इथे जवळच मालकांच्या घराजवळ राहते. ”ती उत्तरली.

             “ इथे कोण कोण असते तुझ्याजवळ ” माझी चौकशी.

                “ माझे पति आणि दीड वर्षाचा मुलगा ” तिने खुलासा केला.

       आमचे एवढे संभाषण चालु असतांनाच त्यांची जेवणाची सुटी संपली सर्व कामगार गेलेत व सवयी प्रमाणे आपापल्या कामास लागले.  ती पण कामावर निघून गेली.  ती गेली पण माझे मन स्वस्थ बसेना.  माझे बालपण पण केडगावला गेल्याने मी तर्क वितर्क करू लागलो. कोण ती ?  इतर सारे मजूर असतांना मला तिच्या बद्दलच का सहानुभुती निर्माण व्हावी ? चेहरा तर पाहिलेला व ओळखीचा वाटतो.  स्मरण शक्तीवर पूर्ण ताण देउन पण काही आठवत नव्हते.  केडगावच्या सखाराम भोसलेची धाकटी बहिण का नारायण तेल्याची पुतणी? काहीच आठवत नव्हते.

                 दुसरे दिवशी सकाळी ती नेहमी प्रमाणे कामावर आली. जसजसा वेळ जाउ लागला तसा कामाचा वेग वाढू लागला.  तसेच माझी विचार चक्रे पण जोरात फिरू लागली.  कुंभार वाडयात राहणा—या यशवंत कुंभाराची तर ती मुलगी नाही.  अजून एक पर्याय मनी आला.

             होय शक्य आहे.  माझे मन भूतकाळात गेले व मला भूतकाळ आठवला.  माझे डोळयासमोर तीच ती कमळा परकर पोलके घातलेली १० —१२ वर्षाची परकरी पोर उभी राहिली.  सावळा रंग,  नाकी डोळी चांगली,  थोडीशी लाजरी परंतु हुषार अशी कमळा मला आठवली.  त्यावेळी आम्ही केडगावला राहत होतो.   कुंभार वाडयासमोरच आमचे घर होते.  घरासमोर येसू अर्थात यशवंत कुंभाराचे बैठे घर होते.  यशवंत कुंभार वय अंदाजे तीस ते पस्तीस‚ उमदे शरीर‚ साधारण उंची‚ पिळदार मिशा‚ तडफदार तरूण परंतु वडिलोपार्जित कुंभाराचा व्यवसाय न जमल्यामुळे नोकरीकडे वळलेला.  नगरला कोठेतरी रखवालदाराचे काम करित असे.  अंगावर पोषाख चढविला म्हणजे अधिक रूबाबदार दिसत असे त्याचा तो रूबाब पाहूनच समोरच्या व्यक्तीवर छाप पडत असे.  अशा या येसूची ही थोरली कन्या कमळा.

                        मला आठवते सुटीच्या दिवशी घरासमोर मैत्रिणींसमवेत ठिक—या‚ लगो—या व लंगडी खेळतांना कधी दिसतसे.   नुकताच वार्षिक परिक्षेचा निकाल लागला होता.  कमळा चौथी मध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली होती.  आता ती ५ वीला हायस्कूलला जाणार याचे तिला फार कौतुक वाटत होते व आनंद पण झाला होता.  या आनंदाचे भरात ती आमचे घरी आली होती. “काका हे घ्या पेढे मी पास झाले.  माझा तिसरा नंबर आला. ” पेढा वडिलांचे हातात ठेवत व वाकून नमस्कार करित ती म्हणाली. “शाब्बास !! अशीच चांगल्या मार्कांनी पास होत रहा.  आता हायस्कूलला जाणार ना ”  वडिलांनी पेढा स्विकारत तोंड भरून आशिर्वाद दिला.

 

                     “हो ” ती म्हणाली.

                       पुढे वडिलांची बदली केडगावहून सोलापूरला झाल्याने केडगावचे भाडयाचे घर सोडावे लागले. आम्हास निरोप देतांना “काका परत या हं! ” असा आग्रहाचा निरोप देण्यास ती विसरली नाही.  कालांतराने वडिलांचे सोलापूरला निधन झाले. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मला पुण्यास जॉब मिळाला व पुण्यात स्थायिक झालो.  आज 20 वर्षांनी तीच कमळामला एका गॄहिणी च्या रूपात मला दिसली. आज तिच्याशी बोलून शंका निरसरन करायचे ठरविले होते.  ती कामावर आली तशी मी तिला देशपांडयांकरवी निरोप दिला.  ३० —३५  वर्षाची‚ सावळया रंगाची‚ थोडासा उभट चेहरा‚ फिकट पिवळया रंगाची साडी नेसलेली‚ गळयात मंगळसू्त्र‚ हातात छोटी पिशवी व त्यात जेवणाचा डबा अशी कमळा माझे समोर उभी राहिली.

 

                   “ये  बैस अशी” मी तिला समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवित म्हणालो.  तशी ती थोडासा संकोच करित अंग चोरत खुर्चीत बसली.

 

                “काय गं तु येसु कुंभाराची मुलगी ना ? ” मी शंका निरसन करित विचारले.

 

               “ होय‚ पण तुम्हाला कसे माहित ?” तीचा प्रतिप्रश्न.  

 

                “ मी केडगावचे कुलकण्या॔चा मोठा मुलगा विजय तुमच्या घरासमोर राहत होतो.  ” मी खुलासा केला.

         खात्री करण्याच्या दॄष्टीने तिने प्रतिप्रश्न केला.  “तुम्ही नगरला कॉलेजला शिकत होता काय?”

                   “होय“ मी म्हटले.

                      “ ए‚ सुलभा जरा इकडे बाहेर ये“ मी पत्नीला बाहेर बोलाविले व तिची ओळख करून देत म्हणालो,  “ही कम्ळा,  केडगावला आमचे घरासमोर राहत होती.”    एका मजूरी काम करणा—या स्त्रीची ओळख करून घेण्यास सुलभाला जरा विचित्र वाटत होते.  ती केवळ शिष्टाचार म्हणून हास्य मुद्रा करित “असं का ? ” म्हणाली.

                   “ ही १० — १२ वर्षाची असतांना  मी तिला पाहिले होते.  त्यानंतर आज पाहत आहे.  किती मोठी झाली आहे.” मी सुलभाला म्हणालो.

             एवढयात सुलभाने शिष्टाचार सांभाळत तिच्या हातात चहाचा कप आणून दिला.  ती संकोचाने नाही म्हणत होती.  परंतु आमच्या आग्रा्रहा खातर तिने स्विकार केला.  ती चहा पीत असतांना मी मला न उलगडलेला गूढ प्रश्न तिच्या पुढे टाकला.  “ काय गं कमळा,  तु एवढी हुषार मुलगी आणि तुझी अशी परिस्थिती का झाली ?” 

                          तिच्या डोळयात टचकन पाणी आले.  कसातरी कपातील चहा संपवित माझे प्रश्नाकडे दुर्लक्ष  करित ती म्हणाली.  “ मी कामावर जाउ?  मुकादम रागावेल.? ” “मुकादमशी मी बोलेल काळजी करू नको ” असे म्हणत मी परत तोच प्रश्न केला.

                         डोळयातील पाणी पदराने पुसत दु:खी मनाने ती सांगू लागली.  “ तुम्ही केडगाव सोडल्यावर ५ — ६  वर्षातच वडिलांची नोकरी सुटली.  पाठोपाठ १ वर्षानंतर आर्इचे निधन झाले.  सूटलेली नोकरी व आर्इचे निधनाचा धक्का वडिलांना सहन झाला नाही दोन्ही दु:ख पचविण्यासाठी ते मद्याच्या आहारी गेले.  तशा परिस्थितीत मी शिक्षण चालू ठेवले.  नगरला कॉलेज मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.  शिकत असताना दुकानात अर्थर्जनासाठी सेल्सगर्लची नोकरी केली.  याच दरम्यान मामांनी दौंडकडील एक दोन स्थळे सुचविलि त्यातील एक निश्चित केले व विवाह बंधनात अडकले.  त्यांचे नाव प्रभाकर असून एस.एस.सी नंतर टर्नरचा कोर्स केलेला व नंतर दौंडला स्वत:चे वर्कशॉप काढले. वर्कशॉप छान चालले होते व आमचा संसारपण व्यवस्थित चालू होता.  तशातच श्रीकांतचा जन्म झाला.

 

                  पण नियतीने आमचे पुढे काय ठेविले होते ते आम्हाला कळच नाही.  तो मंगळवार होता.  ते नेहमी प्रमाणे सकाळी वर्कशॉपमध्ये गेले.  एक कामगार रजेवर असल्याने व जॉब लवकर पूर्ण करून द्यायचा असलेने ते स्वत: मशिनवर काम करू लागले.  काम सुरू असतांना वीज प्रवाह खंडीत झाला मशिनमध्ये अडकलेला जॉब काढत असतांना अचानक वीज प्रवाह सुरू झाला व काही कळण्याच्या आतच यांचे दोन्ही हात मशिन मध्ये अडकले व कोपरापासून निकामी झाले. तेव्हापासून वर्कशॉपमध्ये जाणे बंद झाले. कालांतराने वर्कशॉपदेखिल बंद पडले. आमचे वर उपासमारीची वेळ आली.  कामाचे शोधात पुण्यास आलो.  शेजारच्या बाइच्या ओळखीने या बांधकामावर काम मिळाले.  

           एवढे बोलता बोलता तिच्या डोळयात पाणी आले पदराने डोळे पुसतच ती कामावर निघून गेली. ”                                               

 

                तीची ती करूण कहाणी ऐकून सुलभाला व मला फार वार्इट वाटले. ती तर निघून गेली पण जातांना आमचे हृदय हेलावून गेली.  सुलभाला तीची दया आली व मला म्हणाली. “अहो, पुण्यासारख्या मोठया शहरात चांगला मोठा जॉब करताय तर बघाना तिच्यासाठी एखादी चांगली नोकरी.”             एका स्त्रीने दुस—या स्त्री बद्दल काढलेले सहानुभुतीचे उदगार मला बरेच काही सांगून गेले.  मी सहजच एका मित्रास फोन करून तिच्या बद्दल सांगितले,.  त्याने तत्परतेने तिला एका सहकारी बँकेमध्ये सहायकाची नोकरी दिली.  

 

          अशाच एका रविवारी ती आम्हास आपल्या कुटुंबियांसमवेत भेटावयास आली.  गप्पांच्या ओघांत अनेक जुन्या आठवणी निघाल्या. मी लहान वयात आर्इला त्रास देत असे.  त्याप्रत्येक वेळी आर्इ मला येसू काकांचा धाक दाखवित म्हणायची, “ बघ येसूकाका पकडायला येतील  हं !” आर्इचे हे सारखे बोलणे एैकून मी एकेदिवशी आर्इला विचारले, “ आर्इ,  त्या कमळीला पण येसू काकांनी पकडून ठेवले आहे का गं ?” आर्इने गमतीने उत्तर दिले “होय”. मला ते खरेच वाटले.  त्याच दिवशी येसू काका आमचेकडे काही कामानिमित्त येत असतांना पाहिले व मी घाबरून मला पकडतील या भितीने शाळेच्या मागील आवारात लपून बसलो.  ते निघून गेले तरी मी परत आलो नाही म्हणून मला आर्इ शोधत तेथे आली व समजूत काढीत घेउन गेली.  अशी येसूकाकांची आठवण एैकून सर्वांना हसू आले.

 

          एकदा कमळा लहानपणी आंघोळ झालेवर केस न विंचंरता अशीच मैत्रिणींमध्ये खेळायला खाली आली. तिच्या आर्इला ते न आवडल्या मुळे तिने तिच्या झिंज्या ओढत पाठीत एक रपाटा घातला व तिला घेउन गेली.  पण कमळा एैकेल तेव्हा खरे  ती परत आर्इचा डोळा चुकवून खेळण्यास आली.  येसूकाकांच्या दुस—या दणक्यानंतर ती परत खेळावयास आलीच नाही.

 

           अशा एक ना अनेक कटू गोड जुन्या आठवणी निघाल्या व दिवस कसा निघून गेला ते कोणालाच कळले नाही. संध्याकाळी ती आपल्या घरी निघून गेली.  दूरवर जाइपर्यंत हात हलवित होती.  दॄष्टिआड होइपर्यंत नजर भिडवित होती.  जातांना अमोल संदेश देउन गेली व आभार मानण्यास मात्र विसरली नाही. 

 

            दु:खात सुख लपलेले असते.  दु:खात सुख शोथुनी पहा.

 

            सुख असो वा दु:ख असो.  समाधानाने जिवन जगत रहा.

Go Back

Comment