Menu

पुनरारंभ

199289

मिरवणूक

Please Download Here !!

 

मिरवणूक

                       नदीच्या कडेला डोंगराच्या पायथ्याशी वसलेली यंग्रट वाडी.   वाडी तशी छोटीशी 100-125 उंब-याची. येथील युवाशक्ती वाडीच्या नावाप्रमाणे यंग्रट व टारगट. कोठे, केव्हा व काय करतील याचा भरवसा नाही.  नेहमी प्रमाणे पारावर गप्पा मारीत चकाटया पिटीत बसलेली. काय करणार? गावात काम नाही. वाडीत धंदा नाही.  तंबाखू मळून झाली. पिचका-यांनी जमिन रंगवून झाली.  कोंबडा छाप बिडीच्या धूराच्या लाटांनी आसमंत भरला.  

                      गप्पांच्या ओघात कच-याच्या डोक्यात कल्पना आली.  विषय काढत म्हणाला, “गडयांनो 2/3 वरीस झाली. आपल्या वाडीत काही कार्यक्रमच झाला नाही राव.  ना कुणाचं लगीन, ना बारस, ना कसली मिरवणूक.  3 वर्सापूर्वी मावस भावाच्या लग्नाच्या वरातीत जाम अंग दुखस्तोवर नाचलो व्हतो.  पार घामाघूम झालो व्हतो यार ! आता नाचाया अंग लर्इ सळसळतंय.  वाडी पार झोपल्यागत झालीय.  वाडीत काय चैतन्यच नाही राव.  काय तरी कराया पायजे.  वाडीला जागं कराया पायजे. कच-याच्या सुरात सूर मिसळत मन्याने पण तोच सूर आळवला. ”काय तरी कराया पायजे बा !  माझं बी अंग सळसळतय नाचाया.  “लर्इ दिस झाले हलगीची अन डफडयाची थाप पण कानावर आली नाय. ”  सोन्याने पुष्टी केली.  “आपुन असं करूया डफड अन्ं हलगी वाले बोलवू या.  त्यांना बडवाया सांगुन मनसोक्त नाचू या”   सोन्याने आपली अक्कल पाजळली. “वा रे गडया ! कारणा बिगार नाचाया समदे वाडीवाले आपल्याला येडयात काढतीन की.  पोरास्नी याड लागलया म्हनतीन. ” कच-या म्हणाला.

                    “हांग ते बी खरच हाय म्हना. ” सोन्या आपली चूक सुधारत म्हणाला. यकांद्या फुडा-याचा नायतर नेत्याचा वाढदिस साजरा करायचा का?  मन्याने शक्कल लढविली.

                    “आरं पण आपली अन् साळाची कंदीच फारकत झालीया.  कुणाचा बी वाढदिस ठाव नाय आपल्याला.  मला तर माझा सौताचा बी वाढदिस ठाव नाय.  मन्याने आपली बुध्दिमता प्रकट केली.  “दगडया तु आमच्यापरीस सात बुकं शिकला हाय.  तु काय तरी युक्ती काढ की गडया. ”  सोन्या दगडयाकडे निर्देश करत म्हणाला .

                  “कुठल्या तरी अस्तित्वात नसलेल्या बाबाचा दिस साजरा करूया !” दगडया म्हणाला.  

                  “हा कोठला विस्तवात बाबा. मला तर काय बी समजना गडया. ” कच-याचा प्रश्न.

                  “तुज्या डोस्क्यामंदी नावापरमान नुसता कचरा भरलाय बघ. आरं विस्तवात नाय अस्तित्वात.  म्हंजी अंतर्धान पावलेला, या जगात नसलेला. ” दगडयाचा खुलासा.

                “म्हंजी आकाशात अंतर्धान पावलेला. वर गेलेला. ” मन्या आपली अक्कल पाजळीत म्हणाला.

               “ आरं जो जलमलाच नाय तो मरणार बी कसा?  ही फकस्त कल्पना हाय.  “त्यो लय मोठा बाबा हाय.  त्याची ष्टोरी बी लय मोठी हाय.  म्या तुमा उंद्या सांगतो. तुमी फकस्त यक करायचं.  मोहोरल्या मासात पुनवला आपुन अंतर्धान बाबाचा उत्सव साजरा करणार हायती ही बातमी वाडीतल्या अन् गावातल्या समद्या घरात द्यायची. ” दगडया चा खुलासा.

               “झकास आयडीया. ” सोन्याने सहमति दर्शविली.

                ठरल्या प्रमाणे दुस-या दिवशी सर्व जण पारावर जमले.  दगडयाने तयार केलेल्या कपोलकल्पित अंतर्धान बाबांचा कथारूपी पूर्वेतिहास सांगण्यास सुरवात केली.  “गडयांनो कालच्या बिस्तरवारी माझ्या सपनात एक बाबा आल्ता. दाढी मिशा वाढलेल्या. डोक्यावर देवळाच्या कळसावाणी जटांची चंबळ.  समद्या अंगाला भस्म लावल व्हतं.  यका हातात चिमटा अन् दुस- या हातान चिलम वढत व्हता. उच्चापुरा अन धडधाकट.   उघडा बंब. ” 

             “नागवा व्हता काय?” मध्येच सोन्याचा प्रश्न.

            “न्हाय वला लंगुट व्हती की, कमरला. ” दगडयाचा खुलासा.                                   

                 दगडयाची कथा सर्व जण एकाग्रातेने ऐकत होते. कथेला धार चढत होती. मध्येच सोन्याने केलेल्या प्रश्नाने व्यत्यय आला तसा मोन्या शिवी हासडत म्हणाला, “ ए गाढवीच्या गप गुमान ऐक की कशाला प्रश्न करतोय?” 

                दगडया पुढे सांगू लागला, “आला तवा हातात त्रिशूल नव्हता पण माझ्या समोर येउन ठाकला तवा एकदम त्याच्या बाजूला त्रिशूल बी येउन ठाकल की राव!  म्या पिउन गाढ झोपलो व्हतो. माह्या मुस्काटात एक लगावली.   खाडकन् माझी समदी उतरली. म्या घाबरलो.  म्या हात जोडून त्येच्या पाया पडलो अन इचारल. तुमी कोण बाबा?  अन् माहया सपनात कावून आले बाबा?  बाबा खवळला अन् रागान लाल झाला.  त्येच्या डोळयात आग दिसत व्हती. माहया अंगावर धावून व्वसकन् वरडत म्हनला, दगडया उठ लेका,  असा अजगरावानी काय लोळत पडलाय.  म्या तुमच्या कडे यायला तडफडतोय अन् तुम्ही समदे वाडी वाले ढाराढूर झोपल्यात.  म्या अंतर्धान बाबा.  वाडीच्या पडयाल भस्मीबाबाचा डोंगुर तिथ माझी वस्ती व्हती.  लर्इ वर्स झाली म्या तिथून अंतर्धान पाावलोय.  2000 वर्सापूर्वी तुमच्या वाडीवर आसूरानी हल्ला केला व्हता.

                 “आसूर म्हंजी? ” पुन्हा सोन्याचा प्रश्न.

                “आसूर म्हंजी लय मोठाले राक्षस” दगडयाचा खुलासा.

                “ए, गप की आता. पुनच्याला मंधी बोलला तर पॄष्ठभागावर लाथच घालीन. ” मोन्याने सोन्याला दम भरला.  

               दगडया परत पुढे सांगू लागला.  वाडी वरची समदी मानसं घाबरली.  लेकरंबाळ, बाया बापडया, वाडी सोडून डोंगराकडं पळत सूटली.  जवा ती डोंगराच्या पायथ्याशी आली तवा त्यांच संरक्षण करन माझ काम व्हत.  मी माझ्या योग शक्तीने असूराशी सामना केला, त्याला जागवरच जाळून भस्म केलं अन् या डोंगरावरून अंतर्धान पावलो.  तवाधरन या डोंगरास्नी भस्मीबाबाचा डोंगुर नाव पडले.  माझी शक्ती डोंगरावरच्या प्रत्येक दगडात आहे.  दगड लर्इ कामाची चीज हाय. रस्त्यावर मैलाचा दगड म्हनून ठिवला तरी चालतो.  त्याला शेंदूर फासला तर देव होतो.   लय झाल तर मारण्यासाठी भिरकवता पण येतो.  म्हणून मला दगड प्यारा हाय.  मी शाकाहारी हाय.  मला कोंबडं,  बकरं चालत नाय.  बाजरीची भाकर, दुध अन  गुळ माझा निवद हाय. आता म्या परत येतुया.  गाडयावर बसवून वाजत गाजत माझी वाडीत मिरवणुक काढून मला नेउन डोंगरावर सोडायचे तुमचे काम आहे. अस म्हनून बाबा परत अंतर्धान पावला.

               “अरं ते समदं खरं हाय पण मिरवणूक कशाची काढायची त्येंचा ना फोटु ना काय?”  मन्याचा प्रश्न.

               “व्हय” म्हणत सोन्याने पुष्टी दिली.

              “सोप्प हाय.  ते अंतर्धान पावलेले बाबा हायती.  गलूलसाठी वापरता तशी, विंग्रजी वाय अक्षराच्या आकाराची झाडाची फांदी गाडयात उभी करायची त्येला हार घालायाचा.  पायाशी एक दगुड ठिवायचा. त्येला शेंदूर फासायचा, हळद कुक्कु वाहायच.  उदबत्ती लावायची. दिवा पेटवायचा. अन यालाच अंतर्धान  बाबा  म्हनायचं.  हाय काय अन नाय काय. ” दगडयाचा खुलासा.  

             “आमालाबी वार्इच विंगजी समजत वाय का फाय त्ये. लर्इ भाव नको मारू.  बरं फुड”.  मन्याने ताशेरा ओढला.  

           “बाजुला एक दानपेटी ठिवायची.  लोक दर्शन घेतीन.  प्रसाद ठिवतीन अन् पेटीत दक्षणा टाकतीन”.  दगडया विस्तार करत सांगू लागला.  

           “ते समदं झालं पण आपुन काय करायचं?”  शंक-याने प्रश्न उपस्थित केला.    

           

               “लोक मिरवणुकी साठी जमली की, आपण सगळयांनी एकटक आकाशाकडं बघायचं.  बाबांची वाट पाहिल्या गत करायच.  घडीभरान मी वरडन “बाबा आले.  बाबा आले.”  तुमी समद्यांनी हात जोडून नमस्कार करायचा अन बाबाचा जयघोष करायचा.  भस्मि बाबाकी जय!  अंतर्धान बाबाकी जय !   डफडी वाजवून स्वागत करायच मिरवणुकीला सुरवात करायची.  मनसोक्त नाचायच.  अधून मधून भस्मि बाबाकी जय! अंतर्धान बाबाकी जय ! जयजयकार करीत वरडायचं.” दगडयाने आपला प्लॅन सांगितला.

             “आरं पण मिरवणुक काढायची तर पोलिसांची परवानगी लागती म्हणं. ” कच-याची शंका.

              “व्हय. ते बी खरा हाय पन त्याची काळजी नाय.  वाडीतल्या बापू दादाची पोलीस डिपार्टमेंट मध्ये झॅक वळख हाय. त्यास्नी सांगितल तरी चालन.  ते करतीन सगळ बैजवार.  आपल्याला फकस्त नाचायच हाय,  -हाडा नाय करायचा.” दगडयाने खुलासा केला.                                                

              सगळ ठरले.  दिवस उजाडला.  बाबांचा पूर्वेतिहास त्यांची महती थोडक्यात बोर्डवर लिहून बोर्ड माहितीसाठी गाडीवर ठेवला.  मिरवणुकीची तयारी झाली.  दगडयाने व त्याच्या मित्रांनी बाबा येणार असल्याचे व आल्याचे नाटक चांगले उमटविले. शंक-या गाडीवर बाबांच्या पायाशी सेवे करिता बसला. मिरवणूक निघाली. दगडया व त्याचे मित्र नाचण्यात धुंद झाले. सर्व व्यवस्थित चालू होते.  वाडीतले लोक व गावातून आलेले लोक अंतर्धान बाबाचे भाव भक्तीने दर्शन घेत.  पायावर डोके ठेवत.  पायाशी ठेवलेल्या दगडावर हळद कुंकु वाहत. दानपेटीत दक्षिणा टाकत व मिरवणूकीत सामिल होत.  

             पण एका म्हातारीला काही राहवल नाही.  ती शंक¹याला विचारती झाली, “मी म्हातारी झाले पण माझे डोळे अजून शाबूत  हायती.  काय रं पोरा.  बाबा कुठ हायती दिसत न्हाय? ”  

            “शंक-या वेळ मारून नेत म्हणाला,  “आजे हायत की हीतच . त्ये बघ मांडीमारून बसलेत गाडीवर.  तुझ्याकडं बघतायत.  नमस्कार कर त्यास्नी. ” म्हातारीचा विश्वास बसेना.  तिने दगडयाला नाचतांना ओढून आणल अन तोच प्रश्न केला.  “आज्ये त्ये बघ की बसल्यात गाडीवर.  पिरमानं अन भक्ती भावानं बघितलं की दिसत्यात.  दाढी मिशा वाढल्या हायती.  डोक्यावर देवळाच्या कळसावाणी जटांची चुंबळ हाय. समद्या अंगाला भस्म लावल हायं.  यका हातात चिमटा अन् दुस-या हातात चिलम हाय.  उघडा बंब हाय.  त्ये बघ त्यांचे डोळे कसे पाणी दार हायती.  तुझ्याकडं बघतायत.  नमस्कार कर त्यास्नी. ” दगडया आजीला पटवित म्हणाला.

              म्हातारीन डोळयावर उजवा हात ठेवित व डोळे बारीक किलकिले करित दूरवर पाहिल्या सारखे केले.  काहीतरी दिसल्यागत भक्ती भावाने हात जोडले व म्हणाली, “व्हय कायतरी दिसतय बाबा. ” म्हातारीचे समाधान झाल्याचे दिसताच दगडया शंक-या वर वरडला.  “ए शाण्या बाबांसमोरची उदबत्ती संपली.  लाव की गडया.  बाबा रागावतीन. ” असे म्हणत बाबांचा जयजयकार करित नाचायला पळाला.  एका वयस्कर आजीचे समाधान झाल्याचे पाहून इतरांचा त्यावर विश्वास बसल्या सारखे झाले.  

               मिरवणूक वाडीत फिरून झाली. वाडीवरच्यानी फक्त पारापर्यंत साथ दिली व परतले.   पुढे काही मोजक्या लोकांनीच डोंगरापर्यंत साथ केली. पूजा करून डोंगराच्या पायथ्याशी शेंदूर लावलेला दागडाची स्थापना झाली. भस्मि बाबाकी जय! अंतर्धान बाबाकी जय !  जय जय कार झाला.  लोकांनी वाहिलेल्या फळांचा आणी साखर फुटाण्याचा प्रसाद वाटप झाले.  भजनाचा कार्यक्रम झाला व मंडळी परतली.  दगडया, कच-या, सोन्या, मोन्या आणि त्यांचे साथीदार नाचून दमलेली मंडळी तिथच ढाराढूर झाली.   

            दुस-या  दिवशी उत्साही मंडळींनी दानपेटी उघडली. पेटीत वाडी व गावाच्या मानाने ब-यापैकी रकम जमा  होती. प्रसाद रूपात आलेली फळे वाडीतील शाळेच्या विद्याथ्र्यांमध्ये वाटप करण्याचा सर्वानुमते निर्णय झाला व अमलात आणला.  पण जमा रकमे बद्दल मतमतांतरे निर्माण झाली.  कोणी आपसात वाटून घेण्याचे मत व्यक्त केले.                                                                         

 कोणी सामुहिक मद्यपान करून मौज मजा करणेत रस दाखविला.  कोणी मंदिरात दान करणेचा तर कोणी तेथे छोटेसे मंदिर उभारण्याचा विचार प्रकट केला.   परंतू दगडया सर्वांच्या विरोधात जाउन म्हणाला,  “मित्रांनो ही जमा झालेली माया आपणास अचानक आलेली अनपेक्षित रकम हाय.  पैसा जमविणे त्यावर मौज मजा करणे किंवा अनावश्यक ठिकाणी खर्च करणे आपला हेतू नाय.  फकस्त मनसोक्त नाचणे हा हेतु होता. तो सफल झाला.  

            यावर आपला कोणताच हक्क नाही.  माझे मते या रकमेत अजून थोडीशी रकम टाकून आपण एक पाण्याची टाकी वाडीतील शाळेत बसवू या.  यामुळे मुलांची तहान भागेल.  पाणी पिण्यासाठी नदीवर जावे लावणार नाही अथवा शेजा-या पाजा-यांना मागावे लागणार नाही.  त्याची पाण्यासाठीची वणवण थांबेल. शाळेच्या आवारातच मुलांसाठी मुतारीची सोय करू.  जेणे की आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहिल. म्हत्वाचं आपल्या सर्वांबद्दल “उडाण टप्पू,, बिन कामाचे, टवाळखोर” अशी जी धारणा वाडीतल्या लोकांमध्ये झाली आहे ती पुसण्याचा एक प्रयत्न.   

            कच-याच्या मनाला ही गोष्ट पटली. तो म्हणाला, “पर दगडया समद कराया पैक कमि पडतीन राव !”

          “ हरकत नाय.  म्या म्हनलंना यात अजून थोडीशी रकम टाकू. ” दगडयाचा खुलासा.

            “ पर आणायचे कुठुन ?” कच-याचा प्रश्न.

           “आजपासनं आपली दारू, बिडी, सिगरेट, तमाखु बंद.  व्यसना साठी लागणारा पैका यात टाकायचा. आपलं व्यसन सुटलं की प्रकॄति बी सुधारन.  दगडयाने घोषणा केली.                              

           दगडयाचे विचार सर्वांना पटले.  लगोलग व्यसना वर होणारा खर्च एकत्र झाला व महिन्या भरातच शाळेला मुतारी व छोटी पाण्याची टाकी बांधण्यात आली.

           झालेल्या सोयीने शिक्षक व मुले आनंदली. छोटयाशा कार्यक्रमात दगडयाने अंतर्धान बाबाची कथा कपोल कल्पित असल्याची जाहिर केले व वाडीची माफी मागितली.  वाडीवरल्या लोकांनी उडाणटप्पू पोरांचे कौतुक केले. अंतर्धान बाबा की जय!  भस्मी बाबाकी जय !  जयजयकार करित कार्यक्रम संपला.

Go Back

Comment