Menu

पुनरारंभ

199221

भक्ष्य

Please Download Here !

भक्ष्य 

                         रात्र तशी फारशी झाली नव्हती. साडे दहा अकराचा सुमार.  बाहेर निरव शांतता पसरली होती.  सॄष्टिने काळीभोर अंधाराची चादर ओढली होती. सर्वत्र गडद अंधार पसरला होता.  कोणी येउन डॊळ्यात बोटे घातली तरी दिसणार नव्हते.  बाहेर चिट पाखरू दिसत नव्हते.  आकाशात टिटवी टिव ऽ टिटीव ऽऽ टीव ऽ करीत रात्रीची भयाणता वाढवित होती.  दूरवर जार्इपर्यंत तिचे टिवटिवणे ऐकू येत होते.  रातकीडे आडोशाला लपून कीर्र कीर्र करीत होते. विहीरीतील बेडकं डराव डराव करीत त्यांची साथ संगत करीत होती.  विहिरीतील झ­यातून झिरपणारा पाण्याचा थेंब, उऺचावरून खॊल विहिरीत पडताच टप्पकन् असा मोठ्ठा आवाज होउन हदयाचा ठेका चुकवत होता. मळ्यातील केळी झाडाच्या पानांची सळसळ चालू होती.  खाली पडलेल्या पाल्या पाचोळ्यातून सरपटणारे साप, उंदीर, घूस सरपटून धावपळ करीत शांतता भंग करित होती.  कुञ्यांचे भुंकणे अविरत चालूच होते्.  5/6 किलोमिटर अंतरावरून भरधाव वेगाने पळणा­ या ट्रकच्या टायरचा चिर्र ऽ आवाज व कर्कश हॉर्न स्पष्ट ऐकू येत होता.  फर्लांगभराच्या अंतरावर आप्पा शिंदे च्या शेतात बोअरवेल साठी चालू असलेल्या मशिनच्या आवाजाने डोके भणाणून सोडले होते.  दूरवर धावणा­या रेल्वेची धड धड ऐकू येत होती . अशा भयाण परिस्थितीत सुथ्दा घाबरलेल्या अवस्थेत हरी धीराने पाणी पिण्यासाठी उठला व माठाजवळ जात असताना चुकून त्याचा पाय पाण्याने भरलेल्या गडव्यास लागला.  तसे त्यातील पाणी सांडून गडवा घरंगळू लागला. त्या घरंगळण्याच्या आवाजाने हरी अधिकच घाबरला. भीतीने अऺगावर शहारे आले. दरदरून घाम सुटला.  स्वत:ला कसेबसे सावरीत रांजणातून 2 ग्लास पाणी काढून ढसा ढसा प्यायला व परत खाटेवर जाउन आडवा झाला. नेहमी राञऺदिवस रानावनात काम करणा­या हरीला अशी भयाण राञ नविन नव्हती. पण घडलेली घटना  नविन होती.

                      त्याचा सहकारी व नात्याने मावसभाउ असलेल्या नारायणाच्या बाबतीत अर्ध्या तासापूर्वी घडलेली घटना त्याच्या नेत्रपटलावर कायमची कोरली गेली होती.  कीतीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरता येणे शक्य नव्हते.  रोजचीच रात्र पण आज हरीला सरता सरत नव्हती.  खुप मोठी युगा सारखी वाटत होती.  आजू बाजूला कोणतीही वस्ती नव्हती किंवा कीतीही हाका मारल्या तरी ओ देउन त्याच्या मदतीस कोणीही येणार नव्हते याची त्याला पूर्ण जाण होती.  रात्र सरून दिवस उगवण्याची वाट पाहण्याशिवाय त्याच्याकडे गत्यंतर नव्हती.  देवाचा धावा करीत पहाटे केव्हा डोळा लागला त्याला समजलेच नाही.

                       नेहमी प्रमाणे सकाळी मळ्याचे मालक भाउसाहेब मोटार सायकलवर मळ्यात हजर झाले.  हरीला इतकी गाढ झोप लागली की मालक आल्याचे त्याला कळले देखिल नाही.  भाउसाहेबांनी मोटर सायकल झाडाखाली लावली.  रात्री उसाला कोठवर पाणी दिले याची पाहणी करू लागले.  उसाचे गट पाण्याने भरभरून वाहत होते.  पाणी वाया जात असल्याचे पाहून हरी व नारायण दोन्ही सालदारांच्या हलगर्जी पणाचा भयंकर राग आला.  वाटले असेच खोलीवर जाउन त्याना जाब विचारावा.  पण त्या आधी त्यांनी आपला मोर्चा विहीरी कडे वळविला व पंप चालू आहे का बंद पाहिले. अपेक्षे प्रमाणे पंप चालू होता.   त्वरेने पंप बंद केला.  खोलीवर जाउन ए ऽ ह-या,  एऽ ना-या अशा मोठया आवाजात आरोळ्या देत दरवाजा जोरजोराने खटखटकवला.  कोणी तरी दरवाजा ठोकतोय ऐकून अर्धवट झोपेत असलेला हरी घाबरला.  दरवाजाचा आवाज आल्याने घाबरतच त्याने दरवाजा उघडला. समोर भाउ साहेबांना पाहून त्याची पाचावर धारण बसली.  त्याला बघता क्षणी शीवी हासडत म्हणाले, “गाढवा पंप चालू आहे. गट भरभरून पाणी वाहतय.  ते कोण कधी बंद करणार? तुझा बाप? ”

                       

 मालकाचा चढलेला पारा पाहून हरी अधिकच घाबरला. त्याची बोलती बंद झाली होती. काय बोलावे व कसे सागावे हेच त्याला कळेना.  भाउसाहेब अधिकच गरम झाले.  

                     शेवटी धीराने हरीने तोंड उघडले.  त त प प  करीत सांगण्याचा प्रयत्न करू लागला.  “मालक नाऽऽऽ-या”.  पुढे शब्द फुटेना.  डोळ्या समोर रात्रीचा प्रसंग उभा राहीला.  “मालक नाऽऽऽ-या” म्हणत सांगण्याचा प्रयत्न करू लागला.  त्याला तेथेच थांबवत भाउसाहेब उद्वीगतेने जोरात ओरडले ,  “ अरे पुढे बोल की नुसता नाऽऽऽ-या म्हणतोय.  ना-या खपला की काय? ”

                     व्हय” खाली मान करून हरी म्हणाला.

                    “काय म्हणाला परत बोल. तुझी रातची उतरलेली दिसत नाही”. मालक गरजले.

                    “व्हय” हरी मान डोलवत म्हणाला.

                      “गधडया लाज वाटते का रातची उतरली न्हाय म्हणायला”. भाउसाहेब चिडले.

                       “न्हाय.  न्हाय तसं नव्ह मालक.  ना-या खरंच न्हाय.  त्याला रातच्याला जनावरान फाडून खाल्ल”.  हरी धीराने एका दमात बोलला.

                       विश्वास न बसल्या मुळे भाउसाहेबांनी परत विचारले, “काय खरं सांगतोय का?  कुठं?”

                      आता हरीच्या बोलण्यात धीर आला व बोट दाखवित म्हणाला, “व्हय मालक.  त्या तिकडं उसाच्या फडात. ” हे ऐकून भाउसाहेब जागेवरच उडाले. त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.  कधी नव्हे ती अशी विश्वास न बसणारी घटना घडली होती.  त्यांनी हरीला आपल्या बरोबर येण्यास सांगितले.  तो अतिशय घाबरला होता. धीर होइना त्यांच्या सोबत जाण्यचा.  घाबरू नको मी तुझ्या बरोबर आहे.  अजून दोन चार जणाना सोबत घेउ.  अशी समजूत काढल्यावर तो तयार झाला.  त्यांनी शेजारच्या चार पाच गडयांना त्वरीत बोलावले.  गावात निरोप धाडला तसे 15 ते 20  युवक हातात काठया व कोयता घेउन हजर झाले.   सर्व हरीसह घटनास्थळाकडे निघाले.  खोलीपासून साधारण 200 फूटावर उसाच्या फडात काठया आपटत व सावधतेने एकत्रित राहून आगेकूच करत राहिले.  अचानक एका गडयाला फाटलेल्या शर्टाचा तुकडा दिसला. “मालक,  मालक” असे हाका मारीत सर्वाना शर्टाचा तुकडा दाखवित सावध केले.  50 फूट पुढे गेल्यावर सर्वजण एकदम थांबले व अवाक् होउन बघतच राहिले.  

          नारायणचा अर्धवट खाललेला मॄतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पडला होता.  आजू बाजूला रक्त सांडलेले होते.  चेहरा ओळखू येत नव्हता.  हा हा म्हणता बातमी सर्व गावात पसरली. लगेचच पोलीस पाटील, सरपंच,  तलाठी, ग्रामसेवक व गावकरी घटनास्थळी हजर झाले. हरी काहीच बोलू शकत नव्हता.   भाउ साहेबांनी व वनाधिका-यांनी कधी घडले? कसे घडले? याबद्दलची माहिती हरीला विचारली.  मनावरचे ओझे हलके झाल्या सारखे झाले.

           आता हरी ब-यापैकी स्थिरावला होता. सर्वाच्या नजरा हरीवर स्थिरावल्या.  श्वास रोखले. हरी हिमतीने आठवेल तसे कथन करू लागला.  

                                            

                       “म्या अन् ना-याने दिव लागणीला संगच भाकर खालली.  रातच्याला 9 वाजेच्या सुमारास मंग दोघबी फावड घिउन फडाकड गेलो.  पंप चालू करून फडाच्या वरल्या अंगाला ना-या थांबला अन् म्या खालल्या अंगाला पाणी फिरवायला गेलो.  एक दीड घंटयात फड भरला. म्या वर आलो. पंप बंद केला. तंबाकू खायला चंची काढली.  दोघानी तंबाकू खाल्ली.  वार्इच इश्रांती घेतली अन परत कामाला लागायच म्हणून उठलो.  ना-या हिरी कड पंप चालू करायला गेला.  म्या परत खाल्ल्या अंगाला जायला निघालो.  ना-या पंपापत्तूर पेाचल्याचे म्या पायलं. ना-या परत पंप चालू कराया पाठमोरा झाला अन् त्याच वक्ताला घात झाला. काय कळायच्या आत दबा धरून बसलेला, एक भला मोठा बिबटया माझ्या बाजून वा-याच्या येगाने ना-या वर झेपावला अन् त्याची मान जवडयात पकडली.  ना-या खाली पडला अन् जिवाच्या आकांतानिशी वरडाया लागला.  वार्इच क्षणभर मला काय बी उमगल नाय. म्या हातातल फावड घेउन माराया धावलो तस ना-याला सोडून बिबटया माझ्याकड पाहत गुरगुरला.  म्या माग फिरलो.  ना-या सुटला अन् जिवाच्या आकांताने पळू लागला.  त्याने परत ना-याचा पाठलाग केला त्याला जबडयात पकडल अन् जमिनीवर लोळवल.  ना-याने लय सुटायचा प्रयत्न केला बगा.  म्या परत एकदा त्याला सोडवण्या साठी बिबटयाच्या दिशेने दगूड भिरकावला तो त्याच्या कपाळाला लागला.  बिबटया चिडून माझ्या दिशेने याया लागला.  म्या हिरीकड धावलो. ना-याची शुध्द हरपून निपचीत पडला होता.  माझ्यात अन् बिबटयात दोन तीन कासरा अंतर व्हत. बिबटया माझा माग सोडून परतला अन ना-याला घसटत नेउन फडात गेल्याच म्या पायलं.  फुडं माझा नाविलाज झाला.  म्या कायबी करू शकलो नाय.  खोलीत गेलो दरवाजा बंद केला अन् घटाघटा पाणी पिउनसन खाटेवर पडलो.  दरवाजा उघडून कोणाला बोलवायची हिंमत नव्हती.  कुनीबी नजदीक नव्हतं. माह्मा कड मोबार्इल बी नव्हता मालकास्नी फोन कराया.  दरवाजा उघडला तर बिबटया मला बी खार्इन भिती व्हती.  रातभर जागा व्हतेा.  खाटावर रडत व्हतो. कवाबी बिबटया र्इइन याच भ्या व्हत.  पन सकाळच्याला कवा झोप लागली उमगलच न्हार्इ.                                                     

                        त्याची कहानी ऐकून सर्वाचे मन हादरले. हरीने एकटयाने न भिता बिबटयाला परतवून लावण्याचे धाडस केले याचे सर्वानी कौतुक केले. वनाधिका-यांनी बिबटयाचा माग काढण्याचा प्रयत्न केला. थोडया अंतरावर,  ओढयाजवळ बिबटयाच्या पायाचे ठसे आढळले.  शिकार करून बिबटया ओढया पलिकडे गेल्याचे निष्पन्न झाले.  प्राशासनिक दॄष्टया पंचनाम्या सारखे उपचार पूर्ण करून नारायणचा मॄतदेह गावात आणला व त्याच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत अग्निदाग दिला.

                      घटनेचे गांभिर्य पाहता सुरक्षिततेच्या दॄष्टीने गावक-यांनी वनखात्याकडून बिबटयाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली.  सरपंच,  ग्राामसेवक यांनी दखल घेत वन अधिका-याकडे पाठ पुरावा केला.  मागणी पूर्ण झाली.  दुर्दैव असे की 15 दिवस पिंजरा लावून देखिल बिबटया जेरबंद झाला नाही.  परंतु महिन्याभरा नंतर नारायणावरील हल्ल्याची घटना ताजी असतांनाच एके दिवशी दुपारच्या सुमारास एकांताचा फायदा घेत त्याच ठिकाणी हरी विहिरीजवळ पंप चालू करण्यास गेला असता पाठमो-या हरीवर त्याच बिबटयाने मागून हल्ला चढविला.  परंतु हरीला वेळीच चाहूल लागल्याने जरासे बाजूला होउन वाकला. बिबट्याचा अंदाज चुकला व झेप घेतलेला बिबटया विहिरीत जाउन पडला.  हरीने आरडा ओरडा करून सर्वांना सावध केले. वन अधिका-यांना बिबटया विहिरीत पडल्याची वर्दी दिली.  पिंजरा लावला अन् बिबटयाला पाण्यातून काढून पिंज-यात जेरबंद केले. हरी परत एकदा सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.  

                         

  सरपंचांच्या घरी वनअधिका-यांशी या घटनेची चर्चा चालू असतांना त्यांचा 6वीत शिकणारा विन्या बैठकित आला सरपंचाच्या समोर कागद धरीत म्हणला,  “बा म्या यावर एक कविता केलीय बघा.  शाळेत मास्तरांना लर्इ आवडली.  वाचू म्हणत. ” आज्ञेची वाट न पाहता वाचावयास सुरूवात केली.

       

              पल्याडल्या वावरात वाघरू दिसलं गडया

            धोंडया सांगे, कोंडयाला आता खर नाय गडया   Iधॄ,|

            परवाच्याला म्हणे दगडयाची दोन मेंढरं नेली

            सदा औताडाची म्हस पण नेली

            वाघरू लय चपळ हाय

            पंचक्रोशीत त्याचा बोलबाला हाय

            वस्तीवरल्या मान्सांच्या त्याने वळखल्या नाडया                           

            शिकारीच्या जागा पण त्याने हेरल्या गडया    I 1 I

            जंगल वाल्यास्नी कळवाया हवं

            मेंढरास्नी संरक्षण द्यायाला हवं

            गाववाल्यास्नी सांगू पाहारा ठिवा                             

            भारनियमन गेलं खडडयात

            रातभर दिवा बत्ती चालू ठिवा

            भिऊ नको म्या बी तुझ्यासंग हाय गडया     I 2 I

            यात वाघराची काय बी चूक न्हाय

            मानूसच लर्इ वंगाळ हाय

            जंगलं समदी तोडून टाकली

            वाघराला –हायाला जागा नाय –हायली

            मंग तो बी काय करीन, तुच सांग गडया     I 3 I

            आताच म्या एक बातमी ऐकली

             वाघरू बिघरू काय पण नाय

            मेंढरं न म्हस चोरली हाय

                             

           खरं सांगू गडया माह्मबी यक बकरू न्हाय

          चोरं पल्याडल्या गावातलाच हाय                                  

           घावला त करीन त्याला दे धरणी मला ठाय  I 4 I

     

                 यावर विन्याचे कौतुक करित व शाबासकीची थाप देत वनाधिकारी म्हणाले, सरपंच हे सत्य आहे बर का !  अनेकवेळा केवळ बिबटया आला म्हणून अफवा पसरविल्या जातात. बिबटया मांसाहारी प्राणी आहे. तो भुक लागल्याशिवाय कधी कुणावरही हल्ला चढवित नाही.  झाडे तोडून वनक्षेत्र कमि केले त्याचा निवारा काढून घेतला.  जंगल नष्ट झाल्यामुळे त्याचे खाद्य अर्थात जंगलातील प्राणी कमि झाले. मग तो  तर तरी काय करणार. पोट भरण्यासाठी तो मानवी वस्तीकडे वळला. त्याचे खाद्य रहिवासाच्या जागा हिरावून घेतल्यात ना ! त्याच्या कॄत्याला आपणच जवाबदार, अन् त्याला आपण. बदनाम करत आहोत.  

Go Back

Comment