Menu

पुनरारंभ

218638

जन्म दाखला

Please Download Here!

 

      जन्म दाखला

               जना कुंभार सकाळी सकाळी तयार होत आपली पत्नी येसूबार्इला म्हणाला “येशे मी वार्इच तालुक्याला जाउन येतो. जमन तसं लवकर दुपारच्याला येतो.  

             “अवं आज किती कामं हायती. वावरात जायाचं हाय. पोरीच लगीन ठरलं हाय.  गावातनं वाण्याकडनं वाणसामान आणायचा हाय. ढोरास्नी नदीवर न्यायचं हाय. शिवाय आपली शेवंता गाढवीन कवा बी जनल.  जनली तर मला कुठं बी जाता इनार न्हाय. तिच्याकडं बगावं लागन.  माजी यकल्याची लय ताराबळ हुईन.  म्हणून म्हटल उंद्या परवा गेल तर नाय चालनार काय?”  येसुबार्इ आपल्या अडचणी मांडत व त्याला थांबविण्याचा प्रयत्न करित म्हणाली.

           उंद्याच्याला गेलो असतो पन काय हाय. आज तलाठयाचा वार हाय.  उंद्या तलाठी भाउसाहेब भेटणार नाय.  उत्पनाचा दाखला मिळल्या बिगार सुमीच कॉलेज प्रवेशाचे काम हुणार नाय.  मागच्या साली प्राथमिक शाळला, सरकारी हापीसला रांजण, मडके दिल्ते.  त्याचे पैसे बी आणायचे हैत. पत्रिका छापायच्या हायती. मायंदळ कामं हायती.  तुला ठाव हाय सरकारी काम हायती.  लगेच न्हाय होत.  आज सुरू करीन तवा फुडल्या हप्त्यात होतीन.  ” जना कुंभार विस्तार करत म्हणाला.   

          “जावा मंग मी काय सांगनार.  पण दुपारच्याला लवकर या . ” म्हणत येसुबार्इने परवानगी दिली.

           कोप-यात दाराच्या मागं खुंटीला अडकविलेली लाल कपडयाची झालर लावलेली, त्यावर जनाने विणकाम केलेली पांढरी कापडी पिशवी घेतली. त्यात आवश्यक ते कागदपत्रे टाकली पायात वाहाणा सरकवल्या व “ येतो ऽऽ गं येशे” जाता जाता आरोळी देत वाट धरली.  “अवं तुमचा तो बोलण्याचा डबा, मोबार्इल का काय म्हनत्यात घेतला का?” येसुबार्इ आठवण करित म्हणाली.

          “व्हय व्हय.  आन् गरज लागली तर सुमीच्या मोबार्इलवरून फोन कर. ” जना मागे वळून न पाहताच म्हणाला.  बस स्टँड वर येताच त्याला 10 ची बस मिळाली व अर्ध्या तासातच तो तालुक्याच्या गावी पोचला सुध्दा.  बस स्टॉप जवळच वेशीला लागून तलाठी कार्यालय होते.  तलाठी कार्यालयात गर्दी होती. त्याचा नंबर येण्याची वाट पहात बाकावर बसला होता. तेवढयात त्याचा फोन वाजला.

          “हॅलो म्हणत जनाने फोन उचलला.  “धनी, अवं धनी म्या येशी बोलतीया. ” तिकडून येसूबार्इचा आवाज आला. ती मोठया आवाजात बोलत होती.  “म्या वळखलं.  सांगायची गरज न्हाय.  हां बोल येशे. ” जना म्हणाला.  “धनी, लय ग्वाड बातमी हाय.  ” येसूबार्इ  रहस्य लपवित म्हणाली.  “मंग सांगशीन तरी आता. ” जना अधीर होत म्हणाला.   “ अवं आपल्या शेवंता गाढवीणीला गाढाव झालयं.  लर्इ गोड गोजरं हरणावाणी दिसतयं”. येसूबार्इ आपला आनंद व्यक्त करित मोठया आवाजात म्हणाली. तसे सगळ्यांच्या नजरा जना कुंभारा कडे वळल्या व चेह-यावर स्मित हास्य उमटले.    “धनी ऐकाना, येतांना वाटाया गुळाची भेली अन् पायलीभर चण घेउन या.  आन् शेवंतीसाठी खुराक बी घेउनया.  लर्इ थकलीया बिचारी. ” येसूबार्इ ने आदेश दिला.                                                                                                                                                                                 

          “अगं पण मला अजून पैकं न्हाय मिळाले. शाळेत अन् सरकारी हापीसात जायच हाय अजून.  म्या तलाठी आप्पांच्या हापीस मध्ये हाय. हितं गर्दी हाय.  कीती येळ लागन सांगता येत न्हाय”.  “ते काय नाय” घिउन या म्हटलं ना?” येसूबार्इ हट्टी आवाजात म्हणाली.

          “अगं जरा हळू बोल. म्या हापीसात हाय घरी नाय.  शेजारी लर्इ लोकं बसल्याती. समदं ऐकत्यात. ” जना दबक्या आवाजात म्हणाला.  

          “असूं दे.  तेस्नी बी समजू दे.  आपली शेवंता गाढवीण बाळंत झाली अन् गाढाव झालं. ते आपलं पशुधन हाय.  ही आपल्यासाठी आनंदाची बातमी हाय.  म्हनत्यात सुख सांगाव जगाला अन दुख बांधाव मनाच्या खुटीला. चारपाच वर्सानी हेच पिलू ओझे वाहण्याच्या आपल्या कामात र्इन.  ” लर्इ गरीब जनावर हाय.  कीती बी ओझ टाकलं तरी बोलत नाय मुकाट वाहून नेतय. कुणी बी हाका गप गुमान चालतय. ”येसूबार्इ बोलतच होती.

          तिला मध्येच अडवित जना म्हणाला. “ अगं ते समदं खरं हाय.  पर मी हापीसात हाय.  जास्त बोलू शकत नाय. ”

         “ बरं ते राहू द्या. तलाठी भाउ साहेवास्नी पण सांगा व त्येचा आजचा जल्माचा दाखला बी घेउन या. ” एवढयात एक पोरगा तिच्या समोरून जात असतांना दिसला. फोनवर बोलता असतांनाच फोन चालू ठेवून त्याला विचारले “ए पोरा,काय पहर झाला रं आता?”

“मी नाही समजलो मावशे.  काय म्हणतीय ?” पोराचा प्रतिप्रश्न.

“आरं म्हनजी कीती वाजले. तुझ्या घडयाळ्यात?” मावशीचा प्रश्न.

“ वाजले अस्तीन अकरा. ” पोरगा म्हणाला.

“अरं बाबा नीट सांगकी घडयाळात बघून?” येसबार्इू चिडक्या सूरात बोलली.

पोरगा घडयाळात पाहून म्हणाला, “ अकरा बाजून दहा मिनिट. ”

“हांग असं बैजवार सांग की. पैलांद्याच सांगाया तुला काय धाड भरली व्हती काय? ” येसूबार्इ चिडूनच पण समाधानी होत म्हणाली.

           तिचे व त्या मुलाचे आपसातील संभाषण कार्यालयात उपस्थित सर्व जण ऐकत होते.

            परत फोनकडे बघून येसूबार्इ म्हणाली्, “धनी गाढवाचा जल्म अकरा बाजून दहा मिनिटांनी झालाय.  सांगा तलाठी भाउ साहेबास्नी अन् त्याचा जल्माचा दाखला घेउन या. ”

          येसूबार्इचे फोन वरील बोलणे ऐकून तलाठी भाउसाहेब जनाला मध्येच अडवित म्हणाले, “ जना त्यांना म्हणावं इथे फक्त जमिनीच्या व्यवहारासंबधी अन् उत्पन्नाचे दाखले मिळतात.  जन्माचे दाखले नाहीत.  दुस-या ऑफिसमध्ये माणसाच्या जन्माचे दाखले मिळतात.  जनावराच्या जन्माचे नाहीत.  बरं तुझे काय काम आहे. ”                                                                                                       

            जना फोन कट करीत अदबीने म्हणाला, “माझ्या पोरीला कॉलेजात शिकायला पाठवतोय. म्हणून मला माझा उत्पन्नाचा दाखला पायजे. ”    “अरे वा! फार चांगली आनंदाची गोष्ट आहे.  मुलीना शिकविलेच पाहिजे.  घरातली स्त्री शिकलेली असली म्हणजे सर्व घर सुशिक्षित होते. पण काय आहे जनाभाउ, आज फक्त सात बाराचे दाखले देत आहोत.  उत्पनाचे दाखले परवा गुरूवारी देणार आहोत.  गुरूवारी सकाळी लवकर ये अन् घेउन जा.  मी तुला या चांगल्या कामासाठी जरूर मदत करीन. ” तलाठी भाऊसाहेब  आश्वस्त करित म्हणाले.    येसूबार्इला न राहवल्यामुळे तिने परत फोन केला.  “धनी, पिलाचा जल्माचा दाखला घेउन या बरं! तलाठी भाउसाहेबास्नी सांगा  देतीन ते. ”

             “अगं पर तलाठी हापिसात फकस्त जमिनीच्या व्यवहाराचे अन् उत्पन्नाचे दाखले मिळत्यात.  जनावराच्या जल्माचे दाखले कुठबी भेटत नाय. ” जना तिला समजावित म्हणाला.  

             “ ते काय नाय. तलाठी भाउसाहेब इतके दाखले देतात, त्यात अजून एक.  कागुदावर दोन ओळी खरडायच्या अन् फकस्त सही शिक्का मारायचा.   झाला दाखला तयार.  हाय काय अन् नाय काय. इतलं सोप काम हाय. ” येसूबार्इ  म्हणाली.

               तलाठी भाउसाहेबांनी तिचे संभाषण ऐकले .  त्यांना मजेशीर वाटले.  त्यांनी जनाला फोन मागितला व म्हणाले, “ दे इकडे मी बोलतो त्यांच्याशी. ”

             त्यांनी फोन मागीतल्यावर सर्वजण आश्चर्यचकित व धीर गंभीर झाले व आता तिला चांगलेच फैलावर घेतील असे वाटले.  ते काय बोलतात यावर सर्वांच्या नजरा रोखल्या गेल्या.

               तलाठी भाउसाहेब शांतपणे बोलते झाले. “येसूबार्इ नमस्कार.  मी तलाठी भाउसाहेब बोलतोय. ”

              त्यांचा आवाज ऐकून येसूबार्इ थोडी मनाने हादरली.  डोक्यावरचा पदर सावरीत व स्वत:ला सावरीत आपली बाजू मांडीत म्हणाली,“भाउसाहेब गाढवं म्हणजे जनावर न्हायीत त्ये आमच्या कुटुंबातलेच हायेत अन् आमचं पशुधन बी. त्याच्यात वाढ झाली म्हणजे आमास्नी आनंद हुणारच की नाय.  मंग त्यास्नी बी जल्माचा दाखला मिळाया नकु का? संत ज्ञानेश्वरांनी रेडयाच्या मुखातून वेद म्हणवून त्येच्या जल्माच सार्थक केलं.  संत एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजून त्याला जिवदान दिले.  ही गाढवं बी त्याचेच वंशज हाय. मंग त्यास्नी दाखला मिळाया हवा. ”

              “ अहो येसूबार्इ.  चतुष्पाद जनावरांना जन्म दाखला दिल्याचे माझे अजून तरी माहितीत नाही आणि मला तसा अधिकार पण नाही.  आणी त्याचा तुम्हाला आणि तुमच्या गर्दभाला काय फायदा हो?” तलाठी भाउसाहेबांनी विचारले.

               “ भाउसाहेब, त्या दाखल्या वरून ते या गावचं गाढाव हाय हे निश्चित हुर्इल अन् त्याला गावात कुठबी चरायला मुभा मिळेल.  त्याला कोणी आडिवणार नाही.  भविष्यात कधी सरकाराने जनावरांसाठी चारा छावणी उघडून मदत केली तर गाढवास्नी बी खुराक मिळऺल अन् त्याचा फायदा हुर्इन की.  गाढाव आमच्या उत्पनाच साधनच हाय नं. ”  येसूबार्इ खुलासा करित म्हणाली.                                                                                                                                                                       

                “ अहो येसूबार्इ, ते सगळ खरयऺ.  आज तुम्ही त्याचा जन्माचा दाखला मागतात.  उद्या त्याचे आधार कार्ड मागाल.  परवा मतदानाचे कार्ड मागाल, नंतर रेशन कार्डामध्ये नोंद करून मागाल. ” तलाठी भाउसाहेब एक एक विचारते झाले.

               “ न्हाय.  ते अजून म्या ठरीवलं नाय. उंद्याच उंद्या बघू. आज फकस्त जल्माचा दाखला द्या. ”  येसूबार्इ म्हणाली.

                “अहो येसूबार्इ आधी सांगितल्या प्रमाणे चतुष्पाद जनावरांना जन्माचा दाखला दिल्याचे माझे अजून तरी माहितीत नाही.   तरीपण हे सगळे आपण त्याचा नामकरण विधी व पहिला वाढदिवस साजरा कराल तेव्हा मला बोलवा. पाहू तेव्हा. ” तलाठी भाउसाहेब वेळ मारून नेत व तिचे समाधान करत म्हणाले.

                येसूबार्इ कडे आता बोलण्यासारखे काहीच नव्हते म्हणून “ठिक हाय”म्हणत तिने फेान ठेवला.              फोनवरील संभाषण झाल्यावर तलाठी भाउसाहेब उपस्थितांना उद्देशून  म्हणाले, “बघा मंडळी, यातील थोडा विनोदाचा भाग सोडल्यास येसूबार्इचा भोळाभाव, निरागसता व प्राणिमात्रावरील प्रेम स्पष्ट दिसते.  ग्रामीण भागातील अडाणी जनता आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना देखिल आपलेच मानते.  त्यांना कुटुंबातील सदस्याचा मान देतात.  त्याच्यावर तेवढेच प्रेम करतात.  नुसते “प्राणी मात्रावर दया करा” “जगा व जगु द्या” अशी मोठी मोठी वाक्ये न उच्चारता प्रत्यक्षात आचरणात उतरवतात. अशी भावना शहरी भागात शहरवासीयांमध्ये दिसणे दुर्मिळच. ” असे म्हणत गाढवाच्या जन्माचा दाखला या विषयावर पडदा पडला व ते आपल्या  कामाला लागले.   

Go Back

Comment