Menu

पुनरारंभ

199266

विष्णु न्हावी

Please download here !!          

विष्णु न्हावी

           दारात धोपटी ठेवतच विष्णु न्हाव्याने आवाज दिला “ ए बबन्या चल पोत आण बसायला.  आर्धी खाकी विजार व दोन गुंडया तुटलेला शर्ट घातलेल्या बबन्याने बर हकुम पोते आणले.  पोते अंथरत विष्णु न्हाव्याने विचारले “ तो शान्या कुठाय?  त्याची पण कटिंग करायची आज.”

          “गिरणीत गेलाय दळण आणायला. येर्इल आताच” बबन्याने उत्तर दिले.

           माझ्या स्मॄतिप्रमाणे, माझे लहान पणापासून विष्णु न्हावी आमच्या कॉलनीत घरी येउन दाढी कटिंग करायची सेवा देत असे. जसा फॅमिली डॉक्टर तसा आमचा फॅमिली न्हावी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चाळीशी उलटलेला, कॄष्ण वर्ण, साधारण पाच फूट उंची, मेाठाले डोळे, पिळदार पांढ–या मिशा, मिशांच्या वर डाव्या बाजूला नाकाजवळ मोठा काळा मस, भाविक असल्याने कपाळावर व कानांच्या दोन्ही पाळयावर गंधाचा टिळा,  जणू कॉलर साठी कापड कमी पडल्यामुळे कॉलर विरहित फूल बाहीचा पांढरा शर्ट, शर्टाच्या आत बंडी, चापून चोपून नेसलेले दोन टांगी पांढरे धोतर, पायात कधीही पॉलीश न केलेल्या जड वाहाणा, हातात दोन्ही बाजूनी उघडणारी वरून अर्ध गोलाकार झाकणाची व खाली चौकोनी पञ्याची धोपटी.  

          धोपटीतले साहित्य म्हणाल तर तत्कालीन अद्ययावत सामग्री. जसे ८ इंच बाय ६ इंच आकाराचा साधारण जुनाट पारा उडत चाललेला आरसा. अंगावर टाकायला चारही बाजूनी गोठ वाळलेले पांढरे एक ते दिड मिटर घरी धूतलेले कापड. झिरो तसेच एक व दोन नंबरचे केस कापायचे मशिन, एक लहान व एक साधारण मोठी अशा दोन काञ्या, वस्तरा, वस्त–याला धार लावायचा दगड व चामड्याचा पट्टा, गोदरेजचा साबण ठेवायचा गोल डबा, दाढीचा साबण काढण्याचे उथळ भांडे,  एकुलता एक कडक झालेला दाढीचा ब्रश, नखे कापायची नरांगी,  ठराविक ग्राहकांसाठी केस काळे करण्याची तत्कालीन कांटा छाप पावडरच्या दोन तीन पुड्या इ. इ. सर्व आवश्यक साहित्य जागच्या जागी व्यवस्थित रचलेले. असा तो विष्णु न्हावी दर आठवडा पंधरा दिवसाला न चुकता आमचेकडे सकाळी सकाळी आठचे सूमारास हजर व्हायचा.           

            आमचा बबन्या शांत स्वभावाचा आज्ञाधारक तसाच हुषार तर शाम शेंडेफळ. खोडकर, मस्ती खोर, बिनधास्त बोलणारा, निर्धास्त वागणारा, स्वत:ला नेहमीच शहाणा समजणारा.  त्याचे सर्व मित्र त्याला शाम्या नावाने संबोधित असत. त्याच्या बोलण्यात नेहमी शहाणपणाची भाषा असल्यामुळे विष्णुने त्याचे नामकरण शाम्या एैवजी शान्या केले. शाम्या नावाप्रमाणे शहाणा असल्यामुळे त्याने पण विष्णु काकांचे नाव दरोडेखोर काका असे केले.  का केले याची पण गंमतच आहे.

              त्याच काय झालं एकदा नेहमीप्रमाणे विष्णु न्हावी रविवारी सकाळी घरी आला.  शाम्या कटिंग करायला बसला. त्याला विष्णु न्हाव्याची थोडीशी फिरकी घ्यावीशी वाटली.  तसा तो म्हणाला “ काका तुमचा काळा उग्रा चेहरा,  झुपकेदार मिशा, नाकाजवळ असलेला मोठा काळा मस व मोठाले डोळे पाहता तुम्ही जर काळे कपडे, कमरेला पट्टा, डोक्याला कापडी पट्टी, हातात रायफल, गळयात काडतूसांची माळ व काळा चष्मा असा थोडासा वेश बदलला तर तुम्ही हूबेहूब दरोडेखोर काका शोभून दिसाल.

              विष्णु न्हावी त्याची मान खाली दाबत म्हणाला, “ए शान्या, मी काय तुला चोर दरोडेखोर वाटतो काय?  दरोडेखोर कसा असतो कधी पाहिलाय तरी का? जास्त शहाणपणा करू नको. गुपचुप खाली मान घालून बस. हलू नकोस, तुझी वटवट बंद कर नाहीतर डोक्यावर एक केस ठेवणार नाही. सर्व केस कापून चकोटा, चमण लोटा करिन.” तेव्हां पासून तो त्यांना दरोडेखोर काका म्हणून बोलावित असे.

           गप बस म्हटले तर गप बसणार तो शाम्या कसला. तो आपली अक्कल पाजळीत म्हणाला, “बरंय ते जाउ द्या काका. तुम्ही साक्षात विष्णु भगवानच वाटतात. ”शाम्या  म्हणाला.                   

           “ते कसे काय रे ?” विष्णनेु आपली शंका उपस्थित केली.

            शाम्या खुलासा करीत म्हणाला, “मागच्या आठवडयात सकाळी बाबांना दाढी करून लवकर बाहेर जायचे होते म्हणून तुम्हाला बोलवायला सांगितले. तुम्ही कॉलनीतच कोणाच्या तरी घरी असणार याचा अंदाज घेत सर्व ठिकाणी जाउन आलो. सगळीकडे तुम्ही नुकतेच गेल्याचे समजले.” मध्येच त्याचे बोलणे खंडित करित विष्णु म्हणाला,  “गाढवा मला इतक्या लवकर वर पाठवतोस काय, मी तुझे जाउळ ककाढलेत. तुझ्या पोराचे जाउळ काढूनच जार्इन.  समजलास काय? ”

            शाम्या आपली बाजू सावरीत हातवारे स्पष्टिकरण देत म्हणाला, “अहो काका नुकतेच गेलेत म्हणजे वर नाही. काम करून दुसरीकडे गेलेत. ”

           “ गाढवा मग असे स्पष्ट सांग की” विष्णू समजाविण्याच्या सुरात म्हणाला. पुढे            आपले म्हणणे पूर्ण करित शाम्या पुढे बोलू लागला. “ काका मी संपूर्ण कॉलनी पालथी घातली पण तुमचा पत्ता लागला नाही.  शेवटी खालच्या आळीत उस्मान चाचा कडे त्यांच्या दाढीला कट मारत असल्याचे समजले.  तेथे विचारले तर चाचा पण म्हणाले “ वो अभीच यहाँसे कट मारके गये.”  शेवटी बाबा तसेच दाढी न करता निघून गेलेत. म्हणून म्हटलं काका, एकाद वेळा शोधले तर साक्षात विष्णु भगवान सापडतील पण तुमचा पत्ता लवकर लागणार नाही”.

           “ ए गप बस शान्या जास्त चबर चबर करू नको” विष्णु परत गप करित म्हणाला.

            सकाळी लवकर आले तर आमच्या घरचा चहा हा विष्णु न्हावीचा ठरलेला व हक्काचा चहा असे. शाम्याला एकदा त्यांची गंमत करण्याची लहर आली. तो बाहेरूनच मोठयाने घरात आर्इला म्हणाला. “ आर्इ, दरोडेखोर काकांचा चहा गाळू नको.   त्यावर विष्णुन्हावी थोडासा नाराजीने परंतु अधिकार वाणीने म्हणाला,  “अरे गाढवा,  लेका हा माझा हक्काचा चहा आहे तुझ्या बापाने आजपर्यंत कधी नाकारला नाही अन् तु कोण रे माझा चहाचा हक्क हिरावून घेणारा उपटसुंभ.”

            शाम्या पण तेवढाच शहाणा.  तो खुलासा करता झाला, “ तसं नाही काका, ते काय आहे काका, मी चहाला नाही म्हणालो नाही, चहा गाळणीने चहा गाळायला उगाच वेळ घाललवायला नको म्हणून नाही म्हणालो.”

           विष्णुने आवाज थोडासा चढवून विचारले,  “कांरे का गाळू नको?”

           शाम्याने हसत उत्तर दिले.  “अहो तुमच्या एवढया झुपकेदार घनदाट मिशा असतांना चहा गाळण्याची गरजच काय ? चहा पितांना मिशा थोडयाशा पुढे ओठासमोर ओढून घ्यायच्या व काम झाल्यावर परत मागे. ”

          यावर विष्णुला काय उत्तर द्यावे ते समजेना.त्याने गमतीने त्याला मारण्यासाठी हात उगारला तोवर शाम्या दूर पळून गेला होता.    

           दिवाळी पाडव्याचा दिवस. विष्णु न्हावी प्रथेप्रमाणे या दिवशी आरसा दाखवून दिवाळी मागण्या साठी आला होता.  सोबत नेहमी प्रमाणे धोपटी होतीच. मला आरसा दाखविला.  सौ. ने घरातून  दिवाळी फराळाचे ताट व सोबत दिवाळी भेट आणून दिली. माझी दाढी वाढली असल्यामुळे मी सहजच त्याला म्हणालो, “अरे विष्णु आलाच आहेस तर जरा दाढी तरी करून दे जरा! ”                               “साहेब आज मी फक्त दिवाळी भेटी च्या उद्देशाने आलोय. धोपटीत फारसा सामान नाही.”

        “अरे दाढी करायला काय लागते फक्त साबण आणि वस्तरा आणि आरसा.  ते असेलच की ” इति मी.

         विष्णुने धोपटी उघडून पाहिले त्यात दाढीसाठीचा गोदरेज साबण संपला होता. विष्णु आपली असमर्थता प्रदर्शित करित म्हणाला, “साहेब दाढी केली असती पण …  …   … ”

        मी मध्येच आडवीत विचारले  “ अरे पण काय?”

        तत्परेने तो म्हणाला “दाढीचा साबण संपलाय.  मी दुसरा आणायला विसरलो. ” विष्णुने आपली अडचण मांडली.  

         त्यावर तोडगा काढीत व सारवासारव करित म्हणाला, “तुम्ही आमचे नेहमीचे गि–हार्इक. तुम्हाला नाही म्हणणे मला जड जातेय. पण जर घरातून तुमचा रोजचा आंघोळीचा साबण मिळाला तर दाढी करू शकेन.”

         त्याच्या तोडग्याला मान्यता देत मी घरात सौ. ला आवाज दिला, “अगं ए एैकलस कां?”

        आमची आज्ञाधारक हजरजबाबी पत्नी हातातील काम सोडून पदराला हात पुसत समोर हजर झाली व म्हणाली “बोला”.

        “न्हाणी घरातील आंघोळीचा हमाम साबण दे जरा”. इति मी.

          आज्ञा शिरसावंद्य मानीत काही क्षणातच हमाम साबणाची वडी माझे हाती सोपवित म्हणाली, “ व्वा छान ! नेहमी विष्णु कडून फक्त दाढी कटिंग होते. पण आज दिवाळीच्या शुभदिनी साक्षात भगवान श्री. विष्णुच्या हस्ते स्नान पण घडणार वाटते!”

         विष्णु न्हावी आदब राखीत व स्मित हास्य करित म्हणाला “वहिनी, तसे काही नाही माझा दाढीचा साबण संपलाय व साहेबांची दाढी करायची आहे म्हणून. ”

      आज नेहमी प्रमाणे विष्णु सकाळी लवकरच आला. चहाची लज्जत न चाखताच माझी दाढी करण्यास सुरवात केली.  दाढी करतांना आज तो नेहमीचाच विष्णु नसल्याचे मला जाणवले.  त्याचा चेहरा थोडा वेगळा वाटला.  डोळयात नेहमीचे तेज नव्हते.  हात थरथर कापत होता.  मी त्याला म्हणालो “ अरे आज चहा घेतला नाहीस. हात पण थरथर कापतोय.  तब्येत तर ठिक आहेना?”

         “ सर्व ठिक ठाक आहे.  पण काय होते ते मलाच समजत नाहीय” इति विष्णु.

         “अरे मग आज काम करू नको. घरी जाउन आराम कर” माझा सहानुभुतीचा व आपुलकीचा सल्ला.

         माझी दाढी करून माझ्या सल्ल्याचा मान राखीत विष्णु तडक घरी निघाला. परमेश्वराने त्याच्यापुढे काय वाढून ठेवले होते ते कोणास ठाउक. नियतीने विष्णुच्या बाबतीत उलटा खेळ खेळला. तिला शान्या आणि दरोडेखोरकाका यांच्यातील काका पुतण्याचे नाते व आपसातील  गमतीने चालणारी नोकझोक पसंत नव्हती. शान्याच्या दरोडेखोर काकांच्या आयुष्यावर नियतीने अवेळी दरोडा टाकला व त्याचे आयुष्य कायमचेच संपविले.

          घरी जाता जाता विष्णु ठेचकाळून पडला तो कायमचाच.  दुसरे दिवशी आमचा विष्णू विष्णुमय झाल्याची कटू बातमी कानी आली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म  ¦ भेदा भेद धर्म अमंगळ ¦¦ या संतांच्या उपदेशाप्रमाणे कॉलनीतील सर्व धर्मीयांशी सदैव हसत खेळत, चेष्टा मस्करी करीत स्मित मुद्रेने दिलेली सेवा आमच्या स्मरणी ठेउन तो कायमचाच आम्हाला सोडून गेला होता.

Go Back

Comment