Menu

पुनरारंभ

199256

पेरूवाल्याची पोर

Please Download here !!

 

प्रकाशन : गॄहलक्ष्मी जुलै २०१३ | अन्नपूर्णा मासिक जून २०१२

 

पेरूवाल्याची पोर

               सायली आणि शेवंता देाघी जिवा भावाच्या मैत्रीणी.  सायली एक मध्यम वर्गीय  घराण्यातील.  तिचे वडिल एका सरकारी कार्यालयात अधिक्षक.  तर शेवंताची घरची परिस्थिती बेताचीच तिच्या वडिलांचा पेरू विकण्याचा व्यवसाय.   दोघी अभ्यासात हुषार.  बारावीचे परिक्षेत उत्तम गुण मिळवून देखिल शेवंता नाराज दिसत होती. तिची नाराजी पाहून सायली ने विचारले‚

          “काय गं ! काय झाले एवढी उदास का? अजून जास्त गुण मिळायला हवे होते का ?”

           “ नाही गं तसं नाही ” शेवंता म्हणाली. 

          “ मग अशी उदास का? काही बोलत नाही. काही अडचण आहे का?” सायलीने प्रतिप्रश्न केला.

           “ नाही गं काही नाही ” शेवंता म्हणाली.

            “ अगं मैत्रिण म्हणवतेस आणि सांगायला पण लाजतेस.  काय परकी समजतेस मला? मन मोकळे कर. मी काही मदत करू शकली तर जरूर करेन” सायली आश्वासन देत म्हणाली.                                  

            असा ‘हो नाहीचा’ दोघीतील संवाद १५ ते २० मिनिटे चालू होता. अखेर शेवंता जड अंतः करणाने आपले दुःख लपविण्याचा प्रयत्न करीत बोलती झाली.

            “ अगं‚ तुला माहीत आहे आमची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे.  माझ्या बाबांनी फळ विक्री करून आजपर्यंत कसे बसे माझे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.  आर्इला मधूमेह आहे. तिच्या औषध पाण्याचा खर्च व माझ्या शिक्शणाचा खर्च बाबांना झेपणार नाही.  मी एकूलती एक असल्याने १२वी पर्यंत शिक्षण होउ शकले. आता आर्इ पुढील शिक्षण घेण्याच्या विरोधात आहेत. बाबा काहीतरी विचार करू असे मोघम म्हणतात. मला अजून पुढे खूप शिकायची इच्छा आहे.  वाणिज्य शाखेत पदवी घेर्इन म्हणते. जमल्यास पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा पण विचार आहे. पण परिस्थितीमुळे काहीच करता येत नाही. जर शिक्षण सोडले तर घरीच बसावे लागेल, फार तर एखाद्या  दुकानात सेल्स गर्लची छोटीशी नोकरी करता येर्इल. पण मला ते नकोय गं !  मला माझे करिअर बनवायचे आहे. ” हे सांगत असतांना तिच्या डोळयात अश्रू दाटून आले. तिचे दु:ख एैकून सायलीच्या डोळयाच्या कडा पण पाणावल्या.

            डोळे पुसत सायली म्हणाली‚ “परिस्थिती विचार करण्या जोगी आहे.  माणूस सर्व सोंग आणू शकतो पण पैशाचे सोंग आणू शकत नाही बघ.  आणी असे झाले तर माझ्या जिवनात मी एका चांगल्या मैत्रिणी पासून वंचित राहीन.  आपण दोघी एकाच कॉलेजात जाउ. एकत्र अभ्यास करू. मैत्रिणी जमवू. अशी अनेक स्वप्ने मी रंगविली होती गं.  सर्व विरली बघ.  तरीपण काळजी करू नकोस.  उद्या येर्इन मी तुझ्या घरी, तुझ्या आर्इची समजूत काढायला.  मग तर झालं. आता तरी हास व छानसे स्मार्इल दे !  चल आपण रसवंतीमध्ये उसाचा रस घेउन तोंड गोड करू या म्हणजे तुझा मुड येर्इल. ” असे म्हणत दोघींची पावले जवळच्या रसवंती गृहाकडे वळाली.  रसपान करतांना पण त्यांच्या याच विषयावर गप्पा झाल्या. रसपान झाल्यावर दोघींनी आपापल्या घरची वाट धरली.                               

        एक हुषार व होतकरू मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार म्हणून तिला पण वार्इट वाटले. पण करणार काय.  सायलीने सर्व हकिकत घरी आर्इस सांगितली.  रात्री जेवतांना सायलीला कोणत्या कॉलेजात प्रवेश घ्यावा हा विषय चर्चेत आला. त्यावेळी सहजच म्हणून सायलीने शेवंताची कहाणी तिच्या बाबांना पण सांगितली “आपण काही या बाबतीत करू शकतो काय ?” विचारले.

       “सध्या या घडीला काहीच करू शकत नाही. बघू पुढे. ” बाबा म्हणाले.  

       दुपारची निवांत वेळ. शेवंता घरातच होती. तिची आर्इ नुकतीच कामे आटोपून पहुडली होती.

       “ येउ का ?” हे शब्द कानी पडताच शेवंताचे लक्ष दाराकडे गेले. दारात सायलीला पाहून म्हणाली.

       “अगं ये ना!   येउ का काय विचारतेस ? ”शेवंता म्हणाली.

       सायलीचा आवाज ऐकून शेवंताचे आर्इस जाग आली व उठत म्हणाली,  “कोण, सायली तू?”

       थोडयाशा गप्पा झाल्यावर सायलीने विषयास हात घातला.

       “ मावशी‚ शेवंतास कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार?”

       “आता कुठले आले कॉलेज अन् काय पोरी.” शेवंताची आर्इ हताशपणे एक मोठा सुस्कारा सोडत म्हणाली.

       “ म्हणजे मी नाही समजले. पण असे का हो म्हणता मावशी? असे काय झाले की, तिचे शिक्षण अपुरे ठेवावे लागते?” सायली म्हणाली.

      “ अगं पोरी तुला काय सांगू आणि कसं सांगू हेच कळेना बघ. ” शेवंताची आर्इ म्हणाली. आज पर्यंत शिकली तेच पुष्कळ झाले.  आमच्या डोक्यावरून पाणी गेले गं बार्इ! तु जाणतेच कॉलेज म्हटले की, देणगी‚ फी‚ पुस्तके‚ ड्रेस वगैरे खर्च आला.  यासाठी पैसा लागणार.  यांचा फळ विक्रीचा व्यवसाय. हातावरचे पोट.  दिवसाकाठी खूप फिरल्यावर, कसे तरी शे–दोनशे रूपये मिळतात. त्यातच उद्यासाठी माल आणायचा, घर खर्च करायचा‚  भरीस भर त्यात माझे आजारपण, शिवाय हिच्या लग्नासाठी थोडीफार पुंजी बाजुला ठेवायला हवी. मग तुच सांग पोरी, हिचे शिक्षण कसे शक्य आहे? उगाच अर्धवट शिकण्या पेक्षा न शिकलेली बरी.  शिवाय आमचे समाजात शिकलेल्या मुलीचे लग्न जमविणे कठिण जाते बघ.  मुले एवढी शिकलेली नसतात.                                                               

 त्यापेक्षा फार तर एखाद दुसरा छोटा मोठा कोर्स करून व्यवसायाला लागणे किंवा लग्न जमेपर्यंत नोकरी करून घरास हातभार लावावा असे वाटते गं बार्इ.  परिस्थितीमुळे तिचे शिक्षण अपुरे राहते याची आम्हाला देखिल खंत वाटते गं !  पण काय करणार? ”एवढे बोलुन परत एकदा मोठा सुस्कारा सोडला.

         यावर सायलीकडे काहीच उत्तर नव्हते. तरीपण स्वत:ची बाजू सावरीत सायली म्हणाली. “मावशी, हे सर्व खरंय.  पण मी म्हणते, मुलीच्या शिक्षणासाठी शासनाच्या काही योजना आहेत त्याचा फायदा का घेउ नये? मुली शिकल्या तर संसाराला तिचा हातभार लागतो.  वेळप्रसंगी शिक्षणाचा फायदा घेत ती स्वत:चे पायावर उभी राहू शकते. ”                                  

           “तुझे म्हणणे खरंय पोरी.  पण शासनाकडून मदत मिळवायची म्हणजे कागद पत्रांची पुर्तता करणेत दिवस जातात. लाच दिल्याशिवाय कामे होत नाही. ऑफिसला सतराशेसाठ हेलपाटे घालवे लागतात हेलपाटे मारण्यातच दिवस जातात. एक दिवस गेला म्हणजे त्या दिवशी चूल बंद याची कल्पना नाही तुला पोरी. ” शेवंताची आर्इ जड अंत:करणाने म्हणाली. यावर सायलीजवळ काहीच उत्तर नव्हते.  

          “तरीपण प्रयत्न करायला काय हरकत आहे.  प्रायत्नांती परमेश्वर. आज ना उद्या कधीतरी यश येणारच. अशी आशा करण्यात काय हरकत आहे.  उद्याच्या आशेवरच माणूस जगतो ना!  बघते मी माझ्या बाबांना पण सांगून” सायली म्हणाली. तिचा आत्मविश्वास पाहून शेवंताची आर्इकडून तिचे कौतुकोदगार निघाले. “ हुषार आहेस गं पोरी. ऐकणार आहेस थोडीच. ”

          शेवंता शांतपणे सर्व ऐकत होती. बोलणे झाल्यावर चहापाणी करून, सायली जाण्यास निघाली.  तिला निरोप देण्यास ती रस्त्यापर्यंत आली.  “परत ये गं ऽऽ पोरी.” शेवंताच्या आर्इने आग्रह पूर्वक निमंञण देत आवाज दिला.

          सायलीचॆ बाबा सदाशिवरावांनी त्यांच्या परीने शेवंतास शासनाकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न केलेत पण अपयश आले. वर्तमान पञातून आवाहन केले. आवाहनानुसार एका स्वयंसेवी संस्था मदतीस पुढे सरसावली. शेवंता व सायलीला एकाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पुनश्च दोघींचे कॉलेज व अभ्यास नित नियमितपणे सुरू झाला. |

          शनिवारचा दिवस.  दुपारी अडीच तीनची वेळ.  सायली व शेवंता दोघी सायलीचे घरी अभ्यास करित होत्या. सदाशिवराव आराम करित होते तर आर्इ घरकामात मग्न होती.  तोच कानावर नेहमीची चितपरिचीत आरोळी कानी आली.

         पेरू घ्या पेरू ऽऽऽ गोड पेरू ऽऽऽ कलमी पेरू ऽऽऽ.

         सायलीने बाहेर येउन पेरूवाल्यास साद दिली.

         “ ओ पेरूवाले काका इकडे या. ”  

            साधारण 50शीच्या आसपासचा डोळयात जाड भिंगाचा चष्मा‚ पांढरी टोपी‚ पाढरा पूर्ण बाहीचा शर्ट‚ वर खोचलेले एक टांगी पांढरे धोतर‚ पायात चामडी वाहाणा असा पेहराव केलेला इसम सायकल सह हजर झाला. सायकलच्या मागील कॅरेजला उथळ टोपलीत गवत आंथरून पेरू रचलेले होते. सायकलच्या हँडलला एका बाजूस काटा अडकवलेला तर दुस—या बाजूस प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत पेरू वजनाची मापे व जेवणाचा डबा होता.

            सायली नेहमीप्रमाणे म्हणाली “आज चार पेरू द्या”.

            शेवंता सायलीचे मागोमाग बाहेर आली. पेरूवाल्यास पाहून म्हणाली, “ बाबा तुम्ही ”

             पेरूवाल्याचा प्रतिेप्रश्न “सर्इ‚ पोरी तु इकडे कोठे आलीस आज? ”   

            दोघांमधील संवाद एैकून सायली चकित झाली व म्हणाली,“तुम्ही दोघे एकमेकास ओळखतात ? ”

            “ होय पोरी.  ही माझी एकुलती एक मुलगी शेवंता. हिला आम्ही घरी सर्इ म्हणतो, ” पेरूवाला उत्तरला.

             एव्हाना सायलीचे आर्इ बाबा पण बाहेर आले. शेवंता आपल्या वडिलांना त्यांची ओळख करून देत म्हणाली, “ बाबा ही माझी मैत्रीण सायली, हे सायलीचे बाबा व आर्इ.  ही आपल्याकडे एक दोन वेळा आली त्यावेळी तुम्ही घरी नव्हता.”

              ओळख परीचयानंतर सदाशिवराव व शेवंताचे बाबा यांच्या गप्पा चालू असतांनाच शेवंताचे लक्ष सायकलला अडकविलेल्या पिशवी कडे गेले.  पिशवीतील जेवणाचा डबा जसा चा तसा पाहून शेवंता थोडया रागत येउन म्हणाली, “हे हो काय बाबा, अजून डबा खाल्ला नाही? आता तीन वाजलेत, जेवणाची वेळ टळून गेली. उपाशीच फिरताय.  चक्कर येतील ना ? ”

             “ खाइन आता. ही नेहमीची एक दोन गि­हार्इक झाल्यावर जेवणारच आहे. उपाशी थोडीच राहणार?  ” शेवंताचे बाबां म्हणाले.

            “थांबा, आता जेवण करूनच जा. आम्हा सर्वांची पण जेवणे राहीलीत अजून.  मी वरण भाताचा कूकर लावते व भाजी गरम करते. चपात्या तयार आहेत. ” सायलीची आर्इ आग्रह करित म्हणाली.           नाही नाही म्हणता त्यांचा आग्रह त्यांना मोडवेना. जेवणे आटोपून शेवंताचे बाबा जायला निघणार त्यावेळी सायलीने पेरूचे पैसे देउ केले. ते नाकारत शेवंताचे बाबा म्हणाले, “राहू दे पोरी. माझ्या पोरीच्या शिक्षणासाठी झटणा­या मोठया मनाच्या माणसांपेक्षा पैसा मोठा नाही. अशा थोर माणसाची ओळख झाली ती काय कमि झाली. ” तू पण माझ्या सई सारखीच आहेस. मुलीकडून घ्यायच नसतं. तिला द्यायच असतं.”

            शेवंताचे बाबा भावनावशतेने बोलून गेले. कळत न कळ त्यांच्या डोळयांच्या कडा पाणावल्या. धोतराच्या सोग्याने डोळे पुसत निरोप घेत म्हणाले,  “ निघतो मी अजून बराच माल अडलाय पाटीत. सर्इ पोरी लवकर जा घरी. तुझी आर्इ वाट बघत असेल. ” ओळख परीचयानंतर त्यांच्यातील घरोबा वृध्दिंगत होत गेला.

           शिक्षण पूर्ण होत असतांनाच शेवंतासाठी वर संशोधन सुरू असल्याचे सदाशिवरावांना समजले. त्यांच्या कार्यालयात नुकताच विनायक कांळे नावाचा हुषार, होतकरू, विवाहेच्छु, सुस्वभावी तरूण रूजू झाला होता. विनायक एका गरिब शेतकरी कुटुंबातुन पुढे आलेला. त्यांना हे स्थळ शेवंतासाठी योग्य वाटले. एक दिवस विनायकचा रजेचा अर्ज टेबलावर आलेला पाहून सदाशिवरावांनी गमतीने विचारले, “काही खास कार्यक्रम आहे वाटत. लाडू खाउ घालण्याचा विचार दिसतोय. ”  

          “ हं, होय, न  न नाही सर. आजीची प्रकॄति ठिक नाही म्हणून भेटून यावे म्हणतो.” विनायकने बिचकत उत्तर दिले.  

         “ काय होय काय नाही. आजीच्या आजारपणाचे नुसते कारण आहे. ” सदाशिवराव म्हणाले.  

         “नाही सर, तसे काही नाही. ” विनायक सारवासारव करित लाजत म्हणाला.           

         “बरं तुझे आर्इ वडिल कोठे आहेत?” सदाशिवराव मुद्याला हात घालत म्हणाले    .

         “सर ते कालच येथे आलेत. आहेत खोलीवर.” इति विनायक.

          “उद्या संध्याकाळी घेउन येशील त्यांना माझ्या घरी भेटायला. तेवढीच ओळख.” सदाशिवराव म्हणाले.

         “होय सर‚ सांगतो मी त्यांना.” इति विनायक.

         ठरल्या प्रमाणे संध्याकाळी विनायक त्याचे आर्इ वडिलांसह आला. ओळख, गप्पा टप्पा, चहापाणी झाल्यावर सदाशिवरावांनी विनायकचे लग्नाचा विषय काढला व शेवंताची माहिती देत प्रस्ताव पुढे मांडला. होय नाही करता करता दुसरे दिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. दोन्ही पक्ष समविचारी लाभल्यामुळे, आठवडया भरातच दोहोबाजूंचा होकार आला व यथावकाश विवाह सोहळा आनंदात पार पडला.

          महिन्या भरातच विनायकचे निमंत्रणावरून सदाशिवराव, त्यांची पत्नी व शेवंताचे आर्इ वडील पूजेचे निमित्ताने त्यांचे घरी गेले. शेवंताने आधीच सदाशिवरावांचे आवडीचा पेरूचा मुरंबा केला होता. जेवणे आटोपल्यावर सदाशिवरावांनी सहजच शेवंताचे सासूला प्रश्न केला. “ काय कशी आहे आमची शेवंता?  ”   

          शेवंताचे सासू कडून त्वरेने उत्तर आले. “पेरूवाल्याची पोर ती‚ पेरूच्या फोडे सारखीच गोड आहे. ”

          

Go Back

Comment