Menu

पुनरारंभ

199215

पेरलं तसं उगवतं

 Please download here !!

प्रकाशन : शिवस्पर्श दिवाळी अंक २०१४ 

पेरलं तसं उगवतं

           ज  दौलतरावांना जाउन जवळजवळ सहा महिने झाले.  परंतु सरूच्या डोळयातील पाणी थांबावयास तयार नव्हते. असा एकहि दिवस गेला नसेल, ज्या दिवशी दौलत रावांची आठवण तिला झाली नाही.  रोजचा दिवस उगवायचा तो मुलगी नलीनीच्या लग्नाची चिंता, मुलगा उमेशच्या शिक्षणाची काळ, अर्धांगवायुने पिडीत सास–यांचा औषधाचा खर्च व डोक्यावरील बँकेच्या कर्जाची टांगती तलवार घेउनच.  यात कमि ती काय महागार्इ व भ्रष्टाचार यासारखी महाभुते तिच्या भोवती फेर धरून नाचायची.  याशिवाय भाउबंदकी ती वेगळीच.  सर्वांनी जणू तिला त्रास देउन तिचे जिवन विस्कळीत करण्याचा विडाच उचलला होता.  तिला जिवन जगणे नकोसे करू टाकले होते.  

           दौलतरावांनी त्यांच्या हयातीत तहसील कार्यालयात शेतीवरील कर्ज माफी करण्यासाठी अनेक खेटे मारले. हवे नको ते कागद पत्र पुरविलेत. आयपत नसता अधिकारी, कर्मचा—यांचे लाड पुरविले.  परंतु त्यांना यश मिळाले नाही. अंती कंटाळून भरला संसार अध्र्यावर सोडून मॄत्यला कवटाळले.  पति निधनानंतर सरकार दरबारी केव्हा तरी, कधी तरी सरकारी अधिका—यांना जाग येर्इल व कर्जमाफी होर्इल या वेडया आशेने  “पयत्नांती परमेश्वर” व  “प्रयत्ने रगडीता वाळूचे कण तेलही गळे” म्हणत सरूने आपले प्रयत्न चालू ठेवले.  पण भ्रष्ट अधिकारी व कर्मचा—यांनी दाखविलेल्या कोरडया सहानुभुति शिवाय तिच्या पदरी काही पडत नसे. ती एकाकी पडली होती. तिच्या मदतील कोणीही नव्हते.

 “जन पळभर म्हणतील ‘हाय हाय’

  मी जाता राहील कार्य काय ,

  सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,

  तारे आपला क्रम आचरतील

  असेच वारे पुढे वाहतील    ¦ 1 ¦   

 

  सखे सोयरे डोळे पुसतील

  पुन्हा आपुल्या कामी लागतील

  उठतील बसतील हसुनि खिदळतील

  मी जाता त्यांचे काय जाय ? ¦ 2 ¦”

 

या कवितेतील ओळींची प्रचिती तीला रोजच जाणवत होती. 

            नेहमी प्रमाणे ती आज कचेरीत चौकशी साठी आली होती.  पण अधिका—यांनी नेहमी सारखे केवळ पोकळ आश्वासनाशिवाय तिच्या पदरात काही टाकले नव्हते.  काम न झाल्यामुळे ती निराश होउन विवंचनेत घरी परत चालली होती.  रस्ता कापत होती मन मात्र इतरत्रच गुंतले होते. घराजवळ येताच पाठीमागून येणा—या शेत मालाने भरलेल्या बैल गाडीचा धक्कयाने  “ओ ऽ ऽ  तार्इ जरा बाजूला व्हा की !” या गाडीवानाच्या आवाजाने ती भानावर आली . तीचे लक्श गाडीच्या चाकाकडे गेले.  चाकाच्या  आ—यांना छानसा रंग दिल्यामुळे चाके फिरतांना छान रंगी बिरंगी दिसत होती. घरात येताच ती ओसरीवर टाकलेल्या घोंगडीवर स्थानापन्न झाली.  तसे नलिनीने थकल्या भागल्या आर्इला पाणी आणुन देत म्हणाली,  “बस ! खूप थकलीस. अगं आर्इ तु निष्कारण काळजी करतेस बघ. सर्व काही ठिक होणार आहे.  पण त्याला थोडा वेळ तर द्यायला पाहिजे ना !   पाणी पी आणि घरात जाउन आराम कर. मी बघते स्वयपाकाचे सर्व. ” तिच्या बोलण्याकडे सरूचे लक्षच नव्हते. “आर्इ पाणी घे ना.” नलिनीच्या या पुनश्च बोलण्यामुळे ती भानावर आली.  तिने तोंडावर पाण्याचा थोडासा पाण्याचा हपका मारला. पदराने चेहरा पुसला व पाण्याचा घोट घेतला.  चेह—यावर थोडीशी तरतरी आली.  ती तशीच ओसरीवरच लवंडली.  थकव्यामुळे केव्हा डोळा लागला ते समजलेच नाही.  झोपली तरी मन गाडीच्या चाकाच्या रंगविलेल्या रंगीबेरंगी आ—यांप्रमाणे प्रमाणे गरगर फिरत होते.

              तिच्या डोळयासमोर गेल्या चार पाच वर्षापूर्वीची ती सुखमय दॄश्ये दिसू लागली.  नुकतीच होळी झाली होती. धरणीमाय दौलतरावावर जाम खुश होती. गहू व ज्वारीच्या राशीच्या राशी भर भरून  घरी येउन पडल्या होत्या. सोबतीला कडधान्याने पण छान साथ दिली होती.  नव्या गव्हाच्या शेवया, पापड, कुर्डया व इतर वाळवणाने अंगण भरून गेले होते. धान्य साठवणीला घर कमि पडले म्हणून गरजे पुरते व पुढील वर्षाच्या पेरणी साठी आवश्यक तेवढच धान्य घरात ठेउन बाकीचे विकावे विचार झाला.  मनाजेागता भाव मिळाला.

              चैत्री पाडव्याचा दिवस उजाडला. घरा दारात चैतन्याचे व आनंदाचे वातावरण होते.  दौलतराव सकाळपासूनच खूश हेाते.  खुशीमध्ये सरूला म्हणाले, “सरू बाय, आज गुडी पाडव हाय. म्या म्हनतो आपुन समदे तालुक्याला जाउया! मला थोडेसे काम हाय, त्ये मी करतो नंतर पाडव्याची खरेदी करूया!   आज सोनं घेतलेल लय चांगलं असत म्हनत्यात.” दौलत रावांनी आपला विचार प्रकट केला.

                “अवो पर आज सणाचा दिस हाय. दारात गुढी उभारली हाय. घरात काहीतरी गोड धोड करून गुढीला अन् आपल्या वास्तूला पण निवद करायचा हाय.  दारी दुभती जनावर हायती.  धारा काढायच्या.  त्यांच चारा पानी कोन करीन.  आज कसचं जमन?” सरूने आपली अडचण सांगितली.  “तुझ आपलं असंच असत. म्या जवा कुठं जायाच म्हनतो, तवा तु न्हाय म्हनते. व्हतीन की घरातली बी कामे व्हतीन. ” दौलतराव नाराजीने म्हणाले.  त्यावर तोडगा काढीत दौलतराव म्हणाले, “म्या जातो म्होरं जेवण करून.  नांगरटीसाठी ट्रॅक्टरवाल्याशी बोलतो अन म्होरल्या हप्त्यात नांगरट करून घेउ या!  तु, नलीनी, उम्या अन् बापू समदे या दुपारच्याला गाडीनं. ”

               ठरल्या प्रमाणे सगळे दुपारी तालुक्याच्या गावी गेले.  तोवर दौलतरावांची कामे आटोपली होती.  दौलतराव सर्वांना घेउन आधी सोनाराच्या दुकानात खरेदी करण्या निघाले तशी सरू बोलती झाली.  “अवो आधी बापूचे कपडे, उम्याचे बूट व नलिनीला ड्रेस चे कापड घेउ या नंतर पैक उरल्यावर सोन घेउ या की !”  यावर तिचे सासरे बोलते झाले. “ तु घरची लक्ष्मी हाय.  आधी घरची लक्ष्मी सजली पायजे.  ती परसन्न असली म्हंजे समदं घर आनंदात असत बघ. अन् आता घेतलेलं सोन गरज भासली तर नलीच्या लग्नाला बी उपेगी पडन. ” आजोबाच्या बोलण्याला  पुष्टी जोडत नलिनी म्हणाली, “ होय आर्इ बापू खरं म्हणतात. ” तिच्या या शहाणपणाच्या बोलण्यावर सरू खुश झाली व तिच्या चेह—यावरून हात फिरवित आपल्या डोक्यावर बोटे कडाकडा मोडीत म्हणाली, “ शहाणी गं माझी बाय. ”  सरू  व नलिनीच्या साठी सोने खरेदी करण्यातच बराच वेळ गेला.  वर्षाची सुरवात चांगली झाली म्हणत सर्वजण दिवे लागणीला घरी परतले.

              पुढील दोन चार वर्षे अशीच सुरळीत व आनंदात गेली. सर्व काही सुरळीत चालू होते.  धरणीमाय भरभरून देत होती. केलेल्या कष्टाचे चीज होउन नियमित हंगाम घरी येत होते.  घरदार मुलांचे शिक्षण सासू सास–यांचे औषधपाणी नात्या गोत्यातील लग्न सरार्इतील देणे घेणे व्यवस्थित चालू होते.  कशाची म्हणजे कशाची उणीव भासत नव्हती. घरात दुध– दुभते,  धन–धान्याची वाणवा नव्हती.  पण नियतीला त्याचे सुख पाहवले नाही.  नियतीने त्यांच्या पुढे वेगळाच खेळ मांडून ठेवला होता.

            सकाळी नित नियमाप्रमाणे सासूबार्इ उठल्या व आपल्या दिनचर्येला लागल्या.  गोठयात गुरा ढोरांचे आवरून स्नान करून त्या देव पूजेस बसल्या तसे त्यांच्या छातीत दुखु लागल्याचे म्हणाल्या.  दौलतराव न्याहरी उरकून शेतात जाण्याच्या तयारीत होते. परंतु आर्इची तब्येत ठीक नसल्याचे समजताच त्यांना घेउन तडक दवाखाना गाठला.  डॉक्टरने चिकित्सा केली हॄदय विकाराचा झटका असल्याचे अनुमान बांधित ताबडतोब तालुक्याला  मोठ्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्याचा सल्ला दिला.   हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर रक्तवाहिन्यां मध्ये अटकाव निर्माण झाल्याने बायपास सर्जरी करण्याचे व त्यासाठी मोठा खर्च लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  ऑपरेशन झाले पण एवढामोठा खर्च करून देखिल फारसा फरक पडला नाही.  पदरी अपयश  पडले.  ऑपरेशन नंतर दीड दोन महिन्यातच आर्इ परलोकी गेली.  आर्इच्या अचानक जाण्याचा बापूला धसका बसला. त्यांना दु:ख सहन झाले नाही.  त्यातच त्यांना अर्धांग वायुचा झटका आला व शरीराची उजवी बाजू निस्तेज झाली.  आघातावर आघात होउ लागले.  जणू दु:खाचे पर्वच सूरू झाले. त्यात कमि की काय निसर्गाने पण आपले रंग बदलले. निसर्ग कोपल्या सारखा झाला.  पावसाळयाच्या सूरवातीला जून मध्ये पावसाने छान साथ दिली.  पेरण्या झाल्या.  बीजे अंकुरली.  पिके तरारून वर आली.  धरणी मातेने जणू हिरवी शाल पांघरल्या सारखी शेती हिरवी गार झाली.  शेतकरी मनोमनी सुखावला.  पण पूढील पावसाला ओढ लागली.  शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला.  पण निसर्गाला त्याची दया आली नाही.  शेते करपली.  हाती येणारे पिक गेले.  कोरडा दुष्काळ पडला.  दौलतराव मनातून खचले.  घरखर्च मुलांचे शिक्षण व बापूच्या औषधपाण्यासाठी पैसा कमि पडू लागला.  आजपर्यंतची शिल्लक कामी आली. ती तरी कोठवर पुरेशी पडणार.  सरूने जमवलेली  गाडग्या मडक्यातील संचयीत संपली.  अखेर गाडगे मडकेच ते तरी कितीक संचय करून ठेवणार.  घरातील सोने नाणे गहाण ठेवून संसार चालू लागला.   

              परत पेरणीचे दिवस आले.  मानवी मनाची आशा मोठी वार्इट. मागील वर्षी पावसाने धोका दिला म्हणुन काय झाले.  दौलतरावांनी हिंमत न हारता इतर शेतकरी मित्रांप्रमाणे सावकाराकडून कर्ज काढून पेरणी केली.  बँकेने उभ्या पिकावर कर्ज मंजूर केले.  पैशाची मदत मिळाल्या मुळे मनास उभारी आली.  वेळच्या वेळी पाउस झाला.  वेळेवर दिलेल्या खत पाण्याच्या मा—याने पिके तरारली.  शेतकरी खुश झाला.  पण नियतीचा खेळच अजब.  तो केाणास कसा कळणार. पिके हाता तोंडाशी आली व काढणीच्या वेळी वादळी वारा व गारांच्या पावसाने थैमान मांडले. पिके जमिन दोस्त झाली.  दौलत रावांच्या काळजाचे पाणी झाले.  पिकांच्या भरवशांवर उभ्या केलेल्या आशा आकांक्षा वर पाणी फेरले.  गरीबीने डोके वर काढले.  नलिनीचे शिक्षण, लग्न, उम्याचे शिक्षण, बापूच्या औषधींचा खर्च, सावकाराची देणी, बँकेचे कर्ज सर्व समस्या एकावेळी दौलतरावांसमोर आ वासून उभ्या राहिल्या.  रात्रंदिवस दिवस एकच विचार. अभिमानाने जगलेल्या आयुष्यात स्वत:च्या हिमतीवर जगणारा व कोणाच्याही ५ पैशाची उधारी न ठेवण—या दौलतरावांना जेवण गोड लागेना,  रात्रीची झोप येर्इना, महागार्इ ती वेगळीच.   दौलतराव मनाने खचले.  त्यांच्या जिवाची होत असलेली घालमेल कुटुंबियानी ओळखली. त्यांची अवस्था पाहून पत्नी सरू, कन्या नलिनी व बापूने खूप समजावले.  त्यांना सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला.  पण सर्वजण अयस्वी ठरले.

                       सकाळची वेळ नेहमी प्रमाणे दौलतरावांनी न्याहारी केली. नित्याच्या सवयीप्र. नलीनी कॉलेजला जाण्याच्या तयारीत होती. बापू आपले अर्धांग वायुचे शरीर घेउन एका हाताने व काठीच्या साहाय्याने जमेल तसे गोठयातील कचरा आवरण्याच्या प्रयत्नात होते.  दौलतरावांनी सरूला बाहेर बोलावित म्हणाले, “म्या रानात जातूया. दुपारच्याला काम संपलं म्हंजी तालुक्याला कचेरीत जाउन चक्कर टाकून बघतो, कर्ज माफी झालीय का नाय अजून.  सांजच्याला येतूय घरला.  फकस्त नागरटवाला आला तर त्यास्नी १००० रूपये द्या अन बाकिचे समदे  म्होरल्या हप्त्याला देतो म्हणून सांगा. ” असे म्हणून दौलत रावांनी घर सोडले ते कायमचेच.                               

                               संध्याकाळ झाली. दिवस मावळला. तालुक्याच्या गावावरून येणारी शेवटची एस. टी. बस पण येउन गेली. पण दौलतराव घरी आले नाही.  सरू, नलिनी, उम्या, बापू सर्वजण वाट पाहून थकले.  गावातील त्यांच्या मित्रांकडे चौकशी करून झाली.  तालुक्याच्या गावातील नातेवार्इकांना फोन लावून झाले.  कोठेच पत्ता लागेना.  चिंता वाढल्या. रात्र आडवी आल्यामुळे शोधकार्यात अडचण आली.  सकाळ झाली.  सूर्य नारायण कासराभर वर आला तशी सरू, नलिनी, उम्या, बापू यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी कानी आली.  क्षण भर कोणाचाच विश्वास बसेना.  दौलतरावांनी रानात आड बाजूला बाभळीच्या झाडाला दोर टांगून आत्महत्या केली.  ही दुख:द बातमी वा—या सारखी  गावात पसरली. एका पर्वाचा अंत झाला.   दौलतरावांच्या कुटुंबियांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले. सर्व कुटुंब निराधार झाले.

           कॅलेंडरची पाने उलटावी तसे भराभर  दिवसामागून दिवस सरले.  आज सकाळीच सरूची चुलत नणंद दारात अनपेक्षित पणे हजर झाली.  दारात येताच तिने आवाज दिला,  “ ए ऽ सरे हायका गं घरात ? ” म्हणत प्रवेश केला.  सरू आपल्या कामात व्यस्त होती.  अचानक आलेल्या नणंद बार्इचे ती गोंधळलेल्या स्थितीत स्वागत करित म्हणाली, “अगं बया वन्सबार्इ तुमी?  यानं  बसा. ” म्हणत तिच्या कडे बसकर सरकवला.  वन्सबार्इ स्थानापन्न झाल्या तसे सरूने विचारले, “आज सकाळच्या पारीच कस काय येण केल बार्इ? ”

             “आनंदाची बातमी हाय. आपल्या नलीसाठी निरोप घेउन आलीया.  दौलत दादाने सहा मैन्या आधी त्या दिनकररावाच्या मुलाबद्दल मला इचारल होतं. पन तवा त्यास्नी लगीन करायच नव्हतं.  म्हणे मुलगा कुठं नागपुराला कंपनीच्या कामासाठी जाणार हाय.  इन तवा बघू. अस म्हनले व्हते.  आता मुलगा आलाय  म्हून त्यांनी सौताहून माह्याकडं आपल्या नलिनीसाठी निरोप धाडलाय.  पोरगा चांगला उच्चापुरा देखणा हाय. शिकलेला हाय. निर्व्यसनी हाय . आन् यकला यक हाय.  म्या म्हनलं,  सांगून बघते सरू वैनीला. ” वन्स बार्इने एका दमात आपले म्हणने कथन केले.      

          सरूने त्यांच्या साठी चुलीवर चहाचे आधण ठेवत विचारले, “चहा घेता नं वन्स?” 

          “आत्ताच घीउन आलीय बघ. पण ठिव उलसाक. घीन वाइच अर्धाकप. |” वन्सबार्इ म्हणाल्या.

           परत विषयाकडे येत सरू म्हणाली “ ते समदं खरं हाय.  पण पैलं म्हंजी नलीला मुलगा पसंत पडाय हवा. तिच्यासंग बोलाया हवं. तिच्या मोठया किश्या मामाला पन सांगाय हवं.”

           नलिनी बाहेर जाण्याच्या तयारीत होती. स्वतःचे आवरून आर्इचा निरोप घेण्यासाठी स्वयंपाक घरात प्रवेश केला तसे अचानक आत्याला समोर बसलेली पाहून म्हणाली,  “अगं, आत्या केव्हा आलीस? कशी आहेस तु?”

          “झाला घडीभर.  कुठं निघालीस गं सकाळी? ” आत्याचा प्रश्न.

          “मैत्रिणी बरोबर क्लासला” नलिनीचे उत्तर.

         “अगं, जाशीन. पण बस घटकाभर जरा माह्यासंग. जरा काय बोलायच हाय तुह्यासंग. ”  आत्या तिला अडवित म्हणाली.

            आत्याच्या आज्ञेचे पालन करित भींतीवरील घडयाळाकडे तिरपी नजर टाकित नलिनी आत्याजवळ बसली. तशी आत्या आपले विचार तिच्यापुढे मांडीत म्हणाली,  “नले, खूप शिकली गं बाय माझी.  आता तुझ्या लग्नाचं वय झालय.  तुह्याबरूबरच्या पोरी संसाराला लागल्याती.  त्यास्नी दोन दोन लेकरं झालीया. तु बी इचार कर जरा. ”    

             आत्याची गंमत करित आत्याच्याच भाषेत नलिनी म्हणाली, “आत्ये काय बी सांगती तु  अजून मला म्होर लय शिकायचं हाय.  वकिल व्हायाच हाय.  आन् म्या का इचार करू? माझी माय हाय, किश्या मामा हाय. त्ये बघतीन की. ”

             तिच्या अशा अडाणी भाषेतील बोल ऐकून आत्या म्हणाली, “अगं बये माझी चेष्टा करतीय का?”  यावर नलिनी नुसतीच हसली.

            आत्याने नलिनीला अडवून तिच्याशी केलेला संवाद सरूला रूचला नाही.  नलीनीला बाहेर पाठविण्याच्या उद्देशाने म्हणाली , “नले आज तुला क्लासला येळ व्हत न्हाय का? बसलीया गप्पा मारत. तुझी मैतर वाट पहात अशीन बघ. ”

             आर्इच्या बोलण्याचा गर्भितार्थ समजून नलिनी “ येते गं आर्इ.  आत्या बस जरा ! जेउनच जा. ” म्हणत बाहेर पडली.

            वन्स बार्इ गेल्यावर त्यांनी आणलेल्या स्थळा बद्दल सरूने तिचा भाउ किशोर समवेत बोलणी केली व नलिनीला विश्वासात घेत आलेले स्थळ पाहण्याचा विचार झाला.  आठवडाभरातच आत्याच्या घरी मुलीला मुलगा दाखविण्याचा कार्यक्रम पार पडला.  नलिनीच्या मते तिला मुलगा फारसा आवडला नाही पण केवळ आर्इ व मामाच्या बोलण्यास मान देउन ती लग्नास तयार झाली.  दौलत रावांचा एक जिवश्च मित्र सयाजीराव, किशोर मामा, सरू बार्इ, आत्या व वराकडील समवयस्क थोर मंडळी यांच्यात विवाह कुठे करायचा, कसा करायचा, देवाण घेवाण इ. बाबतीत चर्चा झाली.  विवाह ठरला व  उभयपक्षी विवाह समारंभाची तयारी सुरू झाली.

           सरूबार्इ नुकतेच जेवण करून जराशी वामकुक्षी घेत पहुडली होती.  तेवढयात वन्सबार्इ  वरपक्षाकडून एक निरोप  घेउन हजर झाल्या.  घरात येउन स्थानापन्न होतात न होतात तशाच वन्सबार्इ म्हणाल्या, “वैनी  वरपक्षाकडून यक  सांगण आलयं बार्इ. ” सरूने आपले कान टवकारले.  तसे वन्सबार्इ खुलासा करत्या झाल्या.  “रूखवतामध्ये 10 लिटरचा प्रेस्टिजचा कुकर द्या म्हनत्यात. ” सरू गांगरली.  वन्सबार्इंच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाली, “ पण त्या दिशी बैठकित सात लिटरचा अन हकिन्सचा म्हनले व्हते नव्हं का? त्येला आपून बी व्हय म्हनल व्हत. मंग आता काय इचार बदलला?” सरूने आपली शंका काढली.

           “ अवं त्ये म्हनत्यात आमची फॅमिली मोठी हाय.  घरात एक दोन गडी नोकर चाकरबी हाय. पुरनार न्हाय. 10 लिटरचा बेस राहिन. ” वन्सबार्इंनी खुलासा केला. मागणीचे स्वरूप किरकोळ व आपल्या आवाक्यात असल्या कारणाने “जाउ दे.  आपल्या नलिच्याच संसाराला लागनार हाय. ” म्हनत सरूने मागणी मान्य केली.  तदनंतर अशाच एक दोन वेळा मोठा टी व्ही. पाहिजे.  दोन दारांचा मोठा फ्रीज पाहिजे. अशा मागण्या आल्या. सरूला हे स्थळ जरा डोर्इजड होत आहे असे वाटू लागले. परीस्थिती नसतांना देखिल किश्या मामाच्या सल्ल्याने व मदतीने मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

          किश्या मामा, मामी, सरू, नलिनी व उम्या नुकतेच तालुक्याच्या गावाहून लग्नाची खरेदी आटोपून परतले होते. संध्याकाळची वेळ. सुरूंग फूटून एक भला मोठा धोंडा बाजूला पडावा तसा मोठा आघात सर्वांवर झाला. वरपक्षाकडून आलेल्या एक पाहुण्याने वरदक्षिणा म्हणून 20 तोळे सोने द्यावे अशी बातमी आणली. सर्वांचे धाबे दणाणले. केलेली अवास्तव मागणी यांच्याकडून पूर्ण करणे कदापि शक्य नव्हते. विचारांनी मने ग्रासली.  लग्न मोडावे म्हटले तर गावात व समाजात नाचक्की होर्इल.  दुसरे स्थळ मिळणे कठिण होर्इल. मुलीचे आयुष्य वाया जार्इल. असे अनेक विचार मनात आले.  काय करावे काही सुचेना.  डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर उभा होता.  सरूपुढे एक नविनच धर्म संकट उभे राहिले. तिला हा धक्का सहन झाला नाही.  ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले.

         ही वार्ता दौलतरावांचे मित्र सयाजीरावना समजली. ते व त्यांची पत्नी सरूच्या भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले. सरूच्या जिवाची घालमेल त्यांच्याकडून पाहवेना. नलू आर्इच्या सेवेसाठी हॉस्पिटलमध्येच होती. उभय पती पत्नी त्यांचा एकुलता एक मुलगा, हर्षद साठी वधू संशोधन करित होते.  हर्षद एक उच्चशिक्षित, सुस्वभावी, गोरा गोमटा, उंच, व हुशार मुलगा होता. मुंबर्इ सारख्या मोठया शहरात नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. नलिनी नाकी डोळी सुंदर, सुस्वरूप, सुस्वभावी, कामसु, सुशिक्षित मुलगी होती. तिच्या बालपणा पासून तिला ते पाहत होते, ओळखत होते. त्यांच्या मनात नलिनी बद्दल वेगळा विचार आला.  आपण जर नलिनीलाच आपली सुन म्हणून स्विकारले तर, शिवाय नलिनी व हर्षद चा जोडा पण छान शोभेल.  

         हर्षद व नलिनी दोघे पण एकमेकास बालपणापासून ओळखत होते.  बालपणी एकत्र खेळले होते.  एकत्र अभ्यास केला होता.  12 वीच्या परिक्षेनंतर पुढील शिक्षणामुळे ते एकमेकापासून दुरावले होते.  हर्षदची आई व सयाजीरांवांनी त्यांचे विचार हर्षद पुढे माडले. हर्षद मनातून खूश झाला.  त्याच्या मनातील स्वप्न साकार होणार याचा त्याला आनंद झाला.  त्याने संमति दिली.  अशीच काहिशी परिस्थीती नलिनीची पण होती.  पण केवळ त्यांच्यावर झालेले सुसंस्कार व घरातील मंडळी काय म्हणतील? आपल्यास अनुमति देतील का नाही अशा संभ्रामावस्थे मुळे उभयतां आपली इच्छा वडीलधारे व वयस्कांसमोर मांडू शकले नव्हते.

            सरूला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला गेला होता.   थोडीशी अशक्तता सोडलीतर आता तिला जरा बरे वाटत होते.  सरूला परत भेटण्यासाठी सयाजीराव व त्यांच्या पत्नी तिच्या घरी गेले असता किश्या मामा पण तेथेच उपस्थित होता.  या संधीचा फायदा उठवित त्यांनी हर्षदसाठी नलिनीचा हात मागत त्यांच्या समोर हर्षदचा प्रस्ताव टाकला.  चहा पाणी व या विषयावर थोडयाफार  चर्चेअंती ‘नलिनीचा विचार घेउन कळवू असे मोघम उत्तर त्यांना दिले.   

            संध्याकाळी जेवतांना सरू, किश्या मामा, बापु व उम्या यांची सरूच्या लग्नाच्या विषयावर चर्चा झाली. दिनकरराव व त्यांचे कुटुंबाकडून विवाहा पूर्वीच सरू असलेल्या विविध मागण्यांमुळे नलिनी नाराज होती. ती पोट तिडकिने रागात म्हणाली, “जो माणूस सासरच्या भरवशावर मागणी करून संसार करणार असेल अशा नाकर्त्या माणसाशी मला नाही लग्न करायचे व अशा लोभी कुटुंबात पण नाही जिवन काढायचे. ” तिची आर्इविषयी तळमळ व भावाची काळजी पाहून बापू म्हणाला, “खरंय पोरी तुझं.  अशी माणस कर्तुत्वमान नसतात. त्यांच्यात स्वत: कमविण्याची, काही करण्याची धमक नसते.  ते फकस्त दुस–याच्या जिवावर जगण्याचे विचारात असतात.  गरमा गरम चर्चेचे वातावरण थोडे निवळल्यावर किश्याने हळूच विषय काढला. “नले सयाकाकाचा हर्षद तुह्याबरोबरच शिकत व्हता न्हवं.  लय बेस आदबशीर हुषार अन् कर्तबगार मुलगा हाय म्हनं.  त्येा मंबर्इला मोठया कंपनीत चांगल्या मोठया पदावर काम करतुया म्हनं.  तु त्याला वळखत असशील न्हाय. तुला ठाव हाय न्हवं. ”    

          “ होय मामा बारावी पर्यंत माझ्या बरोबर आपल्या गावातच शिकत होता. मागच्या आठवडयातच इथे येउन गेला.  भेटला मला.  खूपच हुषार आहे. ” नलिनी खुषित येत म्हणाली.      

            “मंग तुझा काय इचार हाय.  आयुक्शाचा जोडीदार बनवशीन त्याला तुझा? ” किश्या मामाने खडा टाकला. संथ पाण्यामध्ये खडा टाकल्यावर पाण्यावर अनेक लाटा तयार व्हाव्यात, तसे नलिनीच्या मनात अनेक विचार तरंगू लागले.  तीला त्यांच्यातील मागील मैत्रीपूर्ण गप्पा व लायब्ररीची पुस्तके, नोटस देतांना घेतांना केलेली चेष्टा मस्करी तसेच काहीवेळा ऑफ पिरीयडला कॉलेजच्या कँटिनमध्ये टार्इमपास म्हणून बरोबर बसून खाल्लेला वडापाव, नाश्ता व चहापाणी सारखे इतर अनेक प्रसंग आठवले.  ती मनोमनी हरखली. विचारात मग्न झाली. काय बोलावे काय उत्तर द्यावे तिला उमजेना. तिला लाजल्या सारखे झाले. ती खाली मान घालून बसली. लाजेने काहीच बोलेना.

            तिची ती विचारमग्न अवस्था पाहून तीची तंद्री भंग करित मामाने आवाज दिला.  “ए ऽ नले, काय झालं काय बोलतबी नाय.  काय इचार काय तुझा?”

            मामाच्या बोलण्याने तिची तंद्री भंग झाली.  तिचा लाजरा चेहरा सर्वांच्या नजरेत भरला. सर्वांच्या नजरा आपल्याकडेच रोखल्याचे पाहून ती अधिकच लाजली व काही न बोलता घरात पळाली.

 

           तिचे लाजून घरात पळुन जाणे जणू ही तिची मूक संमति असल्याचे सरूने व मामाने ओळखले. सरू म्हणाली “ ए नले, उंद्या सकाळी सयाकाकांला, हर्षदला अन् त्येच्या आर्इला आपल्या कडे यायाच आवतन धाडते बरं का ! धाडू का?”

           “जा तु काय बी कर मला नको सांगू. ” म्हणत नलिनीने आपली संमती प्रकट केली.

           दिनकररावांच्या कुटुंबाचे संबंध अध्र्यावर तोडीतच सयाजी रावांशी नविन संबंध प्रस्थापित करत उभय कुटुंबामध्ये चर्चा झाली. विवाहाची तारीख पण ठरली. निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. त्याच वेळी पोस्टमन ऽऽ  असा आवाज देत पोस्टमन आला व बँकेकडून आलेले एक रजिस्टर पत्र देउन गेला.  पत्र सरूच्या नावावर इंग्रजीत होते.  ते तिला काहीच समजेना.  नलिनीला आवाज देत ती म्हणाली,  “ ए ऽ नले इकडे ये जरा.  हे बघ काय पाकिट आलंय.”

           नलिनीने पाकिट उघडले पत्र वाचून आनंदात आर्इला म्हणाली, “ आर्इ, आता तुझे सरकारी कार्यालयात फे–या मारण्याचे काम अजिबात बंद. तुला तलाठी ऑफिस, कचेरीत कोठेच जाण्याची कधीच गरज नाही. आपले बँकेचे कर्ज पूर्णतया माफ झालंय अन् मागील सहा महिन्यात भरलेले सर्व हप्ते तुझ्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. “ सरू आनंदली. तिच्या डोळयात आनंदाश्रू तरारले.  दैालतरावांची आठवण आली तशी म्हणाली, “आज त्ये असते तर त्यास्नी बी लय आनंद झाला असता.  त्यानी लय कष्ट केले.  समदे कागदपत्र जमा केली. कचेरीमध्ये फे–या मारल्या.  त्यांच्या कष्टाच चीज झालंय.  

           ठरल्याप्रमाणे नलिनी व हर्षदचे लग्न थाटात पार पडले.  सगे, सोयरे, आप्त, मित्र मंडळी, निमंत्रित यांनी मांडव पूर्ण भरला होता.  लग्नास सरकारी अधिकारी तसेच सर्व बॅंक अधिकारी पण आवर्जून उपस्थित हेाते.  सरूच्या डोळयाचे पारणे फिटले.  सरू नलिनीला म्हणाली, “त्यास्नी नुसतंच बी नाय पेरलं तर मान्स बी जोडली. बघ समदा मांडव कसा उभ्या पिकाच्या शिवारावानी, मान्सांनी भरला हाय. पेरलं तसं उगवलं बघ. ”

Go Back

Comment