Menu

पुनरारंभ

199225

मृगजळ

Please Download Here !!             

प्रकाशन: उद्योजक बना दिवाळी अंक २०१४ 

मृगजळ

 

                  “ए ऽ मध्या ऊठ.  ऊठ की आता कवाधरनं अजगरावानी लोळत पडलाय. गावातला तुझा मैतर सद्या आलाय. ऊठ आता. ” द्रौपदेने आळसावलेल्या मधुला उठवित आवाज दिला.

               “जाउ दे गं माय,तु कायबी सांगती. पडू दे जरा घटकाभर उठतो घडीभरान. वार्इच अंग दुखतया.” जागेवरच न हालता मधू उठण्याचा कंटाळा करित म्हणाला, ‘वार्इच मयना पंदरा दिस मम्बर्इला मामा कड काय गेला अन आळसी बनला. द्रौपदा हलक्या आवाजात स्वगत म्हणाली.

            “उठतोय आता का घालु पेकाटात लाथ. तुझा मैतर वाढूळ आलाय अन् बसलाय परसदारी तुपली वाट बघत.” द्रौपदा त्याला उठवित म्हणाली.

            “ काय गं द्रुपदे कोन उनं(आलं)गं? डाकघरातन पास्टमन उना(आला)का?” मागल्या वाडयातून द्रौपदीच्या सासुने आपल्या एैराणी भाषेत हाक दिली.

            “न्हाय न्हाय गावातन मध्याचा मैतर, पाटलाचा सदू आलाय. पोस्टमन न्हाय.” द्रौपदेने खुलासा केला.

      “अगं, आज 15 तारीख उजाडली आजूनबी सरकाराची पेन्सील नाय मिळालं.  सासू बार्इ काळजी करित म्हणाल्या.

          “ आवं र्इन की. त्याच्याकडे अजून सरकाराचे पैक नसतील आल्यात. पैके नाय आलतर तो काय आपल्या पदरच दिन काय? र्इन आपसूक पैक आल्यावर. द्रौपदी समजूत काढीत म्हणाली.

           बोला फूलाची एकच गाठ पडावी त्या प्रमाणे अंगणात पोस्टमन हजर झाला त्याने “पोस्टमन” अशी आरोळी दिली. द्रौपदीचै लक्ष त्याकडे गेले.  अंगणात खाकी ड्रेस घातलेला. पायात चपला. खांद्याला पोस्टकार्ड व पाकिटे भरलेली कापडी पिशवी. सायकलच्या पुढील कॅरेज व मागील कॅरेजला मोठे पार्सल लावलेले.  अशा वेशात पोस्टमन हातातील पाकिटे सांभाळीत व दुस–या हाताने सायकल स्टँडवर उभी करित म्हणाला,

          “ वैनी मावशी हायका घरात? मनी ऑर्डर आलीया. इति पोस्टमन.

          “ या भावोजी त्या तुमचीच वाट पाहत्यात कावाधरनं. तुमाला शंभर वरीस आयुष हाय बगा.” द्रौपदी म्हणाली.

          “ नगं नगं हाय तेवढं पुरेस हाय बघा. गावभर फिरून अन टपाल वाटून लय कट्टाळा आलाया” पोस्टमन उत्तरला.

        “ पोस्टमनच्या हाती गार पाण्याचा ग्लास देत द्रौपदी म्हणाली, “बसा वार्इच. धाडते त्यास्नी.”                                                                

           क्षणार्थातच पदराने कपाळाचा घाम टीपीत व हात पुशीत वॄध्दावस्थाकडे झेपावलेल्या 60 वर्षीय सासूबार्इ बाहेर आल्या तशा पोस्टमनशी संवाद साधत म्हणाल्या, “ बरं झालं बाबा तु लवकर आलास. मागल्या हप्त्याधरनं तुझी चातकापरमान वाट पहात हुती. लयच तारांबळ झाल्ती.  औषधी संपल्यात ती आणायची. म्होरल्या आठवडयात डोंगर वाडीला नातीच लगीन हाय.  गाडी भाडयाला, कापडं घ्यायाला पैकं पायजेत.  म्हतारपण लय वार्इट बाबा. ”

              “मावशे तु कायबी काळजी करू नगं.  सरकार तुमच्या वानी म्हता–या कोता–याची काळजी घेतयं. कंदी तरी व्हत्यात दोन पाच दिस अल्याड पल्याड.  समजून घ्यायाच. पोस्टमन समजूत काढीत म्हणाला.

            “खरंय बाबा तुझ. म्हणत द्रौपदीला आवाज दिला ‘ए धुरपदे वार्इच चहा कर डाकवाल्यासाठी.”

             पोस्टमनने हातातील गठठयामधून मनिऑर्डरचा फॉर्म काढला.  शार्इचे पॅड पुढे करित म्हणाला  “ मावशे हे घे हित अंगठा मार.”

             अंगठा  झाल्यावर पोस्टमनने ड्रेसच्या वरच्या खिचातून एक हजार पाचशे रूपये मोजून मावशीच्या हाती देत म्हणाला, “हे घे मावशे चालू महिन्याचे एक हजार पाचशे रूपये.”    

          एव्हाना मध्या अंगाला आळोखे पिळोखे देत उठला होता. समोर सद्याला पाहून विचारल, “काय रं सद्या कवा धरन आलास?”

           “ आलोय वाढूळ. झाले आस्तीन १०—१५ मिन्ट” सद्या उत्तरला.

          “वार्इच बस जरा. आलो म्या” म्हणत मध्या कोप–यात ठेवलेल्या माठाकडे गेला. तोंडावर गार पाण्याचे दोन चार हपके मारले व तोंड पुसत बाहेर आला. “चाल पडळीत बसू. ” म्हणत मध्या व सद्या पडळीकडे वाटचाल करू लागले. जाता जाता मध्या आर्इला म्हणाला, “ ए माय जरा चा ठिवतीस का आमच्यासाठी.”

           “ व्हय व्हय” म्हणत सुभद्रा माज घराकडे गेली.

            पडळीत जवावरांचा कडबा रचून भरला होता. शेजारी कडबा कापायचे यंञ व एक जूनाट बाकडा होता. बाकडयावर विराजमान होता क्षणीच सद्याच्या अंगावरील लाल रंगाचा छानसा टी शर्ट.  त्यावर ही मॅन चे चित्र शिवाय इंग्रजीमध्ये काही उलटया तर काही सुलटया अक्षरात लिहिलेला काहीतरी मजकूर. निळी अनेक खिचे असलेली जीन्सची फुल पँट. केस छानपैकी कापलेले. असा मध्याचा एकंदरीत अवतार पाहून सद्या आपली प्रतिक्रीया व्यक्त करित म्हणाला, “ आयला मध्या मैना पंधरा दिस मम्बर्इला गेलास अन झटक्यात सुधरलास की गडया. काय ती भारी कापड, केसाचा कट बी लर्इ भारी केलाय गडया. अन कायरं या पँटीला इतके सात आठ खिचे कह्यासाठी रं? बाजाराला जाताना थैली न्यायाची गरजच नाय.  एका खिच्यात भाजी, दुस–या खिच्यात दाळ तांदूळ, तिस–या खिच्यात मिरची मसाला.  एका दमात मध्या जमेल तेवढे बोलला.

            सद्याने केलेल्या स्तुतीवर मध्या थोडासा हरखला व लाजत म्हणाला, “गडया तु माझ मापच काढाय लागला जणू. ”

            “ आय शपथ नाय.  जे दिसलं ते बोललो. ” सद्याने खुलासा केला.

            आता सद्या व मध्याच्या गप्पात रंग भरू लागला होता.  “काय काय पाह्ल रे मम्बर्इला?  कुठ कुठ गेल्ता फिरायला?” सद्याने उत्सुकतेने प्रश्न केला.

        “आरं माझी मामे भन रश्मी अन् तिच्या मैतरणी संग लय फिरलो. कंदी कंदी तर पायाचे तुकडे पडल्यावाणी वाटायचं अन् बस झालं आता म्हनलं तर तिच्या मैतरणी म्हनायच्या ‘वाह रे दोस्ता एवढयात थकलास?’ आरं काय ती मम्बर्इ अन् थितली मान्सं.  सम्दे पायाला चाक लावल्यावानी पळत असत्यात.  कुन्नाला इकडं तिकडं बघाया आन् यकमेकासंग बोलाया येळच न्हाय. ठेसनात गाडी थांबली की, ही झुंबड गर्दी.  एक मिन्टात गाडी भरायची अन् निघून जायाची. पाच मिन्टात दुसरी गाडी यायाची अन् भरायची. तीची बी तीच त–हा व्हायाची.  मिन्टात भरली की जायाची.  मम्बर्इच्या सडका भी लर्इ भारी. लय मोठया अन् सिमेंटच्या कुठ बी कचरा नाय.  आपल्या सडकावानी गाडी गेल्यावर धुराळा बी उडत नाय. अन् त्यावर धावणा–या गाडयाबी भारीच. समद्या एकमेकाला चिटकूनच चालत्यात जणू यकमेकाला बांधूनच ठिवल्यात. आरं गडया येकाबी गाडीची काच उघडी दिसली नाय. ” मध्याने आपली तोंडाची एक्स्प्रेस सोडली.

         “आरां तु इतला फिरला पर बघितलं काय?” सद्याने मध्येच त्याला अडवित विचारले.

         “आपल्या तालुक्याच्या बस स्टँड परिस लय मोठं ईमानतळ.  दहा बारा भले मोठ्ठाले इवानं बस स्टँड वरल्या बसवानी एकमेकाला खेटून उभे होते.  समिंदराचा किनारा, राणीचा बाग, दिवसा आकाशातले तारे दिसणारे तारांगण, गेटवे ऑफ इंडिया, मुझियम अन् लय काय.” हॉटेलमधील वेटरने हॉटेलमध्ये उपलब्थ असलेल्या खाद्य पदार्थांची यादी तोंडपाठ भराभर सांगावी तसा मध्या बोलून गेला. त्याच्या भरभर वाच्यतेने सद्या आश्चर्यचकित झाला. त्याच्या तोंडाचा चंबू झाला व नुसता आ वासून बघतच राहिला.  “आयला, मध्या पंदरा दिसात “गेटवे ऑफ इंडिया, मुझियम” तु विंग्रजी बी बोलायला शिकाला की. ” सद्याने प्रतिक्रीया व्यक्त केली.  त्याच्या कौतुकाने मध्याची छाती इंचभर फुगुन वर आली.  टी शर्टला नसलेली कॉलर ताठ झाली.    “मला बी थोडं थोडक विंग्रजी समजत पण हे तुपल्या शर्टावर उलटया सुलटया अक्षरात काय लिव्हलयं ते उमजतच नाय.  जरा वाचून दाव ना गडया. ” मध्या त्याची फिरकी घेत म्हणाला.

          “ते मला बी कुठ समजतय अन् वाचता येतय. |” मध्या खजिल होत म्हणाला.  

          “माझी भन रेश्मा दीदी अन् तिच्या मैतरणी काय फाड फाड विंग्रजी बोलत्यातं राव. तसलं आपल्या साळचा प्रिन्सीपल किंवा बँकेचा मॅनेजर बी बोलू शकणार नाय.  माझ्या शर्टावर काय लिव्हलयं ते त्यान्लाच ठाव हाय”.  मध्या आपल्या बहिणींची तारीफ करित म्हणाला.

           आता मध्या रंगात आला होता.  तो सांगू लागला. “ एकदा काय झालं गड्या माझी रेश्मा दीदी अन् तिच्या मैतरणी विंग्रजीमध्येच आपसात बोलत होत्या, यकमेकाची चेष्टा करित होत्या अन् एकमेकीच्या हातावर टाळी देत मोठ मोठयाने हासत होत्या. त्या काय बोलत होत्या अन् कयासाठी हासत हेात्या मला कायबी समजत नव्हतं.  तरी पण समद्या हासल्या म्हून म्याबी हसलो. तशी ती स्वीटी मला म्हनली, ‘तु कशासाठी हसलास रे? तुला काय समजलं’.  म्या तर गपगार झालो. काहीच बोलता आलं नाय. ” मध्याने आपली दांडी उडाल्याचे सांगितले.

           माझ्या हसण्यावर स्विटी खूश झाली माह्याजवळ येत व माझा हात धरत म्हणाली, “मला गावाकडची लोक लय आवडत्यात. साधी भोळी असत्यात. त्यांच्या मनात कसलच पाप नसतं. रेश्मा तुझा भाउ मधूकर पण भोळाच आहे.” मला तर लयच कससं झाल तवा. जवा कवा आमी समदे फिरायला जायाचो तवा ती माझी लय काळजी घ्यायची. रस्ता वलांडतांना माझा हात धरून मला घेउन जायाची. हॉटेलात गेल्यावर कस बसायच, कस वागायच, कस चमच्यांनी खायाच, कोणत्या हातात साधा चमचा अन् कोणत्या हातात काटा चमचा कसा धरायाचा समद शिकवायची. शेरातल्या पोरी लय बिनधास्त असत्यात. मला पण स्वीटी लय आवडली.” भावनेच्या भरात मध्या बोलून गेला.

          “मंग करशीन का तिच्या संग लगीन.” सद्याने गमतीने विचारले तसा मध्या लाजला.

           एव्हाना पोस्टमनचे काम संपल्यामुळे त्याचे लक्ष सद्या व मध्याच्या बोलण्याकडे गेले. द्रौपदी पण एका स्टीलच्या ताटात चार कप चहा घेउन बाहेर आली.  तिघांच्या हाती चहाचा कप देत म्हणाली, “काय र कोणाच्या लग्नाची गोट चाललीया. कोण लगीन करतया?”

          “काय नाय. हा सद्या काय बी गोट करतूया. ”  मध्या म्हणाला.  

          “ आरं असं कसं मला बी काहीतरी कळू द्या की. काय गोट करतू ते. आग लागल्या बिगार धूर निघत नाय अन् प्वाट भरल्या बिगार ढेकर येत नाय. ” द्रौपदी म्हणाली.

           “मावशे मम्बर्इला रेश्मा दीदीची मैतर स्वीटी मध्याला लय आवडली. म्या त्याला म्हनलं मंग करशीन का स्वीटी संग लगीन. ” सद्याने खुलासा केला.       

          “ हत्तीच्या, अजून कशात काय अन फाटक्यात पाय. आगूदर सिक्साण पूर्ण झाल्याबिगार अन नोकरी ध्ंद्याला लागल्या बिगार मनात लग्नाचा इचार सुध्दा मनात आनायचा नाय कुनी. ” द्रौपदीने करडया स्वरात सुनावले.

           त्यांच्या मध्ये व्यत्यय आणीत पोस्टमन म्हणाला, “पोरांनो माझ काम करता करता म्या तुमच संभाषन एैकलय.  तुमी मम्बर्इला लर्इ भारी म्हनत्यात. ते समदं मॄगजळ हाय. मला सांगा मम्बर्इत आपल्या गावा परमान डोंगर, द–या, नदी, नाले व स्वच्छ हवा मिळतीय का? आपल्या गावावानी चिमनी–पाखरं, पशु –पक्षी दिसत्यात का?  तिथं फकस्त समंदर हाय. पशु–पक्षी पाहाया प्राणी संग्रहालयात जाव लागत अन् ते बी पिंज–यातले पक्षी पाहाया मिळत्यात.   मानसात मानुसकी दिसती का समदे आपल्या कामात असत्यात.  मोठया उंच बिल्डींगामध्ये लोक खुराडयावानी राहतात. दाराला दार लागून असत्यात पर शेजारी कोन –हातय ठाव न्हाय.  आमच्या वानी तिथल्या पोस्टमनला बी ठाव न्हाय.  तो कोन मानूस हाय, गोरा हाय काळा हाय.  त्याच टपाल असंन तर बिल्डींगच्या खाली ठिवलेल्या तेच्या नावाच्या पेटीत टाकायचं आन निघून जायाच. कंदी तुमच्या आमच्या वानी दोन प्रेमाचे शबुद न्हाय. परत्यक्श भेट तर दूरच.  तू गावातल्या वाडी वस्त्यावरल्या समद्यास्नी वळखतो. त्ये बी तुला वळखत्यात.  चावडी जवळ भिकंभट, पडयाल दोन वाडे सोडून राम शास्त्रीचा वाडा, मधल्या आळीत रामभाउ आळेकर सरपंच.  कोण कुठ –हात्यात ते तु जाणतो.  पर मंबर्इला कोणाच घर कुठाय, कोणत्या पेठात, कोणत्या गल्लीत हाय?  संगतीन का कुनी.  तुमास्नी रोज वावरातला ताजा भाजीपाला, सकाळच्याला अन् सांजच्याला काढलेले ताज दुध मिळत.  तिथ दोन दिस शिळा झालेला शीत गॄहात ताजा केलेला भाजीपाला, दुध मिळते.  निस्त्या उंच उंच बिल्डींगा, मोठाले रस्ते अन् लार्इटी लावलेल्या मोठाली महागडी दुकान. हे समद  भुल भुलैया अन् मॄगजळ हाय लेका.  सुखासाठी त्येच्या माग धावतया पण सुख मिळत नाहीच पण निस्ती भाग्ंभाग अन जिवाची अवकळा होतीया.

           आपल्या गावात पण काय कमि नाय्.  हितं बी इकास व्हतुया.  गावात बँका, एटीएम मशिन्स आलीयात. टी व्ही टॉवर लागलाय, मोठया सडका झाल्यात.  शाळा, कॉलेज, दवाखाने, पोस्ट ऑफिस समद हायती. अजून काय पायजे तुमास्नी.  आपलं गाव ते आपलं गाव हाय.  हाच स्वर्ग समजा अन पळत्याच्या पाठी लागू नका.

              पोस्टमन भावनेच्या भरात बरेच काही बोलला. अचानक त्याचे लक्ष घडयाळाकडे गेले. अजून बरीच टपाल वाटायची असल्याची जाणीव झाली. बरय पोरांनो येतो. म्या सांगीतल्याल ध्यानात घ्या. सर्वांचा प्रेमाचा निरोप घेउन सायकलवर टांग टाकून पुढच्या वस्तीला केव्हा गेला ते समजलच नाही.               

 

Go Back

Comment