Menu

पुनरारंभ

199281

माहेरचा सुगंध

Please download here !!

प्रकाशन: अन्नपूर्णा मासिक मार्च  २०११ 

माहेरचा सुगंध

                वसंतराव एक साधारण शेतकरी. वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली निला त्यांची एकुलती एक लाडकी कन्या. आज विवाहानंतर प्रथमच श्रावण मासाचे औचित्य साधून माहेरपणास आली होती. श्रावण मासातील आनंदी वातावरणा प्रमाणेच तिचे मन आनंदाने भरले होते. याचा प्रत्यय तिच्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता. दिर्घ कालावधीनंतर माहेरपणास आल्यावर आर्इ–बाबांशी किती बोलू अन् बोलू किती नको असे झाले होते. आल्या पासून ती सारखी बडबड करित होती. घरातील प्रत्येक काना कोपरा न्याहाळीत होती. एवढेच नव्हे तर गोठयात जाउन लाडक्या कपिलेशी बोलत होती तर कधी वासराशी खेळत होती. तिची ती प्रत्येक अवखळ वर्तणुक तिच्या आर्इच्या नजरेतून सुटुच शकत नव्हती. निला विवाहउपरांत पहिल्या पेक्षा अधिक प्रसन्न आणि चंचल वाटत होती.

               निळकंठ एक देखणा, हुशार,मनमिळाउ, सुस्वभावी व होतकरू तरूण त्यांना जावर्इ मिळाला होता. उंचीने जरा ठेंगणाच परंतू अंगा पिंडाने मजबूत. व्यवसायाने उच्च शिक्षित निष्णात डॉक्टर. गावात घराजवळच मध्यवर्ती ठिकाणी गावाच्या दॄष्टिने सुसज्ज असे नामांकित हॉस्पिटल. गावातच राहण्यास मोठा भव्य सुंदर वाडा. व्याही भववंतराव गावातील प्रतिष्ठित सधन शेतकरी. वीस पांचवीस एकर बागायती. पाच पंचवीस दुभती जनावरे. नोकर चाकर. शेती व्यतिरिक्त दुधाचा व्यवसाय त्यामुळे घरात दुध दुभत्याची रेलचेल. शेतीची सर्व अत्याधुनिक अवजारे. एक ट्रॅक्टर व टाटा सुमोसारखी दोन चारचाकी वाहने. निलाचा एकच उच्चशिक्षित दिर. तो पण मुंबर्इस एका मोठया नामांकित कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर. मनमिळाउ व प्रेमळ सासुबार्इ.  तिला असे चांगले सासर मिळावे हे त्यांचे सौभाग्यच.

                  संध्याकाळी परसबागेत फिरत असतांना सहजच तिची नजर कोप–यात गेली.  तेथे एक मोठे फुलणारे प्राजक्ताचे झाड होते. नाजूक पांढरी लाल दांडीची फुले तिच्या आवडीची. ते झाड तिचे नजरेस न पडल्यामुळे तिने बाबांना अधिकार वाणीने विचारले, “बाबा‚ येथे प्राजक्ताचे झाड होते. छान फुले यायची त्याला काठे गेले ते?”  “खाली कचरा पडायचा व घरात थोडाफार अंधार पण दाटायचा म्हणून काढून टाकले.” बाबांनी सहजतेने उत्तर दिले.  तिचे आवडते झाड असल्यामूळे तिला वार्इट वाटले व आपली नाराजी दर्शवित लाडिक स्वरात अट्टाहास करित म्हणाली, “ ते काही नाही परत दुसरे झाड घेउन या ते पण प्राजक्ताचेच.”  “बरं बार्इ‚ लावतो मग तर खुश. आमची लाडकी लेक ना ती, तिचे ऐकायचे नाही तर कोणाचे” म्हणत बाबांनी तिचा लटका राग आवरला.

          जवळच निशीकंदाच्या पांढ–या फुललेल्या सुगंधी फुलांच्या ताटव्याने तिचे मन आकर्षून घेतले. ते पाहताच उल्हसित होउन तिच्या तोंडून हर्षोद्गार निघाले,  “व्वाव ! काय सुंदर फुले आहेत. सुवास पण फार छान सुटलाय नाही. आर्इ मी हे कंद घेउन जार्इन. आमच्या वाडयात लाविन. ” 

             “ अगं लब्बाडे‚ आता आमचा वाडा पण झाला वाटतं. ”आर्इ तिची चेष्टा करित म्हणाली.

            “हे गं काय आर्इ‚ तु पण माझी चेष्टा करते.”  निला लाडिक स्वरात म्हणाली.

            “ बरं घेउन जा हो. ” आर्इ तिचे म्हणणे मान्य करित म्हणाली.

            रात्रीची जेवणे आटोपून निला नुकतीच टीव्ही वरील कार्यक्रम पाहण्यात दंग होती. तेवढयात ‘ तुम बीन जाउं कहां ‘ या गाण्याची धुन वाजवित तिचा मोबार्इल वाजला. तिकडून तिचे पति डॉ. निळकंठ बोलत होते. “आठवण आली वाटतं”  असे म्हणत तिने फोन उचलला.  “होय येणार नाही तर काय? ” तिकडून डॉ. चे प्रतिउत्तर. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर निळकंठ म्हणाला “अगं ती अमेरिकेतील माझी मावस बहिण कल्पना, जी आपल्या लग्नात येउ शकली नाही, ती आपल्या भेटी साठी आलेली आहे. तु तेथे असल्या मुळे तुझ्या भेटीसाठी उद्या सकाळी आपली गाडी घेउन तेथे येर्इन म्हणते.  १० दिवसांनी तिला परत अमेरिकेला परतायचे आहे.”                                         

             खरेतर निलाने अजून कल्पनास प्रत्यक्षात पाहिले पण नाही व प्रथमच घरी मोठी नणंद येणार म्हणुन ती थोडीशी बावरली. तिच्या मनात अनेक विचार सुरू झाले. कशा असतील नणंदबार्इ? काय बोलतील ? वगैरे. वगैरे.  अशा एक ना अनेक विचारांनी तिचे मन ग्रासले. या विचारांमथ्येच तिच्या स्वागताची तयारी पण सुरू झाली.  सकाळी अकराचे दरम्यान दारात गाडी उभी राहिली.  गाडीतून एक मध्यम वयीन  सुदॄढ बांध्याची, केसांचा बॉबकट केलेला, पाचवारी साडी व त्यावर मॅचिंग स्लीव्ह लेस ब्लाउज अशा पेहरावातील तरूणी गाडीतून उतरली.  उतरल्या बरोबर निला जवळ जातच “हाय!  निला कशी आहेस तू ?” असा प्रश्न करित तिला अलिंगन दिले. निलाने पण पूर्वीची ओळख असल्या प्रमाणे तिच्या अभिवादनास प्रतिसाद देत पदस्पर्श करित तिला वाकून नमस्कार केला. नणंदेने वसंतराव व निलाचे आर्इचे पायास पदस्पर्श करून आशिर्वाद घेतला.

            या प्रथम भेटीतील वर्तणुकीनेच तिने सर्वांचे मन जिंकून घेतले. निलाचे मनातील नण्ंदेबद्दलची भिती तर पार पळूनच गेली.  नंतर स्वत:ची ओळख करून देत नणंदबाई म्हणाली‚ “मी सौ. कल्पना‚ निळकंठची मावस बहिण. भेटीपूर्वी कशी असेल माझी वहिनी? गोरी की काळी? जाड मुरमु–याचे पोते की  सडपातळ गवताची काडी?” असे अनेक प्रश्न माझे मनात होते ते आज निलास पाहिल्यावर सर्व एकदम सुटले.”

          “मग कशी वाटली आमची निला ?” निलाचे आर्इने विचारले.

          “सुंदरच ! माझ्या मनी होती तशीच अगदी. माझ्या भावाची निवड आहे ती. ”कल्पना उतरली.

           नणंदबाईंच्या स्तुतीने निला सूखावली व लाजली. ओळख परिचयाचा व स्वागत सोहळा पार पडल्यावर सगळे चहापानाकडे वळले.  जसजसा वेळ गेला तसतशी ओळख पण वाढत गेली. नणंद — भाउजय नात्याचे मैत्रीत रूपांतर झाले.

             “ नीले, त्यांना तुझ्या खोलीत घेउन जा बाई, स्नान झाल्यावर खाली फराळाला जेवायला घेउन ये. त्यांना काय हवे नको ते बघ. नीलाच्या आईने फर्मान सोडले. आईच्या बरहुकूम दोघी वर गेल्या. आवरल्यावर गप्पांमध्ये रंगल्या, इतक्या की, जेवणाच्या विसरल्या. 

           आईने खालून आवाज दिला, “ नीले, आवरलं का ग त्यांच?”तशा त्या खाली आल्या.

           कल्पनास अमेरिकेला परत जायचे असल्याने तिने दुसरे दिवशी संध्याकाळी निघण्याचा आपला बेत जाहिर केला व जातांना सोबत निलास घेउन जाण्याचा मनोदय व्यक्त केला. निलाचे आर्इने अजून दोन दिवस राहण्याचा आग्रह केला.  परंतू वेळेचे बंधन असल्याने ती दोन दिवसा पेक्शा जास्त राहू शकली नाही. आईचे आदरातीथ्य, परिसर भटकंती आणि गप्पागोष्टी यात बघता बघता दोन दिवस कसे निघून गेले ते कळले नाही.  जातांना आर्इने दोघींची खणा नारळाने ओटी भरून भाव पूर्ण निरोप दिला. जातांना निला निशीकंदाचे कंद नेण्यास ती विसरली नाही. 

         निलावर झालेले माहेरचे सुसंस्कार तिची वर्तणूक आचार व विचार तिच्या सासरच्या लोकांना फार आवडले.  तिच्या प्रेमळ वर्तणुकीने व दिलेल्या प्रेमाने सासू सासरे व दिर भारावून गेले.  ती या नव्या घरी इतकी रममाण झाली की, तिच्या वाचून काही घरातले पान हलेनासे झाले.  जणू सासर हेच तिचे माहेर झाले.  महिना भरातच निला व निळकंठला व्यवसायानिमित्त परदेशी जावे लागले.  तिची अनुपस्थिती सासू सासरे व घरातील नोकर माणसांना देखिल जाणवू लागली.                                            

         निलाने दारी लावलेला निशीकंद चांगलाच बहरास आला होता. त्याच्या सुवासाने संपूर्ण वाडा सुगंधित झाला होता. याचवेळी परदेशातून नीलाचा फोन आला. सासु बार्इंनी फोन उचलला. ख्याली खुशालीच्या गप्पा झाल्यावर त्यांचे तोंडून सहजच उदगार निघाले, “ अगं तुझ्या अनुपस्थितीत पण तुझ्या माहेरचा निशीकंद फार छान फुललाय अन् कसा सुगंघ देतोय बघ.”       

Go Back

Comment