Menu

पुनरारंभ

213580

लडीवाळा

Please Download here !!

प्रकाशन : वसुधा दिवाळी अंक २०१३       

   लडीवाळा

                 पियुष गोंडस हुषार व चुणचुणीत तीन वर्षीय व घरातील सर्वांचा लाडका एकुलता एक मुलगा.  पियुष आजी आजोबांबरोबर फार खुष असे.  त्याचे आजी आजोबांवर व आजी आजोबांचे त्याचेवर निस्सीम प्रेम. क्वचित प्रसंगी आजी आजोबा काही कामानिमित्त बाहेर गेल्यास ते परत येर्इपर्यंत आजी आजोबा कोठे  गेलेत?  कशासाठी गेलेत ? केव्हा येणार?  असे अनेक प्रश्न विचारून तो आर्इ नेहा व वडिल अभिस विचारून भंडावून सोडत असे. नेहाच्या अपरोक्ष ती ऒफिसला अथवा बाहेर कामासाठी गेल्यास दिवसभर तो त्यांच्याशीच खेळत असे. त्यांच्याच हाताने खात पित असे. त्याला वेळच्या वेळी खाउ घालणे, झोपविणे व त्याच्याशी खेळणे यातच त्यांचा दिवस जात असे. खाउ घालतांना व झोपवितांना निरनिराळ्या गोष्टी, गाणी सांगत तसेच वार, महिने, रंग यासारखा थोडाफार अभ्यास देखिल घेत.  यामुळे त्याला आजी आजोबाचा खुप लळा होता. ते दोघे घरी असले म्हणजे नेहाला पियुषची काळजी नसे.   

          गेले दोन दिवसांपासून पियुष तापाने आजारी होता. कधी संध्याकाळी तर कधी सकाळी तापाची चढउतार चालू होती.  त्यात अभिजित चेन्नार्इला ऑफिसच्या कामाकरिता व सासूबार्इ सांगलीला नणंदेकडे मंगळागौरीला गेल्यामुळे घरी नेहा, तिचे सासरे व पियुष हे तीघेच होते.  पियुषची प्रकॄति ठिक नसल्यामुळे ती तणावात होती पण सासरे घरी असल्यामुळे फारशी चिंता नव्हती.

           आज नेहा नेहमीप्रमाणे ऑफिसला आली पण तिचे कामात लक्षच लागत नव्हते.  ती काय करते ते तिलाच समजत नव्हते. एकच चूक सारखी होत असून देखिल तिच्या लक्षात येत नव्हती.  तिची मन:स्थिती ठिक नव्हती. ऑफिसच्या कामामध्ये ती पियुष चे आजारपण विसरण्याचा प्रयत्न करित होती, पण राहून राहून तिच्या लाडक्या बाळाचा पियुषचा चेहरा डोळ्यासमोर यायचा व मन अस्वस्थ व्हायचे. तिच्या जिवाची होत असलेली घालमेल व अस्वस्थता तिच्या शेजारी बसलेली तिची मैत्रिण अनघाला जाणवत होती. पण कामाचा व्यापच एवढा होता की,  तिच्याशी बोलण्याची देखिल फुरसत नव्हती.            कामाच्या व्यापात व पियुषच्या काळजीमुळे जेवणाची वेळ केव्हा झाली व तिच्या सर्व मैत्रिणी डबे घेउन उपहार गॄहाकडे केव्हा गेल्या ते नेहाला समजलेच नाही.  नेहमीप्रमाणे नेहा आता येर्इल या आशेने सर्वजणी तिची जेवणासाठी वाट पहात बसल्या.  स्नेहाने फोन केला तेव्हां जेवणाची वेळ झाल्याचे तिच्या लक्षात आले.  ती आपला डबा घेउन उपहार गॄहाकडे गेली. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे सर्वांनी डबे उघडून आपण आणलेली भाजी व अन्य पदार्थ एकमेकात वाटून हसी मजाक करित जेवणास सुरवात झाली.  पण याकडे नेहाचे लक्ष नव्हते.  तिच्या तोंडात घासच जार्इना. राहून राहून पियुषचा चेहरा डोळ्यासमोर यायचा व मन दु:खी व्हायचे.  पियुष झोपला असेल काय?  त्याने औषधी घेतली असतील काय?  आजोबांना त्रास तर देत नसेल ना? त्याचा ताप कसा असेल? वगैरे अनेक प्रश्नांनी तिचे मनात काहूर माजायचा. तिची स्थिती “घार हिंडते आकाशी,चित्त तीचे पिलापाशी” अशी झाली होती.

            “ ए ! हे बटाटयाचे काचरे कोणाचे गं ?” स्वातीने प्रश्न केला.

             “ का गं काय झालं ?” अनघाने विचारले.

              “अगं मीठ महागल्याचे किंवा त्याचे रेशनिंग झाल्याचे पण कधी एैकिवात नाही.” स्वाती म्हणाली.

              “म्हणजे? मला नाही समजले?”अनघाचा प्रतिप्रश्न.     

              “अगं यात मीठाची वानवाच आहे म्हणजे मीठ टाकायचीच विसरलेली दिसते.” स्वाती खुलासा करती झाली.

              या छोटयाशा विनोदावर सर्वजणी हसल्या पण नेहाकडून काही प्रतिसाद लाभला नाही.

              “बटाटयाचे काचरे नेहाकडची आहे.” रेवा म्हणाली.

               आपल्या नावाचा उच्चार होताच नेहाची तंद्री भंग झाली. भानावर येत म्हणाली, “मला कोणी काही विचारले काय ?”

               “होय, अगं ! आमच्यात ये. स्वप्नात रमू नको. मी विचारले, हे बटाटयाचे काचरे कोणाचे ? स्वातीने पुन्हा तोच प्रश्न केला.

                “मी आणलेत बटाटयाचे काचरे.  माझे आहेत.   का गं !  काय झालं?  तिखट झालेत का कच्चे राहिलेत ? ” नेहा थोडीशी गरबडत म्हणाली.

               “ घ्या यावर विनोद झाला सर्वजणी हसल्यात तरी हिला समजलेच नाही काय झालं ते.  अगं !  भाजीत मीठ टाकलेच नाही तु. ” स्वाती ने खुलासा केला.

              “असं होय.  विसरले वाटते. ” नेहाचा खुलासा.  

              “ अभी येथेच आहे का गेलाय कोठे दौ–यावर ? ” रेवाने नेहाची मस्करी करित विचारले.

             “दोन दिवस झाले चेन्नार्इला गेलाय.  येर्इल ८ – १० दिवसांनी. ” नेहाने खुलासा केला.

             “ म्हणूनच कामात पण लक्ष लागत नाही राणीसाहेबांच, आणी जेवण पण जात नाहीय स्वारीला. ” अनघा फिरकी घेत म्हणाली.

             नेहाची मानसिक परिस्थिती चेष्टा मस्करी व हसी मजाक समजण्या पलिकडची होती.  पियुषच्या आठवणीने तिच्या डोळ्याच्या कडा पाण्याने ओलावल्या. तिने हातातील रूमालाने डोळे पुसत काही न खाताच डबा बंद केला.  तिची अस्वस्थता व चिंताग्रस्त चेहरा पाहून हसी मजाकचे आनंदी वातावरण एकदम धीर गंभीर बनले.  सर्वजणी गंभीर झाल्या.  अचानक काय झाले हे कोणालाच समजेना. ती एवढीशी चेष्टा पण सहन करणार नाही असे कोणालाच वाटले नाही. ती दु:खी होण्याचा उलगडा कोणालाच होर्इना.  स्वाती, रेवा, अनघा तिघींनी तिचे दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिला समजाविण्याचा प्रयत्न पण केला. पण व्यर्थ.  ती काहीच बोलेना. त्यांच्या गॄपमध्ये स्वाती तिची अगदी जवळची मैत्रिण समजली जात होती.

          तिने तिला विश्वासात घेत विचारले? “काय गं सासरे रागावलेत का तुझ्यावर?  का ऑफिसच्या कामाचा ताण जाणवतो?”

       “ नाही. असे काहीच नाही. ” नेहा म्हणाली.

        “मग असे अचानक डोळ्यातून पाणी येण्याचे कारण तरी काय ?” स्वातीचा प्रतिप्रश्न.

        “पियुष गेले दोन दिवस आजारी आहे. ताप सारखा कमि जास्त होत आहे.  घरी सासरे आहेत. पण तो कसा असेल? ताप उतरला की नाही? रडतोय का? याची काळजी वाटते.  त्याची आठवण झाली म्हणून. ” नेहाने खुलासा केला.  

        ते ऐकून सर्वांच्या चेह–यावरील भाव बदलले व चिंताग्रस्त दिसू लागले. 

        “अगं मग सुटी घ्यायची. कशाला आली ऑफिसला? अभि नसला तरी सासू सासरे तरी आहेत ना घरी त्याची काळजी घ्यायला. ” स्वाती म्हणाली.                                                                                                                            

         “ होय,सासरे आहेत.  सासूबार्इ गेल्यात सांगलीला नणंदेकडे गौरी गणपतीसाठी. ” नेहा खुलासा करती झाली.

         “डॉक्टरकडे नेले होते काय? काय म्हणाले डॉक्टर?” रेवाने विचारले.

          “काल संध्याकाळी डॉक्टरकडे जाउन आले.  एक इंजेक्शन दिले व पातळ औषध दिले आहे दर तीन तासांनी द्यायचे. सासरे देत आहेत पण माझे लक्ष लागत नाही गं कामात. ” नेहा आपले दु:ख व्यक्त करीत  म्हणाली.  

          “अगं मग सुटी घ्यायची.  कशाला आली ऑफिसला? रेवाने परत तीच तार छेडली.

          “सकाळी मॅडमना सुटी साठी फोन केला होता पण कामाचा ताण असल्यामुळे त्यांनी सुटी नाकारली व फारच गरज भासली तर दुपारी घरी जा असा सल्ला दिला. ” नेहा म्हणाली.  

        “नुसता तापच आहे ना !  सध्या तापाची साथच आहे. वेळेवर औषधी दिलीत तर लवकर बरा होर्इल. काळजी करू नकोस. ” अनघा समजावणीच्या सुरात म्हणाली.

      “ तु मॅडमना सांगून घरी जा. फारच गरज भासली तर मी पाहीन दुपारी तुझ्या टेबलचे काम. काळजी करू नको.  तु पियुष ची काळजी घे. ” रेवा तिला विश्वास देत म्हणाली. 

           रेवाने दिलेला दिलासा व दाखविलेल्या आत्मियतेने नेहा क्षणभर सुखावली व मॅडमच्या परवानगी ने घरी गेली.                                                           

           पियुषला तिच्या सास–यांनी थोडेसे खाउ घालून, औषधाचा डोस देउन व कॄष्ण–सुदामा, पेंद्याची गोष्ट सांगत नुकतेच झोपविले होते. अंगात तसा थोडासा ताप होताच.  संध्याकाळी परत डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांनी निरीक्षणासाठी भरती करण्याचा सल्ला दिला व त्याप्रमाणे लगेच भरती केले.

           दिवसभराच्या औषधोपचारा नंतर फारसा उपयोग होत नसल्याचे पाहून, बालमानस शास्त्राचा आधार घेत डॉक्टर म्हणाले, “काळजीचे काहीच कारण नाही. पण त्याच्यावर प्रेम करणारी आजी, आजोबा वडिलांसह सर्व व्यक्ती समोर दिसल्यास तर कदाचित त्याला लवकर वाटेल.”

           डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नेहाने  सांगलीला व अभिला चेन्नर्इला फोन करून कळविले. निरोपाप्रमाणे संध्याकाळपर्यंत दोघे हॉस्पिटलमध्ये येउन पोचले.  आजोबांनी देवाला साकडे घालत देव पाण्यात ठेवले. आजीने रात्रभर जागरण करून पियुषच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्टया बदलत राहिली. त्याला गोष्टी सांगत होती.  नेहा व आभि काळजीने बेजार होते. काय करावे ते त्यांना उमजत नव्हते. आजी आजोबांच्या प्रयत्नाला यश आले. सकाळी पियुषचा ताप उतरला. सर्वांच्या जीवात जीव आला व देवाचे आभार मानत सर्वांनी एक मोठा उसासा सोडला.  दुपारी हॉस्पिटलमधून परततांना सर्वांनी गणेश मंदिरात जाउन दर्शन घेतले व देवास पेढयाच प्रसाद ठेवला. संस्कारक्षम व विनयशील नेहा, सासू सास–यांचे नमस्कार करित म्हणाली, “ आर्इ पप्पा, मी तर पूर्ण घाबरले होते पण तुमच्या मुळेच आज पियुषचा ताप उतरला.” 

          संध्याकाळी सर्वजण जेवणास बसले असता आजी पियुषला म्हणाली, “ थांब बाळा मी तुला गरम गरम तुप, वरण–भात आणते खायला.”

        त्यावर पियुष म्हणाला, “ नको, आजी मला आजोबांनी केले होते तसे सुदाम्याचे पोहे दे.  वरण भात नको. ”

       त्याच्या या बोलण्यावर आश्चर्य चकित होत सर्वांच्या भुवया उंचावल्या व  नजरा आजोबांकडे वळल्या. नेहा म्हणाली “ हे काय नविनच आता. ”                                                               

       यावर सासरे खुलासा करित म्हणाले, “तु दुपारी घरी नसतांना त्याला सारखे बिस्किट देण्या पेक्षा कॄष्ण–सुदामा,  पेंद्याची गोष्ट सांगत गोड दुधात पोहे भिजवून दुध–पोहे दिले. ते त्याला फार आवडले. त्यालाच तो सुदाम्याचे पोहे म्हणतो.”  

      “अजून आजोबांनी तुला काय काय संगितले, शिकविले.”  अभिने उत्सुकतेने विचारले.

         त्यावर तो उजवा पाय गुडघ्यापर्यंत उचलून गुडघ्यावर हाताने खाली दाबत, एका पायाने लंगडा चालत पेंद्याची नक्कल करित आपल्या बोबडया आवाजात गाउ लागला “क्लुत्ना थ्ंभाल रे थंभाल आपुल्या गायी, आमी जातो आमच्या घली.” एवढे करून तो पळत जाउन आजीच्या मांडीवर विसावला.

        नेहा त्याच्या बाललिलांवर शेरा मारीत म्हणाली, “अरे लबाडा, गेले दोन तीन दिवस तापाने आजारी होता. पण आजी आल्याबरोबर कसा ताप पळून गेला अन् कळी कशी खुलली एका मुलाची. यासाठी आजी आजोबा हवेत काय तुला ? ” तसे सर्वजण हास्यानंदात बुडून गेले. 

        असे हे आनंदी कुटुंब व आनंदी दॄश्य पाहिल्यावर “ वसुधैव कुटुंबकम” याची सार्थता पटली नाही तर नवलच म्हणावं,

Go Back

Comment