Menu

पुनरारंभ

199230

जागरण

Please download here !!

 

प्रकाशन: भन्नाट दिवाळी अंक २०१३ | पुणेरी तडका दिवाळी अंक २०१४

 

 जागरण

              नित्यनियमाप्रमाणे गावातील काही ज्येष्ठ मंडळी येसूबा ढेरे, किसना दळवी,  महंमदभार्इ, अब्दुल्ला, राजाभाउ कुळकर्णी, सदा न्हावी वगैरे चावडीवर  जमली. गाव गप्पा मध्ये गावातील अनेक जाज्वंत व ज्वलंत घडलेल्या घडामोडी,  राजकारण,  भांडण–तंटण,  उणे–दुणे एवढेच नाही तर गावातील प्रेमप्रकरणे,  लफडी,  चो–या – मा–या  इ. अनेक विध विषयांवर यथेच्छ चर्वण झाले.   चो–या – मा–यांचा विषय निघताच महंमद भार्इ सांगू लागला.  

               “अरे भार्इ क्या बताउँ, एैसा लगता है की गावमे शायद कोर्इ चोर उचक्के आये है या तो फिर गावमे कोर्इ भुरटा चोर हो” महंमद भार्इने शंका उपस्थित केली.

              “ कारं बाबा असं का म्हणतुया, आजवर गावात कंदी काय घडलं नाय अन् समजल पन नाय.  कुणाचा सुतळीचा तोडा बी चोरीला गेला न्हाय.  तुला काय म्हणायचय गावातले लोक चोर हायेत काय? ” किसना त्याच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करित म्हणाला.

               “ नही रे बाबा² ऐसा नही. परसो हमारे पडोसकी फातिमा बी बोल रही थी …….. ” महंमद भार्इ खुलासा करता झाला.

               त्याचे वाक्य अर्थवट मध्येच तोडत रंगनाथ कुंभार म्हणाला “ काय म्हणत व्हती. ”

               “पिछले चार पाच दिनसे उसके मुर्गीयोंके खुराडेसे हर रोज अंडे चोरी होते है.” महंमद भार्इ आपल वक्तव्य पूर्ण करता झाला.

              “ अरे हां जब मै कल सुबह खुराडेसे अंडे निकालने गया, तेा देखा मेरे यहासे भी अंडे चुराये गये है. ” अब्दुल्ल्या त्याला पुस्ती जोडत म्हणाला.

           “अरे बापरे! हे तर कठिणच झालंय.  आज फकस्त अंडी चोरली. उंद्या कोंबडया पळवतीन, परवा गोठयातली शेळ्या, मेंढया, वासरं पन चोरतीन. फुडं जाउन घरावर डाकाबी घालाया कमि नाय करणार. ” येसूबान आपली अक्कल पाजळत बोलता झाला.

         “खरा हाय बा तुजं. पण म्या म्हणतु गावातली कुत्री समदी झोपली का यवढी.  न्हार्इ तिथ आपल्या व पोराबाळांच्या अंगावर भुंकतीन त्यांच्या अंगावर धावतीन,त्यांस्नी चावतीन. गावात नुसता उच्छाद मांडलाय समद्या कुत्रयांनी.  हरामखोरांना खायाला नाय दिल पायजे.” किसना आपला राग व्यक्त करित म्हणाला.   

               आता चर्चेत रंग भरत चालला होता. चर्चा बहरात येत होती. राजाभाउंना  बोलण्याची संधी मिळताच त्यांनी आपले तोंड उघडले. “चोर भुरटा जरी असला तरी निर्ढावलेला दिसतो. त्याला पकडायला हवे. ”                                                        

                  सदा न्हावी आपली एैकिव कहाणी सांगू लागला. “नशिब आपल्या गावात तर फकस्त भुरटया चो–या होतात. पण शेजारी पडाळे वस्तीवर तर मोठया चो–या झाल्यात म्हन. परवा राती म्हणे एकनाथ वाण्याचे दुकानाचे फडताळ उचकटून दुकान फोडले. एक दिड हजाराचा गल्ला आणि तिखट मिठाच्या पुडया पळीवल्या. घर समजून सरकारी दवाखाना आन् त्याला लागून असलेला जनावरांच्या दवाखान्याची कुलपं तोडली.  दवाखान्यात काय मिळणार डोंबलं.  रिकाम्या हाताने जायच नाही म्हणून दाराचे पडदे व टॉवेलच चोरून नेले. माझा सांगाती सांगत होता त्याच दोन वर्षाच कारटं रोज नाही तवा रडून सारी रात जागवतो. आर्इ बापाला तरास देतो. अन् वस्तीवर चोर आले तवा त्याला बळ रडवावं तरी रडत नाही, गप गुमान  झोपतं. ” त्याच्या छोटयाशा विनोदावर सर्व हसले.

              “ न्हाय बा ही गोट हसण्यावारी घेण्या जोगी नाय. सरपंचाला अन् गावाच्या पोलीस पाटलाला वर्दी द्याया हवी. ग्रामसभा घेउन काहीतरी ठोस निर्णय घ्यायाला हवा. येसूबा  चर्चेत गांभीर्य निर्माण करित म्हणाला. 

             “बरावर बरावर. यकदम बराबर” म्हणत महंमदभार्इने त्याला पुस्ती जोडली.        

             कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ व्हावी या उक्ती प्रमाणे त्याच रात्री गावाच्या पूर्व वेशीजवळ ब्राम्हण वाडया मध्ये चोर आल्याची अफवा आली. सकाळी राजाभाउंची पत्नी कपडे वाळत टाकता टाकता शेजारील पार्वती काकूस म्हणाल्या “ काकू काल रात्रभर आपल्या बोळीमध्ये काही ठोकल्याचे किंवा भींतीला भोक पाडल्या सारखे आवाज येत होते. मला तर बार्इ रात्रभर त्या आवाजामुळे झोपच आली नाही. म्हणतात शेजारी पडाळे वस्तीवर चोर आले हेाते. छोटया मोठया चो–या पण झाल्यात. तेच चोर आपल्या येथे तर आले नसावेत ना ?” राजाभाउंची पत्नी भितीयुक्त शंका उपस्थित करीत म्हणाली.

             “ होय बार्इ,  मला पण तसेच आवाज ऐकू आले. मी यांना उठवित म्हणाली देखिल. पण त्यांनी या गोष्टीकडे ‘ काही नाही म्हणत’ काना डोळा केला व झोपा गुपचुप म्हणाले.” पार्वती काकू त्यांच्याशी सहमत होत म्हणाल्या.

            “अहो पहाटे पर्यंत आवाज येत होते. आपल्या वाडयाच्या भींती जुन्या भक्कम आहेत. त्या लवकर तुटणे अशक्य असल्याने कंटाळून निघून गेले असावेत.” राजाभाउंची पत्नी  म्हणाली.

            “होय, खरंय ते.  पण आज जरी गेलेत तरी उद्या येणार नाहीत कशावरून?” पार्वती काकूंनी आपल्या मनातील भिती व्यक्त केली.

             हा हा म्हणता,  गावात चोर आल्याची बातमी वा–यासारखी गावभर पसरली. वेशीजवळ ब्राम्हण वाडया मध्ये चोर आले. दिवसभर प्रत्येकाच्या तोंडी हाच विषय व हीच चर्चा.                                      

            सरपंचाच्या कानावर ही बातमी आधीच उडत उडत आली होती. सरपंचांनी तातडीची ग्राम सभा बोलाविली.  सभेस गावातील प्रतिष्ठित सर्व गावकरी ग्रामसेवक तसेच पोलीस पाटील उपस्थित झाले.  सभेच्या सुरवातीसच यापुर्वी गावात कधीही चोरी मारी अथवा डाका दरोडा पडला नसल्याचे विषद केले. गावक–यांची एकी, एकमेकावरील प्रेम व एक दुस–याबद्दलची सदभावना हेच गावाचे बळ आहे. या बळावरच गावाचा रामरगाडा सुरळीत चालू आहे. हे त्यांनी ठासून सांगितले. गावात सुरू झालेल्या चो–यांनी गावातील शांतता व एकता भंग होउ शकते. गावावर येउ घातलेल्या संकटास सर्वांनी एकीने सामोरे जायला हवे. या संदर्भात गावचे पोलीस पाटील तालुक्याच्या गावी जाउन पोलीसात वर्दी देउन येतील. परंतू गावातील प्रत्येक गावक–याने जागरूक राहून गावाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. इति पाटील.

           “ आरं पन म्या म्हणतू पोलीस पाटलान पोलीसांना सांगितलं, तरी पोलीस हितं येउन कायमचे थोडीच बसनार हाय. चोर बी लर्इ श्याने असत्यात.  पोलीसांचा राउंड झाल्यावरच त्ये चोरी करत्यात. ” दगडू सुतार आपली अक्कल पाजळीत म्हणाला  दगडूच्या या वाक्यावर सभेत खसखस पिकली व सर्व हसले.

             यावर ग्रामसेवक तोडगा काढीत म्हणाले “ पोलीस येतील तेव्हा आपण त्यांना मदत करूच. पण त्या व्यतिरिक्त गावातील सर्व गावक–यांनी रोज रात्री आळीपाळीने जागरण करून आपापल्या गल्ली बोळातील घराचे, दुकानांचे संरक्षण करायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एक विजेरी व एक वेताची अगर बांबुची काठी आणि शिटी घेउन रात्री दहावाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत हातातील काठी आपटीत व शिटी वाजवित पहारा द्यावा.”

             “असं कवर करायचं?” किसना दळवीने प्रश्न उपस्थित केला.

             “जोपर्यंत पंचक्रोशीतून चोर पळून जात नाहीत व चोर गेल्याची खात्री होत नाही तोपर्यंत.” सरपंचांनी खुलासा केला. 

           आठवडया भरातच योजिल्या प्रमाणे गावक–यांची आपापल्या भागात गस्त सुरू झाली. उत्साहाने गावकरी उपक्रमामध्ये सामील झाले. अशाच एक रात्री गावात ब्राम्हण आळी जवळ गस्त चालू होती.  गस्त घालणारे गावकरी काठया आपटीत, मधूनच शिटी वाजवीत आपले कर्तव्य पार पाडीत होते.             राजाभाउंच्या पत्नीस परत मागील आठवडया प्रमाणेच भींत ठोकल्याचे आवाज ऐकू आले. तशी ती राजाभाउंना उठवित घावरलेल्या अवस्थेत हलक्या आवाजात सांगू लागली,  “अहो उठा. लवकर उठा. बोळीत चोर आलेत वाटते. बोळीमध्ये माजघराच्या भींतीला बाहेरून भोक पाडून विटा काढण्याचा प्रयत्न चालू आहे. जरा कान देउन ऐका. शिवाय बोळीच्या बाहेर अधुन मधुन विजेरीचे झोत पण टाकल्याचे दिसतात.”                                            

            राजाभाउ अर्धवट निद्रावस्थेत बोलते झाले. “ अगं काही नाही. झोप तु आपली काळजी करू नको. आणि आपल्या सारख्या उपाध्यायाच्या घरात चोरी करून काय मिळणार त्यांना, सुपा–या, खारका आणि नारळ.”

          “अहो मला तर बार्इ भिती वाटते त्या चोरांची. काही नाही मिळाले तरी आपल्याला मारले ठोकले तर. त्यांच्या हातात कु–हाड, पहार, चाकू, सुरे असतात म्हणे बार्इ.  शेजारच्या देशपांडे भावजींना उठवू या का ? ”  

              पत्नीच्या आग्रहास्तावर राजाभाउ उठले व माजघरात गेले. थोडावेळ थांबले पण काहीच ऐकू न आल्यामुळे ते परतु लागले, तसा त्यांना भींतीला बाहेरून ठोकल्याचा काहीसा आवाज आला. ते थोडेसे घाबरले पण “घाबरू नको” असा पत्नीस धीर देत स्वत: सावरले.    

               “शेजारच्या देशपांडे भावजींना उठवू या का ? ” पत्नीने परत तोच प्रश्न केला.

               तसे राजाभाउ हुषारीने म्हणाले “ नको. त्यांना उठवायचे म्हणजे लार्इट लावून बाहेर जाणे आले व दार उघडण्याचा आवाज झाला तर ते सावध होतील व पळून जातील अथवा हातातील हत्याराने आपल्यावर वार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापेक्षा मी खिडकीतून विजेरीच्या प्रकाश झोताने गस्त घालणा–या गावक–यांना इशारा करतो. हातात हा कुदळीचा लाकडी दांडका घेउन बसतो. चोराने मध्ये प्रवेश करताच त्याच्या डोक्यात वार करतो.  तु तिखटाची पूड घेउन सावध रहा. मी प्रहार करताच त्याच्या डोळ्यात तिखटाची पूड फेक. एकदा का तो जखमी झाला व डोळे आग करू लागले तर काही करू शकणार नाही.”

               “ अहो पण ते दोन तीन जण असणार. त्यांच्या जवळ हत्यार असणार. आपण दोघेच. त्यांच्याशी कसा सामना करता येर्इल?” पत्नीने शंका उपस्थित केली.

               “ तुमचे म्हणणे बरोबर आहे पण धीर धरा.  हिंमतीने काम घ्या.” राजाभाउ पत्नीस धीर देत म्हणाले. 

                अधून मधून खिडकीतून गस्तीवरील गावक–यांची वाट पहात दोघे पती पत्नी माजघरात बसून होते. घडयाळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. रात्र सरत चालली होती. राजाभाउ व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यास डोळा नाही. भय वाढत होते. पहाटचे चार वाजत आले. तशी गस्ती वरील गावक–यांची शेवटची फेरी त्यांच्या घराकडे आली. राजाभाउंनी पुढच्या दारी जाउन हळूच खिडकितूनच हलक्या दबक्या आवाजात त्यांना बोळीमध्ये चोर लपले असल्याचे सांगीतले. गावकरी सावध झाले. काहीजण  बोळाच्या एका टोकाशी तर काहीं दुस–या टोकाशी दबा धरून बसण्याची व एकाने जवळच्या झाडावर चढून अंदाज घ्यायचा योग्य वेळी शीटी मारयची.  शीटी वाजताच दोन्ही टोकाकडून एकाच वेळी सर्वां चोरांवर तूटून पडण्याची योजना आखली गेली. प्रत्येकाच्या मनात थोडीशी भिती तर होतीच पण एकीचे बळ मोठे या उक्तीप्रमाणे सर्वजण सावरले.  कोणी काय करायचे ठरले. प्रत्येकाने आपापल्या जागा घेतल्या. श्वास रोखले. विजेरीच्या झोताने व सर्व काही ठिकठाक झाल्याच्या खाणा खुणा झाल्या.  शिटी वाजली तशी सर्वजण हातातील काठी उगारत बोळीकडे धावले व हल्ला चढविला.

             आपल्याला कोणी मारावयास येत असल्याचे पाहून बोळीतील रात्रभर एकमेकास लाथा मारीत धूडगूस घालत चरणारी, तीन चार गाढवे भाँच्यू ऽ ऽ ऽ भाँच्यू ऽ ऽ ऽ असे ओरडत वाट मिळेल तिकडे लाथा उडवीत पळत सुटली. बोळीत चोर नसून एकमेकास व भींतीवर लाथा मारीत धूडगूस घालत चरणारी गाढव असल्याचे पाहून सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. राजाभाउंच्या तोंडून सहाजिकच त्रागात्मक अपशब्द उमटले “गाढविच्यांनी रात्रभर धूडगूस घालून आमचे जागरण केले.” 

               सकाळी सकाळी ही बातमी संपूर्ण गावभर पसरली व सर्वांना मनोरंजनाचा एक विषय चघळायल मिळाला. 

              संध्याकाळी नेहमी प्रमाणे चावडीवर जमणारी येसूबा ढेरे,  किसना दळवी,  महंमदभार्इ, अब्दुल्ला, सदा न्हावी, राजाभाउ कुळकर्णी वगैरे मंडळी जमली तेव्हा राजाभाउ कुळकर्ण्यांनी महंमद भार्इला विचारले, “अरे भार्इ हमारे यहां तो चोर की जगह गधे निकले लेकिन तुम्हारे मुहल्लेमे अंडे चुरानेवाला चोर का क्या हुआ? मिला या नही?”

               “अरे हां भार्इ, हर रोज कडी नजर रखने के बाद कल देखा, अंडे चुरानेवाला निचेवाली गली का कुत्ता था. उसे अंडे चुरानेकी आदतसी है. पकडनेकी कोशिश की लेकिन भाग गया साला.”  महंमद भार्इ खुलासा करता झाला. सदा न्हावी गमतीने म्हणाला, “आयला, काय गंमत हाय बघा,आजकाल माणुसच काय तर कुत्र, मांजरं, गाढवं देखिल माणसाला गाढव बनवायला लागलीत.” सदाच्या या टिपणीवर सर्वजण परत खदखदा हसले.

Go Back

Comment