Please download here !!
आर्इ – गुगलचे इंजिन
“ ए तार्इ माझा काळा पेन दिसला का गं तुला “ विजयने वॄंदा तार्इला विचारले.
“ नाही रे ²” वॄंदाने नकारार्थी उत्तर दिले.
“ अगं काल सबमिशनचे काम होते ते झाल्यावर येथेच ठेवला होता.” विजय म्हणाला.
“ अरे मग असेल तिथेच कोठेतरी जाणार कोठे? नीट बघितलस कां? टेबलाच्या ड्रॉवरमध्ये बघ. ”वॄंदाने दिशादर्शक सूचना केली.
विजयने तार्इच्या सांगण्या प्रमाणे टेबलाचा ड्रॉवर तपासला, तर डायरी खाली त्याचा काळा पेन लपलेला त्याला दिसला. एकाद्या शास्त्रज्ञाला फार मोठा शोध लागावा व आनंदाच्या भरात युरेका ऽ युरेका ऽ असे म्हणत नाचावे ओरडावे तद्वत तो वॄंदा तार्इला म्हणाला “सापडला ऽ सापडला ऽ”.
पण यावर त्याचे समाधान झाले नाही. तो वॄंदाला चिडवित व तिच्यावर खोटा संशयास्पद आक्षेप घेत म्हणाला, “तुला गं कसे माहिती? तुच लपविला असशील. नाहीतर एवढे अचुक कसे सांगितले.”
“ वा रे! बावळया, स्वत:च स्वत:च्या वस्तू इकडे तिकडे ठेवायच्या आणि नाही आठवल्या तर आहेच आर्इ आणि तार्इ शोधून द्यायला.” वॄंदा फुशारकी मारित म्हणाली.
“ ए जास्त फुशारक्या मारू नकोस हं, तु तरी काय करतेस गं? माझ्या सारखेच आर्इला विचारतेस, ‘आर्इ माझा निळा स्कार्फ सापडत नाहीय.| ‘माझी थिअरीची वही सापडत नाहीय.| वगैरे वगैरे” विजय तिच्या फुशारकीची हवा काढीत म्हणाला.
वॄंदा वैतागून म्हणाली, “ बरंय बरंय² नको शहाणपणा दाखवू जास्तीचा.”
वॄंदा व विजय यांच्यातील संवाद ऐकून आर्इ वैशाली, पदराला हात पुसतच, बाहेर आली. दोघांना दटावित दटावणीच्या सूरात म्हणाली, “ काय रे काय भांडण चाललय आपसात? जरा शांत राहता येत नाही का तुम्हाला?”
आर्इच्या रागावण्याने दोघे क्षणभर शांत झाले. पण शांत बसेल ती वॄंदा कसली. हळूच दबक्या आवाजात आर्इसमोर आपली कैफियत मांडू लागली. “अगं, त्याचा काळा पेन सापडत नव्हता. मी त्याला टेबलाच्या ड्रॉवरमध्ये असेल असे सहज सुचविले आणि तेथे मिळाला. तर हा शहाणा म्हणतो कसा, ‘तुच तेथे ठेवला असशील’?
वैशाली दोघांना समजावणीच्या सूरात म्हणाली, “बर! बरं! असू दे. तुमच्या बाबांच्या सकट सगळयांच्या खोडया मला माहीत आहेत. स्वत:च्या वस्तू नीट कधी जागेवर ठेवायच्या नाहीत आणि वेळेवर सापडल्या नाही म्हणजे ओरडा करायचा.”
वॄंदा आपल्या अकलेचे तारे तोडीत म्हणाली, “आर्इ, आमचे सर म्हणतात, गुगल आहे तर माहिती तंत्रज्ञान आहे, गुगल आहे तर सर्व काही आहे, अन् गुगल नसते तर काहीच नसते. माहिती तंत्रज्ञान पण नसते. कोणत्याही प्रकारची माहिती किंवा जगातील कोणतेही शहर, त्याचा नकाशा, तेथे जाण्याचा मार्ग किंवा तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती पाहिजे असल्यास, इंटरनेटवर गुगल उघडून पाहिजे ते टाइप केल्यास, क्षणात गुगलच्या इंजिन द्वारे शोध घेउन त्याचे अनेक पर्याय आपल्या समोर मांडले जातात. त्यातील योग्य तो पर्याय निवडून, आपल्या गरजा पूर्ण होउ शकतात. खरं सांगू आर्इ! तू या आपल्या छोटयाशा घरातले गुगलचे इंजिन आहेस.” वैशाली तिला मध्येच अडवित म्हणाली, “ते कसे काय गं?”
वॄंदा खुलासा करती झाली. “अगं हे बघ! बाबांना हात रूमाल, डायरी, चाव्या सापडत नाहीत, लगेच तु शोधून देणार. आपल्या विज्याला पेन, पायमोजे, क्रीकेटचा बॉल, टेनिसची बॅट सापडत नाही, लगेच तू शोधून देणार. आजीला स्वयपाक घरात वेलची पूड, मिरीचा डबा, लवंगा काही सापडल्या नाहीत लगेच तू शोधून देणार.
विजय मध्येच तिला अडवित म्हणाला, “आणि ए शहाणे तुझा स्कार्फ, मेकअपचा डबा, पर्समधल्या स्वत:च्या वस्तू, मोबार्इल चार्जर पण आर्इच शोधून देते ना! ते कधी सांगणार.”
“अरे हो रे बावळया” असे म्हणत शोध वस्तूंची यादी पूर्ण करित वॄंदा पुढे बोलती झाली, “दोन दिवसापूर्वीचा पेपर, किराणा दुकानदाराची वाण सामानाची वही, सुर्इ दोरा वगैरे घरातल्या सूर्इ दो–या सकट छोटया मोठया वस्तू कोठे आहेत याची माहिती तू क्षणात कशी गं देतेस? कसे जमते गं तुला हे सारे? खरंच तु महान आहेस. तुला घराचे गुगल इंजिन म्हणावयास काहीच हरकत नाही.” वॄंदाने आपले म्हणणे एक मोठा श्वास घेत संपविले. “ ए, चल काही तरीच काय बोलतेस.” आर्इ लटक्या स्वरात म्हणाली.
असा माय लेकरांचा संवाद चालू असतांनाच आजी हॉलमध्ये प्रवेश करती झाली. “काय चाललय माय लेकरांच? कसल्या वस्तूंची यादी करताय? कोणत्या गहन विषयावर एवढा काथ्याकूट चाललाय? मला अडाणीला तरी कळू देत जरा.” आजी म्हणाली.
“ अगं आजी, ही आपली हुषार वॄंदातार्इ आहेना, ती आर्इला गुगलचे इंजिन म्हणते.” विजयने खुलासा केला.
“ इंजिन म्हणजे रूळावर धावणारे, आगगाडीचे डबे ओढून नेणारे रेल्वेचे इंजिन कां ? आजीने भोळया भाबडया स्वभावाने प्रश्न केला.
“अगं हो इंजिनच, पण रेल्वेचे नाही, गुगलचे. अगं! आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात गुगल एक माहिती तंत्रज्ञानातील सेवा देणारी कंपनी आहे. जिथे आपणास पाहिजे असणारी सर्व काही माहिती एका क्षणात मिळते. ते शोधून देणारे त्याला गुगलचे सर्च इंजिन म्हणतात. ” विजय खुलासा करता झाला.
“बरं बरं राहू दे तुझे ज्ञान तुझ्याजवळ. एवढी माहिती आहे मला. मी काही एवढी अडाणी नाही. तुमची आजी आहे. ” आजी म्हणाली. आजी पुढे खुलासा करती झाली. “ कोठले का असेना इंजिन आहे खरंय. तु, विजय, मी आणि बाबा तसेच सासर माहेरची सर्व नातेवार्इक मंडळी या इंजिनाला जोडलेले डबे आहेत. या सर्वांच्या आवडी–निवडी, त्यांची मने सांभाळीत या संसार रूपी रूळावरून जोरात धावते आहे. संसारात कितीही अडचणी व सुख दु:खे रूपी चढ–उतार, डोंगर–द–या, छोटेमोठे पूल आलेत तरी न डगमगता, कंटाळा अथवा किट किट न करता हसत मुखाने पार करित हा संसाराचा गाडा ओढते आहे. रोज सकाळी लवकर उठून सर्वांचा चहा नाश्ता, तुमचे डबे, दुपारचे व रात्रीची जेवणे एवढेच नव्हे तर दिवसभर घरातली इतर कामे सांभाळून आल्या गेल्या पाहुण्याची सरबरार्इ पण तीच करते. सकाळी उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत आपली स्वत:ची प्रकॄती सांभाळत सदैव कामात असते. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला या भुमिकेतून जावे लागते. जी स्त्री हे सर्व यशस्वी रित्या करू शकते तीच खरी स्त्री व तिचेच जिवन सार्थकी ठरते.”
आजीचा खुलासा संपत नाही तेाच खोडसाळ वॄंदा विजयला चिडवित म्हणाली, “ ए बावळया समजले का आता?” कॉलेजला जाण्याची वेळ झाली असून सुध्दा जाता जाता विजयने टीव्ही चालू केला. ते पाहून वैशाली तार्इ जराशा लटक्या रागानेच विजूवर ओरडल्या, “ आता कॉलेजला जाणार आहेस की टीव्ही वर मॅच बघत बसणार आहेस?” “कॉलेजलाच जाणार आहे पण नाणेफेक कोणी जिंकली व फलंदाजी कोण करतंय एवढेच पाहायच आहे.” विजू आपली बाजू मांडीत म्हणाला.
एवढयात घरातून विनायकरावांनी आवाज दिला. “वैशाली एऽ वैशाली ² मला ऑफिसला जायला उशीर होतोय.”
आवाजाच्या दिशेने तोंड करित वैशालीने, त्यांची नेमकी गरज अजमावित तत्परतेने म्हणाली, “ होय, आलेऽ आलेऽ. तुमचा आजचा ड्रेस, टाय, चाव्या, आणि डायरी लाकडी कपाटात वरून दुस–या रकान्यात ठेवलेत.”
वैशाली आत जाणार त्याच वेळी विजयने मागूनच तिला पाठमोरी हाक दिली, “ ए ऽ आर्इ. ” त्याच्या हाकेला प्रतिसाद देत आतमध्ये जाता जाता ती म्हणाली, “ अरे, हो रे! मला माहित आहे तुझा पॉकेट मनी संपलाय ते. घेते मागून बाबांकडून.”
आजी आणि वॄंदा दोघी जणी आर्इची चाललेली धावपळ व तारेवरची कसरत पाहत होत्या. वॄंदा विजयला सूचवित म्हणाली, “ समजलं मी आर्इला गुगलचे इंजिन का म्हणाले ते. तुझ्या व बाबांच्या हाके सरशी तिने न सांगता तुमच्या गरजा ओळखल्या व तत्क्षणी पूर्ण केल्या. ‘त’ म्हणजे ‘ताक’ ओळखणारी माझी आर्इ आहेच गुगलचे इंजिन. त्यापेक्षा चपळ, तत्पर व बिरबला सारखी हजर जबाबी.”
“ ए शहाणे त्याला शहाणपणाचे डोस पाजत बसू नको. अपचन होर्इल त्याला. जा घरात जा आर्इला कामामध्ये थोडीफार मदत कर. हे इंजिन काम करून थकले तर तुमची आमची सर्वांचीच पंचार्इत होर्इल. सर्वांच्या गरजा आवडी निवडी सांभाळून घरचे व बाहेरच सांभाळायचे सोपे खाण्याचे काम नाही. जा घरात जाउन आर्इला थेाडी फार मदत कर कामाला. लक्षात ठेव ! तुला पण इंजिनाच्या भुमिकेतून जायचे आहे. ” आजी वॄंदाला थोडयाशा दरडावणी व उपदेशात्मक स्वरात म्हणाली.
वॄंदा आजीची आज्ञा शिरसावंद्य मानीत घरात गेली. |आर्इला घरकामात थोडीशी मदत करित बाबांना आणि विजुला हसत निरोप दिला. बाबा व विजू गेल्यावर सासू, सुन आणि नातीने बनविलेल्या स्वयपाकावर गप्पा गोष्टी व हसी मजा करित यथेच्छ भोजनावर ताव मारला. जेवण होते न होते तोच “ ए वृंदे, संध्याकाळी चहाबरोबर नाश्ता आणि रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचे गं? त्याप्रमाणे भाज्या आणून तयारीला लागले पाहिजे.” वैशालीने संभ्रामात्मक व चिंतात्मक स्वरात विचारले.
“अगं सूनबार्इ, झोप आता जरा निवांत थोडावेळ. थोडासा आराम कर. संध्याकाळचे संध्याकाळी आम्ही बघू. वॄंदा आणि मी जार्इन बाजारात भाजी आणायला. येतांना देवळात पण जाउन येर्इन. संध्याकाळच्या चिंतेची डोक्यावरची टांगती तलवार तात्पूरती बाजूला ठेउनच वैशाली नामक इंजिन शेडमध्ये निद्राधीन झाले.