Menu

पुनरारंभ

199277

गोड गुपित

Please download here !!

प्रकाशन: कुंभश्री दिवाळी अंक २०१२ | अन्नपूर्णा मासिक सप्टेंबर २०१२

                                               गोड गुपित

                 तालुक्याच्या गावापासुन साधारण दूरवर डोंगराच्या पायथ्याशी वसलेले 500 उंबरठयाचे बांगरवाडी एक छोटेसे गाव. गावाला लागुनच अर्धा एक फर्लांगांच्या परिसरात गावाशी निगडीत असलेल्या १००–१२५ लोकवस्तीच्या पाच एक वस्त्या.  चिमटे वस्ती ही त्यातील एक. आजू बाजूला डोंगर दरी, हिरवीगार बहरलेली शेती, संथ गतीने वाहणारे ओढे नाले असा नैसर्गिक रित्या संपन्न सुंदर परिसर. तालुक्याच्या गावातुन सकाळी साडे आठ व संध्याकाळी साडे पाच वाजता ये जा करणारी महामंडळाची एस.टी. बस एवढीच काय ती बांगरवाडीला जोडणारी यातायात व्यवस्था.

            शंकरअण्णा साधारण ५०–५५ च्या वयाचे वारकरी सांप्रदायातील साधी राहणी व उच्च विचारसरणीचे नावाजलेले प्रगतिशील प्रतिष्ठित शेतकरी व्यक्तिमत्व. शिवाय पंचायत समितीचे सदस्य. गोल चेहरा, पांढरा नेहरू शर्ट, पांढरे स्वच्छ धोतर, पांढरी टोपी, गळयात तुळशीमाळ, कपाळी, गळयाला व कानांच्या पाळीला अष्टगंधाचा टिळा. भरगच्च पिळदार मिशा असा त्यांचा नेहमीचा वेश. अवघ्या बांगरवाडी मध्ये त्यांचा मान केला जात असे.  प्रतिष्ठे प्रमाणे त्यांचे ग्रामीण भागातील अद्ययावत वाडा सदृश कौलारू घर पण शोभून दिसत असे.  मोठे चौरस आकाराचे तीन्ही बाजूंनी कुंपण घातलेले शेतातील घर. अंगणात डाव्या बाजुला ट्रॅक्टर ट्रॉली उभी करणेसाठी शेड.  उजव्या बाजूस एक लोखंडी झोका.  प्रवेश द्वाराजवळ दोन्ही बाजूस उंच नारळाची झाडे. कुंपणालगत आतील बाजूस व्यवस्थित लावलेली विविध फुलांनी बहरलेली झाडे. स्वच्छ सुंदर शेणाने सारवलेले अंगण. यामुळे घर अधिकच उठून दिसायचे.  बैठक खोली फार छान सजवलेली होती. बैठकी मध्ये दीड फूट उंचीचा बांधलेला ओटा.  त्यावर पांढ–या शुभ्र चादरी आच्छादित दोन तीन गाद्या व लोड कायमस्वरूपी असायचे.  भिंतीला खालच्या अर्ध्या भागास गुलाबी रंग तर वर हिरवा रंग लावला होता. दोहोमध्ये एक इंचाचा निळया रंगाचा पट्टा शोभून दिसत होता. भिंतीवर पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री नेत्यांच्या तसबिरी सोबत अण्णांच्या वाडवडिलांचे फोटो देखिल लटकत होते.

      घरात शंकरअण्णा, पत्नी काशीबार्इ, त्यांची दोन अपत्ये, कन्या पतिभा व शेंडेफळ शैलेश असे चार जण. प्रतिभा नितळ बांध्याची, हुषार, नाकी डोळी सुंदर, थोडी सावळ्या रंगाची, सुस्वभावी मुलगी. तालुक्याच्या गावी वाणिज्य शाखेच्या तिस––या वर्गात शिकत होती.  तर 10 वर्षाचा शैलेश बांगरवाडीला जिल्हा परिषदेच्या शाळेत 4थी मध्ये शिकत होता, आज त्यांची कन्या प्रतिभास पाहण्यासाठी तालुक्याच्या गावाहून पाव्हणे येणार होते.  याची कल्पना फक्त वस्तीवर वरच्या बाजूस राहणारी प्रतिभाची मावशी बायजा बार्इ शिवाय कोणासही नव्हती.                                                     

      नेहमी पमाणे वेळेवर सकाळी दूरवर हवेत धुरळा फेकीत घाट उतरणारी महामंडळाची बस बायजाच्या नजरेस पडली तशी तिने खालच्या वस्तीवर शंकर अण्णांच्या घराकडे पाहत काशीबार्इस जोराने सूचना वजा आरोळी दिली.

           “ ए ऽऽ काशे यष्टी आलीया, पावणे आल्याती बघ !”

            बायजेची हाक ऐकून काशीबार्इची एकच धांदल उडाली.  तिने भराभर घर आवरायास सुरवात केली.  अंगणातील गार्इचे वासरू परसदारी नेउन बांधले.  अंगणात फडी फिरवली. बैठकीमधील समोर नको असलेल्या वस्तू आतील घरात नेउन ठेवल्या.  न जाणो पाहुणे मधल्या घरात आले तर व्यवस्थित दिसायला हवे असे मनाशीच पुटपुटत कोनाडे स्वच्छ केले.  खुंटीवरचे कपडे आवरले.  शैलेशच्या मदतीने त्याचे दप्तर व इतर सामान आवरून ठेवले.

          काही वेळातच एस. टी. बस धुराळा उडवित बांगरवाडी स्टँडवर येउन पोचली.  आजुबाजुच्या दुकानदारांनी व लोकांनी नाका तोंडाला रूमाल लावले.  दोन चार प्रवासी उतरल्यावर शहरी पेहरावातील दोन पुरूष, दोन स्त्रिया व एक युवक असे पाच जण उतरले.  गाव छोटेसे असल्याने साथारणत: सर्व जण एकमेकास ओळखतातच.  शहरी पेहरावातील पाहुणे नवखे वाटल्याने हे पाहुणे कोण व कोणाकडे आलेत अशा प्रश्नार्थक नजरेने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर स्थिरावल्या.  प्रावासात अंगावर पडलेली धुळ झटकत त्यातील एका व्यक्तिने स्टँडवरच्या पान टपरीवाल्यास विचारले.

         “चिमटे वस्ती कोठे आहे ? ”

          टपरीचा छोटा दरवाजा उघडून टपरीवाला बाहेर आला व दूरवर हात दाखवित म्हणाला, “याच रस्त्याने सरळ खाली गेल्यावर गावाच्या बाहेर साधारण अर्धा फर्लांगावर आहे.  तिथे आपणास कोणाकडे जायचे आहे ? ” पानटपरी वाल्याने उत्सुकतेने विचारले.

          पाहुण्यांनी खिशातून एक कागदाचे चिठोरे काढले त्यावरील नाव वाचत म्हणाले,  “शंकरअण्णा चिमटे पंचायत सदस्य. ”

         “तेथे जाण्यासाठी रिक्शा, घोडागाडी असे काही वाहन मिळेल काय ?”  पाहुण्यांनी विचारले.  

          “नाही.  फार लांब नाही.  पायी चालण्यासारखे अंतर आहे.  पण थांबा वाइच. ” म्हणत त्याने बाजूच्या घरात डोकावत हाक दिली.  “एऽ किसन्या, इकडे ये “

         त्या हाकेसरशी अर्धी चड्डी नेसलेला, शर्टाचे वरील बटन तुटले असल्यामुळे मुठी मध्ये शर्ट पकडून आपली छाती झाकण्याचा प्रयत्न करित, एक आठ दहा वर्षाचा मुलगा बाहेर आला. येताक्षणीच पाहुण्यांकडे पाहात विचारले, “ काय रे नान्या कशाला बोलावल मला ? ”

         “आरं या पावन्यास्नी वस्तीवर शंकरअण्णांच घर दाव आन तिथ घिउन जा. ” पान टपरीवाल्याने आदेश दिला. आदेश पाळीत अनवाणीच पाहुण्यांबरोबर “चला” म्हणत चालू लागला.

         चालता चालता तुझं नाव काय?  शाळेत जातोस का?  पाहुण्यांनी विचारले.

         “ व्हय की. शंकरअण्णाच्या शैल्याचा मैतर हाय.”  किसन्या म्हणाला. यासारखी अनेक प्रश्नोत्तरी व गप्पा झाल्यात.  गप्पांच्या भरात शंकर अण्णांचे घर केव्हा आले ते त्यांना समजलेच नाही.

         अंगणात शंकरअण्णा व काशीबार्इ त्यांच्या स्वागतास उभेच होते.  त्यांनी हसतच हात जोडुन “या” म्हणत सर्वांचे स्वागत केले.  सोबत आलेल्या किसन्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकीत म्हणाले, “शाब्बास रे किसन्या झकास काम केले. ” अण्णांच्या शाबासकी मुळे किसन्याची छाती अर्धा इंच फुगुन वर आली व स्वत:ला धन्य समजत घराकडे पळतच सुटला. अण्णांनी सर्व पाहुण्यांना घरात नेले व बैठकीतील ओटीवर बसण्याची विनंती केली. काशीबार्इंनी सर्वांना पाणी दिले.  स्वागताचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर पाहूणे आपली ओळख करून देत म्हणाले, “मी मनोहर साठे.” नंतर एकेका कडे अंगुली निर्देश करित सर्वांची ओळख करून देत म्हणाले, “ही माझी पत्नी सौ. मनिषा, हे माझे थोरले बंधू शाम, माझी वहिनी सौ. विजया व हा आमचा पुत्र प्रीतम.  आम्ही सोलापूरला असतो तर प्रीतम येथेच एका शासकीय कार्यालयामध्ये प्रधान लिपिक आहे.  तद्वत अण्णांनी देखिल आपल्या सर्व कुटुंबाची ओळख करून दिली.

          बोलण्यास सुरवात करायची म्हणून अण्णांनी प्रश्न केला, “ प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना? ”

         “नाही. काही नाही “ मनोहर पंत म्हणाले.

         एवढयात प्रतिभा पोह्यांच्या डिश घेउन विनम्र पणे बैठकीत प्रवेश करती झाली.  सर्वांच्या नजरा एकदम तिच्या कडे वळल्या.  आज प्रतिभाने छानशी पिंक रंगाची साडी व्यवस्थित पणे चापूनचोपून नेसली होती व त्यावर मॅचिंग ब्लाउज. कोणताही मेकअप न करता देखिल ती रोज पेक्षा फारच सुंदर दिसत होती. क्षणापुरता हिच का ती आपली पतिभा असा संभ्रम अण्णांच्या मनी डोकावून गेला. हळूवारपणे तिने एकएक डिश प्रत्येकाच्या हाती दिली.  तिचा प्रसन्न चेहरा, विनम्र हावभाव व सहज सुंदरता पाहून सर्वांच्या चेर्हयावर एक विलक्षण भाव उमटले, जे कोणीही लपवू शकले नाही.  

         पोहे देउन झाल्यावर ती समोरच संकोचून सतरंजीवर बसली.  प्रत्येक जण पोहयांचा आस्वाद घेत होता.  “हे पोहे आमच्या प्रतिभानेच केले बरं का ! ” काशीबार्इ म्हणाल्या, “ही आमची कन्या प्रतिभा तालुक्याच्या गावी वाणीज्य शाखेच्या तिस–या वर्षाला आहे.  अभ्यासात हुषार आजपर्यत प्रत्येक वर्गात तिने चांगले गुण मिळविले.  घरकाम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम कोठेही कमि नाही. ” पोहयांचा स्वाद घेत अण्णांनी पुस्ती जोडली.  सर्वासमोर तिची चाललेली स्तुति पाहुन तिला अजूनच लाजल्यागत झाले.  तिची नजर वर होत नव्हती. “तुम्हाला काही विचारायचे असल्यास विचारा” अण्णा म्हणाले.  यावर नाही म्हणता मनिषा ताईंनी तुझे नाव काय? काठे शिकतेस? असे दोन चार जुजबी प्रश्न विचारले. कांद्या पोहयांचा कार्यक्रम संपल्यावर प्रतिभा उठून आत गेली.  

          “आम्ही येतो” म्हणत पाहुणे पण उठले.

 

           “आल्यासरशी थोडे थांबा जेवण करून जा.  संध्याकाळी ५ वाजेशिवाय आपणास परतण्यास गाडी नाही. “ अण्णा आग्रह करित म्हणाले. ”थोडेसे वस्तीवर व मळ्यात फिरून या तोवर मी झकास पैकी स्वयंपाक करते. ” काशीबार्इनी अण्णांची री ओढत पुस्ती जोडली.

           त्यांच्या आग्रहापुढे सर्वांचा नाइलाज झाला. सर्वजण क्षणभर एकमेकांकडे पाहत मुकपणे सहमत झाले.  अण्णा सर्वांना घेउन आपले शेत मळा व घर दाखविण्यास घेउन गेले.  दूरवर आंबा, चिंच व बाभळीच्या झाडांकडे अंगुली निर्देश करित आपल्या शेताची सीमा दाखवित म्हणाले, “त्या तिथपर्यंत आपली जमिन आहे. 2 विहीरी आहेत. बाराही महिने भरपूर पाणी असते.” फळा फुलांनी बहरून आलेला मळा दाखविला.  आजूबाजूचा हिरवागार परिसर, थंड हवा, फुललेली शेती,  पशुपक्षांचा मुक्त विहार पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले.  तॄप्त नजरेने व आनंदी मनाने सर्वजण घरी परतले.

            एव्हाना दुपारचे 12 वाजले होते. काशीबार्इ व प्रतिभा स्वयंपाकात दंग होते. पुरूष ओेसरीवर बसले.  मनिषाताई व विजया तार्इ माजघरात काशीबार्इना मदत करण्यास सरसावल्या. नाही नाही म्हणता त्या पण कामात गुंतल्या. शैलेश प्रीतमना घेउन परसदारी गोठा व परसदारच्या छोटेखानी बगीचामध्ये घेउन गेला. बगीचा मध्ये आळूची पाने, काथिंबीरीचा वाफा, दोन चार मिरचीची झाडे डौलाने फुलली होती. बागेतच उतारावर ओढयाला लागून कढीपत्त्याची झाडे होती. छोटेखानी बाग, गोठयातली वासरे, ओढयाकाठचे सौंदर्य प्रीतमला फार आवडले व तो पाहतच राहिला.

          “ प्रतिभे, थोडीशी कोथिंबीर व दोनचार कढीपत्त्याच्या काडया आण जरा” काशीबार्इं म्हणाल्या. आर्इच्या सांगण्यावरून ती परसबागेत गेली.  कढीपत्त्याला हात पुरेना म्हणुन जवळच असलेल्या दोनचार विटा एकमेकावर रचून कढीपत्ता तोडण्याच्या प्रयत्नात असतांना तिचा पाय घसरला.  तोल जाउन खाली पडणार या भितीने तिने “आर्इ ss गं !” अशी किंकाळी मारली.

          किंकाळी ऐकताच खाली उभ्या असलेल्या प्रीतमचे लक्ष तिकडे गेले.  क्षणाचाही विलंब न करता तो धावतच चार पावले वर चढला व मदतीसाठी हात पुढे केले तशी ती अलगदच त्याच्या बाहुपाशांमध्ये अडकली.  क्षणभर काय घडले कसे घडले हे दोघांना उमगलेच नाही.  ते केवळ एकमेकांकडे पाहतच राहिले.  त्याच्या अनपेक्षित झालेल्या स्पर्षाने ती सुखावली.  काया रोमांचित झाली.  अंग मोहरले.  क्षणभर का होर्इना हे अनोखे हवे हवेसे वाटणारे सुखाचे क्षण संपूच नयेत असे दोघांना वाटले.  ‘शब्दा वाचूनी कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ या काव्य पंक्तिंची अनुभुती अनुभवली.

         “ तार्इ “ अशी शैलेशची हाक कानी पडताच दोघे सावध झाले व एकमेकापासून दूर झाले. आपण एका तरूणाच्या बाहुपाशात अडकलो असे लक्षात येताच तिचा चेहरा लाजेने लाल बुंद झाला.  तिने स्वत:ला सावरले व धावतच घरात गेली.  आर्इच्या पुढयात कढीपत्ता व कोथिंबीर टाकून काही एक न बोलता मधल्या खोलीत आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकीत गुडघ्यांमध्ये लपवून बसली.

          तिला पळत आलेली पाहून आर्इने घाबरतच विचारले “ काय गं प्रतिभे, काय झाले? अशी वाघ मागे लागल्यागत पळत का सुटली ? ” त्यावर प्रतिभेचे काही उत्तर न आल्यामुळे काशीबार्इ काम सोडून मधल्या खोलीत गेल्या. मनिषाताई व विजया तार्इ पण पाठोपाठ आल्या. काशीबाईंनी आपल्या हातांनी तिचा चेहरा वर उचलीत परत तोच प्रश्न केला.  “काय गं प्रतिभे, काय झाल?” तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता.  काय झाल ते सांगण्यास ती काहीच तयार नव्हती. फक्त आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकीत गुडघ्यांमध्ये लपवून बसली.

         एवढयात शैलेश प्रवेश करता झाला व हातवारे करित खुलासा करता झाला “आई, ताई कढीपत्ता तोडत असतांना पाय घसरून पडली पण, पाहुण्यांनी आपल्या दोन्ही हातांनी असे सावरले.  ती काही न बोलताच घरांत पळून आली. ” काशीबाई थोडक्यात काय झाले ते समजले.  “ असं काय. बरं जाउ दे, म्हणत विचारले, “कोठे लागले तर नाही ना? “ यावर  काही न बोलता फक्त मानेनेच नकारार्थी मान हलवून बसून राहिली. घरातली कामे बाकी असल्यामुळे त्या तीघी स्वयपाक घरात परतल्या व आपल्या कामास लागल्या.

          काशीबार्इनी पुरण पोळी, कटाची आमटी, गुळवणी, वरण, भात, भाजी, भजी, पापड असा साग्र संगीत झकास बेत केला. सर्वजण जेवायल्या बसल्यावर काशीबार्इ गरमा गरम पुरणाच्या पोळया करित होत्या. प्रतिभा वाढण्याचे काम करित होती. अण्णा सर्वांना पोटभर जेवणाचा आग्रह करित होते.  थोडयावेळापुर्वी प्रतिभा आणि प्रितम यांचे बाबतीत घडलेल्या सुखद घटनेची ते दोघे, शैलेश आणि काशीबार्इ आणि मनिषाताई व विजया तार्इ शिवाय कोणाला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे प्रितमला वाढतांना प्रतिभाची त्याच्या कडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. तरी पण मधूनच दोघे एक चोरटा कटाक्श टाकत होते.  घडोघडी दोघांच्या डोळ्यासमोर तो ताजा प्रसंग उभा राहत असे.  तो नको म्हणत असतांना देखिल त्याच्या पानावर अर्धी पोळी वाढली जात होती.  परूषांच्या जेवणानंतर महिला बसल्या.  जेवतांना प्रतिभेचे लक्ष जेवणात नव्हते हे काशीबार्इच्या लक्षात आले.  त्यांनी “लाजू नको, जेव पोटभर” असा गर्भित सल्ला दिला.

          वामकुक्षी झाल्यावर सर्व पाहुणे मंडळी परत जाण्यास निघाली. जातांना त्यांचे सोबत मळ्यातील चिंचांचा व पेरूचा वानवळा देण्यास काशीबार्इ विसरल्या नाहीत.  त्यांना निरोप देण्यासाठी स्टँडवर अण्णा, काशीबार्इ व प्रतिभा आले होते.  थोडयाच वेळात बस आली सर्वांना व्यवस्थित जागा मिळाली. प्रितम खिडकीजवळच बसला.  प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.  निरोपाचे हात हालले.  प्रितमचे लक्ष मात्र खाली उभ्या असलेल्या प्रतिभा कडेच होते. चोरटी नजरा नजर झाली.  दुपारी घडलेली घटना आठवताच दोघांच्या ओठावर स्मित हास्य उमटले.  हाताची बोटे हळूच बाय करण्या हालली.  दोघे कळत न कळत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हे चाणाक्ष काशीबार्इच्या नजरेतुन सूटले नाही.  गाडीच्या वेगाबरोबर यांच्या प्रेमाने पण वेग धरला.  क्षण दोन क्षण प्रतिभा काही हरविल्या प्रमाणे जाणा–या पाठमो–या बसकडे एकटक पाहत होती. तिची समाधी भंग झाली ती काशीबार्इच्या वाक्यानेच “प्रतिभे चल आता घरी. ” यथाशीघ्र दोहो बाजूंनी होकार झाला व दोघे बांगरवाडीला निसर्गाच्या सान्निध्यात विवाहबध्द झाले. संसारात रमले.

          अशाच एका रात्री मनिषातार्इ प्रितम आणि प्रतिभा सर्व एकत्र जेवण्यास बसले असता मनिषातार्इंनी सहजच गमतीने प्रितमला म्हणाल्या, “काय रे, प्रितम तुला या आधी दोन चार चांगल्या पदवीधर मुली सांगून आल्या पण त्यातली तुला एकही पसंत पडली नाही आणि तु तर लग्नच करणार नाही म्हणालास, मग तुला प्रतिभेमध्ये काय विशेष वाटले की तु तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला. ”  यावर त्याने भाष्य करण्याचे टाळले.  पण मनिषातार्इनी परत तेच विचारल्या वर म्हणाला, “ते एक गोड गुपित आहे.” “अरे मग सांग की, गोड गुपित सांगायला काय हरकत आहे” मनिषातार्इ आग्रह धरीत म्हणाल्या.

          हो नाही करता थोडेसे आढेवेढे घेतल्यावर प्रितमने बांगरवाडीला कांद्या पोह्याच्या दिवशी कढीपत्ता तोडतांना प्रथम भेटीतच ती कशी बाहुपाशात अडकली याचे रसभरीत वर्णन केले.  ते ऐकत असतांना प्रतिभा लाजेने चूर होत होती. यावर मनिषा तार्इंनी “अरे लबाडा, त्या कढीपत्त्याचा पत्ता देखिल आम्हाला लागू दिला नाही काय ?” असा लाडिक शेरा मारला.  यावर सर्वजण खळखळून हसले व रात्रीचे जेवण अधिकच गोड झाले.

Go Back

Comment