Menu

पुनरारंभ

199221

गळतीचे पान

Please download here !!

प्रकाशन: महाकेसरी दिवाळी अंक २०१२  

गळतीचे पान'

             गोपाळराव व निर्मलातार्इ दोघे साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक.  नेहमी प्रमाणे संध्याकाळचा फेर फटका मारून देवदर्शन झाल्यावर समोरच्या बागेत झाडाखाली बाकावर नितनियमाप्रमाणे घडीभर निवांत बसले. बसल्या जागेवरून बागेतील सर्व दिसत होते.  समोर सुंदर हिरवागार मऊ गवताचा गालीचा पसरला होता.  रंगीबेरंगी फुलांचे ताटवे बहरले होते. फुलपाखरे स्वच्छंद विहरत होती. झाडावर पक्ष्यांचा चिवचिवाट चालू होता. ख़ारुताइचा लपंडाव चालू होता.  बाहेर गेट जवळ  वडा पाव,  भेळपुरी, पाणी पुरी व फास्ट फूडची दुकाने थाटली होती.  गवताच्या मऊशार गालीच्यावर काही कुटुंबे हसत खिदळत आपसात गप्पा गोष्टी करित होती. काही कुमार वयातील मुले मुली गवताच्या गालीच्यावर क्रिकेट, फूटबॉल,  टेनिस खेळत होती. त्यांचे पालकही त्यांच्या खेळण्यात सामिल होउन खेळाचा आनंद घेत होती.  काही तरूण तरूणी घोळक्याने बसली होती तर प्रेमी युगुले व काही जोडपी वडा पाव, भेळीचा आस्वाद घेत बागेच्या कडेला झाडीमध्ये आपसात दंग झाली होती.  बागेच्या एका बाजूला बालकांसाठी छोटया बालेाद्यान मध्ये घसरगुंडी, झोपाळा, सिसॉ सारख्या खेळण्यावर लहान मुले खेळाचा आनंद घेत हेाती.  त्यांचे पालकही बालकांचे कोडकौतुक करित त्यांना कसे खेळायचे याचे मार्गदर्शन करित होती.  गोपाळराव व निर्मलातार्इ बसलेल्या बाकाच्या भोवती पिकलेल्या पानांचा सडा पडला होता.  एकंदरित संध्याकाळचे प्रसन्न शांत व रम्य वातावरण होते.

        गोपाळराव व निर्मला तार्इ आपसात बोलत असतांना “अहो गोपाळराव, अहो निर्मलातार्इ ”  अशी हाक त्यांच्या कानी आली.

       उभयतांनी आपणास कोणी हाक मारित असल्याने इकडे तिकडे चैाफेर नजर टाकली पण कोणीच दिसेना. क्वचित् प्रसंगी भास झाला असेल असे म्हणत दुर्लक्ष करित परत दोघे आपल्या गप्पात दंगले. थोडया वेळाने परत तीच हाक “अहो गोपाळराव अहो निर्मलातार्इ ” त्यांच्या कानी आली.  गोपाळराव आपल्या जागेवरून उठून उभे राहिले व इकडे तिकडे पाहू लागले.  पण कोणीच दिसेना.

               “ अहो गोपाळराव मी येथे खाली आहे, तुमच्या पायाशी.  इकडे खाली बघा”.  गोपाळरावांनी मिळालेल्या सूचनेप्रमाणे स्वत:च्या पायाकडे पाहिले.  पायाशी झाडाची अर्धवट वाळलेली व गळून पडलेल्या पानाशिवाय काहीच दिसेना.  त्यांची नजर एका पानावर स्थिरावली. पान  त्यांचेशी बोलू लागले.   “ होय,  होय मीच बोलतोय. मला उचला. ”    

                    गोपाळराव व निर्मलातार्इ गोंधळले घाबरले. काही अवचित प्रकार तर नाहीना अशी शंका त्यांच्या मनी आली.

                  “अहो घाबरू नका. मी पर्ण बोलतोय.  भूत पिशाच वगैरे काही नाही.  उचला मला ” परत आज्ञा झाली.

             गोपाळरावांनी मेाठया हिकमतीनेÊ धीराने व घाबरतच एक पान उचलले.      

                   “ अहो,  ते नाही.  त्याच्या बाजूचे.  हिरव्या देठाचे,  किंचित पिवळसर रंगाचे. ते उचला. ” निर्देश वजा सूचना झाली.

       गोपाळरावांनी सूचनेप्रमाणे हातातले पान खाली टाकत त्याच्या शेजारचे पान उचलले.

             “ अहो ते पण राहू द्यात.  उचला ते.  द्या निर्मलातार्इंच्या हातात.  आणि आता हे पान तुमच्या हातात ठेवा व बसा आपल्या जागेवर. ” अशी सूचना मिळाली.    सुरवातीला झाडापासून अलग झालेले गळालेले व थोडेसे वाळलेले पान बोलत असल्याचे पाहून निर्मलातार्इ जाम घाबरल्या.  क्षण भर उभयतांना नवल, कुतुहल तसेच भयावह वाटले.

               “अहो निर्मलातार्इ अशा घाबरू नका. नवल करू नका अथवा कुतुहलाने पण बघू नका. घाबरण्याचे तर मुळीच कारण नाही.  इथे काही जादूटोणा नाही कींवा अंगारा धूपाराचा प्रकार नाही.  प्रसन्न चित्ताने व शांत मनाने दोघे बसा.  आपण थोडयाशा गप्पा मारूया !” पान म्हणाले.

            “ नमस्कार गोपाळराव,  नमस्कार तार्इ ” पानाने उभयतांना अभिवादन करीतनमस्कार केला.  

            “ नमस्कार” असे म्हणत उभयतांनी त्याचा स्विकार केला.

              “ माफ करा,  सुरवातीला मी तुम्हा उभयतांना नावाने हाका मारल्यात याचा तुम्हाला राग तर आला नाही ना?  सारखे तुम्हाला नावाने हाक मारण्यापेक्षा तुम्हाला दादा आणि तार्इ संबोधले तर तुमची हरकत तर नाही ना ? ” पर्णाने विनयशीलता दाखवीत विचारले.

               “नाही, नाही, मुळीच नाही. काही हरकत नाही. ” गोपाळराव व निर्मलातार्इ उभयतांनी संमती दिली.

                “ आमची ओळख सांगायची तर आम्ही पण तुमच्या सारखेच समवयस्क समदु:खी.  माझे नाव पर्ण व तुमच्या हातातील माझा मित्र पन्ना.  आम्ही याच झाडावर जन्मलो.  आमचा रहिवास तुमच्या डोक्यावरील झाडावर होता.  आता वयपरत्वे पान गळतीमुळे गळून झाडापासून अलग झालो आहोत.  हीच आमची ओळख. ” पर्ण आपली ओळख करून देत म्हणाला.

            “ अरे पण तु कोण आम्हाला कसे ओळखतो?” निर्मलातार्इंनी धीराने प्रश्न केला.

            “ तुम्ही नित नियमित या बागेत फिरावयास येतात.  येथेच बसतात.  कधी तुमच्या समवेत तुमचे स्नेही मित्र असतात ते तुम्हाला नावाने हाक मारतात ते माझ्या लक्षात राहिले.  म्हणून मला तुमची नावे समजली. ” पर्ण खुलासा करित म्हणाला.

          “ अस्स होय.  वय झाले तरी तुझी स्मरणशक्ती चांगली दिसते रे. ” त्याच्या स्मरण शक्तीची दाद देत व त्याची दखल घेत निर्मलतार्इ व गोपाळराव म्हणाले.  

            केलेल्या कौतुकासाठी “धन्यवाद” पर्ण म्हणाला.  

            “दादा, तार्इ,  मी आजपर्यंत तुमच्याशी संवाद साधण्याचा बरेचदा वेळोवेळी प्रयत्न केला पण मी झाडावर उंचावर असल्याने माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहचतच नव्हता. पानगळ म्हणजे आमचे उतारवय.  पानगळी मुळे मी खाली आलो व आता या उतारवयात तुमच्याशी संवाद साधण्याचा योग आला बघा.  ” पर्ण लीनतेने म्हणाला.      

              आतापर्यंतच्या संवादामुळे दादा, तार्इ, पर्ण व पन्ना यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले होते.  नकळत एकमेका प्रति सहानुभुति व आपसी प्रेम निर्माण झाले होते. सर्वजण दिलखुलास गप्पा मरित होते.         

       एवढयांत पर्णाच्या कानी उंश्ऽऽ उं ऽ श् ऽ उंश्” असा दु:खदायक वेदना कारक आवाज आला.  त्याचे लक्ष अचानक निर्मलातार्इंच्या हाताकडे गेले.  पाहतो तर काय निर्मलतार्इं आपल्या हातातील पन्नाच्या देठास आपला अंगठा व तर्जनी मध्ये धरून बोलता बोलता चाळा करित सहजपणे कधी उजवीकडे तर कधी डावीकडे गोल फिरवित होत्या.  त्यांना अडवीत, तो एकदम ओरडत म्हणाला “अहो तार्इ,  अहो तार्इ,  थांबा जरा त्या पन्नास असे गोल गोल फिरवू नका.  तो पण तुमच्या सारखाच वयस्कर आहे हो.  त्याला चक्कर येतेय म्हणून तो “उंश्ऽऽ उं ऽ श् ऽ उंश् ” असा ओरडतोय हो.  अहो,  या वयात त्याला असे गोल गोल फिरवीणे सहन होत नाही हो. ”

 

       निर्मलातार्इंची चूक त्यांच्या लक्षात आली. त्यांनी ताबडतोब पर्ण व पन्नाची माफी मागीत पन्नास फिरविणे बंद केले व म्हणाल्या “ अरे हो, चुकलेच हो माझे.  माफ करा मला. ”

         पन्ना थोडा थिर स्थावर झाल्याचे पाहून, आपसातील संवाद पढे चालू ठेवित पर्ण म्हणाला,  “दादा तुम्ही व आम्ही समवयस्क,  समदु:खी, दोघांनी आपल्या आयुष्यात बरेच काही भोगले, सोसले,  अनुभवले व  पाहिले.  तुमच्या व आमच्या उतार वयात एक साम्य आहे,   एक साधर्म्य आहे.  या उतार वयात तुमच्या आमच्या मनात काही सल आहेत,  काही कटु गोड आठवणी आहेत.  तुमची हरकत नसेल तर त्यातील काही सामार्इक अशी दु:खे,  मनातील सल व आठवणी एकमेकाशी मनमोकळे बोलून आपली सुख दु:खे तुमच्याशी शेअर करण्याचा मानस आहे. ” पर्णाने प्रस्ताव मांडला.

              “ काही हरकत नाही. पण आपल्यात साम्य आहे, साधर्म्य आहे म्हणतोस,  ते कसे काय रे ?” गोपाळरावांनी प्रश्न उपस्थित केला.

            पर्ण बोलता झाला. “दादा आमचा जन्म याच झाडावर, याच बागेत झाला.  ज्यावेळी अंकूर फूटला पालवी आली त्यावेळी या वॄक्षाला,  संगोपन व जोपासना करणा–या माळी दादाला, एवढेच नव्हे तर येथे येणा–या सर्व लहान थोरांना आनंद झाला.  जो तो माझ्याकडे आनंदाने बोट दाखवित म्हणत असे “बघा झाडाला कशी छान पालवी फुटली.” त्यावेळी आम्हाला खूप आनंद झाला.  इतका की आम्हाला आकाश ठेंगणे वाटू लागले.  बघता बघता सर्व झाड कोवळया पालवीने भरून गेले. झाडाला शोभा आली. बाग बहरली.  आमची कोवळी कांती बघून येणा–या जाणा–याची मने सुखावली. चिमणी पाखरं आमच्या अंगा खांद्यावर बागडू लागली. आमच्या मागे लपून लपाछपी, पाठशिवणीचा खेळ खेळू लागली. बाल वयात पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या रिम झिम सरी अंगावर घेत,  हिवळयात सकाळच्या कोवळया उन्हात मुक्तपणे नाहात, उन, वारा, पाउस, थंडी यांचेशी मैत्री केली.  वा–याच्या झुळके बरोबर सळसळ करित नाचलेा. बागडलो. गाणी गायली.  थोडे मोठे झाल्यावर हिरव्यागार रंगानी सर्वांना नेत्रसुख दिले.  मुसळधार पावसाचे थेंब झेलत,  उन्हाचा कडाका सहन करित झाडाखाली आश्रयास आलेल्या प्रत्येक पांथस्थाला, भले गरिब असो अथवा श्रीमंत असेा,  लहान असो अथवा मोठा असो सर्वांना कोणताही भेदभाव न करता आश्रय दिला.  एवढेच नव्हे तर या झाडाला लागलेली फळे, फुले पण ज्याला वाटेल त्याने तोडली.  कधी कुरकुर केली नाही किंवा कधी कोणास मनार्इ केली नाही. परोपकार हा धर्म समजून दुस–यांसाठी जिवन व्यतीत केले.  दादा यासंदर्भात एक सुभाषित आठवते का तुम्हाला ?

 

छायाम् अन्यस्य कुर्वंति,तिष्ठंती स्वयं आतपे                  फलान्यपि परार्थाय,  वॄक्षा सत्पुरूषा इव   

          एवढे सर्व करून सुध्दा या कृतघ्न व स्वार्थी मानवाने आमच्या फांद्या छाटल्या व जन्मास येणा–या पानांचा, फळा–फुलांचा उमलण्या आधीच जीव घेतला.  त्यांची हत्याच केली म्हणाना. यावर कृतघ्नपणाचा कहर करित झाडांच्या मुळावरच अॅसिड टाकून झाडे पण जाळून टाकली.

       आता आमचे दिवस संपले.  आम्हाला वार्धक्य आले म्हणून वयपरत्वे भुवरी गळून पडलो.  पायदळी तुडवलो गेलो. ज्या वा–यासंगे,  पावसासंगे मैत्री केली त्यांच्या झोताबरोबर प्रवाहाबरोबर वाहत गेलो. एक दिवस असा उजाडणार की,  माळी दादा आम्हाला उचलून खड्डयात खत बनविण्यासाठी पुरणार अथवा जाळून टाकणार.”                                                 

        बोलता बोलता त्याचे मन दु:खातिवेगाने भरून आले. पर्णाच्या आणि पन्नाच्या डोळयात आश्रू जमा झाले. बोलण्याचा स्वर रडवेला झाला.  एक क्षणाची विश्रांती घेत रडवेल्या करूण स्वरात पर्ण परत पुढे बोलू लागला बोलू लागला. “ आणि तार्इ,  जर यदाकदाचित जर सुदैवाने त्यांच्या तावडीतून सूटका झालीच तर असेच वाहत जाणार व पायदळी तुडणार.  झाले,  संपले आमचे जीवन. ” हे वाक्य संपताच पर्ण व पन्ना उभयजण रडू लागले.

        पर्ण व पन्नाच्या जीवनाची करूण कहाणी ऐकून दादा व तार्इचा कंठ दाटून आला. तार्इ म्हणाल्या “ नको रे असा कठोर बोलू. आमच्या काळजाला छिद्र पडायला लागलीत बघ.” 

       त्याच्या या बोलण्यावर निर्मला ताई अंर्तमुख झाल्या. सद्य कौटुंबिक स्थितीची जाणीव झाली व भुतकाळ आठवला. विचार चक्रे फीरू लागली.  पर्ण आणि पन्नाने आपले आयुष्य समाज सेवेसाठी खर्च केले. तरी पण शेवटी उतार वयात त्यांच्या पदरी निराशा व हाल अपेष्टाच आल्यात ना ? मग  तसे पाहिले तर आपले तरी काय वेगळे थोडीच आहे?  चांगला भरलेला सर्व संपन्न असा सुखी संसार आहे.  दोन मुले, सुना,  नातु आहेत.  आमच्या ‘हम दो और हमारे दो’ या चौकोनी संसारात मुलांसाठी तरूणपणी अनेक यातना सहन केल्या.  कष्ट उपसले.  त्यांच्या वर सुसंस्कार करित चांगले शिक्षण सुशिक्शित केले. कर्तव्य भावनेने त्यांची लग्ने करून दिलीत.  आमच्या चौकोनी संसारात दोन कोन वाढले.  षटकोनी संसार झाला आणि दुर्दैवाने कौंटुंबिक सुखाला पारखे झालो.  सुनांच्या बदललेल्या मानसिकते मुळे एकत्र कुटुंबाची विभागणी झाली.  तीन विभक्त कुटुंबे बनली. कधी भेट नाही की,  साधी विचारपूस नाही.  भेटण्यासाठी जावे म्हटले तर म्हणतात, “‘आधी फोन करून या.” या उतार वयात आर्थिक, सामाजिक व शारिरिक दॄष्टया सुदॄढ व स्वावलंबी असून देखिल आमच्या पदरी तरी काय पडले,  तर अनाथा सारखे एकाकी जिवन जगणे.

        निर्मलातार्इंच्या डोळयात अश्रू तरारले.  ही गोष्ट गोपाळरावांच्या लक्षात आली.  त्यांची समजूत काढीत ते म्हणाले “अगं जाउ दे. एवढा काय विचार करतेस? हे पण दिवस निघून जातील. ही नविन पीढी. त्यांचे विचार वेगळ,  आपले वेगळे. यालाच दोन पिढयातील अंतर म्हणतात. येतील एक दिवस आपली आठवण झाली म्हणजे. शेवटी आपलीच मुले आहेत. माणसाने आशावादी असावं. ”

        असा संवाद चालू असतांना एक वा–याची मंद झुळूक आली.  पर्ण व पन्ना त्यांच्या हातातून केव्हां गळून खाली पडलीत व इतर पानांमध्ये मिसळली ते त्यांना कळलेच नाही.  ती गळतीची पानं शोधण्याचा उभयांनी बराच प्रयत्न केला पण अपयशी ठरले.

        एव्हाना सांज झाली. सूर्य मावळतीला गेला,  तिमीर दाटायला लागला व पॄथ्वीतळावर आपला कब्जा करू लागला.  पाखरे घरटी परतली.  बागेतील सर्वजण आपल्या मार्गाला लागले.  बाग बंद होण्याची वेळ झाली.  रखवालदाराने बागेची वेळ संपल्याची सूचना करीत शीटी वाजविली. नार्इलाजाने गोपाळराव व निर्मलातार्इंना दु:खी होउन पण घरचा रस्ता धरावा लागला.  

Go Back

Comment