Please download here !!
प्रकाशन :वसुधा दिवाळी अंक २०१२ | कराड वैभव दिवाळी अंक २०१२
दिनू
भर पावसाळयाचे दिवस. गावची नदी भरभरून वाहत होती. गावातील नदी नाले पण भरभरून येत होते व नदीला मिळत होते. त्यामुळे नदीचे पात्र रूंदावले होते. वेशी जवळील मारूती व महादेवाचे मंदिर निम्मे अधिक पाण्यात बुडाले होते. गावास पाण्याने जवळ जवळ वेढा घातला होता. शेजारच्या वाडीला जोडणारा कमि उंचीचा छोटा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाडीकडे जाणारी यातायात पूर्णपणे बंद होती. पाण्याने रौद्र रूप धारण केले होते. पावसाची रिप रिप चालु होती. पाउस थांबण्याचे नाव घेत नव्हता.पाणी कमि होण्याची चिन्हे दिसत नव्हती. गावकयांच्या म्हणण्यानुसार गेली 25वर्षात एवढा मोठा पूर न आल्याचे म्हटले जात होते. कधी नव्हे तो आलेल्या पूराचे सर्व गावर्कयांना अप्रूप वाटत होते. डोक्यावर छत्री, घोंगडी, रेनकोट वगैरे घेउन भर पावसात गावातील आबाल वॄध्द पुराचे पाणी पाहण्यास जात होते. पाणी पाहतांना नजरेत कुतुहल तर मनात काहीशी भिती होती. दूरूनच एखादी वस्तू वाहत येतांना दिसली तर काय असेल काय नसेल याचे तर्क वितर्क व्हायचे. वेळ प्रसंगी पाण्यात दोर सोडून अथवा फासे टाकून मदतीचा प्रयत्न केला जायचा.
घरातील कामे आटोपून आज बायजा पण तिच्या शेजारणींसमवेत पूर पहावयास आली. आली तशी ती नदी किनारी काठावर झाडाखाली एका दगडावर बसली. बघता बघता तिचे मन भुतकाळात गेले. पाच वर्षापुर्वी घडलेल्या प्रसंगाची तिला तीव्रतेने आठवण झाली. असेच पावसाळ्याचे दिवस होते. नदीला पुर आला होता. नदीचे पात्र रूंदावले होते. कुतुहल म्हणून पूर पाहण्यास गाव लोटला होता. तो प्रसंग व ती दु:खद घटना तिला या आयुष्यात तरी सहज विसरणे शक्य नव्हते. जस जसे प्रसंग आठवू लागले तस तशी चित्रे डोळया समोर साकारू लागली. तो दिवस, तो प्रसंग, ती घटनाचित्रे तिला वाहत्या पाण्याच्या पॄष्ढभागावर दिसू लागली. ती जणू एखादे चलतचित्रच पाहत होती. तिचे काळीज हेलावले. डोळयात अश्रूंनी गर्दी केली. गालावर आसवे ओघळली.
बायजा नेहमीप्र्रमाणे आपल्या सकाLच्या कामात गर्क हेाती.दिनू लग्नानंतर 8 वर्षानी जन्मास आलेला तिचा एकूलता एक मुलगा. तळहातावरील फोडाप्रमाणे जपत होती त्याला. “ए ऽ आये नदीला पानी लय आलया म्हणत्यात. समदी मानसं जात्यात पाणी बघायला. म्या जाउ ?” दिनुने विचारले.
त्याच्याकडे फारसे लक्ष न देता, चुलीवरचे भांडे उतरवत ती म्हणाली, “व्हय लेकरा म्या बी ऐकलंय. पण तु एकटा नग जाउस. म्या बी र्इन तुझ्यासंग सांजच्याला. तवर तुझा बा बी इन शेतावरनं. आपण समदेच जाउ बरूबर.” बायजा म्हणाली.
दिनू आर्जव करित म्हणाला, “पर आये म्या यकला न्हाय. सुताराचा किस्न्या, लव्हाराचा गंप्या, सोनाराचा लंगडया, कुंभाराचा रंग्या, बामनाचा दिलप्या समदे जात्यात. त्यांच्या संग जाउन येतो.”
“ मी नगं म्हनलं ना यकदा. जाउंदे समद्यास्नी. ते समदे मोठी हायती. तवर तु अभ्यास करून घे.” बायजा रागावून म्हणाली.
दिना नाराजीने कोपयात जाउन बसला व अभ्यास करू लागला. पण त्याचे सर्व लक्ष बाहेर लागले होते. एवढयात बाहेरून त्याच्या मित्रांची हाक आली.“ ए ऽ दिन्या चाल की लवकर.”
“ ए पोरांनो तुमी जा आपलं. दिन्या अभ्यास करतुया. तो न्हाय येणार आता.” बायजेने बाहेर येउन सर्व मुलांना सांगितले व परत आपल्या कामाला लागली. बायजेच्या आदेशावरून सर्व मुले निघून गेली.
दिनुचा हिरमुसलेला चेहरा पाहून तिला वार्इट वाटले. त्याची समजुत काढण्या ती त्याच्या जवळ जाउन बसली. त्याला मायेने जवळ घेत, त्याच्या डोक्यावरून हळूवार मायेने हात फिरवित, समजावणीच्या स्वरात म्हणाली, “रागावला का रे माझ्या राजा. पाणी ते पाणी, त्येला काय पाह्माच. पाणी लय वंगाळ हाय बघ. त्याला लय वढ हाय. तु ल्हाना हाय. हात पाय घसरून पडला झडला म्हंजी. अन् म्या म्हनलं नव्हं, काम झाल्यावर सांजच्याला जाउ. तवर तुझा बा बी इन शेतावरन. शाना रं माजा राजा”. असे म्हणत ती उठली आपल्या कामाला लागली.
इकडे दिनुचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. मन मित्रांबरोबर मजा करण्यात भटकत होते. तो काय वाचतोय काय लिहितोय त्याचे त्यालाच समजत नव्हते. बायजा कामात दंग होती. दुपारची वेळ असल्याने ती गोठयात जनावरांना चारा पाणी देण्यास गेली. एवढयात बायजेची नजर चुकवून दिनू केव्हा नदीला गेला ते तिला कळलेच नाही. दिनू पळतच मित्रांच्या शोधात नदीच्या खालच्या भागात गेला, तिथे पाणी खोलवर गेले होते. त्याचे सर्व मित्र वर टेकडीवरून पाण्याची मजा पाहात होते. दिलप्याचे लक्ष अचानक खालच्या तीरावर गेले. पाहतो तर काय दिनु एकटाच काठावर उभा होता व सैर भैर नजरेने इकडे तिकडे मित्रांना शोधत होता. दिलप्याने जोराने मोठया आवाजात दिनुस हाका मारण्यास सुरवात केली. “ए ऽ दिन्या, दिन्या, ए ऽ दिन्या आम्ही वर हाय टेकाडावर.” पाण्याच्या खळखळाटामुळे त्याला काहीच ऐकू येत नव्हते. दिलप्याचा आवाज तेथपर्यंत पोचत नाही असे समजून सर्वजण एकदमच ओरडू लागले, “ए ऽ दिन्या, दिन्या, ए ऽ दिन्या” कुणाचातरी आवाज दिनूच्या कानी आला म्हणून त्याने वर पाहिले आणि नेमका त्याच वेळी घात झाला. घडू नये तेच घडले. दिनूचा पाय सरकला व तो पाण्यामध्ये पडला. हा हा म्हणता तो पाण्याबरोबर वाहत जाउ लागला. त्याच्या मित्रांनी लगबगीने पळत जाउन ही दु:खद वार्ता गावात जाउन सांगितली. गावकरी येर्इ पर्यंत वेळ टळली होती. तोपर्यंत दिनू पाण्यात दिसेनासा झाला होता. केवळ दु:ख प्रदर्शित करण्यापलिकडे कोणी काहीच करू शकत नव्हते.
ही दु:खद वार्ता बायजाच्या कानी आली. वार्ता ऐकताच तिला दु:खावेग आवरेना. क्षणभर सर्व जग थांबल्या सारखे झाले. तिच्या पायाखालची वाळूच सरकल्या सारखे तिला झाले. धरती फाटून तिने आपल्याला कवेत घ्यावे असे वाटू लागले. ती धावतच नदी किनारी गेली. छाती बडवित धाय मोकलुन रडू लागली. “दिन्या, ए ऽ दिन्या कुटं गेलास रे तु बाळा आसं मला यकटिला सोडून. म्या तुला म्हनलं व्हतंन सांजच्याला समदे जाउ. असा कसा गेलास रे तु दिन्या ? ” त्यावेळेची तिची ती आर्त किंकाळी ऐकून सर्व उपस्थितांचे हॄदये हेलावली होती. वातावरण एकदम बदलले होते. धीर गंभीर झाले होते.उपस्थितांच्या डोळयात सुथ्दा अश्रूंनी गर्दी केली होती. तिचा दु:खावेग पाहून ती पण पाण्यात उडी घेतेय की काय अशी शंका मनास चाटून गेली होती. सर्व आया बाया तिला सावरीत होत्या. तिची कशी तरी समजूत काढण्याचा प्रयत्न करित होत्या.
एव्हाना तिच्या समवेत आलेल्या तिच्या सर्व शेजारणी परिसर फिरून झाल्यावर परत बायजा जवळ आल्या. फिरता फिरता दोन अडीच तास कसे निघून गेले ते त्यांना कोणालाच कळले नाही. अजून पण बायजा वाहत्या पाण्याकडे एकाग्र होउन एकटक पाहत होती. जणू तंद्रीच लागली होती. तिची ती एकाग्र लागलेली समाधी पाहून सोबत आलेली शांता म्हणाली, “ए बायजे चल घरला. आमी समद्या वेशीपासल्या देविच्या मंदिरालोग जाउन आलो, तरी बी तु हितंच हाय व्हय! उठ की आता, आम्हाला घरला मायंदळ काम पडल्यात.”
तिच्या या बोलण्याने तिची तंद्री यत्किंचितही ढळली नाही. ती तशीच पाण्याकडे एकाग्र होउन एकटक पाहतच होती. तसा शांतेने परत एकदा जोरात आवाज दिला, “ए ऽऽ बायजे चलती का आता? का आमी जाउ? ” तिच्या ओरडण्याने बायजेची तंद्री भंग झाली. ती म्हणाली,” तुमी म्होर व्हा गं बायांनो. मी आलेच घडीभरान. ” असे म्हणत बायजा परत संथ वाहणारे पाणी पाहण्यात तल्लीन झाली. “ काय बार्इ, ते पाणी तरी किती येळ येडयावाणी बघायचं. सांजलोग अशी बसली तरी बदलणार हाय थोडीच. चला गं आपन जाउ या !” कमळीने शेरा मारला व सगळयाजणी घराकडे निघुन गेल्या.
एव्हाना संध्याकाळ होत आली होती. सूर्य पश्चिमेकडे मावळतीला झुकला होता. पाणी पाहण्यास आलेली जवळजवळ सर्वजण घरी परतीच्या मार्गास लागली होती. शेतावरील कामे संपवून बायजाचा पति बाजीराव व तिची धाकटी बहिण सारजा बायजेला शोधत नदी किनारी आले. बायजा अजूनही एकटक पाण्याकडे पाहत शोक करित बसली होती. तिची तंद्री लागली होती. आपल्या पतिला व सारजेला पाहून तिला दु:ख आवरेना. आपल्या दु:खास वाट करून देत ती हुंदके देत रडू लागली. “ न्हाय, मी नाय येणार घरला. माझ्या दिनाची वाट पाहतेय मी. तो येणारच. त्याला भेटल्या बिगर मी न्हाय येणार. ” बायजा रडवेल्या सुरात म्हणाली. “झालं ते लय वंगाळ झालं. तु हित कुटवरबी बसली तरी तो येनार न्हाय आता. बायजे चल घरला आता. समदे लोक घरला गेल्याती. तु यकलिच हितं बसून हाय. ” बाजीराव जड अंत:करणाने म्हणाला.
बाजीरावाच्या बोलण्यास पुस्ती जोडत सारजा समजावणीच्या सुरात म्हणाली, “अगं बायजे, असं काय करते येडयावाणी? तो येणार हाय थोडीच आता. तो लय लांबच्या प्रवासाला गेला हाय. इतक्यात थोडीच परत येनार. चल तु आपली घरला. ” यावर बायजेची काहीच प्रतिक्रीया नव्हती. ती तशीच बसून होती. बाजीराव समजाविण्याच्या सुरात म्हणाला, “ अगं म्या बी त्याचा बाप हाय. मलाबी दुख व्हतया. अगं बायजे, यडी का खुळी तु? ” पश्चिमेकडे मावळत्या सूर्याकडे अंगुली निर्देश करित म्हणाला, “त्यो बघ आपला दिनू. डोंगराच्या आड लपतोय. बघ तुला वाकुल्या दावित म्हणतोय, ‘ये मला पकडाया. अगं तो फकस्त तुझा नी माझा नाय तर समद्या जगाचा दिनु हाय. त्येच्याविणा दिस उगवत न्हाय. रोज न चुकता भल्या पहाट येतो अन् आपल्या परकाशान समदं जग उजिवतो. सांजच्याला तु त्येला मावळतीला पाहत हाशील तर भल्या पहाट पूर्वेकडून तुला हाक देर्इल, “ए ऽ आये मी हितं हाय” असा दांडगा हाय बघ. चल तु घरला, चल बरं आता. गुर घरी परतल्याती. दाव्यास्नी बांधून आलोय. धारा काढायच्याय. त्यांना चारापाणी करायचाय. बख्खळ काम हायती.”
बाजीरावाच्या म्हणण्याची री ओढत सारजा म्हणाली,” व्हयं व्हयं, दाजी म्हणत्यात ते समदं खरं हाय. तो रोज सकाळच्याला येतो तुला आवाज देतो पण तुला तुझ्या कामाच्या रामरगाडयात त्येच्याकडं लक्ष देयाला येळ तरी हाय कां ?” असे म्हणत बायजा व सारजा दोघांनी तिचे दंडाला धरून उठविले व तिघे घराकडे चालू लागले. मावळतीचा सूर्य दिसेनासा होर्इपर्यंत बायजा मान मोडेस्तवर मागे वळून वळून पाहत होती. तो दिसेनासा झाल्यावर ती आर्त स्वरात म्हणाली, “दिन्या ऽ ए दिन्या ऽ ऽ दिन्यारे सकाळच्याला लवकर ये रे बाबा. म्या तुझी वाट पाहत राहिन. ”