Menu

पुनरारंभ

199217

धाडस

Please download here !!

प्रकाशन : कुंभश्री दिवाळी अंक २०१३ (बेडया)

धाडस

                    हिवाळयाचे दिवस.  रविवार, थंडीचा कडाका पडल्यामुळ॓ दुपारी १२चा सुमार असून देखिल उन्हाचा चटका जाणवत नव्हता. सर्वसाधारण आल्हाददायक वातावरण होते.  बबन्या आणि शंक–या दोघे आठ दहा वर्षीय शाळकरी मुले शाळ॓च्या पटांगणावर खेळून झाल्यावर रमत गमत घरी निघाले.  दोघांची खाकी हाफ पँट, अंगात पांढरा हाफ शर्ट, बबन्याने निळया रंगाचा हाफ स्वेटर घातलेला तर शंक–याने नक्षीदार गुलाबी रंगाचा स्वेटर व कानात कान टोपी असा दोघांचा वेश.  मारूती मंदिर जवळ येताच दोघांचे पाय अचानक थांबले.

                थोडे दूरवर थांबत बबन्याने शंक–याला विचारले,” काय रं शंक–या आज काय गावक–यांची मिटींग हाय का?” 

                “न्हाय तरं. मला नाय ठाव. आन आसन तर ग्रामपंचायती जवळ बोर्डबी नाय लिवला.”  शंक–याने उत्तर दिले.

                “आरं मंग त्ये बघ.  देवळाच्या माघं ७—८ जण  बसल्यात, कोण हाय ते?” बबन्याने प्रश्न केला.

                “ मला काय ठाव” शंक–या म्हणाला.

                 “जरा नीट बघ. त्यांच्या जवळ काठया हायती अन घोंगडबी हाय अंगावर. मला तर कायतरी इपरीत दिसतया. आपल्या गावातले लोक कंदी मंदिरामाग न्हाय बसत अन् घोंगड बी नाय घेत अंगावर. ” बबन्याने शंका उपस्थित केली.

                 “भिउ नको बा म्या हाय तुह्मासंग. आपुन तिथं जवळ जाउ अन् गोटयांचा डाव मांडू अन् खेळण्याच्या बहाण्याने त्ये काय करत्यात काय बोलत्यात बघू. ” शंक–या त्यावर युक्ती शोधीत धीर देत म्हणाला.

                 “ठिक हाय. झकास आयडीया. पन त्यांनी आपल्याला मारल तर” बबन्याने शंका उपस्थित केली.

                 “पळून जायाचं” शंक–याने त्यावर तोडगा काढला. 

        दोघांनी जवळ जाउन गोटयांचा डाव मांडला. पण त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे व वागण्याकडे होते. पिळदार मिशा व धडधाकट अंगाचा, अंगात पांढरी बंडी व गुडघ्यापर्यंत नेसलेले धोतर असा रांगडा गडी.  इतर चार पाच जण पण साधारण मजबूत बांध्याचे व धट्ट॓कट्ट॓ तरूण हेाते. पिळदार मिशावाला त्यांचा सरदार हळू आवाजात इतरांना उद्देशून बोलता झाला.  “ तान्हया, सर्जा आजच्या आठादिसा गावात एकनाथ वाण्याकडे लेकीच आन् डाग्दर सायबाकडे त्येच्या लेकाच लगीन हाय.  दोनी पार्टी मजबूत हाय. दोघबी मालदार हाये. मोठया घरच लगीन हाय म्हणून आदल्या दिसी त्येंच्याकडं सांजच्या यष्टीने पै पावणं येतीन. पावण्यांकडबी माल असणार. पयल सांजच्या यष्टीन येणा–या पावन्यास्नी यष्टीतच गाठायच माल लुबाडायचा अन् रातच्याला लगीन घर.”

        पुढची योजना सांगणारा तेवढयात त्यातील एकाचे लक्ष खेळणा–या शंक–या व बबन्या कडे गेले. त्याने त्यांना हटकले,” ए पोरांनो काय करता हितं.  जा घरला.”

                 “आमी रोज हितच खेळतु.” शंक–या म्हणाला व परत आपल्या खेळण्यात दंग असल्याचे सोंग केले.

                  “ए² जाता का आता का दिउ दणका?” असे म्हणत त्यातील एकाने दोघांना ठणकावले तसे शंक–या अन बबन्या धूम ठोकत गावाकडे पळत सुटले.

        शंक–या अन बबन्याला असे जोरात पळत येत असल्याचे पाहून वेशीजवळ पान टपरीवर उभे असलेले पोलिसपाटील जयसिंगरावानी त्यांना अडविले. “काय रे पोरांनो असे वाघ माग लागल्यागत काय पळत सुटलाय.” पोलिस पाटलाने विचारले.

       पोलिस पाटलाच्या थांबविण्याने ते थांबले व क्षणभर मोठा उसासा टाकित शंक–या म्हणाला “काका, तिकडे मारूती मंदिराच्या मागं कुणीतरी सात आठ जण बसल्यात.  आठादिसांनी गावात येणा–या येष्टीवर आन गावातबी दरोडा पडणार हाय म्हणं.”  “हत् लेका कायतरी बोलू नको. दरोडा काय असा सांगून टाकित नसत्यात.” पोलिस पाटील त्यांचे वर अविश्वास दाखवित म्हणाले.  “आयच्यान खर सांगतो.” बबन्या स्वत:च्या गळ्याला हात लावीत म्हणाला.  “पर काय रं पोरांनो तुमास्नी कोणी सांगितल हे. ” पानाला चुना लावित पान टपरीवाल्या महमद्याने विचारले.  “तिकडे मारूती मंदिराच्या मागे कोणीतरी सात आठ जण बसल्यात. त्यांच्या जवळ काठया हायती अन् खांद्यावर घोंगड हाय.  ते बोलत होते.  आमी आमच्या कानांनी ऐकलंय.” बबन्या खुलासा करता  झाला.

       सुरवातीला टपरीवाल्या महमद्याला पण खरे वाटेना पण “पाटील, वैसे तो सच नही लग रहा पण आपुन एकबार देखकर आनेमे क्या हर्ज है” म्हणत त्याने पान टपरीला कुलुप लावले व दोघेजण मारूती मंदिरापर्यंत जाउन आले.  ते जार्इ पर्यंत ती मंडळी पसार झाली होती. तेथे कोणीच नव्हते. परत आल्यावर पान टपरीचे कुलुप उघडीत महामद्या हसत म्हणाला, “ पाटील, छोटे छोटे बच्चोने हमको शेंडी लगायी, हमको ‘मामा’ बनाया.” पाटलांनी आपले घर गाठले व टपरीवाला महमद्या आपल्या कामाला लागला.

        घरी आल्यावर जयसिंगरावांनी  सहजच ती गोष्ट आपल्या कारभारणीला सांगितली. त्यावर कारभारीन पण हसत म्हणाली, “ काय तुमी बी शेंबडया पोरांवर इस्वास करित तंगड तोडत तिथवर गेलात अन मामा बनून आलात.” पण पाटलांना चैन पडेना. पाटलांची आपली कर्तव्य भावना जागॄत झाली. दुस–या दिवशी सकाळी पायात चप्पल सरकावित ते कारभारणीला म्हणाले, “अहो, मी जरा तालुक्याला जाउन येतो अन् पोरं म्हणत्यात तशी पोलिसंना वर्दी देउन येतो.”  “तुमी बी काय पोरा सोरांच्या बोलण्यावर इस्वास करता.  मळयात धान येउन पडलंय मळणीला माणसं येणार हायती. सरला कालेजात जाणार हाय. मळयात कोणी बघायला न्हवं का?” कारभारणीने त्यांच्या कामात खो घालत त्यांना अडविले.  अडचण खरी असल्याने पोलिस पाटलांनी आपला बेत बदलत मळयात जाण्याचे ठरविले.         

        गावात दोन प्रतिष्ठित घरात लग्न सोहळा असल्यामुळ॓ पाहुण्या रावळ्यांची लगबग दिसू लागली होती. गावचे वातावरण सर्वत्र थोडेसे वेगळ॓च आनंदमयी झाले होते.  नेहमीप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणाहून वेळ॓ नुसार संध्याकाळची एस.टी. बस निघाली. बसमध्ये नित नियमित प्रवास करणारे कॉलेजीयन्स, कामे आटोपून घरी परतणारी गावकरी, गावातील छोटे दुकानदार तसेच काही अपरिचित पाहुणे मंडळी होती. आखलेल्या योजनेप्रमाणे एस.टी. बसमध्ये तान्हया, सर्जा, शिप्या॔ या दरोडेखोरांनी पण प्रवाशांच्या वेशात प्रवेश मिळविला. तान्हयाने पुढे जाउन चालकाच्या मागील सीटवर कॅबिनचे दाराजवळ जागा मिळविली.  सर्जा मधल्या सीटवर बसला तर शिप्या॔ मागील दाराच्या तोंडाशी असलेल्या सीटवर बसला. बस भरली होती.               

           गाडीने तालुक्याचे गाव सोडून पान मळा येताच तान्हयाने योजनेप्रमाणे चालकाच्या कॅबिनचे दार उघडून आत प्रवेश केला. चालकाच्या पोटाशी चाकू धरून “गाडी गप गुमान चालवायची. मागं बघायच न्हाय अन् सांगितल्या बिगार थांबवायची न्हाय” अशी ताकीद दिली. चालक गोंधळला. दरोड॓खोराक़ड॓ धारदार शस्त्र असल्याने आज्ञा पालन करणे शिवाय काहीच पर्याय नव्हता. तान्हयाने बसवर ताबा घेताच हातातील कु–हाडीच धाक दाखवित सर्जाने प्रवाशांना लूटण्यास सुरवात केली. मागे बसलेल्या शिप्या॔ने हातात छोटी बंदूक रोखून धरत “तुमच्या जवळ आसन नसन त्येवढं त्येच्या हवाली करा न्हाय तर कोनाचीबी खैर नाय” धमकावित सर्जाच्या हवाली करण्याचे फर्मान सोडले. बसमध्ये गडबड गोंधळ माजावयास लागल्याचे पाहून सर्जाने प्रतिकार करणा–या एक दोघास कु–हाडीच्या दांडक्याने मारून दहशत निर्माण केली.  मिळ॓ल तेवढ हस्तगत करू लागला. साधारण २० ते २५ मिनिटे लूट चालू होती. गाडीतील सर्व प्रवासी हतबल झाले होते. दरम्यान महाविद्यालयीन तरूणींनी आपल्या नोट बुकची पाने फाडली त्यावर “ एस.टी.त दरोडेखोर शिरलेत. मदत करा.” असा मजकूर लिहून चिठ्या चालत्या एस.टी.तून खाली टाकल्या. बस कान्हू पाटलाच्या उसाच्या फडाजवळ येताच तान्हयाने गाडी थांबविण्याची आज्ञा केली व उडी मारून पलायन केले. सर्जा मागील दाराने लूट घेउन पळून जाण्यात यशस्वी झाला. दोघेजण उसाच्या फडाशी उभ्या असल॓ल्या त्यांच्या इतर साथीदारांना जाउन मिळाले. तितक्यात प्रसंगावधान राखून शीप्या॔च्या मागील सीटवर बसलेली पोलिस पाटील जयसिंगरावची सडपातळ कीडकीडीत बांध्याची एकूलती एक लेक सरला सीट खाली लपली व मागील बाजूने मोठया हिमतीने तिने सीट खालूनच शिप्या॔चे पाय घट्ट धरून ठेवले. शिप्या॔चे पाय पक्क धरून ठेवल्यामुळ॓ तो असहाय झाला. त्यास पळता आले  नाही.  त्याने खूप आरडा ओरडा करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला पण सरला हिमतीची पक्की होती. तिने पाय सोडलेच नाही. तेवढयात या संधीचा फायदा घेत त्याच गाडीतून प्रवास करणारा गावचे सरपंच सयाजीराव यांचा तरूण मुलगा पुष्कर त्याच्या अन्य दोन मित्रांसह शिप्या॔वर तूटून पडला. त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली व त्याला ताब्यात घेउन यथेच्छा प्रसाद दिला. गावक–यांनी त्यास पोलिसांच्या हवाली केले.

          गावात येणा–या एस.टी.बसवर दरोडा पडल्याची वार्ता व त्यात पोलिस पाटील जयसिंगराव यांची कन्या सरला व सरपंच सयजीराव यांचा पुत्र पुष्कर यांची शौर्य गाथा कानोकानी सर्वदूर पसरली.  दोघांचे कौतुक होउ लागले. आठ दिवसांनी गावकरी व पोलिसांनी मिळून त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. समारंभास सरपंच, पोलिस पाटील, गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच पोलिस अधिकारी उपस्थित झाले. सुरवातीला गावातील शाळेचे मुख्याध्यापक व इतरांनी सरला व पुष्करचे कौतुकास्पद भाषणे केली.  सत्कार सुरू असतांनाच पोलिस पाटलांचे लक्ष समोर उभ्या असलेल्या बबन्या व शंक–याकडे गेले. ते मंचावरून खाली उतरले व दोघांना घेउन मंचावर आले. बबन्या व शंक–याचा नेहमी सारखा हाफपँट व बिन गुंडयांचा सदरा असा बावळा वेश पाहून सर्वजण सुरवातीला अचंभित झाले व त्यांच्या कडे पाहून हसू लागले.

          सर्वांना उद्देशून पोलिसपाटील सांगू लागले, “आजच्या या सत्कार समारंभामध्ये सरला व पुष्करने दाखविलेल्या धाडसा बरोबर त्यांचे आधी या दोघांचा पण सत्कार करणे फार जरूरीचे आहे. ” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. सर्वांच्या चेह–यावरील भाव पाहून पोलिस पाटील खुलासा करते झाले, “ या दोघांनीच सर्वप्रथम गावच्या एस.टी. बसवर व गावावर दरोडा पडणार असल्याची वार्ता मला दिली. पण केवळ बारीक पोर समजून त्याकडे दुर्लक्ष झाले. दरोडेखोर जवळ असतांना देखिल न घाबरता, गोटया खेळण्याचा बहाणा करित ते काय करतात, काय बोलतात याचा धाडसाने कानोसा घेतला. बालपणीच त्यांचे चातुर्य, धाडस  व गावाप्रति असलेल्या जागरूकतेची भावनांचा विचार करता या लहान मुलांचा सत्कार करणे योग्य ठरेन.”  या वर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. सरला, पुष्कर तसेच बबन्या व शंक–याला गावातर्फे तसेच पोलिस खात्यातर्फे शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देउन सन्मानित करण्यात आले.

                   सत्कार समारंभ पार पडलेवर काही दिवसांनी पोलिस पाटील जयसिंगराव तसेच सरपंच सयाजीराव नेहमीप्रमाणे गावाच्या विषयावर व गावातील लहान मुलांनी व तरूणांनी दाखविलेल्या धाडसा विषयी बोलत असता सरपंच सयाजीराव जयसिंगरावांन पुढे  प्रस्ताव टाकीत म्हणाले, “पाटील आजपर्यंत आपण दोघे सहकारी मित्र बनून गावाचा गाडा हाकित राहिलो. तुमची हरकत नसल्यास आपण त्याचे रूपांतर सोयरिकी मध्ये करूया का?”              

                   “म्हणजे मी नाही समजलो.” जयसिंगरावांचा प्रतिप्रश्न.

                  सयाजीराव खुलासा करित म्हणाले, “मी तुमची कन्या सरलाचा हात माझा मुलगा पुष्करसाठी मागतो. तिला पुष्करची पत्नी व आमची म्हणून सून म्हणून स्वीकारण्याची माझी इच्छा आहे.” यावर जयसिंगराव खुशीतच गालातल्या गालात हसले व “घरच्यांचा व मुख्य सरूचा विचार घेतो.” मोघमपणे म्हणाले.      

           संध्याकाळी सर्व कामे आटोपल्यावर निवांत वेळी, घरात सरूच्या लग्नाचा विषय निघाला. “पोर आता न्हाणी झाली. तिच्या सोयरिकीचं बघितल पायजे.” कारभारणी जयसिंगरावांना आपली चिंता व्यक्त करित म्हणाली. यावर जयसिंगराव  म्हणाले,  “होय, बरी आठवण काढलीत. काल संध्याकाळी सरपंच सयाजी रावांनी आपल्या सरूला, त्यांचा मुलगा पुष्करसाठी मागणी घातली मजजवळ.  म्हटल घरच्यांचा व सरूचा विचार घेतो अन् सांगतो.”  पुष्करचे वर्णन करित पुढे कारभारणीला सांगू लागले,  “पोरगा तसा चांगला उंचा पुरा, हुशार, मेहनती, विनयशील आहे.  माझ्या नेहमीच्या पाहण्यात आहे.  जोडा पण शोभून दिसेल.  पण आपल्या सरूचे शिक्षण चालू आहे अजून.” जयसिंगराव म्हणाले.

                     “व्हर्इल शिक्षण बी. आता पासून सुरवात करू तवा दोन वर्सांनी हुर्इल.” कारभारीण पुढचे धोरण  आखत म्हणाली.

          जयसिंगराव व कारभारणीचे असे बोलणे चालू असतानाच नाकी डोळी नीट, सावळीच पण चार चौघीमध्ये सहज उजवी दिसणारी  सरूने हॉल मध्ये प्रवेश केला व आर्इला विचारले, “आर्इ संध्याकाळी जेवायला गरमा गरम पिठल भाकरी करू या का? ”

               “व्हयं कर बाळा तुला आवडतंना” कारभारणी बरोबर पाटलांनी पण तिच्या मेनुला संमति दिली.

         ती आज्ञा घेउन परतणार तसा जयसिंगरावांनी तिला आवाज देत म्हणाले, “सरू थांब जरा. अगं तुझ्या लग्नाचा विषय निघालाय. तुझा काय विचार आहे ?”

                “हे काय बाबा, तुम्हाला इतक्या लवकर माझ्या लग्नाची घार्इ झाली वाटते.” सरू लाडात येउन म्हणाली.                                             

                “अगं तसं न्हाय. आयुष्यात समद्या गोष्टी येळेवर व्हायाला हव्यात म्हणुन म्हटलं. तुह्यासाठी गावातलच एक चांगल स्थळ सांगून आलंय. पोरगा चांगला देखणा हाय,  हुषार हाय अन मेहनतीबी हाय, आमच्या नेहमीच्या पाहण्यातला हाय,” कारभारीण समजावयाच्या सूरात म्हणाली.   

                                                                                                                                               

                                                                     

                      “गावचे सरपंच सयाजी रावांचा मुलगा पुष्कर तु त्याला पाहिल असशीलच. कधी जाता येता त्याचेशी बोलली पण असशील.”जयसिंगराव खुलासा करते झाले.                                                                                       

             पुष्करचे नाव काढताच तिच्या डोळ्यासमोर त्याने एस.टी. बस मध्ये दरोडेखोरावर झडप टाकून त्याचेशी दोन हात केल्याचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. तसेच त्यानंतर सत्काराच्या वेळी त्याने एक दोन वेळा तिच्याकडे चोरटा भावपूर्ण टाकलेला कटाक्ष व केलेल् स्मितहास्य आठवले. खरे तर त्याच वेळी दोघांच्या मनात एकमेकाबद्दल कळत नकळत प्रेम भावना निर्माण झाली.  त्यानंतर कॉलेजला जाता येता झालेले बोलणे, भेटणे अशा प्रसंगांनी त्यांच्यातील प्रेमाला पालवी पण फुटली होती. आता आई बाबांनी तेच स्थळ सांगून आल्याचे सांगितल्यावर तीचे मन शहारले. मनासारखे घडून येत असल्याने मनोमनी आनंदली. काही एक प्रतिकिया न देता दाराला टेकून उभी राहात उजव्या पायाच्या अंगठयाने फरशीवर रेघोटया ओढण्याचा प्रयत्न करू लागली. तिची ती मूक क्रीया कारभारणीच्या चतूर व सूक्ष्म नजरेतून सूटली नाही.

             “ मग काय, काय विचार आहे तुझा ?” जयसिंगरावांनी परत प्रश्न केला.

            “अवो तुमी बी असं काय इचारताय. या आजकालच्या मुली तोंडाने कधी खरं सांगतीन व्हय. तुमा न्हाय ठाव अजून. तुमी आपलं कामाला लागा. समदं बेस व्हणार हाय.” कारभारणीने तिच्यावतीने संमती देत म्हटले. आर्इच्या या वाक्यासरशी सरू लाजतच घरात पळत सूटली.

             महिन्याभरातच सरला व पुष्कर या दोन्ही धाडसी वीरांचा विवाह मोठया धुमधडाक्यात पार पडला. शंक–या व बबन्याची जोडी आपल्या तार्इच्या लग्नात खूप नाचली.  दोन्ही धाडसी वीर प्रपंचाला लागले.

 

Go Back

Comment