Menu

पुनरारंभ

218636

आशीर्वाद

Please download here !!

प्रकाशन: अक्षर सिद्दी दिवाळी अंक २०१२ 

आशिर्वाद

               धरणाच्या काठावर डोंगरांच्या कुशीत हजार पंधराशे वस्ती असलेली एक छोटेसे गाव डुंबरवाडी. एक यातायात सोडली तर सर्व सुख सोयींनी परिपूर्ण. ग्रामपंचायत कार्यालय, बँक, पोस्ट ऑफिस, सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची मराठी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाचनालय तसेच गावाच्या एका टोकाला उंच ठिकाणी बांधलेल्या पाण्याच्या टाकीतून गावाला होणारा सुरळीत पाणी पुरवठा.  दोन चार मोठी किराणा दुकाने यामुळे नित नियमित लागणा­या गरजेच्या सर्व गोष्टी गावातच उपलब्ध होत.  जवळच्या दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या तालुक्याच्या गावातून येणारी सकाळी एक व संध्याकाळी एक अशा दोनच राज्य परिवहन मंडळाच्या फे­या ही एक गैरसोय सोडली तर पूर्णतया स्वावलंबी.

                        गावातील माणसे म्हणावी तर, कष्टाळू मेहनती सर्वांना सांभाळून घेणारी व एकोप्याने राहणारी.  वाडीतील काही हुशार व होतकरू सुशिक्षित युवकांकडून सहकारी सोसायटी चालविली जात होती. वाडीतील महिला पण सहकाराच्या बाबतीत मागे नव्हत्या. शाळेतील शिक्षिका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका यांच्या मदतीने बचत गट देखिल चालविला जात होता.  जणू सहकाराचे बाळकडू त्यांना बालपणीच पाजले जात असावे.  कधी कुणाशी भांडण किंवा तंटा बखेडा नाही.  गैरव्यवहारांना केव्हाच तिलांजली देण्यात आली होती.  पोलिस चौकी फक्त नावालाच.        शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. स्वच्छतेच्या बाबतीत म्हणावे तर गावातील रस्ते सदैव स्वच्छ. कोठेही कचरा पडलेला नाही. दररोज घंटागाडी द्वारा गावातील ओला कचरा व सुका कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात असे.  शेती मुख्य व्यवसाय असल्यामुळे बहुतेक घरी गुरे ढोरे ही होतीच व त्यांच्या विष्टेवर गोबर गॅसचा वापर होत असे.  सौर उर्जेचा वापर करून रस्त्यावर दिवा बत्ती केली जात असे.  घराघरात शौचालय बांधून आरोग्याची काळजी घेतली जात होती.  ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाकडून नित नियमित औषधी फवारणी होती.

                        अशा या गावाला शासनाच्या ग्रााम सुधारणा योजना अंतर्गत या वर्षीचा प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची बातमी गावात येउन धडकली. सर्वत्र आन्ंद झाला.  गावक­यांनी घरोघरी पेढे वाटून एकमेकाचे अभिनंदन करित आनंदोत्सव साजरा केला.

                        गावात वेशीजवळील देवीच्या मंदिराचे आवारात ग्रामपंचायतीने गावक­यांचे कौतुक करण्या विशेष सभेचे आयोजन केले. सभेला तालुक्याचे तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी, राजकीय मंडळी तसेच समाजसेवक देखिल उपस्थित होते.  सभेमध्ये अनेकांनी आपल्या भाषणामध्ये स्वच्छता व आरोग्या बद्दलचे महत्व समजावून दिले.  शेवटी सभेचे मुख्य अतिथी म्हणून तहसिलदारांचे भाषण झाले.  भाषणा मध्ये गावक­यांचे अभिनंदन व कौतुक करित ते म्हणाले, “या पारितोषिकाचे श्रेय आपणा सर्वांना जातेच पण त्या बरोबर तुमच्या गावाशी अगदी जवळचे नाते असणारे ज्यांची या गावाशी नाळ बांधली गेली आहे ‚असे समाजसेवक श्री.पांडूरंग तात्या यांना देखिल जाते.  गेले 3 वर्षे ते सतत माझ्या संपर्कात होते.  इकडे तुम्हा सर्वंना मार्गदर्शन करून तुमच्या कडून सुधारणा करून घेत‚  तर तिकडे जेव्हा जेव्हा मला भेटत त्या त्या वेळेस गावात झालेल्या सुधारणांचा आढावा देत असत.  तसेच गावास ग्राम सुधारणा योजना अंतर्गत शासना कडून प्रोत्साहन मिळविण्याचा मला आग्रह करित.  त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे आज या गावास हा सोनियाचा दिवस पाहावयास मिळतो आहे.  असे अभिमानाने मला नमूद करावेसे वाटते.       येत्या 15 तारखेस त्यांचा 75वा वाढदिवस आहे.  या बद्दल मी त्यांचे अभिनंदन करितो त्यांना उदंड आयुष्य लाभो व अशीच समाजसेवा त्यांचे हातून घडत राहो अशी इच्छा व्यक्त करतो.  परत एकदा सर्व गावक­यांचे व समाज सेवक श्री.पांडूरंग तात्या यांचे अभिनंदन करून भाषण संपवितो.  जयहिंद, जय महाराष्ट्र.”                                                                                                    

          सभेच्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्राम सभा घेण्यात आली.  त्या मध्ये समाज सेवक श्री. पांडूरंग तात्या यांचा 15 तारखेला गावातच देविच्या मंदिराचे आवारात वाढदिवस साजरा करण्याचा प्रस्ताव बहुमताने पास करण्यात आला व त्या निमित्ताने छोटयाशा पुजेचे आयोजन करण्याचे पण ठरविले.  पुजा सांगण्यास तालूक्याच्या गावातील भिकंभटास बोलविण्याचे ठरविले.  कार्यक्रमास केवळ १० दिवसच बाकी असल्यामुळे व  वेळेचे बंधन पाळीत कोणी काय काम करायचे याची जबाबदारी संबंधितांकडे सोपविण्यात आली.

         दुस­या दिवशी सकाळी समाज सेवक श्री. पांडूरंग तात्यांची संमती घेण्यास व त्यांना आमंत्रित करण्यास सरपंचासह काही वरिष्ठ मंडळी तालुक्याच्या गावी त्यांच्या निवासस्थानी रवाना झाली.  त्यांची संमती घेउनच भिकंभटास पुजेस पाचारण करून परतली.

          कार्यक्रमाचा दिवस उजाडला तसे सर्व गावकरी आनंदाने व उत्साहाने वेळेवर देवीच्या मंदिराचे आवारात सकाळी ९ वाजताच उपस्थित झाले.  अंगात पूर्ण बाहिचा पांढरा नेहरू शर्ट,  बारीक रंगीत किनार असलेले पांढरे एकटांगी धोतर, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध, खांद्यावर भगवा पंचा व हातात सामानाची पिशवी घेउन, स्थूल प्रकॄतिचे भिकंभट स्वत:ला व सामान सावरीत महामंडळाच्या गाडीने उतरले.  उतरले तसे ते देवीच्या मंदिराकडे गेले.  आयोजकांच्या संमतीने पूजा मांडण्यास सुरवात केली.

        “पळी  पंचपात्र,  तांब्याचा तांब्या, ताम्हण, होमकुंड, ४ पाट, चौरंग व पाण्याने भरलेली कळशी आणा.” भिकंभटांनी आज्ञा केली.

        “हे घ्या महाराज ” म्हणत सर्व साहित्य पूजेची जवाबदारी सोपविलेल्लया  एका कार्यकर्त्याने त्यांच्या पुढयात आणून ठेवले.

        “गणपतिला लाल फूल, दुर्वा, पंचामॄत, गुळ खोब­याची वाटी, शंख, देवाची घंटा, नारळ “ महाराजांनी दुसरी मागणी केली.                                                                                                                        

              ती पण मागणी पूर्ण करित कार्यकर्ता म्हणाला, “महाराज लाल फुले मिळाली नाही.”

              “बरे असू दे हो. पांढरे फूल लाल गंधामध्ये बुडवुन वाहू.”  महाराज त्यावर तोडगा काढीत म्हणाले.  

                   साडे दहाचे सुमारास मंदिराचे समोर एक पांढ­या रंगाची सुमो येउन थांबली.  गाडीतून वयस्कर भरदार शरीर यष्टीचे, पांढरा पायजमा, पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी, डोळयांवर सोनेरी रंगाच्या फ्रेमचा चष्मा, हातातील काठी टेकवीत समाज सेवक श्री. पांडूरंग तात्यांचे आकर्षक व्यक्तीमत्व आपल्या धर्मपत्नीसह उतरले. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या.  त्यांनी हसत मुद्रेने सर्व उपस्थितांना अभिवादन करित मंदिराचे आवारात प्रवेश केला.  गुलाब पुष्प व श्रीफळ  देउन सरपंचांनी त्याचा सत्कार केला व खुर्चीवर स्थानापन्न होण्याची विनंती केली.   खुर्चीजवळ हातातील काठी ठेवत त्यांनी आसन ग्रहण केले.                                                

                       “पूजेची सर्व तयारी झाली आहे.  हरकत नसल्यास पूजेस प्रारंभ करूया !  ” म्हणत महाराजांनी यजमानांना बोलविण्याची विनंती केली. संकल्प सोडून पूजेस प्र्रारंभ झाला.  गणेश पूजन झाले.  वेद शास्त्रातील मंत्रोपचाराने एक एक करित सर्व वस्तू समर्पित होउ लागल्या.  

            एवढयात महाराजांचा मोबार्इल वाजला.  पलिकडून महाराजांच्या धर्मपत्नीने आज्ञा केली, “ अहो आताच गावाकडून फोन आला.  आपल्या चिंगीचे लग्न ठरले.  उद्या साखरपूडा आहे.  आज संध्याकाळी त्वरेने परगावी जाणे जरूरीचे आहे.  पूजा आटोपल्यावर लवकर या !”

                       धर्मपत्नीची आज्ञा शिरसावंद्य मानत त्यांनी थोडक्यात  “येतो” असे उत्तर देत फोन ठेवला.  

           फोनच्या गडबडीत गणपतीला गुळ खोब­याचा नैवेद्य दाखविण्याचे राहिल्याचे त्यांच्या मदतीस दिलेल्या शंकरच्या लक्षात आले.  त्याकडे महाराजांचे लक्श वेधत शंकर म्हणाला, “महाराज, गुळखोब­याचा नैवेद्य देवास दाखविण्याचा राहिला.” चूक लक्षात येताच “अरे हो” म्हणत त्यांनी गुळखोब­याचा नैवेद्य श्री. गणेशा पुढे ठेवित “  प्राणाय स्वाहा, आपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा ……” असा मंत्रोपचार करित त्याभोवती पाणी फिरविले.

          श्री गणेश पूजा, नवग्रह पूजा,, होम हवन, आरती  इ. यथासांग पूजा झाली.  श्री.व सौ. पांडूरंग तात्यांनी जोडीने नतमस्तक होत भिकंभटास प्रणाम केला.  “यशवंत व्हा, औक्षवंत व्हा, शुभम भवतु! ” असा पांडूरंग तात्यांना तर सौ. ना “अखंड सौभाग्यवती भव!  ” असा तोंडभरून आशिर्वाद दिला.  यथोचित दक्षिणा, शिधा आटा, व मान सन्माना सहित महाराजांची बिदागिरी केली.  ब्राम्हण, यजमान, आयोजक सर्वजण समाधानी व कॄत कॄत्य झाले. दोन अडीच तास पूजा झाल्यावर महाराजांना घरी लवकर जाण्याची घार्इ असल्यामुळे व संध्याकाळी उशीरा शिवाय एस.टी.नसल्याने त्यांनी आयोजकांना फाटया पर्यंत सोडवून देण्याची विनंती केली.  गाव तसे छोटे व फारसे काही साधन नसल्यामुळे सरपंचांनी शंकरला आपल्या बैल गाडीने त्यांना सोडविण्याची व्यवस्था केली.

             सरपंचांची आज्ञा शिरसावंद्य मानित महाराजांना घेउन निघाला.  कच्च्या व खराब रस्त्यामुळे गाडी फार उडत होती.  महाराजांचा शिधा आटा अस्ताव्यस्त होउ लागला, तेल डोफळले शिवाय त्यांना पण असुविधाजनक वाटल्यामुळे ते शंकरला म्हणाले, “अरे जरा हळू हाक की, बैलगाडी हाकतोय की विमान चालवतोय?

             विनोद बुध्दीचा शंकर म्हणाला, “महाराज सांडू देत हो शिधा आटा पण चंचितली दक्षणा तर साबूत हाय न्हवं”

                  “ अरे, शिंच्या तुला काय रे त्याचे?  तु आपला गाडी हाक बघू ” महाराज क्रोधित स्वरात म्हणाले.

            एवढयात मागून एक मोटरसायकल आली.  “गाडी थांबव रे.  मी त्या मोटर सायकलवर जातो.” महाराजांनी आज्ञा केली.                                                                                                            

                        शंकर मागे बघत म्हणाला,, “ त्यो किस्न्या हाय.  मी वळखतो त्याला.  तुमी थांबा जरा.”

            एव्हाना मोटारसायकल जवळ आली होती. “ए किस्न्या थांब वार्इच.  कुटं चालला ?  महाराजास्नी फाटयालोग घिउन जा. ” शंकर म्हणाला.

                 “आरं म्या हित जवळच जातुया मळयामंदी.  लार्इट आल्याती मळयाला पाणी सोडाया चाललो.” असे म्हणत न थांबता निघून गेला.

           महाराजांना बैल गाडीचा प्रवास करण्या वाचून गत्यंतर नव्हती. नार्इलाजाने धक्के खात बैलगाडीचा प्रवास पुन्हा सुरू झाला. थोडे अंतर चालुन गेल्यावर सुदैवाने मागून एक पांढ­या रंगाची सुमो गाडी येतांना त्यांच्या नजरेस पडली.  त्यांचे भाग्य थोर म्हणून काही न बोलता, सुमो त्यांच्या बैलगाडी जवळ येउन थांबली.  आतमध्ये यजमान श्री पांडूरंग तात्या व त्यांच्या पत्नी होत्या. गाडी थांबताच पांडूरंग तात्यांनी गाडीतुनच हात बाहेर काढीत महाराजांना बोलवित लीनपणे म्हणाले, “या महाराज तालुक्याला येताय का? ”

                     ‘आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे’ अशी स्थिती महाराजांची झाली व आनंदाने ते त्यांच्या समवेत पुढील प्रवासाला निघाले.  त्या एक तासाच्या छोटया प्रवासा दरम्यान त्यांच्यात अनेक विषयावर गप्पा टप्पा झाल्या.  प्रवास सुरळीत चालु होता.  पण नियतीने त्यांच्यांपुढे काही वेगळेच वाढून ठेवले होते.  घाट सुरू होण्याच्या तोंडाशी अरूंद रस्त्यावर समोरून येणा­ बैल गाडीला जागा देत असतांना अचानक चालकाचा अंदाज चुकला व त्यांची सुमो रस्त्याच्या कडेला दोन अडीच फूट खडडयात उलटी झाली.  चालकासह सर्व घाबरले.  सुदैवाने म्हणा अगर त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणा कोणासही खरचटण्या पलीकडे काही लागले नाही अथवा दुखापत झाली नाही.  गाडीचे पण काचा फुटण्यापलिकडे काही फारसे नुकसान झाले नाही.

                पांडूरंग तात्यांनी मोबार्इलद्वारे तालुक्याच्या गावी आपल्या घरी वार्ता दिली त्वरेने त्यांचे बंधु दुसरी गाडी घेउन आले.  सर्वजण परत पुढच्या प्रवासाला लागले.  झाले ते सर्व स्वप्नापरी विसरून पांडूरंग तात्या महाराजांना म्हणाले, “ महाराज आताच तुम्ही दिलेला “यशवंत व्हा, औक्षवंत व्हा, शुभम भवतु²” आशिर्वाद यथार्थ खरा ठरला व आमच्या कामी आला बघा.  आम्ही वाचलो. ” यावर महाराज आपली प्रतिक्रीया देत म्हणाले, “मी कोण?  एक पामर,  वेदातील मंत्रोपचापर करून पूजा अर्चा करतो व धर्मशास्ञाचे पालन करून चरितार्थ करणारा गरीब ब्राम्हण.  ही सारी पुण्यार्इ तुमच्या आमच्या वाडवडिलांची.  त्यांच्या आशिर्वादाने व परमेश्वराच्या कॄपेने बचावलो.  फक्त आपल्या कर्तुत्वाची जोड त्याला मिळाली.  आपण आपल्या वाडवडिलांचे व परमेश्वराचेच आभार मानले पाहिजेत हो.” 

 गप्पांच्या भरात तालुक्याचे गाव केव्हा आले ते कुणालाच कळले नाही.  अखेर वेळ आली होती  पण काळ आला नव्हता’ असा निष्कर्श काढीत व एका मोठया संकटातून बचावल्याच्या समाधानात आपल्या घरी गेले.             

Go Back

Comment