Menu

पुनरारंभ

221759

नाकारलेली बायको

Please download here !!

 

प्रकाशन: 
1| अलका मासिक फेब्रूवारी 2008.
2| माझी वहिनी कथा विशेषांक फेब्रूवारी 2009.
3| शिवस्पर्श दिवाळी अंक 2011.

 

नाकारलेली बायको

           संजय एक होतकरू तरूण. मथ्यमवर्गीय कुटुंबातून वर आलेला. गोल चेहरा, साधारण उंची ,निमगोरा व साधी राहणी.  नुकतीच इंजिनिअरींग ची पदवी घेउन बाहेर पडला होता.  शालेय व कॉलेज जीवनात सतत यश संपादन केले.  जणू सरस्वती त्याच्यावर प्रसन्न होती व त्याला यशाचे वरदानच प्राप्त झाले होते. त्याच्या सततच्या यशामुऴे व विनम्र वर्तणुकीमुळे सर्वप्रिय. असा हा हुषार व उमदा तरूण त्याच्या हिकमतीवर पुण्यात एका नामांकित कंपनीत सिस्टीम इंजिनिअर पदावर दोन महिन्यापुर्वीच रूजू झाला होता. नविन नोकरी‚ नवे शहर‚ नवे सहकारी,  सर्वकाही अगदी सुरळीत व आनंदात होते.  घरची परिस्थिीती बेताचीच.  ५ वर्षापूर्वी पितृ छञ हरवले.   धाकटा भाउ पदवीच्या शेवटच्या वर्षाला. वडिलांचे निधनानंतर कसेबसे पुढील शिक्षण पार पडले.   आर्इ एक सोज्वळ सुगृहिणी.  पति निधनानंतर मोठया हिकमतीने संसाराचा गाडा पुढे हाकित मोठया मुलांचे शिक्षण पूर्ण केले तर लहाना पूर्ण करण्याच्या वाटेवर होता.

            नेहमी प्रमाणे आज देखील संजय सर्व आवरून सकाळी ९ वाजता ऑफिसला जाण्यास तयार झाला. आर्इने नित्याच्या सवयी प्रमाणे म्हणाली, “टेबलावर डबा भरून ठेवला आहे. संजय, डबा घेउन जा.” 

                          “नको आज ऑफिसमथ्ये पार्टी आहे. तेथे जेवण होर्इलच. अन्न वाया जार्इल.” संजय म्हणाला.

            आर्इ मायेने आग्रह करित काळजीच्या स्वरात म्हणाली, “ अरे, तरी पण घेउन जा. नाही लागला  तर परत घेउन ये.  उपाशी राहू नकोस रे बाबा. ”

           घडयाळाकडे नजर टाकित त्याने घार्इतच बूट घातले,  जेवणाचा डबा पाठीवरच्या बॅगेत ठेवला, हाताने केस सावरीतच “आर्इ, येतो गं ” असे म्हणत आर्इचा निरोप घेत बाहेर पडला आणि मोटारसायकलला किक मारून केव्हा रस्त्यास लागला ते आर्इला कळलेच नाही.

            सकाळची वेळ प्रत्येकजण आपापल्या नादात व वेळेवर इच्छित स्थळ पोचण्याच्या विचारात. रस्ता दोन चाकी, चार चाकी, रिक्षा, पीएमटी बसेसने भरून पूर्ण वाहत होता. जणू रस्त्यावर वाहनांचा महापूरच लोटला होता. सर्वजण एकमेकाशी स्पर्धा करित जागा मिळेल त्या बाजूने आपले वाहन पुढे हाकित होता. जणू प्रत्येकाने या स्पर्धे मध्ये भागच घेतला होता.  कळत न कळत स्ंजय देखिल या स्पर्धेमध्ये सामील झाला. पण नियतीने त्याच्या पुढे काय वाढून ठेवले होते ते त्याला पण माहित नव्हते.

           अचानक चिर्र ऽऽऽ असा करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज झाला.  डोळ्याची पापणी लवते न लवते तोच संजय मागून येणा–या वाहनाने धडक दिल्याने बाजुला फेकला गेला.  काय झाले त्याला न कळले.  तोंडातून शब्द फुटेना.  डोक्याला आणि उजव्या हाताला मार लागला होता. जखमी अवस्थेत संजय रस्त्यावर पडला .  जो तो फक्त पाहून पुढे जात होता.  मदतीला कोणी पुढे येत नव्हते.  धडक दिलेले वाहन केव्हाच गर्दीत लेाप पावले होते. बघ्यांची गर्दी वाढत होती.                   

 

            तेवढयात एक तरूणी गर्दीतून वाट काढीत पुढे सरसावली.  तिने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला.  तिचा प्रयत्न पाहून एक दोन तरूण मदतीसाठी पुढे सरसावले.  त्याचा विखूरलेला सामान आवरला.  त्या तरूणांच्या मदतीने जखमी संजयला रिक्षात बसवून नजिकच्या हॉस्पिटल मध्ये भरती केले. प्राथमिक उपचार होइपर्यंत ती तेथेच थांबली. हॉस्पिटल सोडण्यापुर्वी त्याच्या मोबार्इल वरूनच त्याच्या घरचा नंबर घेउन घरी निरोप दिला व ऑफिसला निघून गेली. ऑफिस मध्ये गेली तरी तिचे कामात लक्ष लागत नव्हते. सारखे कोण तो तरूण?  त्याची तब्येत कशी असेल? फार गंभीर तर नसेलना?  अशा अनेक विचारांनी तिचे मन ग्रासले.  असेल कोणीतरी. मी फक्त माझे कर्तव्य केले.  अशी मनाची समजूत घालून ती कामाला लागली.  पण तिला चैन पडेना म्हणून संध्याकाळी ऑफिस मधून परत जातांना वाटेवरच हॉस्पिटल असल्याने ती परत एकदा चौकशी करता गेली.  तोपर्यंत संजय शुध्दीवर आला होता परंतु फार बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.

                       “कसे आहात तुम्ही ? बरे वाटतंय ना ! ” तिने विचारले.

          वर पहात नुसतेच हाताने ठिक असल्याचा इशारा त्याने केला.

                       “घरचे कोणी आले काय ?” तिने प्रतिप्रश्न केला.

                        “ आर्इ ” हलक्या आवाजात तो उत्तरला.

                        “तुम्हाला काही हवे आहे काय ?” तिने विचारले.

           तो काही बोलणार त्याच वेळेस परिचारिका आत आली.  त्याला औषधाचा डोस देत पूर्ण विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले व निघून गेली.  काही न बोलता थोडावेळ ती तरूणी त्याचेजवळ थांबली पण वेळेचे बंधन असल्यामुळे, “ लवकर बरे व्हा !  विश यु स्पीडी रिकव्हरी. ” अशा शुभेच्छा देउन निघून गेली.

           ती गेल्यावर संजयची विचार चक्रे फिरू लागली.  कोण ही तरूणी ?  ना ओळख ना पाळख.  आली कशी विचारपूस करून शुभेच्छा देउन गेली कशी ?  मी तिला कधी पाहिले नाही ओळखत देखिल नाही. तिच्या बद्दल विचारणार तरी कोणाला ? सांगणार कोण ?  माझ्या ऑफिस मधली कोणी सहकारी तर नाहीना ?  वगैरे. वगैरे.  अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात काहूर माजले.   एव्हाना  संध्याकाळचे सात वाजले होते.  आर्इ जेवणाचा डबा घेउन आली सोबत लहान भाउ पण आला होता.  दोघे चिंतेत होते. थोडयाच वेळात डॉक्टर संध्याकाळच्या व्हिजिटला आले.  तपासणी केल्यावर काही धोका नसल्याचे सांगितले.  दोघांची चिंता कमि झाली व चेह–यावर थोडी प्रसन्नता आली.  पेशंट जवळ रात्री फक्त एकालाच राहण्याची परवानगी असलेमुळे, आर्इ थांबली.

          सकाळी भावाने संजयला वर्तमान पत्र व पुस्तक वाचण्यासाठी आणून दिले.  दुपारी जेवण झाल्यावर  तो पुस्तक वाचत पडला होता.  पण पुस्तक वाचण्यात लक्ष लागत नव्हते.  सारखे तेच विचार मनात यायचे. काल संथ्याकाळी आलेली तरूणी कोण ? ओळख नसतांना आली कशी विचारपूस करून शुभेच्छा देउन गेली कशी ?  मी तिला कधी पाहिले नाही ओळखत देखिल नाही.  हा तिढा त्याने परिचारिके कडून सूटेल असे गॄहित धरून तिला विचारायचे ठरविले कारण काल हॉस्पिटल मथ्ये भरती करतांना तीच डयुटीवर होती.  संयेागाने तीच परिचारिका रूममध्ये प्रवेश करती झाली.

                       “ सिस्टर, मला काल या हॉस्पिटल मथ्ये कोणी भरती केले ? ”  संजयने परिचारिकेस विचारले.

                      “काल संध्याकाळी आली होती त्याच तरूणीने.”  परिचारिका  म्हणाली.

                     “तिचे नाव काय?  ती कोठे राहते?  वगैरे काही माहीत आहे का?  ”संजयने विचारले.

                        “ते मला माहीत नाही.  परंतु एवढे मात्र खरे, जर थोडासा जरी उशीर झाला असता तर गंभीर प्रसंग ओढवला असता. ”  परिचारिका  म्हणाली. एवढे बॊलून परिचारीका निघून गेली.                   

           हॉस्पिटल मथ्ये भरती करणारी तीच तरूणी एवढे समजल्यावर, त्याच्या मनातील कोडे थोडे फार सुटले होते. तरी पण संपूर्ण माहिती न मिळाल्यामुळे मन अजूनही बेचैन होते.  पडल्या पडल्या त्या अनोळखी तरूणीचे आभार कसे मानावे या विचाराने त्याचे मन ग्रासले होते. एव्हाना संध्याकाळ झाली. इतक्यात “ मी आत येउ काय ? ” शब्द कानी पडले आणि पाहतो तर काय तीच तरूणी दारात उभी होती. गौर वर्ण, सडपातळ बांधा, साधारण उंची, नाकी डोळी छान,  पाच वारी गोल साडी व्यवस्थित चापून चोपून नेसलेली अशी ती तरूणी हास्य मुद्रेने त्याच्याकडे पाहत होती.  तो  काही उत्तर देण्याच्या आत ती आत प्रवेश करती झाली आणि सरळ त्याच्या कॉट शेजारील खुर्चीमध्ये स्थानापन्न झाली.सोबत आणलेली कॉफी कपात ओतत व बिस्कीटचा पुडा फोडीत तिने प्रश्न केला.

                      “ आज कसे वाटतंय ?” असे म्हणत तिने कॉफी चा कप व बिस्किटे त्याच्या पुढे केली.

           संकोचून तो  “नको” म्हणाला.  “आता आर्इ येर्इलच.  ती चहा आणणारच आहे.  आणि आपण का एवढा त्रास घेतला? ” इति संजय.

                           तो नको म्हणत असतांना तिने कपात कॉफी ओतली व त्याच्या हाती कप देत म्हणाली. “नको काय नको, घ्या तेवढाच आधार होइल पोटाला. ”

                          आज त्यांची थोडी निवांतपणीची पहिलीच भेट असलेमुळे काही क्षण उभयतांना एकमेकाशी काय बोलावे व सुरूवात कोठून करावी हेच कळत नव्हते. दोघांचे मनी काहूर माजले होते. अखेर संजय सुरूवात करित म्हणाला “मला केवळ तुमचे मुळे जिवदान मिळाले आहे. असे परिचारीका म्हणाली.  तुमचे आभार कसे मानावे हेच समजत नाही. मी आपला आभारी आहे.”

                         “ छे : यात काय एवढे. आणी आभार ते  मानायचे. माणसाने माणसाची मदत करायची नाही ते कोणी करायची. मी फक्त माझे कर्तव्य केले. तुमच्याच मोबार्इलवरून नंबर घेउन तुमच्या घरी कळविले. पुढचे काळजी घेण्याचे काम तर त्यांनीच केले. ” ती विनम्रपणे म्हणाली.                                                                                                         

                             पुढे ते असेच बोलत राहिले. बोलता बोलता अर्धा पाउण तास केव्हा निघून गेला ते दोघांना पण कळले नाही. इतक्यात तिची नजर समोरील घडयाळाकडे गेली.सात वाजले होते.  रूमवर तीची मावशी व मैत्रिणी भेटीस येणार असल्याचे तिला आठवले. “रूमवर मैत्रिण व मावशी भेटीस येणार आहेत.  मला निघायलाच हवे.  बरंय!  काळजी घ्या. जमलं तर येर्इन परत. ” असे म्हणत तीने निरोप घेतला.

           संजयने पण स्मित मुद्रेने हात हलवून निरोप दिला. ती गेल्यावर संजयला आठवले तिने आपल्या बद्दल सर्व विचारले परंतु गप्पांच्या ओघात तिचे नांव व इतर माहिती विचारायची राहूनच गेली.  ती गेल्यावर लगेच आर्इ व भाउ आपली कामे उरकून डबा घेउन आले.  समोर दोन कप व फोडलेला बिस्किटचा पुडा पाहून आर्इने आश्चर्याने विचारले.

                      “काय रे संजय हे दोन कप कोणाचे आणि बिस्किटचा पुडा ? कोणी येउन गेले की काय ?”

                         “अगं हो, ती कालची मुलगी. ” संजय गडबडत कोड्यात म्हणाला.                                                                 

                      “कोणती मुलगी ? नांव काय तिचे ?” आर्इचा प्रतिप्रश्न.

                      “अगं ती ऽ कालची.  तिनेच तर मला या हॉस्पीटलमध्ये दाखल केले.”संजय गोंधळत म्हणाला.           

                     “अरे पण तिचे नाव,गाव,  काय ? काय करते ? कोठे राहते ?” आर्इने एकादमात प्रश्नांची सरबत्ती केली.

                    “ अरे, हो !  गप्पांच्या ओघात हे विसरलो की !” संजय म्हणाला.

                    “पूरता विसरभोळाच रे बाळा तु. ”  आर्इने लाडीक शेरा मारला.

          आज बघता बघता हॉस्पिटल मध्ये येउन आठवडा झाला होता.  जखमा भरत आल्या होत्या, दुखणे पुष्कळ प्रमाणात कमि झाले होते.  एक दोन दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता.  दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती.  दोन तीन भेटी मुळे आपसातील आपलेपणा वाढला होता. भेटीची उत्कंठा लागली होती. तीची मुर्ती डोळ्यासमोरून जात नव्हती. आज त्याचे ऑफिसमधील सहकारी पण येउन भेटून गेलेत. त्यांना सुध्दा त्याला हॉस्पिटल मध्ये कोणी व कसे आणले याची माहिती देउ शकला नाही.  आज त्याने निश्चयच केला होता, जर ती परत आली तर संपूर्ण ओळख करून घ्यायचीच.  त्याचा अंदाज खरा ठरला. संध्याकाळी पाचचे सुमारास रूम चे दार ठोठावले व तो कोण म्हणण्याच्या आतच दरवाजा उघडला व पाहतो तर तीच तरूणी दारात उभी होती.  सुहास्य वदन,  खांद्याला पर्स अडकविलेली‚ एका हातात पुष्पगुच्छ व दुस–या हातात प्लॅस्टिकची कॅरी बॅग.  कॉटवर उठून बसत, स्वत:ला सावरत त्याने तिचे हसतमुखाने स्वागत केले व हातानेच आत येण्याचा इशारा केला.

           आत येताच पुष्पगुच्छ त्याचे हाती देत तिने विचारले,  “ कसे आहात, आज बरे वाटते ना ?”

           पुष्पगुच्छ स्वीकारत आभार प्रदर्शित करीत म्हणाला,  “ धन्यवाद. आज बरंय.” 

                                आज पण तिने सोबत आणलेली कॉफी कपात ओतली व त्याचे हाती दिली. आज कोठलाही संकोच न करता त्याने कॉफीचा स्विकार केला.  कॉफी पीत दोघांच्या गप्पा सुरू झाल्या.  बोलता बोलता ती म्हणाली,  “या हॉस्पिटलच्या वातावरणात राहून तुम्हाला कंटाळा आला असेल नाही? तुमची हरकत नसेल तर बाहेर हॉस्पिटलच्या बागेमध्ये आपण जाऊया का ? तेवढाच थोडासा विरंगुळा. मी डॉक्टरांची परवानगी घेते.” त्याने हास्य वदनाने आपली मुक समति प्रदर्शित केली. डॉक्टरांच्या परवानगीने दोघे बाहेर बागेत बसले.  

                            “पुष्पगुच्छ सुंदर आहे. कॉफीची चव तर काही औरच आहे.  जिभेवर बराच वेळ रेंगाळत असते. आपण आजपर्यंत तीन चार वेळा तरी भेटलो, बोललो.  पण न जाणो तुम्ही आल्यावर मला मनस्वी आनंद का होतो व तुमच्या घडीभरच्या सहवासाने मन का प्रसन्न होते. ” संजय सुरवात करित म्हणाला.  त्याचे बोलणे  मध्येच तोडत अंजली म्हणाली,  “बरं बरं, पुरे झाली स्तुती कॉफीची आणि पुष्पगुच्छाची.  मला अहो जाहो करण्या इतकी मी मोठी नाही.  आणि हो तुम्ही मला अंजु म्हणून नावाने हाक मारली तरी चालेल हो.  नको फॉर्मॅलीटीज.”  “बरं बार्इ, अंजू तर अंजू. अहो जाहो किंवा अंजली असे लांबलचक नाव घ्यायची माझी शक्ति वाचली.  ”

                          संजय आपला निर्धार पक्का करीत म्हणाला, “आजपर्यंत आपण तीन चार वेळा तरी भेटलो, बोललो  पण स्वत:ची ओळख फारशी झालीच नाही. मी संजय  कुलकर्णी. एका नामांकित कंपनीत सिस्टीम इंजिनिअर पदावर दोन महिन्यापुर्वीच रूजू झालो.  नविन नोकरी पूणेशहर देखील माझेसाठी नविन आहे.             अंजू देखील स्वत:ची ओळख करून देत म्हणाली, “माझं नाव अंजली प्रभाकर बर्वे, मुळची नगरची पण गेल्या 2 महिन्यांपासून पुण्यात कोथ्रुडला एका खाजगी कंपनीत अकौंट असिस्टंट म्हणून काम करित आहे.  नगरला माझे आर्इ बाबा आणि लहान भाउ असतात.  बाबा नगरला एका कंपनीत सुपरवायझर आहेत.  लहान भाउ कॉलेजमथ्ये शिकत आहे.  आर्इ गृहिणी आहे.  ”  

            आपल्या आवडी, निवडी, करिअर व इतर गप्पांमध्ये आता रंग भरू लागला होता तसे सहजच त्यांच्यातले अंतर कमि होउ लागले वास्तवाचे भान राखत व त्याचा हात थोडासा दूर करणेचा प्रयत्न करित  अंजली म्हणाली, “हे काय.  हे हॉस्पिटलचे आवार आहे. ”  कळत न कळत झालेला स्पर्श व त्याने प्रथमच अंजू म्हणून मारलेली हाक ऐकून ती मनोमनी हरखली.  तिचे अंग शहारले. इतर थोंडया फार गप्पा झाल्यावर. “बराच वेळ झाला.  आता  निघायला हवे हं !” म्हणत अंजु उठली. गप्पांचा ओघ कायम ठेवत दोघेही रूममध्ये गेले. थोडयावेळाने अंजू निरोप घेउन जायला निघाली.  ती दाराशी जाते न जाते तोच तिच्या कानावर एकेरी हाक आली.  ‘ए अंजू’ उद्या परत येशील ना !  ती हाक ऐकून ती थोडी चक्रावलीच पण स्वत:ला सावरीत “ हो येर्इन की ”असे उत्तर द्यायला विसरली नाही. दोघे एकमेकांच्या प्रेमात केव्हा पडले ते त्यांना पण कळले नाही.  एक अनोळखी माणूस आपल्याला एकेरी नावाने बोलावतो काय व आपण त्याला साद देतो काय हे तिला पण कळले नाही.

            दुसरे दिवशी शनिवारी तिला सुटी असल्यामुळे ती लवकरच हॉस्पिटलमध्ये आली. त्यावेळी त्याची आर्इ देखील तेथेच होती.  तिने आईचा मान अदबिने त्यांना  वाकून नमस्कार केला.  तिची आर्इशी ओळख करून देत संजय म्हणाला, “आर्इ, हीच ती अंजू, अंजली बर्वे.  हीनेच मला मदत केली व हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ” संजय म्हणाला.   

                           संजयने सुरवातीलाच तिला “अंजू”अशी एकेरी मारलेली हाक ऐकून आर्इ चकितच झाली व म्हणाली, “ अरे संजय,  हे काय ऐकतेय मी. ”आर्इच्या प्रतिक्रीयेवर संजय बावरला तर अंजली थोडीशी लाजली च आपला चेहरा दुसरीकडे वळवला.  हे चाणाक्ष आर्इच्या नजरेतून सुटले नाही. संभाषणास सुरवात करित म्हणाली,  मी अंजली बर्वे.  यांना अपघात झाला त्यावेळी मीच तुम्हाला फोन केला होता. ”

                      “सुखी रहा. ” आर्इच्या तोंडून आशिर्वादाचे शब्द बाहेर आले.  तिचे ते विनयशील वागणे व बोलणे ऐकून आर्इ भारावली व तिचे तोंडून सहजच प्रशंसोदगार निघाले. “ छान केलेस गं मुली तु.  तुझे आभार मानावे तेवढे कमिच आहेत. ”

                         “ छे !  यात आभार ते काय मानायचे.  मी फक्त माझे कर्तव्य केले. ” अंजली लीनतेने म्हणाली.

           इतर बोलणी झालेवर तिने परत जातांना वाकून नमस्कार करित आर्इचा निरोप घेतला व रूमवर निघून गेली.

                         “घरी ये गं मुली. ” आर्इने तिला घरी येण्याचे निमंत्रण देत म्हणाली.

                         “हो येर्इन की” निमंत्रण स्विकारत अंजली म्हणाली.

                           ती गेल्यावर आर्इच्या मनात विचार आला.  तिचा विनयशील स्वभाव‚ लीनतेने मॄदु बोलणे‚ नाकी डोळी सुंदर, लांब सडक केस‚ तिला फार आवडले व अशीच सून आपल्याला लाभली तर असा मनात विचार आला.

                          संजयला डिस्चार्ज देउन आज आठ दिवस झालेत.संजय दुपारी जेवण करून निवांत झोपला होता.  आर्इ नुकतीच घरातील कामे उरकून पडली होती.  दारावरची बेल वाजली.  आर्इने दार उघडले व पाहते तर समोर अंजली उभी होती. “ ये ” म्हणत तिने हसत मुखाने तिचे स्वागत केले.  चहा पाणी झाल्यावर बोलण्याच्या ओघात विवाह समस्यां सह अनेक विषय चर्चेत आले. विवाहाचा विषय निघाल्यावर आर्इने तिचे विचार जाणून घेण्याच्या उद्देशाने विचारले, “ काय गं तुझा लग्नाचा विचार आहे की नाही. ” यावर ती थोडी लाजली पण बोलता बोलता सहजच बोलून गेली. पाच सहा महिन्यापूर्वी तीची पत्रिका पुण्यास एका ठिकाणी दाखविली होती.  परंतु न जमल्यामुळे नकार आला. नगरची म्हटल्यावर आर्इच्या एकदम लक्षात आले की,  गेल्या सहा महिन्या पुर्वीच संजयसाठी नगरचे एक स्थळ तिचे बंधु वसंता मार्फत आले होते.  पत्रिका पण आली होती.  नगरलाच एका ज्योतिष्याकडे संजय व तिची पत्रिका दाखविली असता जुळत नसल्याचे सांगितले गेले होते. त्यामुळे त्यावर पुढ काहीच चिचार न करता ती गोष्ट तेथेच संपली होती.  खात्री करणे साठी आर्इने परत तिचे नाव व वडिलांचे नाव विचारले.

                          “बरंय काकू निघते मी आता. बोलण्याच्या भरात वेळ कसा निघुन गेला ते कळलेच नाही.  रूमवर माझी मैत्रिण आली असेल व माझी वाट पहात असेल.  तिच्या बरोबर बाहेर जाण्याचा विचार आहे. ” असे म्हणत ती उठली व जाण्यास निघाली. “जाशील गं नंतर थांब जरा ” असे म्हणत एकाच वेळी आर्इने व संजयने तिला थांबण्याचा आग्रह केला.  त्याच वेळेस तिचा मोबार्इल वाजला.  तिची मैत्रिण मंजूषाचा कॉल होता.

                      “हे बघा तिचाच कॉल आहे.  मला निघायलाच हवे” म्हणत  तिने फोन उचलला व “पंधरा वीस मिनिटात येते गं” उतर देत फोन ठेवला.“येते काकू” म्हणत तिने निरोप घेतला व रस्त्याला लागली.

                     ती गेल्यावर आईने तिचा चुलत भाउ‚ वसंतास फोन करून नगरच्या आलेल्या स्थळाबद्दल चौकशी केली कारण ते स्थळ त्यानेच सुचविले होते.  त्याने दिलेली माहिती व तिने सांगितलेली माहिती तंतोतंत जुळत होती. हीच मुलगी संजयला सांगून आल्याचे तिची खात्री झाली. आठवडया भराने एक संध्याकाळी ती मुद्दामच अंजलीचे रूमवर तिचे भेटीसाठी गेली.  अंजली नुकतीच ऑफिसमधून आली होती.  संजयच्या आर्इला अचानक दारात पाहून ती आश्चर्यचकित झाली.

                       “काकू तुम्ही, या ना!  असे म्हणत हसत मुखाने त्यांचे स्वागत केले.  लगबगीने त्यांना बसावयास खुर्ची पुढे करित म्हणाली, “ या बसा.  मी पाणी आणते हं! ” म्हणत ती पाणी आणावयास गेली. बसल्या बसल्या आर्इची नजर चौफेर फिरत होती.  भाडयाची खोली असून देखिल रूम छान, निट नेटकी, व्यवस्थित सजवून, स्वच्छ ठेवली होती. कोठेही पसारा दिसत नव्हता.  कपडे व्यवस्थित पणे हँगरला अडकवले होते.  कॉटवर स्वच्छ चादर होती.  थोडीशीच पण चहापाण्या पुरतीची असलेली भांडी किचन ओटयावर घासून ठेवली होती. “रूम छान व्यवस्थित स्वच्छ ठेवलीस ग पोरी” आर्इने शेरा मारला.  “स्वच्छतेची कामे करायला कोणी मोलकरीण आहे का? ” आर्इचा प्रश्न हातातील पाण्याचा ग्लास देत ती उतरली, “ तुम्ही खोलीची प्रशंसा केलीत.  धन्यवाद.  मी हे सर्व एकटीच सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी करून जाते.  मोलकरणीची व माझी वेळ कधी जमतच नाही.  बरंय, चहा घेणार की कॉफी?  चहा, कॉफी बरोबर थोडेसे पोहे करू का ?  मी पण आताच घरी आले. तुमच्या बरोबर माझा पण थोडासा नाश्ता होर्इल. ”  अंजलीने आग्रह करित विचारले.

                         “ नको,  काही नको तु पण आताच आलीस.  थकली असशील. बस जरा. अगं! मी इकडे माझ्या मैत्रिणी कडे गेले होते. म्हटले इकडे आलेच आहे तर बघावे डोकावून घरी भेटतेस का.  तिच्या कडे चहा पाणी झालंय.  बस गप्पा मारू या!” “बरं आता नाही तर थोडया वेळाने करते” म्हणत अंजली शेजारी कॉटवर बसली.                                                         

            नेहमी प्रमाणे बोलता बोलता अनेक विषयांवर चर्चा झाली.  आपसात एकमेकां विषयी माहिती पण मिळाली. बोलता बोलता सात कसे वाजले ते दोघींना पण कळले नाही.  अंजलीने त्यांच्यासाठी चहा पोहे केले.  अल्पोपहार झाल्यावर संजयचे आर्इने  “बराच वेळ झाला आता निघायलाच हवे.  संजयची येण्याची वेळ झाली.  तु ये ना परत या रविवारी.  संजयला सुटीच आहे. ”  म्हणत तिला येण्याचे निमंत्रण दिले व काढता पाय घेतला. “तुम्ही पण या परत मला फार आवडले” म्हणत अंजली रस्त्यापर्यंत त्यांना सोडावयास गेली.

 

जाता जाता संजयचे आईने सहजच विचारले “काय गं तुला आमचा संजय कसा वाटला ?” ती अनभिज्ञपणे बोलून गेली, “चांगला आहे.” 

              घरात आर्इच कर्ती असल्याने घरी आल्यावर रात्रीच्या जेवणाच्या वेळी तीने संजयचे मन चाचपडत तिच्या विषयीचे मत जाणून घेत विचारले,“ अरे संजय, मी आज संध्याकाळी अंजलीच्या रूमवर जाउन आले.  मुलगी छान कामसू व विनयशील आहे.  या घराची सून शोभेल.  आपल्या घरात तिला सून करून आणणेचा विचार आहे.  तुला काय वाटते? ”यावर संजयने लाजतच “ठीक आहे.  मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे का?”  म्हणत सकारात्मक उत्तर दिले.  सर्व विचारांती पत्रिका व गुण जुळणे या गोष्टींना फाटा देत तिने नगरला अंजलीचे घरी वसंतमामा करवी प्रस्ताव पाठविला.  अंजलीचे आर्इ वडीलांना मुलीसाठी चांगले सुशिक्षित स्थळाकडून मागणी आल्यामुळे आनंद झाला.  आठ दहा दिवसातच अंजलीचे आर्इ वडील चौकशी करणे व मुलगा पाहण्यासाठी पुण्यास येणार असल्याचा वसंत मामा करवी निरोप आला. ठरल्या प्रमाणे एके दिवशी अंजलीचे आर्इ वडील तिचा मामा व संजयचा मामा पुण्यास आले.  चहा पोह्याचा कार्यक्रम झाला. पत्रिकेच्या विषयाला बगल देत रितसर बोलणी झाली. विनाविलंब उभय पक्षांकडून सहमति झाली.  त्वरेने जवळचा मुहुर्त साधत संजय व अंजलीचा विवाह यथासांग थाटा माटात पार पडला.  सर्वत्र आनंदी आनंद झाला.

              वॄध्दापकाळामुळे नव्वदी ओलांडलेल्या आजीचे शरीर फार थकले होते.  नजर कमि झाली होती, कानाने ऐकूही येत नव्हते.  यामुळे आजी विवाहास उपस्थित नव्हती,  म्हणून विवाह उपरांत दोन तीन महिन्यांनी संजय व अंजली प्रथमच सांगलीला आजीच्या भेटीसाठी गेले.  उभयतांनी आजींचे  वाकून नमस्कार केले. अंजलीची ओळख करून देत, संजय आजीला मोठया आवाजात म्हणाला, “आजी ही माझी बायको अंजली, तुझी सून.”

             यावर त्याच स्वरात अंजली म्हणाली “आधी नाकारलेली पण नंतर स्विकारलेली.” 

                             “अरे केवढया मोठयाने ओरडतात रे, माझ्या तर कानठळ्या बसायची वेळ आली. मी काय तुमच्या सारखी बहिरी आहे काय? मला चांगले ऐकू येतंय म्हटलं अजून ” आजी म्हणाली. संजय व अंजलीच्या नकार स्विकाराच्या संवादावर आजीसह सर्व उपस्थित खळखळून हसले.                                                                                                                                                                    

Go Back

Comment