Please download here !!
प्रकाशन: वसुधा दिवाळी अंक २०१४
आधार
वयाची साठी पार केलेले पांडुतात्या दुपारचे जेवण करून नुकतेच वामकुक्षी घेत पहुडले होते. झोप लागणार तेवढयांत दारावरची बेल वाजली. त्यांची झोपमोड झाली. नाखुशीने व नाइलाजाने ते उजव्या गुडघ्यांवर हात टेकत, भिंतीचा आधार घेत व डोळयावर चष्मा चढवित “अगं आर्इ गं! देवा, परमेश्वरा! असा परमेश्वराचा मनोमनी धावा करित “कोण आलंय आता यावेळी” म्हणत उठले. दाराच्या दुर्बिणीतून कोण आलय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण डोळयांनी असहकार पुकारल्यामुळे चष्मा असून देखिल फारसे काही दिसेना. शेवटी सावधानता बाळगत थरथरत्या हातांनी दाराची साखळी लावली व दार अर्धवट उघडून पाहिले तर, हातात नोटबुक व पेन घेउन सडपातळ अंगाची, परिचारिकेच्या वेशातील, साधारण तीस पस्तीस वर्षीय एक तरूणी दारात उभी असल्याचे दिसले. दार न उघडताच पांडू तात्यांनी प्रश्न केला? “ आपण कोण? काय हवंय?”
स्वत:ला सावरीत प्रसन्न व स्मित मुद्रेने दोन्ही हात जोडीत तरूणी म्हणाली, “नमस्कार काका. मी मानसी फडतरे. येथील प्र्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका. शासनाच्या आरोग्य विभागातर्फे गरोदर माता व बाल संगोपन याचे सर्वेक्षण करण्याच्या हेतूने आलीय. मला थोडीशी माहिती पाहिजे आहे.”
थोडयाशा नाराजीने ‘सकाळी अगर संध्याकाळी उशीरा आले असतात तर बरे झाले असते.’ असे मनाशीच पुटपुटत पांडू तात्यांनी या म्हणत दार उघडले. खुर्चीकडे बोट दाखवित बसण्याचा इशारा करित स्वत: समोरच्या कॉटवर बसते झाले.
“खरे तर मी यावेळी दरवाजा उघडणार नव्हतो, पण आपण सरकारी माणसे. सरकारी कामात अडथळा नको म्हणून दार उघडले. बोला आता काय माहिती पाहिजे? ” पांडू तात्यांनी विचारले.
तात्यांच्या आज्ञेप्रमाणे खुर्चीवर स्थानापन्न होत, त्यांचे धन्यवाद करित, या वेळी येण्याचे प्रयोजन कथन करित तरूणी म्हणाली, “ होय काका. दुपारची वेळ म्हणजे आपल्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांची विश्रांतीची वेळ याची मला कल्पना आहे. पण काय करणार? आम्हाला वेळेचे बंधन आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ चे दरम्यान आमचे दैनंदिन काम सांभाळून किमान १५—२० घरांचे सर्वेक्षण झालेच पाहिजे असा अलिखित दंडक असल्यामुळे नाइलाजास्तव तुमची झोप मोड करावी लागली. माफ करा मला.”
“बरे जाउ देत ते. बोला आता. ” पांडुतात्या विषयाला कलाटणी देत म्हणाले.
“ काका, तुमच्या घरात सध्या कोणी गरोदर स्त्री आहे काय? तसेच पाच वर्षाखालील कोणी लहान बालक आहे काय? त्याला पोलिओ ट्रिपल चे व इतर डोस वेळेवर दिले आहेत का?” एका दमात सर्वप्रश्नांची काकांवर सरबत्ती करित परिचारिकेने विचारले.
बालकाचे नाव काढताच पांडूतात्या क्षणभर स्तब्ध झाले. काहीच बोलेनात. काकांना क्वचित ऐकू आले नसावे किंवा समजले नसावे असे समजून परिचरिकेने पुनरावॄत्ती करित पुन्हा तेच प्रश्न विचारले. कळत न कळत पांडूतात्यांच्या डोळंयाच्या कडा ओलावल्या ते परिचारिकेच्या नजरेतून सुटले नाही. वेळमारून नेण्याच्या बहाणे तात्या म्हणाले “अरे हो मी तुम्हास पाणी विचारायचे पण विसरलो. एक मिनिट बसा हं, मी पाणी आणतो.” असे म्हणत तात्या परत आपल्या दुख–या पाठीला उजव्या हाताचा आधार देत घरात पाणी आणण्यास निघाले.
“नको काका, राहुद्यात पाणी वगैरे तुम्ही येथे बसा.” परिचारिका एवढे बोलेपर्यंत तात्या माजघरात पोचले होते. काही क्षणातच तात्यांनी पाण्याने भरलेला पेला तबकात ठेउन आणला व तिच्या पुढे केला. औपचारिकता सांभाळीत पांडूतात्यांचे धन्यवाद करित परिचारिका म्हणाली, “ काका कशाला एवढा त्रास घेतलात?”
“यात त्रास कसला? घरी येणा—या पाहुण्याचे “अतिथी देवे भव!” या भावनेने स्वागत करणे ही आपली भारतीय संस्कॄती आहे. ती जपलीच पाहिजे ना!” इति तात्या.
पाण्याचा घोट घेत परिचारिका म्हणाली, “काका माझ्या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली मला अजून.” यावर भावविवश झालेल्या तात्यांना भरून आले. डोळयांच्या कडा हातानेच पुसत म्हणाले, “ मी कम नशिबी. माझ्या जिवनांत कसले आले नातू, सुनाचे सूख पोरी.” तात्यांच्या तोंडून मुलीचे नाते जोडत ‘पोरी’ असे निघालेले आपुलकीचे शब्द ऐकून परिचारिका सुखावली. ती जणू तात्यांशी चिरपरिचित व कुटुंब सदस्य असल्या प्रमाणे त्यांचेशी संवाद करू लागली. वाक्य संपताच तात्यांच्या भावनांचा बांध फुटला व हुंदका आला. परिचारिका थोडीशी गोंधळली व म्हणाली “ मी नाही समजले काही. मला तुम्हाला दुखवायचे नव्हते. हे आमचे काम आहे. ” “काका शांत व्हा. तुम्हाला पाणी देउ काय?” असे म्हणत नि:संकोच माजघरात गेली व पेला भरून पाणी काकांच्या हाती दिला. क्षण भराने परिचारिकाने विचारले “ काकू गावी गेल्यात आहेत काय?”
स्वत:ला सावरीत तात्या म्हणाले, “होय गावीच गेलीय पण देवाच्या. कायमची. तरूणपणीच एक छोटासा आजार तिच्या जाण्यास कारणीभूत ठरला. त्यावेळी राजेश माझा एकुलता एक मुलगा जेमतेम ५ वर्षाचा होता. त्याला माझ्या हवाली करित कायमची गेली. ” हे वाक्य संपते न संपते तोच तात्यांना गतआठवणींचा पुन्हा हुंदका फुटला. “ फार प्रेम होते तिचे माझ्यावर” करूणामय व रडवेल्या आवाजात तात्या आठवण काढीत म्हणाले.
“ काका आता तुम्ही मला मुलगी म्हणालात ना ! मग माझं ऐका. घडल्या गोष्टी फारच वार्इट घडल्यात व आयुष्य भराचे दु:ख देउन गेल्यात. याला काही उपाय नाही” परिचारिका समजावणीच्या सुरात म्हणाली. तात्या स्वत:ला सावरीत पुढे आपले दु:ख कथन करते झाले. ”तिच्या जाण्यानंतर मी राजेशला स्वत:ची नोकरी सांभाळीत आर्इचे व वडिलांचे दोघांचे प्रेम देत मोठे केले. त्याला आर्इची उणीव भासू दिली नाही. त्याला काय हवे नको ते सर्व दिले. त्याला सावत्र आर्इचा त्रास नको म्हणून पुनर्विवाहाचा विचार देखिल केला नाही. त्याने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याची हुशारी व कर्तॄत्वाच्या जोरावर त्याला पुण्याला एका चांगल्या कंपनीत अकाउंटंटची नोकरी मिळाली. माझ्या कष्टाचे चीज झाले. नोकरी करित असतांनाच त्याचे त्याच्याच कार्यालयातील एका सुस्वरूप देखण्या व सुशिक्षित तरूणीशी प्रेम जमले. मुलगी चांगल्या सुसंकॄत व सुसंस्कारी घराण्यातील होती. हुशार मनमिळाउ असल्याने मी त्यांचा विवाह लावून दिला. दोघांनी पुण्यास एक फ्लॅट घेतला. ते दोघे पुण्यास तर मी येथे चिपळूणला. दोघांचा संसार सुखात चालू होता. वेळोवेळी तसेच दिवसा आड फोन यायचे. माझी चौकशी करायचे. महिन्या दोन महिन्यांनी दोघे यायचे मला भेटायला. मला पुण्यास आमच्या बरोबर रहायला चला असा सारखा आग्रह करायचे. मी तेथे एक महिना राहिलो देखिल पण मला तेथे काही करमेना. मला हे घर व येथील माझे मित्र मंडळी यांची आठवण यायची. घराचा व मित्रांच्या प्रेमाचा मोह सोडवेना. एक प्रकारे घर व मित्र यांच्यातच मी गुरफटलो होतो. तीन वर्षे त्यांनी सुखाने संसार केला. परमेश्वर कॄपेने त्याचा संसार बहरास येत होता. वेलीवर फुल उमलावे तसे त्यांच्या संसारात एक छानसे गोंडस नाजुक व सुंदर बालक जन्माला आले. आमचा आनंद गगनात मावेना. आम्हास गगन ठेंगणे झाले. त्या छोटयाशा बाळास कोठे ठेउ अन् क़ोठे नको असे झाले. त्याच्या केवळ एका रडण्याच्या आवाजामागे आम्ही सर्वजण त्यास काय झाले म्हणून धावत असू. हळूहळू तो घरात रांगू लागला सर्व घर फिरू लागला. सर्वकाही व्यवस्थित व सुरळीत चालू होते. पण नियतीने माझ्याशी असा खेळ का खेळावा हेच मला समजत नाही. असेच एकदा ते माझी भेट घेउन पुण्यास परत जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला जे घडू नये तेच घडले. माझे सर्वस्व हरवले. त्या अपघातामध्ये मुलगा सुन व नातू तिघे एकावेळेस दगावले. अपघाताची बातमी ऐकताच माझ्या पायाखालची जमिन सरकली. मी पूर्णतया अनाथ झालो. ” बोलता बोलता तात्यांना रडू कोसळले.
काकांची करूण कहानी ऐकताच परिचारिकेचे मन हेलावले. कळत न कळत तिच्या डोळयातून अश्रू गाली ओघळले. त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाली,” कोण म्हणतो तुम्ही अनाथ झालात. तुम्ही स्वत:ला एकटे समजू नका. मी आहेना तुमची मुलगी, मानसी. मी तुमची काळजी घेर्इन. तुम्ही मला केव्हाही बोलवा. जरूर येर्इन. बरंय काका सांभाळा स्वत:ला. मला निघायला हवे. येते मी आता. आरोग्य केद्रात जायला हवे. ” एवढे बोलून मानसीने तात्यांचा निरोप घेतला. तात्यांची करूण कहानी ऐकून मानसीचे स्त्री मन दुखावले गेले होते. संध्याकाळी घरी गेली तरी तिच्या डोळयासमोरून तात्यांचा दु:खी कष्टी चेहरा व त्यांची कहाणी काही केल्या जात नव्हती. तिला जेवण पण गोड लागेना.
सकाळी १०चा सुमार. रस्ता माणसांनी व गाडयांनी पूर्ण भरला होता. कामाची वेळ असल्यामुळे जो तो आपल्या नादात होता. गाडयांची जणू शर्यतच लागली होती. प्रत्येक गाडी एकमेकावर कुरघोडी करित ओव्हरटेक करून पुढे जात होती. कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता. एकमेकाकडे बघण्यास देखिल वेळ नव्हता. तात्या चौकातून पेपर घेउन घराकडे निघाले होते. स्वत:ची काळजी घेत हातवारे करून गाडयांना इशारा करित रस्ता पार करित होते. डोळयाची पापणी लवते न लवते तोपर्यंत काय घडले ते कळण्याच्या आतच चारचाकी वाहनाचा चिर्र ऽऽ असा ब्रेक दाबल्याचा आवाज आला अन् तात्या जमिनीवर कोसळले. त्यांच्या भोवती बघ्यांची गर्दी जमली पण मदतीला कोणीपुढे धजेना. धडक देणारे वाहन केव्हाच गर्दीत मिसळून दिसेनासे झाले होते. एवढयात गर्दीतून एक १५ वर्षीय तरूण पुढे सरसावला. त्याने तात्यांना उचलूनच रस्त्याच्या कडेला नेले. आपल्या पाठीवरील बॅगेतून पाण्याची बाटली काढीत त्यांना पाणी पाजले. पुढील चौकातच प्राथमिक आरोग्य केंद्र होते. रिक्षावाल्याच्या मदतीने दवाखान्यात नेले. दवाखान्याच्या पाय–या संपताच वर उजव्या बाजूच्या खोलीत मानसी खिडकीजवळ बसली होती. काकांना जखमी अवस्थेत पाहताच ती घाबरली. ऋणानुबंधांचे नाते असल्याप्रमाणे तिच्या काळजात धस्स झाले. काळीज धडधडू लागले. क्षणभर काहीच सुचेना. स्वत:ला सावरीत त्वरेने पुढे आली. त्यांना टेबलवर झोपवून ताबडतोब डॉक्टरना घेउन आली. डॉ. नी तपासले. थोडेसे खरचटणे व पायाला लागलेला मुकामार या पलिकडे काही फारसे लागले नव्हते. वेदना शामक गोळया देउन आरामाची गरज असल्याचा सल्ला दिला. मानसीच्या जीवात जीव आला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तात्यांवर इलाज चालू असे पर्यंत त्यांना घेउन आलेला तरूण तेथेच थांबला होता. त्याच्याकडे मानसीची नजर गेली. त्याला पाहताच तिच्या मनात थोडी चलबिचल झाली. का कोणास ठाउक तिचे मन त्या तरूणाकडे आकर्षिले गेले. त्याच्याशी बोलण्या एैवजी काहीतरी पूर्वसंचित असल्याचे वाटले व केवळ ती त्याच्याकडे पाहतच राहिली. तो तरूण देखिल मानसीकडे पाहत राहिला. शेवटी न राहवून मानसीने प्रश्न केला? “तुझे नाव काय ? ” मानसीच्या या प्रश्नाने त्याच्या मनात कारण नसतांना आपल्याला या अपघाताच्या केसमध्ये गोवले जाणार अशी भिती उत्पन्न झाली|त्याने भीत भीतच उत्तर दिले. “मनोज.” पूर्ण नाव मानसीचा प्रतिप्रश्न “ मनोज रमेश फडतरे. ” त्याचे पूर्णनाव ऐकूताच मानसी एक तप मागे भूत काळात गेली. विचार चक्रे गतीने फिरू लागली. हा 12 वर्षापूर्वी आपल्या पासून दुरावलेला आपला मुलगा असल्याचे तिला जाणवले. एवढयात तात्यांना बरे वाटले म्हणून डॉ. नी मानसीला बोलावले. तिची विचार धारा खंडीत झाली. तात्यांना औषधी देउन बाहेर आली. तोपर्यंत तो तरूण तेथेच थांबला होता. तिने परत आपुलकीने त्याला विश्वासात घेउन त्याची सविस्तर चौकशी केली.
तरूण आपली करूण कहाणी कथन करित म्हणाला, “मावशी, मी एक दुर्दैवी तरूण. येथेच बी. ए. च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. ” ‘मावशी’ या त्याच्या तोंडून निघालेल्या शब्दाने तीचे मन सुखावले. तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम व सहानुभुती निर्माण झाली. ती कान देउन त्याची कहाणी ऐकू लागली.
तरूण पुढे बोलता झाला. “मावशी मला माझी आर्इच आठवत नाही. मी तिला कधी पाहिले पण नाही. आमच्या शेजारच्या काकू मला सांगतात, माझे लहान पणी मी दोन वर्षाचा असतांनाच माझी माझ्या आर्इ पासून ताटातूट झालीय. माझे बाबा रमेश फडतरे एका कारखान्यात टर्नरचे काम करित असत. माझे वडील व आर्इ यांच्यात वाद विवाद झाल्याने कोर्टात केस गेली. त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट देण्यापुर्वी कोर्टाने मला प्रश्न केला, “ बाळ तुला केाठे राहावयास आवडेल?” त्यावेळेस माझ्या वडिलांचेबरोबर त्यांची आर्इ कमळा आजी व जनन्नाथ आजोबा दोघे असत. त्यांचे मजवर व माझे त्यांचेवर फार प्रेम होते. भर कोर्टात मी सहजच बालीशपणे सर्वा समक्ष “आजी आजोबां बरोबर” उत्तर दिले. माझे म्हणणे ग्राह्य धरून कोर्टाने तत्सम निकाल दिला तसेच माझे बालवय पाहता महिन्यातून किमान तीन वेळा माझ्या आर्इस मला भेटण्याची परवानगी पण दिली. सुरवातीला काही दिवस माझी आर्इ मला भेटायला यायची पण नंतर नंतर माझे बाबांनी परत तिचेशी भांडण करून तिचे येणे बंद केले. मी एकटाच राहिलो. बाबांना दारूचे व्यसन लागले. व्यसनात असतानाच वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे निधन झाले. कालांतराने आजी व आजोबा पण देवाघरी गेले. नातेवार्इकांनी वारसदार असल्याचे दाखवून घराचा ताबा मिळविला. लहान व असमज असल्यामुळे माझा छळ होउ लागला. एके दिवशी छळास कंटाळून घर सोडले. पोलीसांनी पकडले व मला अनाथालयात भरती केले. घरदार नाती गोती सर्व काही गेले. मी पूर्ण अनाथ झालो.” बोलता बोलता त्याच्या डोळयातून घळघळा आश्रू वाहू लागले. पुढे बोलवेना. त्याने सांगितलेली कहानी तिच्या पूर्व आयुष्यासी पूर्णतया परिचयाची व स्वत:वर बेतलेली.असल्याचे जाणवले. पूर्वेतिहासानुसार हा आपल्या पासून दुरावलेला आपला मुलगा, मनोज असल्याचे जाणवले. त्याला मागे मानेजवळ जन्म खुण असल्याचे तिला आठवले. तिने त्याला जवळ करून मानेजवळ असलेली खूण पाहिली व पूर्ण खात्री झाली. मानसीला गहिवरून आले तिचे डोळे पाण्याने डबडबले. मायेचा पूर आला. त्याच्या डोक्यावर हात फिरवित व प्रेमाने कुरवाळीत गहिवरल्या शब्दात म्हणाली, “बाळा आता तु काही काळजी करू नकोस. आतापासून मीच तुझी आर्इ. तु मजजवळच राहशील. तुझे शिक्षण मी पुरे करिन. तुला या पुढे कोणी मजपासून हिरावणार नाही. ” मनोजला पण गहिवरून आले. तो भावूक झाला व “आर्इ”म्हणतच नकळत तिच्या कुशीत विसावला. मायलेकराची भेट झाली. त्याने हाक मारलेल्या ‘आर्इ’ या शब्दाने ती सुखावली. दोघांना अश्रूंचे बांध फुटले. आर्इची माया काय असते ते त्याला जाणवले.
एव्हाना दुपारचे चार वाजले होते. तात्या स्थिरस्थावर झाले होते. ते स्वत:च उठून बाहेरच्या खोलीत आले. मानसी व मनोज यांची भावनायुक्त भेट पाहून त्यांच्या तोंडून सहज उदगार निघाले “वा! काय छान मायलेकराची जोडी जमलीय !” त्यांच्या या वाक्याने दोघे भानावर आले. डोळयातील आनंदाश्रू पुसत मानसी म्हणाली, “होय काका आज तुमच्या आशीर्वादामुळे मला १२ वर्षापुर्वी मजपासून दुरावलेला माझा मुलगा मिळाला. मी धन्य झाले. हा माझा मुलगा मनोज.” मायलेकराच्या विस्मयचकित भेटीने तात्या पण आनंदले.
दोन्ही हात जोडीत व आकाशाकडे पाहत परमेश्वराचे आभार मानत म्हणाले, “धन्य तो विश्वंभर, अगाध त्याची किमया. अपघाताकारणे मिलन केले माता बालका लिलया”| मुली आज त्या परमेश्वराच्या कॄपेने तुला तुझा मुलगा, तर मनोजला त्याची आर्इ मिळाली. आजपासून तो अनाथालयात नाही, तु सरकारी निवासात नाही तर आपण तिघांनी एकत्र माझे घरात राहुया! एक मेकाला आधार देउया!”
घरी जाता जाता सर्वांनी वाटेवरील मंदिरात श्री. गणेशाचे दर्शन घेतले. देवाला पेढयाचा प्रसाद ठेवला. घरी गेल्यावर तात्यांनी रेडिओचा कान पिळताच सुरेल गाणे कानी आले. “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भार वाहे.”