Menu

पुनरारंभ

199259

युध्द

                 Please Download Here!!

                                                      युध्द

                       रविवारचा दिवस.  सकाळी.  निवांत गरम चहाचे घोट घेत पेपर वाचत होतो. आज रविवार असल्याने सर्व कामे निवांत करायची. पेपर मधील प्रत्येक कॉलम वाचायचा. दहा वाजेच्या नंतर नाश्ता पाणी करून स्नानास जावे. मनसोक्त तास दोन तास स्नान करावे.  दुपारी बारा वाजता गोडाधोडाचे भोजन करून मस्तपैकी दोन तीन तास ताणून द्यावी.   संध्याकाळी उठल्यावर गरम वाफाळलेला चहा व त्या सोबत गरमागरम कांद्याची भजी असावी.  मुड आला तर संध्याकाळी गाडी काढून सहकुटुंब एखाद्या मॉलमध्ये जाउन खरेदी करावी.  रात्रीचे जेवण बाहेरच हॉटेलमध्ये करून परतावे व सुख स्वप्ने पहात निद्राधीन व्हावे.  असा मस्त चंगळवादी बेत करून ठेवला होता.  पण हे जागे पणीचे स्वप्न साकार होर्इल तेव्हाच खरे.  म्हणतात “मॅन प्रपोज अँड गॉड डिस्पोज” दैव देते कर्म नेते तसे माझ्याबाबतीत घडले बघा.

                     स्वयंपाक घरातून सौ. ची थोडीशी भयात्मक व किळसवाणी र्इ  ऽ ऽ ऽ अशी दिर्घ आरोळी आली व दुर्दैवाने सर्व स्वप्न एका क्षणात विरले.  मी घाबरलो.  पेपर बाजूला सारून स्वयंपाक घराकडे धाव घेतली.  सौ. चा तो मर्दानी रूद्रावतारी आक्रमक पवित्रा पाहून अचंभित झालो. किचन ट्रॉलीच्या कप्प्या मध्ये एक टक नजर लावून व हातातील लाटणे उगारलेल्या पविञ्यात उभ्या होत्या.  मनात भय असले तरी शिकार करायचीच निर्धार पक्का होता.  एकंदरीत जवळच कोठे तरी झुरळ, पाल किंवा उंदीर असावा असा अंदाज आला.  सर्वसाधारणपणे फक्त पोळी लाटणे किंवा राग आल्यास आम्ही किंवा चिरंजिवांवर लाटणे उगारलेले पाहिले आहे. पण आज पोळी नाही,  चिरंजिव नाही किंवा प्रेमाने आमच्या वर उगारावे म्हणावे तर ते पण नाही.  मग आज कोणाची शामत आली असा काश्मीर प्रश्ना पेक्षा मोठा गहन प्रश्न आमच्या समोर उभा ठाकला झाला. थोडेसे बिचकत, घाबरत अंगात बळे त्राण आणत धैर्याने विचारता झालो,  “अहेा पोळ्या लाटणे सोडून असा रूद्रावतार का धारण केलात ? तुमच्या विरोधात जाउन तुमच्या संगे वैर धरण्याची कोणाची शामत आली बरं ?” 

                     “ हसा तुम्ही फक्त हसा. चेष्टा करा. इथे माझ्या मेलीवर काय बाका प्रसंग ओढवलाय. मला मदत करायची सोडून तुम्हाला मजाक कशी सूचते कोण जाणे ?” सौ. रागात म्हणाल्या.

                  “ अहो पण झालयं तरी काय? कोणता असा बाका प्रसंग तुमच्या वर आलाय ते तरी सांगा.  न सांगता तुमच्या मनातले ओळखणारे किंवा कळणारे आम्ही मनकवडे नाही.  आम्हास काही कळाल्या शिवाय आम्ही तुमची मदत कशी करू शकणार?  नाही का ? आम्ही धाडसाने विचारले.

                     हातातील लाटणे उगारलेलेच, पदर खोचलेला, बांगडया मागे सरसावलेल्या, डोळे विस्फारलेले तर चेहरा रागाने लालसर झालेला . अशा रणचंडीच्या अवतारात त्यांनी आपला मोर्चा आमच्या कडे वळविला.  क्षणभर आमचीच शामत आली असे आम्हास भासले. रूद्रावतारात तसूभर बदल न करता आमच्या वर आगपाखड करित सौ. गरजल्या,  “एवढेसे मेले पिटुकले ते पण किती उच्छाद माडलाय मेल्याने. ” 

                    आम्ही समजायचे ते समजलो पण उगाच न समजल्याचे सोंग करित विचारते झालो. “आमच्या पाहण्यात, ऐकण्यात अनेक लहान मॊठे प्राणी आलेत पण पिटुकला हा कोणता नविन प्राणी. कधी आला नाही तो.  आणि महत्वाचे तुमच्या उपस्थितीत येथे या स्वयंपाक घरात शिरण्याची हिंमतच कशी झाली त्याची म्हणतो मी. कोण हा पिटुकला ते समजेल काय?” मी जरा अदबीने विचारता झालो.  

                    

                  “ करा चेष्टा करा. अजून चेष्टा करा. इथे माझा मेलीचा जीव चाललाय अन् तुम्हाला मजाक सूचते ? अहो तोच तो मेला पिटुकला उदीर. गेले आठ दिवस नुसता उच्छाद मांडलाय मेल्याने. भाजीची टोपली, चहा साखरेचे डबे, तांदळाचा डबा,  पिठाचा डबा सगळीकडे पुरून उ्रलाय मेला.  रोज सकाळी दोन तास त्याच्या लेंडया आवरण्यात जातात माझे. ” सौ. त्रागा करित म्हणाल्या.

                   सौ. च्या प्रत्येक वाक्यात मेला,  मेली,  मेले शब्द वापरण्याची सवय मला चांगली अवगत आहे.  किंबहुना या शब्दांशिवाय त्यांची वाक्येच पूर्ण होत नाहीत.  धीर गंभीर झालेले वातावरण थोडेसे हलके व्हावे सौ. चा राग व भीती जावी या उद्देशाने बोलता झालो, “अहो, सौ. मेला ना तो पिटुकला!  मग कशाला घाबरता.  सोडा त्याचा नाद व लागा तुमच्या कामाला”.     

                   “ कसला मेला.  चांगला घरभर फिरतोय माझ्या उरावर. ” सौ.  पोट  तिडकेने म्हणाल्या.

                   “ अहो. तुम्हीच तर आता म्हणाला ‘मेला’ अन् परत कसा जिवंत झाला “ मी प्रश्न केला.  

                  “तुम्हाला कळत कसे नाही ‘मेला’ शब्द वापरायची आम्हा बायकांची पध्दत आहे मेली.  गेला आठवडाभर घरात नाचतोय.  तुम्हाला किती वेळा सांगितले याचा बंदोबस्त करा.  पण तुम्हाला मेला वेळच मिळत नाही.  सौ. नी त्रागा व्यक्त केला.

                  “अहो,  प्रिय सौ. मी त्याच्यात लक्ष घालून आज त्याचा बंदाबस्त केला असता हो.  पण काय आज रविवार, आमचा आरामाचा  व विश्रांतीचा दिवस ना!”  मी वेळ मारून नेत म्हणालो.

                   यावर आमच्या सौ.भडकल्याच व फर्मान सोडले,“तुमचा रविवार गेला खड्डयात,  जा झाडू घेउन या आणि आज त्याला स्वर्ग दाखवाच. मला स्वयंपाक करून व माझे आवरून दुपारी महिला मंडळात जायचय. आणि हो आपल्या लाडक्या चिरंजिवांना देखिल घ्या मदतिला. आज कॉलेजला सुटी आहे. त्याला म्हणाव आज मित्र  मैत्रिणींचा गप्पांचा फड जरा बंद ठेवा.

                 आम्ही सहमत होत विचारले, “मला एक सांगा गेला आठवडाभर आपण त्याला घालविण्यासाठी काय काय प्रयत्न केले? म्हणजे ते मी परत करणार नाही व त्यावर वेळ वाया घालविणार नाही”.  

                  “ तुम्हाला मेल एक काम सांगायचे कठीण. ” सौ. वैतागल्या.

                  “मी दुकानातून उंदीर मारण्याचा केक आणतो.  तो घरात सर्वदूर ठेउ.  केव्हातरी तो केक खार्इल व स्वर्गवासी होर्इल.  नंतर आपण त्यास बाहेर फेकून देउ. उगाच त्याच्या मागे काठया, लाठया, झाडू घेउन पळायला नको”   मी उपाय सूचविला.

                  “ते सगळ करून झालय महाराज.  स्वयंपाक घरात किचन ट्रॉली खाली. वेडरूम मध्ये कॉट व कपाटा खाली घरभर सर्व दूर केक ठेवलाय.  पण तो त्याला तोंड लविन तर शपथ. तो महा हुशार आहे.  त्याचा केक आता मला खायची वेळ आली आहे” सौ. म्हणाल्या.

                  “ मग उंदराचा पिंजरा लावू या का ?” माझा दुसरा पर्याय.

                    

                  “अहो तुम्हाला समजत कसे नाही.  पिंजरा एका ठिकाणी लावाल.  तो घरभर फिरतो. त्याच्या साठी काय घरभर 5/6 पिंजरे लावणार काय?  शिवाय तो फार लहान आहे. पिंज¹यातून सहज बाहेर येउ शकेल”.   माझा हा मुद्दा पण सौ.नी मोडीत काढला.  

                  शेवटी मला मेलीलाच मरावं लागणार. किमान मला मदत तरी कराल की नाही ? सौ.चा निर्णयात्मक पश्न.

                “ठीक आहे”.म्हणून आम्ही सहमति दर्शविली. परंतु ‘आजचा रविवार खराब झाला’  स्वगत म्हणालो.

               आमची मनोमनीचे बोल सौ.च्या कानी पडले तशा त्या त्राग्याने आक्रमत होत म्हणाल्या “काय काय बोललात?  तुम्हाला तुमच्या रविवारची पडलीय पण गेले आठवडाभर मी त्या पिटुकल्याला झेलते त्याचे काय? ते काही नाही आज उंदीर हटाव मोहिम राबवायचीच आणी यशस्वी देखिल करायची.”  सौ. नी निर्धार केला.  त्यांच्या निर्धारात्मक बोलण्यापुढे आम्ही बापडे व चिरंजीव काय बोलणार. गुपचुप उभयतांनी सहमति प्रदर्शित केली.  ठरले.  सौ. व आम्ही दोघे अशी तीघांची त्रिसदस्यीय सेना तयार झाली.  सौ. आमच्या कॅप्टन तर आम्ही त्यांचे शिपार्इ. मध्येच चिरंजिवांनी आपली अक्कल पाजळीत कॅप्टन पुढे प्रस्ताव मांडला.  “मम्मीश्री जर आपण स्वयंपाक घरातील सर्व भांडी व डबे डुबे काढुन किचन ओटा व डायनिंग टेबलवर ठेवले तर गनिमास अर्थात् पिटुकल्या उंदरास कोठेच लपण्यास जागा राहणार नाही व युध्दभुमिवर उतरण्याशिवाय त्याचेकडे पर्याय राहणार नाही. पर्यायी आपणास सहजा सहजी शिकार साधता येर्इल. “कल्पना चांगली आहे.” म्हणत मी त्यांचे प्रस्तावास पुष्टी जोडली. पण सहजा सहजी प्रस्तावास मान्यता देतील त्या कॅप्टन कसल्या?

               “धन्य हो चिरंजिव. आणी नंतर ही भांडी परत कोण आवरणार? आपले पिताश्री ? सौ.चा प्रतिप्रश्न. यावर थोडा विचार करून त्यांनीच “कल्पना तशी वार्इट नाही” म्हणत सहमति दर्शविली. कॅप्टनच्या नेतॄत्वाखाली योजना आखली गेली. आमचे हाती झाडू आला, चिरंजिवांचे हाती काठी तर सौ. च्या हाती लाटणे  अशी शस्त्रे आलीत. मी बाहेर टेबल जवळ, चिरंजिव दारात तर  कॅप्टन स्वयंपाक घरात. आम्ही तिघांनी शस्त्रांसहित आप आपल्या जागा सांभाळीत मोर्चे बांधणी केली.

                सौ. सावधानतेचा इशारा देत म्हणाल्या,“ गनिम छोटा, हुषार व चलाख आहे. पापणी लवताच केव्हा काठे पळून जार्इल याचा नेम नाही. सर्वांनी सदैव सज्ज व जागॄत राहिले पाहिजे. त्याची  लपण्याची ठिकाणे उध्वस्त केल्यावर गनिम स्वत: रणांगणात येर्इल व रणांगणात येताच त्याचेवर हल्ला चढवायचा. त्याला पळून जाण्याची संधी मिळता कामा नये. कोणीही आपल्या कामात कुचराई करायची नाही. कोणाला काही शंका.” आम्हा उभय बाप लेकाची विरोधात जाण्याची किंवा प्रतिप्रश्न करण्याची काय मजाल. आम्ही होकार देत नंदी बैला सारख्या माना डोलावल्या.

                 कारवार्इला आरंभ झाला. आम्ही तिघे एका ओळीत उभे राहिलो.  सौ.  स्वयंपाक घरातील एक एक भांडे डबा चिरंजीवांच्या हाती देत होती. चिरंजिव माझे हाती व मी डायनिंग टेबलवर ठेवत होतो.

                             

                कामास उत्साह व हुरूप यावा म्हणून चिरंजिवांनी गाण्यास सुरवात केली.  “साथी हाथ बढाना,  एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना”  “अहो चिरंजिव काम करा. गाणी नंतर म्हणा. ” सौ. नी फटकारले.

               अर्धी अधिक भांडी निघाल्यावर थोडा वेळ थांबून सौ. नी परत सूचना वजा धैर्याचा डोस पाजला.  “ लक्षात ठेवा मी आघाडीला आहे.  घाबरू नका.  धैर्याने काम घ्या. कोणत्याही परिस्थीतीत गनिम पळून जाता कामा नये. गनिम आता केव्हाही बाहेर येउ शकतो.  पतिराज आपण आपले शस्त्र झाडू घेउन सज्ज असावे.             गानिम बाहेर येताच त्यावर तूटून पडावे. त्यास पळण्याची संधी देउ नये.  यदाकदाचित गनिम पळावयास लागला तर (चिरंजिवांना निर्देश करित) चिरंजिव आपण काठीने त्याचा मार्ग रोखावा व मज्जाव करावा.”  सौ.च्या भाषणाने आमच्यात धैर्य आले. आम्हास स्फुरण चढले. आमची छाती अर्धा इंच फुगली.  आमचे मुखी शौर्यगीत आले.  “सौभाग्यवतीच्या शत्रुसंगे युध्द आमचे सुरू,  मारू कींवा हरू”.  “ अहो पतिराज पुरे.  गायनापेक्षा कामाला महत्व द्या. ” म्हणत सौ. नी आम्हास गप केले.

                अटीतटीची वेळआली होती.  सौ. नी भांडे काढण्यास हात घातला तसे स्वत:चा जीव वाचवून दडून बसलेले मूषक महाशयांनी उडी मारली ती थेट सौ. च्या चरणाजवळ.  जणू शरणागति ची याचना करित होते.  आम्ही वेळ न दवडता संधीचा पूरेपूर फायदा घेत सर्व शक्तीनिशी हातातील झाडूने  “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती” म्हणत प्रहार केला.  परंतु मूषक महाशय पळण्यात यशस्वी झाले व प्रहार सौ. च्या पायांवर बसला.  सौ. किंचाळत व विव्हळत आर्इचा धावा करित “ अगं आर्इ गं ऽ ऽ म्हणत खाली बसल्या अन् दु:खातिवेगाने म्हणाल्या, “अहो कसला माझ्यावर पूर्व जन्मीचा सूड उगवताय का? उंदीर सोडून माझ्या पायावरच जोरात मारले की हो ऽऽ!” 

                “ सॉरी सॉरी” म्हणत आम्ही दिलगिरी व्यक्त केली.

                 “काय सॉरी, जा आधी त्या मेल्या उंदराला शोधा कोठे पळाला तो.  पकडा,  मारा. ” सौ. ने आदेश दिला.     

                 “ मम्मा, उंदीर बेडरूम मधे पळाला”.  चिरंजिवांनी वर्दी दिली.

                “ कर्म माझे.  आता काय बेडरूम पण खाली करायचे काय ?” सौ.  कपाळावर हात मारीत म्हणाल्या.

                 एवढयात मूषक महाराज बेडरूम मधून जखमी अर्धमेल्या अवस्थेत बाहेर येत असल्याचे सौ. च्या नजरेस पडले.  तो पहा तिकडे.  पकडा, मारा त्याला. ” सौ. गरजल्या.

                आम्ही तिघे व तो छोटासा एकटा जीव आपला जीव वाचवित पळत होता. मला त्याची दया आली क्षणभर थांबलो ते सौ.च्या ध्यानी आले तसा टोमणा मारत म्हणाल्या, वाह रे ऽ शूर सरदार. बघता काय ? थांबा आरती आणते ओवाळायला.”  सौ.नी आम्हास आव्हान दिले.  आमच्यातला पूरूष जागा झाला.  आम्ही प्रहार करणार तोच चिरंजिव म्हणाले, “ पप्पाश्री तो स्वर्गवासी झालाय.” आमचा पवित्रा पाहून चिरंजिव म्हणाले, “थांबा, पप्पा असेच थांबा.  तुमचा या पवित्र्यातला फोटो घेउया ! “ म्हणत हातातील मोबार्इल सरसावला. 

                                         

                 मी त्यास नकार देत फोटो घेण्याचे प्रयोजन विचारले तसे चिरंजिव म्हणाले, “ थोबाड पुस्तिकावर टाकायचा आहे.” मला काही उमगले नाही. थोबाड पुस्तिका म्हणजे काय  ? विचारता झालो. यावर चिरंजिव उत्तरले “ अहो तेच ते फेस बुक हो. ” 

                   मी नकार दिला तशा सौ. म्हणाल्या  “अहो काढू द्यात की, हल्ली खाताना, पिताना, झोपतांना, काही पण करतांना फोटो काढून फेस बुक वर टाकण्याची पध्दत पडलीय.”  सौ.नी पुष्टी केली.  यावर मी बापडा काय बोलणार.

             “ फार लागले का हो? ” मी दिलासा देत विचारले.

           “अहो पति महाशय,  युध्दात व प्रेमात सर्व माफ असते.” सौ.नी अदबशीर उत्तर दिले.

                विजयाचे विश्लेषण करित आम्ही उत्साहित होत म्हणालो,  “काय प्रहार केलाय म्हणून सांगू?  मूषक एका प्रहारातच यमसदनी. आमचा आनंद फारकाळ न टिकू देता सौ.नी टिप्पणी केली, “हूरळून जायला नको. उंदीर बेडरूम मध्ये पळाला तेव्हा चिरंजिवांनी गनिमाला खिंडीत गाठावे तसे कपाटाच्या कोप­यात गाठून मारले.  चला आता स्वयंपाक घरात.  घर आवरायला मदत करा. ” सौ. च्या टिप्पणीने आमची अर्धा इंच फुगलेली छाती पिन टोचून फुगा फुटावा तशी झाली. आमचा आजचा रविवार खराब झाला व शिकार साधल्याचे श्रेय मात्र चिरंजिवांना मिळाले.

             “आमचं मेलं नशिबच फुटकं.” म्हणताच सौ.आमच्याकडे बघतच राहिल्या.

  

                           

Go Back

Comment