Please Download Here!
पैशाचे पाकीट
घरी आल्यावर मी माझे पैशाचे पाकीट घार्इ गडबडीत नेहमीच्या जागेवर न ठेवता कपाटावर ठेवले. नंतर उचलू म्हटले अन् इतर कामामध्ये विसरलो व तसेच राहिलऺ. कपाटाच्या मागे केव्हा व कसे पडले ते कळलेच नाही. दुसया दिवशी बाहेर जातांना नेहमीच्या ठिकाणी पाहिले परंतु सापडले नाही. मी ञासलो, वैतागलो, चिडलो . सर्व घर धुंडाळले, टेबलाचे ड्रॉवर्स, लाकडी कपाटाचे खाणे पालथे केले, सऺपूर्ण कपाट रिकामे करून पऱत भरले. पण पाकीट कोठे मिळाले नाही. चिरंजिवांवर ओरडलो, सौभाग्यवतीवर चिडलो, “स्वत:च्या वस्तू स्वत: नीट जागेवर ठेवता येत नाहीत का ?” माझेच डायलॉग ऐकून गार झालो.
ध्यानस्थ बसून एकाग्र झालो. बुध्दीला ताण देउन स्मरणशक्ती जागॄत केली, देवाचा धावा पण केला. पण सर्व व्यर्थ. शेवटी शांत थंड डोक्याने विचार केला. कदाचित कपाटाच्या मागे तर पडले नसावे. या अंदाजाने बॅटरीचे झोतात कपाटाच्या मागे अंधा-या अरूंद जागेत शोध घेतला. माझा अंदाज खरा ठरला. आमचे प्रिय पाकीट महाशय अंधारामध्ये निवांतपणे शांतचित्ताने आरामात पहुडल्याचे दिसले. शास्त्रज्ञाला शोध लागल्यावर जेवढा आनंद व्हावा तेवढाच किंबहुना तसूभर जास्त मनस्वी आनंद मला झाला. “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोच भार वाहे. ” या काव्यपंक्तीची प्रचिती आली आणि जणू देवच माझ्या मदतीला धावून आल्याचे भासले.
कपाटाच्या मागे त्या अरूंद अंधा-या जागेत हात घालून पाकीट निघणे शक्यच नव्हते. सौ. च्या 2 डझन साडया, 5/ 6 शालू , 5/6 ड्रेस, चिरंजिवांच्या वजनदार 5/ 6 जिन्स पँट, बुश शर्टस, काही मौल्यवान वस्तू, महत्वाची कागदपत्रे, माझा लग्नातला धड वापरता येत नाही किंवा त्याचेशी प्रतारणा पण करता येत नाही असा जिर्णत्वाकडे झुकलेला एकुलता एक, हँगरला मरे पर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्याप्रमाणे टांगलेला कोट, अशा अनंत वस्तू त्याने आपल्या पोटात सामावून घेतल्या होत्या. एवढेच नव्हे तर भेट वस्तू व काही अवजड सामानही डोक्यावर घेउन आमचे कपाट महाशय आपला अगडबंब, अवजड देह घेउन आपल्याच तो-यात, दिमाखात व दोन्ही हात बांधून रूबाबात उभे होते. त्याचा तो अगडबंब लोखंडी देह माझ्या एकटया कडून सहजा सहजी हलणे अशक्य होते. परंतु मनाचा हिय्या करून शरीरातील सर्व शक्ती एकवटून ते हलविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझे अंगात दहा हत्तीचे बळ आल्यागत झाले. सौ. च्या माहेराहून आंदणात आलेल्या त्या अगडबंब देहाच्या कपाटाच्या इभ्रतीला अर्थात् काचेला जराही धक्का लागणार नाही अथवा त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेत माझा हात पाकीटा पर्यंत पोहचेल अशा बेताने त्याच्या मूळजागेपासून 5 ते 6 इंच हलविण्यात यशस्वी झालो. हे सर्व करतांना मी स्वत:च्या डोक्यामध्ये हेल्मेट घालावयास विसरलो नाही. न जाणो वरून एखादी अवजड वस्तू डोक्यात पडून माझाच कपाळ मोक्ष व्हायचा. अथवा अगडबऺब व अवजड कपाट महाशयाचा तोल जाउन माझ्या अंगावर पडल्यास माझा देह रसवंतीतील रस काढलेल्या ऊसाच्या चिपाडा सारखा चिप्पट व्हायचा. एवढी काळजी घेउन देखिल त्याने चिर्र ऽऽऽ असा आवाज दिलाच. त्याला मी म्हणालॊ, “बाबारे , स्वत:पेक्षा तुझी जास्त काळजी घेउन सरकवले व जरासा कुठे धक्का लागला तर ओरडलास. तुला एवढासा देखिल धक्का सहन होत नाही, एवढया कमजोर दिलाचा असशील असं वाटले नव्हते. ”
आता पाकीट सहजच हस्तगत करता येर्इल म्हणून कमरेत वाकून हात घातला. परंतु सहजा सहजी हाती येर्इल ते पाकीट कसले. माझा अपूरा स्पर्श होताच ते दोन इंच मागे सरकले. मी अजून वाकून ते पकडण्याचा प्रयत्न केला तसे ते अजून दोन इंच मागे अडचणीत सरकले. जस जसा मी त्याला पकडण्याचा करित होतेा तस तसे ते अजून मध्ये सरकत होते. असा आमच्यात खेळ सुरू झाला. मी प्रयत्नांची शिकस्त केली परंतु अयशस्वी ठरलो.
मी घामाघूम झालो. पाठीचा कणा वाकला. अशावेळी परमेश्वराने मला अडचणीतील वस्तू काढण्यासाठी समयोचित वाढणारे प्रसरणीय हात दिले असते तर किती बरे झाले असते. आपली प्रिय वस्तू आपल्या डोळया समोर असून आपण ती घेउ शकत नाही या सारखे दुसरे दु:ख नाही.
“अकल बडी या भैस” या म्हणीची आठवण झाली व एक नामी युक्ती सुचली. आपल्या कडे कपडे वाळत घालायची 4 फुटी काठी असल्याचे लक्षात आले. पण आमची कामवाली कमळाबार्इ काम झाल्यावर वस्तू कधी जागेवर ठेवेल तर शपथ. काठीचा शोध सुरू झाला. सुदैवाने समोरच बाल्कनीच्या कोप-यात खडा पहारा देत असल्याची दॄष्टीस पडली. “ना आव देखा ना ताव”, “नेकी और पुछ पुछ” म्हणत तिला ताबडतोब ताब्यात घेतले.
आता माझ्या अंगात अजून दहा हत्तीचे बळ आले व “मी यशस्वी होणारच” असा विश्वास निर्माण झाला. माझी छाती 2” अधिक फुगली. “अब बचके कहा जाएगा बेटा. अब तुझे मुझसे कोर्इ नही बचा सकता” म्हणत शूर वीरा सारखी छाती फुगवून “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती” हे शौर्यगीत गात काठीच्या शस्ञा सह पाकीटा कडे आगेकूच करित होतो. याच वेळी सौभाग्यवतीची नजर माझ्या कडे गेली. ती म्हणाली “अहो काय करताय काय तुम्ही? अन् असे लढार्इला निघाल्या सारखे कोठे निघालात? थांबा मी ओवाळणीचे ताट घेउन येते ओवाळायला. ” मी त्याकडे दुर्लक्ष करीत जरासा खाली वाकलो तशी पाठीत उसण भरली व अयार्इ ऽऽ आर्इऽ अगं आर्इ गं ऽऽ असा आर्इचा धावा करित ताडकन, उठून उभा राहिलो. माझी ती दयनीय अवस्था बघून सौभाग्यवती म्हणाल्या, “ जमत नाही तर फुकटचा नुस्ता आव कशाला आणता? ” यावर कडी म्हणजे माझेच पाकीट माझेकडे पाहत मला चिडवित छद्मी पणे हसल्याचे जाणवले. मला अजून राग आला. माझा राग अनावर झाला व परत वाकून पाकिटावर काठीचा फटका मारला तसे ते अजून अडगळीत सरकले. शेवटी मनाचा हिय्या केला. एक मोठा श्वास टाकून काही झाले तरी बेहत्तर पण पाकीट मिळवायचेच असा मनाशी पक्का निर्धार करून त्याचे समोर सपशेल साष्टांग लोटांगण घालीत अचूकपणे निशाणा धरीत काठीने पाकीट हळूवार पणे प्रेमाने स्वत:कडे ओढले. हाताच्या अंतरावर येताच उजव्या हाताने हल्ला चढवीत ताबडतोब हस्तगत केले. पाकीट हातात घेउन वेदनेने कळवळत पाठीवर डावा हात ठेउन विजयी मुद्रेने “जितम् जितम्” म्हणत उभा राहिलो. गड सर केल्यावर राजा शिवछत्रपतींना एवढा हर्ष कधी झाला नसेल तेवढा त्यापेक्षा किंचित तसूभर जास्त हर्ष मला झाला.
क्षण भर मनात विचार आला. मला शारीरीक व मानसिक त्रास देणा-या माझ्या प्रिय पाकिटाचा निषेध करावा. परंतु मनकवडे, माझ्या मनातील ओळखणारे, माझ्याशी एकरूप झालेले, माझे प्रिय, पाकीट म्हणाले, “अरे तु काय माझा निषेध करशील? तु माझे शिवाय घराचे बाहेर निघूच शकत नाही? आहे हिम्मत माझे शिवाय बाहेर पडण्याची? मनकवडया पाकीटाचे बोल माझे कानी पडताच मी विस्मय चकित झालो. माझे निर्जीव पाकीट बोलू शकते याचे अप्रूप वाटले. आनंद झाला. नंतर त्याचा व माझा संवाद सुरू झाला.
मी : कां रे , मी तुझ्याविना घराचे बाहेर जाउ शकत नाही तु असे का म्हणतोस?
पाकीट: अरे स्पष्टच आहे. या जगात सध्या पैशाशिवाय काहीच होउ शकत नाही. खिशात पैसा नसला तर कुत्रा विचारत नाही.
रस्त्यावरचा भिकारी म्हणतो, ‘ये माझे शेजारी येउन बस.’ “ येस मनी आवो जॉनी, नो मनी पुछेना कुणी. ही जगाची रीत आहे. पैशाविणा माणसाची किंमत शुन्य आहे.
मी : ते खरंय रे! पण आज पर्यंत मी तुला सांभाळले तुझ्यावर प्रेम केले. अन् आज अचानक तु का रागवलास माझ्यावर? का लपून बसला?
पाकीट : एक कारण असेल तर सांगेन. तु माझ्यावर अन्यायच करित आलास. राग येणार नाही तर काय? मी नसल्या शिवाय माझी किंमत तुला कशी कळणार?
मी : तु माझा जवळचा मित्र तुझ्याशिवाय मी कधीच बाहेर जाउ शकत नाही. एकवेळ बायकोला घरी सोडेन पण तुला सोडणार नाही याची खात्री आहे तुला.
पाकीट : तरी पण अन्याय करतोस माझेवर.
मी : काय अन्याय होतात. सांगशील तरी जरा.
पाकीट : हल्ली च्या जगात विजय कुमार नाव असेल तर त्याला “विकी” म्हणतात. राकेश कुमार नाव असेल तर “रॉकी” म्हणतात. रोशन असले तर “रॉनी” म्हणतात. मला मात्र अजून ‘पाकीट’ या जुनाट नावानेच हाका मारतोस. नव्या जमान्यात राहतोस माहीत आहेना?
मी : मग काय म्हणायचे काय तुला?
पाकीट : “वॅलेट” म्हणायचे. “वॅले ऽ ट.
मी : (तोंड वेडे वाकडॆ करित ) बरं बाबा वॅलेट म्हणेन. अरे , पण तु एक विसरतोस. तुझे आणि पाकीट माराचे ऋणानुबंध. तो तुला केव्हा कसा पटवील, आपल्या जाळ्यात ओढेल अन् तु त्याचा हात धरून केव्हा पळून जाशील याचा नेम नाही. पोलीस देखिल तुझा लवकर शोध घेउ शकत नहीत. मी तुला त्याच्या पासून वाचवितो. तुझे संरक्षण करतो. शिवाय तु कधी पाण्यात पडणार नाहीस तुझा चेहरा मोहरा खराब, विद्रुप होणार नाही याची काळजी घेतो त्याचे काय?
पाकीट : ते तु तुझ्या स्वार्थासाठी करतोस रे ! पाण्यात पडलो तर तुझ्याच नोटा भिजतील. माझ्या पोटात नोटा, तूझे 5/7 क्रेडीटडेबीट कार्डस्, पेट्रो कार्ड, डायरी, बीलं, पावत्या, लायसन्स एवढेच नाही तर बायको पासून लपविलेले प्रेम पञे, जड नाणी कोंबून कोंबून भरतो. माझा श्वास गुदमरतो. तरी मी सर्व सहन करतो. त्याचे जतन करतो. याचा कधी विचार केलास तु?
मी : अरे त्या सर्व माझ्या गरजेच्या वस्तू आहेत. त्या जवळ ठेवाव्याच लागतात.
पाकीट: 5/7 क्रेडीट डेबीट कार्डस् वापरायला तु स्वत:ला काय मोठा धनवान किंवा राजकारणी समजतोस काय? महिन्यातून फक्त एकदाच पगार होतेा. तो पण परस्पर बँकेत खात्यात जमा होतो. मग पाहिजे कशाला इतर बँकेची खाती व त्यांचे कार्डस. त्यातून एखादे कार्ड पडले , हरवले तर नुकसान कोणाचे होणार तुझेच ना! मग बसशील हळहळ करीत.
मी : तुला नाही समजायचे लागतात सर्व इतरांवर इंप्रेशन पाडायला. आज काल पर्यावरणाचा तोल ढासळलाय. झाडे तोडली गेलीत. पाऊस लहरी झालाय.
नोटा छापण्यास कागद लागतो. एक A4 सार्इजचा कागद बनविण्यास एका झाडाची कुर्बानी द्यावी लागते. शिवाय सरकारची पॉलिसी बदलत आहे. पेपरलेस ऑफिस, कॅशलेस वैद्यकिय उपचारासारखे उपक्रम राबविले जात आहेत. मग त्यासाठी कार्डस तर हवेच ना! बँका खैरात वाटल्या प्रमाणे कार्डस वाटतात. सारखे फोन करून कार्ड घेण्यासाठी विविध अमिषे दाखवितात. मग सहजा सहजी मिळालेले कार्ड वापरावयास मिळाले तर बिघडले काय?
पाकीट : मग त्यासाठी एक पुरेकी! एवढे पाच सात कशाला?
मी : बरं बाबा तु म्हणशील तसे. उद्यापासून सर्व कार्डस रद्द करतो व एकच कार्ड पाकिटात ठेवतो. नोटा किंवा नाणी देखिल ठेवत नाही.
पाकीट : वेडा रे ऽ ऽ वेडा. आणि भाजी बाजारात एका 10 रूपया कोथिंबीरीच्या जुडीसाठी भाजीवालीला कार्ड देशील ? ती काय कार्ड स्वार्इप करायचे मशिन घेउन बसलीय?
एवढ्यात बायकोने आवाज दिला, “अहो, पाकीट सापडले ना ! मग निघा ऑफिसला. वेड्या सारखे एकटे काय बडबडताय?
माझ्या प्रिय पत्नीने आणि पाकिटाने मला वेडयात काढले. ते मला आवडले नाही. माझा इगो दुखावला. संताप आला. संतापात पाकीटाची पटकन मान खाली दाबली, त्याला कमरेत मोडले, चेन बंद करून तोंड दाबले व खिशात कोंबले.