Menu

पुनरारंभ

224924

आंदोलन

Please Download Here !!

प्रकाशन : भन्नाट दिवाळी अंक २०१४ 

पुरुस्कृत : भन्नाट दिवाळी अंक २०१४ 

 

आंदोलन

                     मनमाड रेल्वे जंक्शन प्रवाशांनी पूर्ण भरले होते| प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक प्रवासी गाडी उभी होती. मनमाडकडून भुसावळ कडे जाणारी तसेच भुसावळळकडून मुंबर्इ कडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. सर्व साधारण अशीच परिस्थिती भुसावळ स्थानकावर असल्याचे वर्तविण्यात येत होते. कोणतीही गाडी पुढे जार्इना.  मार्गस्थ होर्इना. प्रवासी त्रासले होते. आपसात चर्चा चालू होती.  जो तो आपापल्या परीने तर्क वितर्क करित व कल्पना शक्ती लढवित गाडी न सूटण्याचे कारण एकमेकास सांगत होता.  कुणी म्हणे पुढे ओव्हरहेड वायर तुटली आहे, कुणी म्हणे तारा वाहून नेणारे विजेचे खांब कोसळले आहेत, तर कुणी म्हणे पुढे मालगाडी रेल्वे रूळावरून घसरली आहे.  अशा एक ना अनेक बातम्या स्टेशनवर पसरविल्या जात होत्या. सोबत थोडयाच वेळात मार्ग मोकळा होउन सर्व वाहतूक सुरळीत होर्इल, असे आश्वासित करीत एकमेकास धीरपण दिला जात होता. ध्वनिक्षेपकावरून रेल्वेतर्फे दिेल्या जाणा–या सुखमय प्रवासाच्या शुभेच्छांना तडा गेली होती.  मनमाड स्थानकावरील भार कमि करण्यासाठी काही गाडया नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा स्थानकापर्यंत सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला पण दूर पल्ल्याच्या व अतिजलद गाडयांना मनमाडलाच थांबावे लागले.

       मनमाड स्थानकावरील दूरदर्शन संचावर बोंबाबोंबा वाहिनीवर ब्रेकिंग न्युज झळकली. “जळगावजवळ म्हसावद येथे म्हसावद शिवाराचे हद्दीत म्हशींचे रेल्वे रोको आंदोलन सुरू| भुसावळ नागपूर कडे जाणारी व तिकडून येणारी रेल्वे वाहतूक सेवा ठप्प.” ठळक बातमी पाहून सर्वजणच हबकले. बातमी तशी विक्षिप्त व अविश्वसनीय होती. म्हशींचे रेल्वे रोको आंदोलन ऐकून सर्वच विस्मयचकित झाले. तेवढयात दुसरी ब्रेकिंग न्युज मिळाली. “स्थानीय रेल्वे प्रशासन आंदोलन मोडून काढण्यात असमर्थ. पोलिसांना पाचारण. पोलिसांच्या लाठी हल्ल्याने म्हशी बिथरल्या. आंदोलनास हिंसक वळण. दोन पोलिस कर्मचारी जखमी. जखमीना जवळच्या खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.”

       चॅनलवाल्यांना तर अशा रंजक व प्रक्षोभक बातम्या हव्याच असतात. अशी एकादी बातमी मिळाली की, ताबडतोब त्यांचे प्रतिनिधी कॅमेरामन सहित घटनास्थळी धाव घेतात.  टी. आर. पी. वाढविण्यासाठी तीच ती बातमी उसाच्या चिपाटाप्रमाणे चघळून चघळून चोथा होर्इपर्यंत, प्रेक्षकांना नको नको होर्इपर्यंत दाखवित असतात. प्रेक्षक कंटाळून नको तो टीव्ही नको त्या बातम्या म्हणत नार्इलाजास्तव दूरदर्शन संच बंद करतो. लोकप्रिय बोंबाबोंब वाहिनीने यासंबंधी विशेष बातमी पत्र प्रसारीत केले. आमच्या प्रवासाशी संबंध असल्यामुळे लक्ष देउन ऐकू लागलो. सविस्तर बातमीपत्र सुरू झाले. निवेदिका सांगू लागली.

निवेदिका :  नमस्कार. मी  ब(ड)बडी गप्पामारे. आजच्या या विशेश बातमी पत्रात आपले सहर्ष स्वागत. आजपर्यंत आपण दरवाढ, महागार्इ, पाणीप्रश्न यासमान अनेक कारणांसाठी झालेली व केलेली आंदोलने पाहिलीत ऐकलीत. परंतु आजचे हे चतुष्पाद प्राण्यांनी आपल्या सहका—याच्या प्रति दाखविलेल्या उत्कट भावनेप्रति केलेले आगळे वेगळे आंदोलन. जळगाव लगत, म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ, म्हसावद शिवारात काल दुपारी नागपूरकडे जाणा–या नागपूर एक्सप्रेसच्या धक्क्याने एक म्हैस व तिचे पारडू दोघांचा जागीच मॄत्यु झाला. याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा व आसपासच्या परिसरातील शेकडो म्हशी, रेडे कळपा कळपाने जमा झाले व म्हसावद स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर ठाण मांडून ठिय्या आंदोलन करून रेल्वे वाहतूक बंद पाडली. स्थानीय रेल्वे प्रशासनाने सर्व म्हशीना व रेडयांना रूळावरून उठविण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या लाठीमाराने म्हशी बिथरल्या, सैरावैरा झाल्या. आक्रमक होत त्यांनी पोलिसांवर प्रतिहल्ला चढविला. म्हशीच्या आक्रमतेपुढे पोलिस हतबल झाले व त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.  स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळतांना दोन पोलिस कर्मचारी अडखळून पडले व किरकोळ रित्या जखमी झालेत. त्यांना एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. दोघांची प्रकॄति स्थिरस्थावर असल्याचे रूग्णालयाचे सूत्रांकडून सांगण्यात येते. या संदर्भात आमचे प्रतिनिधी श्री. उनाडके घटनास्थळी उपस्थित आहेत. आपण त्यांचे कडून सद्य परिस्थितीचा आढावा घेउया! व तेथील परिस्थिती जाणून घेउया!

         हॅलो  ऽ उनाडके,, आता आपण कोठे आहात?  तेथे काय घटना घडली व तेथील परिस्थिती आता कशी आहे?”  …………

        दूरदर्शनच्या पडद्यावर उनाडके एकटक कॅमे–या कडे पहात उभे असलेले दिसतात.  त्यांच्याकडून काही प्रत्युत्तर मिळत नाही. तसा निवेदिकेने परत एकदा आवाज दिला.

ब(ड)बडी :   हॅलो ऽ उनाडके,, आता आपण कोठे आहात? तेथे काय घटना घडली व तेथील परिस्थिती आता कशी आहे?   ………… (असा दोन वेळा आवाज देउन प्रतिउत्तर न आल्याने) माफ करा.  उनाडकेंशी आपला संपर्क होउ शकत नाही. आपण त्यांच्या संपर्कात राहू या.

          काही क्षणात उनाडके दूरदर्शनचे पडद्यावर उजव्या हातात मार्इक व डाव्या हाताने कानातील हेड फोन वर हात ठेवित ब(ड)बडीचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत असल्याचे दिसतात. ब(ड)बडी चा परत तोच प्रश्न. 

 ब(ड)बडी :  हॅलो ऽ उनाडके,, आता आपण कोठे आहात? तेथे काय घटना घडली व तेथील परिस्थिती आता कशी आहे?   …………  

उनाडके : ब(ड)बडी, आता मी जळगाव च्या अलिकडे म्हसावद रेल्वे स्टेशनपासून साधारण एक किलो मिटर अंतरावर (रेल्वे रूळाकडे बोट दाखवित) घटना घडलेल्या घटना स्थळी आहे. अजून इथल्या परिस्थिती मध्ये फारशी सुधारणा नाही. रेल्वे रूळावर काही अंतराने म्हशीचे कळप ठाण मांडून बसलेले दिसून येत आहेत. (कॅमेरामन रूळावरील म्हशीकडे कॅमेरा नेतो व तेथील दॄश्य दाखवितो.) म्हशी शांतपणे बसून रवंथ करित आहेत.  ते रेल्वे मार्ग सोडण्यास तयार नाहीत.  या संदर्भात येथील प्रत्यक्षदशी॔ स्थानिक लोकांकडून समजते की, काल दुपारी 12चे सुमारास एक म्हैस व तिचे पारडू (बोट दर्शवित) पलिकडच्या शिवारातून अलिकडच्या शिवारात रेल्वे रूळ ओलांडून येत असतांना नागपूर कडे जाणा–या रेल्वेचा त्यांना धक्का लागला दोहोंचा जागीच मॄत्यु झाला. ……… ब(ड)बडी.

 ब(ड)बडी : स्थानीय रेल्वे प्रशासनाने यावर काय उपाय केलेत व कितपत यशस्वी झालेत? ……………

            परत एकदा संपर्क तुटतो व पडद्यावर एकही शब्द न बोलणारे उनाडके नुसते उभे असलेले दिसतात.  काही क्षणात संपर्क प्रस्थापित झाल्यावर परत उजव्या हातात मार्इक व डाव्या हाताने कानातील हेड फोन वर हात ठेवित.

उनाडके : सुरवातीला काही म्हशी व रेडे रेल्वे मार्गाजवळ आलेत व बसले. कालांतराने म्हशीचे व रेडयाचे कळपचे कळप इतरत्र ठिकाणाहून येथे दाखल झाले व सर्वांनी मिळून रेल्वे रूळाचा ताबा घेतला. रेल्वे प्रशासनाने स्थानीय लोकांच्या मदतीने म्हशींना रेल्वे मार्गावरून हुसकावण्याचा प्रयत्न केला.  परंतु काही फरक न पडल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.  पोलिसांनी सौम्यसा लाठीमार करून त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. पोलीसांच्या लाठीमारामुळे म्हशी बिथरल्या व सैरावैरा झाल्यात.  त्यांनी पोलिसांवर प्रतिहल्ला चढविला. स्वत:चा जीव वाचविण्या पळतांना दोन पोलिस कर्मचारी अडखळून पडले व किरकोळरित्या जखमी झालेत. त्यांना जवळच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून रूग्णालयाच्या सूत्रांनुसार त्यांची प्रकॄती स्थिर असल्याचे समजते. ………… ब(ड)बडी.

ब(ड)बडी  : मॄत म्हैस व पारडू कोणाचे आहे? त्यांची काय प्रतिक्रीया?

नेहमीप्रमाणे कानातील हेडफोनवर डावा हात ठेवित.

उनाडके : मॄत म्हशीचा मालक कोण आहे याचा अजून तपास लागला नाही………  ब(ड)बडी.

ब(ड)बडी  : यावर अजून काही भाष्य करता येर्इल काय?

उनाडके : हे म्हशींचे, अबोल प्राण्यांचे आंदोलन असल्यामुळे केवळ चित्रिकरणाशिवाय कोणाशी भाष्य करता येत नाही व यासंबंधी कोणाशी संपर्क करणे शक्य नाही ………… ब(ड)बडी.

       ब(ड)बडी व उनाडके यांच्यातील संभाषण असेच चालू असतांनाच घटनास्थळी म्हशींचा नेता रेडा अचानक बोलू लागला. आपल्या घोग–या आवाजात म्हणाला, “अरे वार्ताहर मित्रांनो नुसतेच शुटींग काय करता काही बोला. काही विचारा ना!”

             रेडा बोलत असल्याचे पाहून सर्व वार्ताहर प्रतिनिधी व कॅमेरामन क्षणभर गोंधळले. त्यांचा विश्वास बसेना.  एक पत्रकार वार्ताहर दुस–याला विचारता झाला. “तुम्ही काय ऐकलं का गडया?”

दुसरा पत्रकार “व्हय की. पण माझा माझ्या कानांवर पण विश्वास बसेना बघा.”

             रेडा बोलू लागला. ही बातमी वा–यासारखी पंचक्रेाशीत पसरली. आसपासच्या महिला त्याला संत श्री. ज्ञानेश्वर महाराजांचा रेडा समजून ओवाळणीची ताटे घेउन ओवाळण्यासाठी आली. एकच गडबड गोंधळ उडाला. थेट प्रक्षेपण दाखविण्यासाठी कॅमेरे सरसावले.  वाहिनीचे प्रतिनिधी व वार्ताहरांनी रेकॉर्डिंगसाठी अंतर ठेउन घाबरतच मार्इक पुढे केलेत.  न जाणो महाराज घाबरले संतापले अन् हल्ला केला तर पळता भुर्इ थोडी होर्इल.

रेडा : (घोग–या आवाजात) मित्रांनो आश्चर्य करू नका. मीच बोलतोय. या म्हशींचा प्रतिनिधी. संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वरांनी हजारो वर्षापूर्वी आमच्या पूर्वजाकडून वेद मंत्र म्हणून घेतलेत विसरलेत का? आमचे पूर्वज जर वेद मंत्र म्हणू शकतात तर मी बोललो यात आश्चर्य करण्यासारखे काही नसावे. या शिवाय काही दशकापूर्वी पू. लं. ची म्हैस म्हणून आमच्यातीलच एक म्हैस प्रसिध्दीस आली होती ना? मग या आजच्या युगात आम्ही पण आमच्यावरील होत असलेल्या अन्यायासाठी आंदोलन करून बोललो व प्रसिध्दी मिळविली यात नवल करण्यासारखे ते काय? रेडा एवढे बोलून श्वास घेतो न घेतो तोच आजुबाजूच्या म्हशींनी आलाप धरून आपल्या घोग–या आवाजात गावयास सुरवात केली. “काय सांगू देवा ज्ञानेशाची मात वेद म्हैशामुखी बोलविले ऽ वेद म्हैशामुखी बोलविले ऽऽ”

रेडा : (त्यांचे अंगावर ओरडत) ए गप बसा. मोठया गायिका आल्यात.

त्यांच्यातील एक म्हैस: महाराज, आपण वेद म्हणालात मग आम्ही गायलो तर काय झाले आज आम्ही भक्ती गीत गावू उद्या आपली भावी पिढी रॉक गीत गाणार नाहीतं कशावरून.

रेडा : बरं बरं पूरे झाले तुमचे शहाणपण.  आज आपण येथे कशासाठी बसलो आहोत ते तरी या मान्सांना कळू देत की.

उनाडके : बोला महाराज. आपण हे ठिय्या आंदोलन कशासाठी करता आहात व यातून काय साध्य करू इच्छिता?

रेडा : (खाकरून घसा साफ करित) मित्रांनो इथे ज्या गावाच्या शिवारात काल आमच्यातील एक म्हशीचे  तिच्या पारडासह अपघाती निधन झाले ते “ म्हसावदगाव." या गावाशी आमचे नाम साधम्य॔ असल्यामुळे, अशा ठिकाणी ही दुर्घटना घडणे ही दु:खदायक व गंभीर बाब आहे. शेतं, शिवार, बांध व रानमाळ हे आमचे चरण्याचे हक्काचे स्थान आहे व रानमाळातून रेल्वे मार्ग जाणे म्हणजे रेल्वेने केलेले अतिक्रमण आहे. आमच्याच हद्दीत आमच्यावर होत असलेला घात म्हणजे आमचेवर होणारा अन्याय आहे.  

उनाडके : महाराज ही दुर्दैवी घटना आहे यात शंकाच नाही. आपल्या या आंदोलनात अजून कोणती संघटना अथवा संस्था सामील आहे काय किंवा कोणाचा पाठिंबा आहे काय? 

रेडा: होय आहे की. ‘गाबै(गाय, बैल) संघटना पण हल्ली शेतीची कामे चालू असल्यामुळे ते प्रत्यक्षरित्या सामील होउ शकले नाहीत.  नंतर ‘शेबो (शेळी, बोकड) संघटना तसेच ‘मेंमें (मेंढी, मेंढा) मवाळ संघटना याशिवाय  ‘गेंझे(गेंडा, झेब्रा) वन्य प्राणी संघटना तसेच ‘वाह’(वाघ, हत्ती) बलशाली संघटना. या सर्व संघटनांनी आमच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.

उनाडके : महाराज या दुर्घटनेनंतर आपले विचार काय किंवा या बाबत आपण काय सांगू शकता.

रेडा : माणूस हा बुध्दीवादी हुशार व स्वार्थी प्राणी आहे. जेथे रेल्वे मार्गात नद्या नाले आडवे आलेत तेथे, पाणी गरजेचे असल्यामुळे पाण्याचा प्रवाह न बदलता आपल्या सोयीसाठी, नदी नाल्यांवर छोटे मोठे पूल बांधून रेल्वे पार केली.  मग जिथे रानमाळावर शेताच्या कडेला आमच्या सारखे प्राणी चरतात तेथे काही न विचार करता अतिक्रमण करित शेतातून रानमाळातून रेल्वे नेली. हा आमच्यावरील सरासर अन्याय आहे.      

उनाडके : महाराज  या आंदोलनाचे पुढचे पाउल काय?                            

रेडा : आम्ही चार पायाचे अबोल मुके प्राणी.  आमच्यावर झालेला अन्याय केवळ दूर दर्शनच्या विविध वाहिन्या मार्फत वुध्दीवादी मानसाच्या नजरेस आणून द्यावा हाच उद्देश. आमच्या या आंदोलनानंतर बुध्दीवादी माणुस जागा होर्इल व आमचा विचार करेल अशी प्रामणिक अपेक्षा. यावर आम्ही आमचे आंदोलन समाप्त करित असल्याचे जाहिर करतो.

उनाडके : धन्यवाद महाराज. (हर्षोल्हासाने टाळया वाजवित) अरे! आंदोलन संपले रे संपले! समाप्ती प्रीत्यर्थ पेढे वाटा बर्फी वाटा.

महाराज :( उनाडकेंच्या बोलण्यात हस्तक्षेप करित) वा रे मान्सा आमचेच गहू अन आम्हालाच जेवू.

उनाडके : (आश्चर्य करित )म्हणजे. मला नाही उमगले महाराज.

रेडा : पेढा बर्फी आमच्याच दुधाने बनवतात ना!  म्हणजे आमचेच गहू अन आम्हालाच जेवू नाही का? अरे, आमचा चारा खाल्ल्याचे समजले पण कडबा, कुट्टी, सरकी, ढेप तर शिल्लक आहेच ना! कडबा, कुट्टी, सरकी, ढेप आणा.

उनाडके : ठिक आहे महाराज. माफी असावी|(पडद्याकडे पाहत) तर अशा रीतीने आजचे हे अनोखे आंदोलन समाप्तीची घोषणा झालेली आहे. बोंबाबोंब वाहिनी साठी कॅमेरामन टवाळके सह, मी प्रतिनिधी उनाडके   ……………ब(ड)बडी.

ब(ड)बडी: अशा प्रकारे म्हशींचे रेल्वे रोको आंदोलन संपुष्टात आले आहे. थोडयाच वेळात रेल्वे वाहतूक पुन्हा पुर्ववत सुरळीत चालू होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आपले आजचे हे विशेष बातमी पत्र येथेच संपवते. आपण येथेच थांबू यात.  “करत रहा बोंबाबोब, बघत रहा बोंबाबोंब.” नमस्कार.  

       बातमी पत्र संपते न संपते तोच आमच्या गाडीला हिरवा दिवा मिळाला. गार्डने शिटी मारीत हिरवा झेंडा फडकविला. स्टेशनवर उदघोषणा झाली “भुसावल की ओर जानेवाली भुसावल सवारी गाडी कुछ ही क्षणोमे प्लॅटफॉर्म नं. 2 से रवाना होगी. सभी यात्रीयोंको मंगलमय यात्रा की शुभकामना.” धावत पळत जाउन गाडी पकडली व मी माझ्या आसनावर आसनस्थ झालो.  खिडकीतून पळती झाडे, डोंगर, दर्या पाहत आनंद घेत पुढच्या प्रवासाला लागलो.                                 

Go Back

Comment